प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?

    • Author, शताली शेडमाके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"माझ्या वडिलांची विमानात बसण्याची खूप इच्छा होती. पण त्यांना कधी बसता आलं नाही. पण मृत्यूनंतर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्या वडिलांच्या कलबंडावर मी हे हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी जात आहे."

कलबंडावर (स्मृतिस्तंभावर ) हेलिकॉप्टर घेऊन जात असणाऱ्या व्यक्तीने मला हे सांगितलं.

आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये कलबंडावर म्हणजेच स्मृतिस्तंभावर अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात.

वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मृत व्यक्तींचं स्मरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती परंपरा आहेत. सर्व जातिधर्मात आपल्या पूर्वजांची आठवण ठेवली जाते.

आदिवासी संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून दगडाचे स्तंभ उभारले जातात. हे स्मृतिस्तंभ आदिम संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील माडिया-गोंड समाजात व्यक्तीच्या मृत्यूनंतर दगडांचे खांब उभारून त्यावर विविध कलाकृतींच्या माध्यमातून पूर्वजांचे स्मरण करण्याची विशिष्ट परंपरा आहे.

या स्मृतिखांबांना माडिया भाषेत कलबंडा, बडांग उरसाना तर गोंडीमध्ये उरस्कल, कोटेह कल असं म्हणतात.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची तालुक्यातील गावा-गावांत मोठ्या प्रमाणात हे स्मृतिस्तंभ पाहायला मिळतात.

या स्तंभांची उंची एक फुटापासून तर 10 ते 12 फुटांपर्यंतही असते.

प्रथेचा नेमका अर्थ काय?

आदिवासी समाजात व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत शरीराला माती दिली जाते. मातीचं शरीर मातीमध्ये मिसळलं गेलं अशी भावना त्यामागे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागांत मृत व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त दगडी स्तंभ उभारले जातात. ही परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे.

हे दगडरुपी स्तंभ व्यक्तीच्या वयानुसार लहान-मोठे असतात, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीसाठी मोठा दगड तर लहान मुलांसाठी लहान दगड लावतात. तसेच त्या व्यक्तीला समाजात मोठा मान असेल तर त्यांच्यासाठी तितकाच मोठा स्तंभ उभारतात.

याबाबत माहिती देताना माडिया समाजाचे पहिले ॲडव्होकेट लालसु सोमा नोगोटी सांगतात, "मृत व्यक्ती पुरुष असेल तर उंच दगड आणि महिला असेल तर सपाट दगड ठेवतात. परंतु, काही ठिकाणी महिलांसाठी उंच दगडही उभारतात. मृत व्यक्तीचं समाजातील कार्य, योगदान जितकं जास्त असेल त्यांचा स्मृतिस्तंभ तितकाच मोठा असतो."

कलबंडा उभारल्यानंतर सदर व्यक्तीच्या सर्व वस्तू तिथेच ठेवल्या जातात. यात त्याच्या वापरातील कपडे, खाट, खुर्ची, ताट-वाटी, सायकल, छत्री इत्यादी. त्या स्तंभाजवळच टाकून दिल्या जातात. तसेच, जर ती व्यक्ती तंबाखू खाणारी असेल तर तंबाखूची डबी, थोडीशी दारु या गोष्टी तेथे ठेवतात.

लालसु नोगोटी पुढे म्हणाले, "कलबंडावर व्यक्तीची जन्मतारीख आणि मृत्यूदिन लिहिण्यात येतं. जुन्या कलबंडांवर तारखा आढळून येत नाहीत. कलबंडावर त्या व्यक्तीच्या आवडीची वस्तू किंवा प्राणी यांच्या लाकडी प्रतिकृती ठेवल्या जातात. काही कलबंडावर लाकडी धनुष्य-बाण,चाकू, तलवार, बंदुक, हेलिकॉप्टरही दिसून येतात. मृत्यूनंतर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा अशी भावना यामागे असते."

मृत व्यक्तीला पुरलेली जागा म्हणजेच समाधी आणि स्मृतिस्तंभ वेगवेगळ्या ठिकाणी असतात. गावातील प्रत्येक कुटुंबाचं एक कलबंडाचं स्थान असतं जिथे घरातील प्रत्येक मृत व्यक्तीचा कलबंडा उभारलेला असतो. ते एका रांगेत वा वर्तुळाकार आकारात उभारलेले दिसतात, असंही नोगोटी यांनी सांगितलं.

विविध राज्यात आढळतात स्मृतिस्तंभ

महाराष्ट्रप्रमाणेच छत्तीसगढ, आंध्र-प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्येही हे स्मृतिखांब आढळून येतात. आसाम आणि काश्मिरमध्येही हे स्मृतिस्तंभ आढळून येतात.

