सिगारेटच्या थोटकानं उलगडलं 30 वर्षांपूर्वीच्या हत्येचं गूढ, आरोपीच्या शोधाची थक्क करणारी कहाणी

फोटो स्रोत, Crown Office
- Author, पॉल ओ'हेअर
- Role, बीबीसी न्यूज
मेरी यांची त्यांच्याच फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. पोलिसांना 30 वर्षांनंतरही त्यांचा मारेकरी सापडत नव्हता. त्यामुळं त्यांची हत्या, एक गूढ बनली होती.
पण, पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमनं एकेक धागा जोडत मारेकऱ्याचा माग काढला. त्याची कहाणीही थक्क करून टाकणारी आहे.
फ्लॅटमध्ये सापडलेल्या सिगारेटच्या एका थोटक्यामुळं मेरी मॅकलॉफ्लिन (Mary McLaughlin) यांच्या मारेकऱ्याचा पहिला सुगावा मिळाला होता.
मेरी यांना अकरा मुलं होती. त्यांच्या हत्येदरम्यान एका गाऊनचा वापर करण्यात आला होता. त्या गाऊनच्या दोरी किंवा लेसच्या गाठीतून नंतर एक डीएनए प्रोफाईल सापडलं.
केसचा तपास करणारे डिटेक्टिव्ह सुरुवातीला या माहितीमुळं गोंधळात पडले होते. त्याचं कारण म्हणजे, 58 वर्षांच्या मेरी यांची हत्या झाली तेव्हा या प्रकरणातील प्रमुख संशयित एडिंगबर्गमध्ये तुरुंगात होता.
ग्लासगोच्या पश्चिम टोकाला मेरी मृतावस्थेत सापडल्या होत्या. मात्र, या संशयिताविषयी अधिक माहिती घेतली तेव्हा गव्हर्नरच्या लॉग बूकमधून हे स्पष्ट झालं की, हा संशयित म्हणजे ग्रॅहम मॅकगिल त्यावेळी पॅरोलवर होता.
त्यानं अनेक लैंगिक गुन्हे (serial sex offenses) केले होते.
या लॉग बूकमधून हे देखील समोर आलं की, 27 सप्टेंबर 1984 च्या पहाटे मेरी यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर काही तासांतच ग्रॅहम त्याच्या कोठडीत परतला होता.
'मर्डर केस: द हंट फॉर मेरी मॅकलॉफ्लिन्स किलर' हा बीबीसीचा नवा माहितीपट आहे. यात या हत्येच्या प्रकरणाच्या तपासाची कहाणी सांगण्यात आली आहे.
तसंच मेरी यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर जो भयावह परिणाम झाला झाला, त्याबद्दलही सांगण्यात आलं आहे.
मेरी यांची शेवटची रात्र
जोआन कोक्रेन वरिष्ठ फोरेन्सिकतज्ज्ञ आहेत. त्या म्हणाल्या, "काही हत्या प्रकरणांचा प्रभाव इतका मोठा असतो की, तुम्ही ती प्रकरणं काहीही झालं तरी, स्मरणात राहतात. शक्यतो कोणी ते विसरत नाही."
"मेरी यांच्या हत्येचं प्रकरण हे मी आतापर्यंत हाताळलेल्या, सर्वाधिक विचलित करणाऱ्या प्रकरणांपैकी एक आहे," असं त्या म्हणाल्या.
मेरी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या रात्र हिंडलँड पबमध्ये मद्यपान केलं. त्यानंतर त्या डॉमिनोज खेळल्या. हिंडलँड पबचं नाव डक क्लब आहे आणि ते मॅन्सफिल्ड पार्कच्या समोर आहे.
हिडलँड स्ट्रीटवरील बारमधून त्या रात्री 10:15 ते 10:30 च्या दरम्यान एकट्याच बाहेर पडल्या. तिथून एक मैलापेक्षा कमी अंतरावर असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेनं त्या चालत निघाल्या होत्या.
वाटेत त्या डम्बार्टन रोडवरील अर्मांडोच्या चिप शॉपमध्ये गेल्या. तिथे त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांबरोबर संभाषण करताना विनोद केले. मेरी यांनी तिथे फ्लिटर्स आणि सिगारेट विकत घेतल्या.


त्यांना वी मेरी (Wee Mary) या नावानं ओळखणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरनं नंतर सांगितलं की, मेरी हातात बूट धरुन अनवाणी पायानं रस्त्यावरून चालत असताना एक माणूस त्यांच्या मागून जातानं त्यानं पाहिलं होतं.
मॅकगिल मेरी यांच्या क्रॅथी कोर्टमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कसा पोहोचला याबद्दल मात्र माहिती मिळाली नाही. मात्र त्यानं फ्लॅटमध्ये जबरदस्तीनं प्रवेश केल्याच्या कोणत्याही खुणा तिथे नव्हत्या.
फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर मॅकगिलनं मेरी यांच्यावर क्रूरपणे हल्ला चढवला. मेरी त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या होत्या.
मेरी यांच्या मुलाला काय दिसलं?
तो मोबाईल आधीचा काळ होता. मेरी यांचं मोठं कुटुंब ग्लासगो, लॅनार्कशायर आणि आयरशाअरमध्ये राहत होतं.
त्या काळात मेरी त्यांच्या या मोठ्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हत्या. आठवड्यातून एकदा त्यांचा एक मुलगा, मार्टिन कलन त्यांची धावती भेट घेत असे.
तेव्हा 24 वर्षांचे असणारे मार्टिन 2 ऑक्टोबर 1984 ला फ्लॅटवर आले तेव्हा, त्यांना काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. त्यानं लेटरबॉक्स उघडला तेव्हा आतून "प्रचंड दुर्गंधी" आली.
फ्लॅटमध्ये मेरी यांचा मृतदेह होता. मेरी गादीवर पडलेल्या होत्या.
त्यांची दातांची कवळी जमिनीवर पडली होती. पबमध्ये जाताना घातलेला नवा हिरवा ड्रेस त्यांच्या अंगावर उलटा (मागची बाजू पुढे) घातलेला होता.

फोटो स्रोत, Firecrest
इयेन विशार्ट माजी वरिष्ठ तपास अधिकारी आहेत. त्यांनी या गुन्ह्याचं वर्णन "अतिशय क्रूर" असं केलं होतं.
"यातील दु:खद गोष्ट म्हणजे, मारेकऱ्यानं जेव्हा त्यांची हत्या केली तेव्हा त्यांनी ते पाहिलं होतं," असं ते म्हणाले.
मेरी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्या तपासणीतून अंदाजे पाच दिवसांपूर्वी मेरी यांची गळा दाबून हत्या करण्यात अल्याचा, निष्कर्ष काढण्यात आला.
त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांनी 1,000 हून अधिक जबाब नोंदवले. मात्र, मेरी यांच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही.
पुढील वर्षी मेरी यांच्या कुटुंबाला सांगण्यात आलं की, या हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला आहे. मात्र, एका सीआयडी अधिकाऱ्यानं मेरी यांची मुलगी, गिना मॅकगेविन यांना "आशा सोडू नका", असं सांगितलं.
मेरी यांना दोन पतींपासून एकूण 11 मुलं होती. स्थानिक समुदायात त्या प्रसिद्ध होत्या.
वर्षानुवर्षे न उकललेलं गूढ
मात्र, त्यांची मुलगी गिना हिनं बीबीसीच्या माहितीपटात सांगितलं की, त्या पहिल्या पतीपासून असलेली सहा आणि दुसऱ्या पतीपासून असलेली पाच मुलं सोडून गेल्यानं कुटुंबात तणाव निर्माण झाला होता.
गिना म्हणाल्या की, "मारेकरी कुटुंबातीलच कोणीतरी आहे, असं मला वाटलं होतं."
गिना यांनी आईच्या हत्येबद्दल पुस्तक लिहिलं आहे. त्या म्हणाल्या की, त्यांनी पोलिसांसमोरही हा संशय व्यक्त केला होता.
"1984 साली माझ्या भावंडांनाही माझ्यासारखंच वाटत होतं," असं त्या पुढे म्हणाल्या.
"त्यांच्या मुलांपैकीच कोणीतरी यात सहभागी असावं किंवा त्याला काहीतरी माहिती असवा, असा संशय होता. मात्र आम्ही याबाबत काहीही सिद्ध करू शकलो नाहीत," असं त्या म्हणाल्या.
2008 पर्यंत चार वेगवेगळ्या तपासांमधून संशयिताची माहिती मिळवण्यास, या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयश आलं.