याबाबत बोलताना गोंडवाना विद्यापीठातून गोंडी लोकसंस्कृतीवर पीएचडी करत असलेले शिक्षक नंदकिशोर नैताम म्हणाले, "महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात जुनापाणी येथे अनेक शिळावर्तुळे आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी शिळावर्तुळे, स्मृतिस्तंभ पाहायला मिळतात. विविध राज्यांत यांना वेगवेगळी नावे आहेत. पत्थलगडी, महापाषाण, शिलाप्रकोष्ठ, शिलास्तंभ (Menhir), शिळावर्तुळे तर इंग्रजीत मेगालिथ (Megalith) असं म्हणतात."

नैताम सांगतात, "आदिवासी भाषांमध्ये कोटेहकल, बडांग उरसाना, बडांग तासना, हातूर बंडा, हत्तुरकल, उरस्कल, कलबंडा, गाता पाखना अशी नानाविध नावे आहेत. हे स्मृतिस्तंभ महापाषाण युगीन असल्याने ज्या-ज्या भागात कोयतूर लोक (आदिम समूह) आहेत त्या-त्या भागात हे स्मृतिस्तंभ मोठ्या प्रमाणात दिसतात."

ही परंपरा का सुरू झाली?

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीर सोडून निघून जात असली तरी निसर्गात तिचा वास असतो. त्या आत्मासाठी कलबंडा उभारले जातात आणि त्याच्या सर्व वस्तू देखील तेथेच ठेवतात.

याबाबत माहिती देताना नंदकिशोर नैताम सांगतात, "व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ हा दगड उभारला जातो. मृत व्यक्तीची स्मृती नेहमीसाठी राहावी. भविष्यातील पिढीला आपल्या वंशातील व्यक्तीची माहिती त्याद्वारे होत राहावी, असा यामागचा उद्देश आहे. गावात वेगवेगळ्या गोत्रांचे वेगवेगळे उरस्कल स्थान असतात."

भामरागड तालुक्यातील काही गावातील स्मृतिस्तंभ हे जवळपास 300-400 वर्ष जुने आहेत. तर, पुरसालगोंदी या गावात जवळपास 20 फुट उंचीचा स्मृतिस्तंभ आढळून आल्याचं नैताम यांनी सांगितलं.

तर, भामरागड तालुक्यातील गोंगवड गावच्या जानो शंकर मडकामी म्हणाल्या, "माणूस मेल्यानंतर दिनाल्क (कलबंडा उभारण्याचा विधी) करुन कलबंडा लावला नाही तर ती व्यक्ती रुसते मग कुटुंबातील लोक आजारी पडतात. म्हणून दिनाल्क करावाच लागतो, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे."

"दिनाल्क करून कलबंडा लावताना त्या व्यक्तीचे कपडे आणि वापरातील साहित्य तिथेच टाकतात. त्यांचे कपडे आपल्यासाठी उपयोगाचे नाहीत. माझे कपडे मला नाही दिले, असं त्या व्यक्तीच्या आत्म्याला वाटायला नको, म्हणून त्याच्या सर्व वस्तू तिथेच टाकून देतात," मडकामी सांगतात.

दगडाच्या स्तंभावर पांढरा कापड पांघरतात. तसेच सुरण कांदा, तांदूळ, पैसे आणि मृत व्यक्ती तंबाखू किंवा दारू पित असेल तर तर त्या स्तंभ जवळ दारु सुध्दा ठेवतात.

कलबंडावर लाकडी हेलीकॉप्टर, पक्षी, प्राण्याची शिंग, चाकू, तीरकामठा बनवून घ्यावा लागतो, ते तयार करणाऱ्यालाही एक कोंबडा आणि बाटलीभर दारू द्यावी लागते.

लग्नात जितका खर्च होतो तितकाच खर्च या कार्यक्रमात होतो, असंही जानो मडकामी यांनी सांगितलं.

छत्तीसगढच्या बस्तर भागातील गोंड लोक मृत्युनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन आत्मा असतात. जीवंत आत्मा आणि दुसरी सावली.

मृत्यूनंतर जीवंत आत्मा निसर्गशक्तीत विलीन होते, तर सावली भरकटत असते, ती घरात प्रवेश करून कोणाला हानी पोहचवू नये, तसेच, पूर्वजांच्या सानिध्यात राहावी, या दृष्टीने कलबंडा उभारले जातात.

मृत्यूपश्चात ही मंडळी लोकांच्या नैतिक वर्तनावर लक्ष ठेवते आणि आदिवासी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करते, अशी मान्यता आहे.

बस्तरमधील लाकडी उरस्कल

गडचिरोली जिल्ह्यातील स्मृतिस्तंभ हे दगडाचे असतात. तर, शेजारी राज्य छत्तीसगडच्या बस्तर भागात दगडांसह लाकडाचे स्मृतिस्तंभही उभारलेले दिसतात. या लाकडी स्मृतिस्तंभांवर सुंदर कोरीवकाम केलेलं असतं. तर, वरती लाकडापासून तयार केलेले पक्षी, प्राण्यांची शिंगं, धनुष्यबाण इत्यादी लावलेले असतात.

ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ वेरियर एल्विन यांनी त्यांच्या 'मुरिया अँड देअर गोटुल' या पुस्तकात बस्तरमधील स्मृतिस्तंभांच्या कलात्मक आणि धार्मिक महत्त्वाची नोंद केली आहे.

एल्विन यांच्या पुस्तकातील माहितीनुसार, उरस्कल हे मृत व्यक्तीच्या प्रतीकात्मक रूपाचं प्रतीक आहे, जे आपल्या कुटुंबाचं, कुळाचं प्रतिनिधित्व करतात. या स्तंभाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची आठवण कायम राहते तसेच ती समुहाचं रक्षणदेखील करते.

तर, ऑस्ट्रियन मानववंशशास्त्रज्ञ क्रिस्टोफ फॉन फ्युरर-हैमेंडॉर्फ यांनी 1945 लासी सादर केलेल्या त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ मेगालिथिक कल्चर ऑफ मिडल इंडिया' या शोधनिबंधात बस्तरच्या स्मृतिस्तंभाची परंपरा आणि ईशान्य भारत व आग्नेय आशियाई जमातींच्या प्रथांमध्ये साम्य असल्याचं नमूद केलं. त्यांच्या शोधकार्याची नोंद विविध शोधनिबंधात आहे.

तसेच, ही परंपरा कुळाच्या सामूहिक स्मृती जतन करण्याचं माध्यम असून ही कृती समाजिक एकात्मता आणि सांप्रदायिक ओळख बळकट करणारी महत्वपूर्ण क्रिया असल्याचं म्हटलंय.

कलबंडा, उरस्कल उभारण्याचा विधी

स्मृतिस्तंभासाठीचा दगड उभारण्याची एक परंपरा, विधी आहे, तिला गोंडी भाषेत करसाड तर माडिया भाषेत दिनाल्क असं म्हणतात. या विधीदरम्यान, मृत व्यक्तीच्या नावाने दिवा लावून मृत्यूगीत गायले जातात. यात त्या व्यक्तीचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचं वर्णन गीतांच्या माध्यमातून केलं जातं.

याबाबत लालसु नोगोटी सांगतात, "आदिवासी समाजात तेरवी हा प्रकार नाही. माणसाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आपल्या सोयीनुसार करसाड वा दिनाल्क करतात. दिनाल्क हा एक खर्चिक विधी आहे. त्यासाठी कोंबडा, बकरा, डुक्कर, दारु, तांदुळ, मोहफुल इ. वस्तू लागतात. त्यामुळे ज्यावर्षी शेतीचं उत्पन्न चांगलं होतं किंवा घरात बऱ्यापैकी पैसापाणी असतो त्यावर्षी दिनाल्क करतात."

पुढे बोलताना लालसु नोगोटी सांगतात, "दिनाल्क विधी एखाद्या लग्नकार्यासारखाच असतो. घरातील मंडळी एक बैठक घेऊन दिनाल्कसाठीचा दिवस ठरवतात, त्यानंतर सर्व नातेवाईकांना बोलावून सर्वजण मिळूनमिसळून तो विधी पार पाडतात. शक्यतो होळीच्या आधी हा विधी केला जातो.

"दिनाल्क करताना तो वैयक्तिक किंवा सामूहिक दोन्ही प्रकारे पार पाडतात. सामुहिकरीत्या म्हणजे, गावात एका वर्षात जितक्या लोकांचे मृत्यू झाले, त्यांचे कुटुंबीय समुहानं दिनाल्क करतात. तत्पूर्वी गोटूलमध्ये गावाची बैठक होते, त्यात एक दिवस ठरवला जातो आणि ठरलेल्या गोष्टींनुसार विधी पार पाडला जातो.

"असं करण्यामागचं कारण म्हणजे, कोणत्याही एका कुटुंबावर आर्थिक ताण येऊ नये, तसेच सामुहिकरित्या मिळून विधी केल्याने आपसातील प्रेमसंबंधही टिकून राहतात. आदिवासी समाजात सामुहिकतेचं महत्व आहे, त्यामुळे विविध उत्सव, जत्रा, कार्य सामुहिकरित्या केले जातात. ग्रामसभांच्या माध्यमातून त्यात आणखी बळ यायला लागलं आहे, नोगोटी सांगतात.

एखादी व्यक्ती ज्या वर्षी गेली त्याचवर्षी तिचा स्मृतिस्तंभ उभारायलाच हवा असं नसतं. कुटुंब आपल्या सोयीनुसार आणि परिस्थितीनुसार दोन-तीन वर्षानंतरही दिनाल्क करून स्मृतिस्तंभ उभारू शकतात. परंतु, जोपर्यंत हा विधी होत नाही, तोपर्यंत घरात लग्नकार्यासारखे शुभप्रसंग केले जात नाहीत. दिनाल्क करून स्मृतिस्तंभ उभारल्यानंतरच शुभकार्य पार पाडतात.

दिनाल्क न करताच कोणतंही शुभकार्य केल्यास मृत व्यक्ती रागावेल आणि शुभकार्यात विघ्न येईल, असा समज आहे. त्यामुळेच एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर आधी त्याचा दिनाल्क करून कालबंडा उभारल्यानंतरच पुढील शुभकार्य केले जाते. तसेच, कोणत्याही शुभप्रसंगी कालबंडाजवळ जाऊन आशिर्वाद घेतला जातो, असंही लालसु नोगोटी सांगतात.

हे स्मृतिस्तंभ कुठे स्थापन करतात?

स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी लागणारा दगड डोंगरावरून आणावा लागतो. डोंगरावरील दगडाची पूजा करून परवानगी घेऊन कुटुंबातील सोयरे दगड घेऊन येतात, यावेळी इतर गावकरी सोबत असतात.

गावातील प्रत्येक गोत्राचं स्मृतिस्तंभांचं वेगळं स्थान असते. अशाप्रकारे वेगवेगळ्या गोत्राचे वेगवेगळे स्थान असतात. ते सहसा गावाच्या वेशीवर, मधोमध किंवा स्मशान भूमीजवळ असतात.

याबाबत नंदकिशोर नैताम सांगतात, "रस्त्याने जाताना हे स्तंभ दिसले की गावाची सीमा जवळच असल्याचे समजावे. काही ठिकाणी एक किंवा दोनच स्मृतिस्तंभ उभे दिसतात. ते इतर स्मृतिस्तंभांपासून दूर असतता. अशावेळी सदर व्यक्ती ही गंभीर आजाराने, अपघाताने किंवा जंगली प्राण्यांच्या शिकारीने मृत पावल्याचे समजावे. अशा व्यक्तींचा स्मृतिस्तंभ इतरत्र उभारला जातो."

आदिवासी समाजातील ही परंपरा अनेक शतकं जुनी असून आजही ती टिकून आहे. बस्तमध्ये दगड आणि लाकूड दोन्हींचे स्मृतीखांब उभारण्याची परंपरा आहे. त्यातही दगडी खांबांचं प्रमाण जास्त होतं. परंतु, डोंगरांवरील दगडं मिळण्याचं प्रमाण कमी झालं, नदीतून दगड आणले जायचे पण आता ते ही मिळत नसल्याने बस्तरमधील मुरिया समाजात लाकडाच्या खांबाचा वापर केला जाऊ लागला. तर भामरागड तालुक्यात आता सिमेंटपासून बनवलेले खांब वापरले जात आहेत.

काळानुसार होत असलेल्या बदलांचा परिणाम आदिम संस्कृतीवर पडताना दिसतोय. वाढतं शहरीकरण, गावांचा विस्तार, औद्योगिकीकरण आणि नक्षलवादी चळवळींनी या पारंपारिक पद्धतींना विस्कळीत केले आहे.

दगडी स्मृतिखांबांपासून तर रंगवलेल्या लाकडी खांबापर्यंत आणि सिमेंटने तयार केलेल्या स्मृतिस्तंभांपर्यंत एक मोठा बदल दिसून येतो. हे विकसित होत असलेल्या सांस्कृतिक गतिशीलतेच्या बदलावाचं जणू प्रतिबिंबच आहे.

दुर्लक्षित, उपेक्षित आदिवासी समुदाय, त्यांच्या आदिम संस्कृतींच जतन, संसाधनांच्या मर्यादा आणि आधुनिक, विकासवाटेच्या हस्तक्षेपांमुळे आदिवासी समाजापुढे नवी आव्हानं आहेत.

या सर्व बदलांसह आदिम समुहाचे आपली संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. देशभरात सगळीकडे विखुरलेल्या संस्कृतीचं जतन करणं ही काळाची गरज आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.