2014 मध्ये पाचव्यांदा तपास सुरू करण्यात आला. त्यात अखेर यश आलं. नॉर्थ लॅनार्कशायरमधील गार्टकॉशमधील स्कॉटिश क्राईम कॅम्पस (SCC)मधील नवीन डीएनए-प्रोफायलिंग सुविधेमुळे हे शक्य झालं होतं.
पूर्वी तज्ज्ञांना 11 वैयक्तिक डीएन मार्कर पाहता येत होते. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे ही क्षमता वाढून आता 24 जणांची ओळख पटवता येणार होती.
तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या क्षमतेमुळे छोट्या किंवा कमी गुणवत्तेच्या नमुन्यांच्या अभ्यासातून वैज्ञानिकांच्या हाती निकाल येण्याची शक्यता वाढली.
टॉम नेल्सन, स्कॉटिश पोलिस यंत्रणेचे फॉरेन्सिक्सचे संचालक आहेत. त्यांनी 2015 मध्ये सांगितलं होतं की, या तंत्रज्ञानामुळं "भूतकाळातील शोध न लागता बंद झालेल्या अशा प्रकरणांचा छटा लावणं आणि न्याय मिळवणं शक्य होईल, त्यात पीडितांनी न्याय मिळण्याची आशा सोडून दिली होती."
जतन केलेले पुरावे आणि नवं तंत्रज्ञान
1984 मध्ये मेरी यांच्या हत्येच्या प्रकरणात घटनास्थळावरून जे नमुने गोळा केले होते, त्यात मेरीच्या केसांचे तुकडे, झटापटीत ओरखडल्यानं तुटलेले नखांचे तुकडे आणि सिगारेटचं एक थोटकं यांचा समावेश होता.
कोक्रेन स्कॉटिश क्राईम कॅम्पसमध्ये काम करतात. त्यांना घटनास्थळावरून सापडलेल्या पुराव्यांचं निरीक्षण करण्यास सांगण्यात आलं. हे पुरावे 30 वर्षे एका कागदी पिशवीत जतन करून ठेवण्यात आले होते.

फोटो स्रोत, Firecrest
कोक्रेन म्हणाल्या, "त्यावेळस त्यांना डीएनए प्रोफायलिंगबद्दल माहिती नव्हतं."
"या पुराव्यांमध्ये असलेल्या क्षमतेची त्यांना कल्पना नव्हती. या पुराव्यांचं काय महत्त्वं आहे, हे बहुधा त्यांना माहिती नव्हतं."
वरिष्ठ फोरेन्सिक वैज्ञानिक असलेल्या जोआन कोक्रेन म्हणाल्या की, हे पुरावे जतन करण्यामध्ये मूळ तपास पथकानं "कमालीची दूरदृष्टी" दाखवली होती.
सिगारेटच्या थोटकामुळे सापडला मार्ग
अखेर एम्बसी कंपनीच्या सिगारेटच्या थोटकामुळे या प्रकरणात पहिलं यश मिळालं. फ्लॅटच्या लिव्हिंग रुममधील कॉफी टेबलवर असणाऱ्या अॅश ट्रेमध्ये ती सिगारेट विझवण्यात आली होती.
या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमला मेरी यांच्या घरातील अॅशट्रेमध्ये एम्बसी कंपनीची सिगारेट सापडल्यामुळे आश्चर्य वाटलं होतं. कारण मेरी यांच्या आवडीचा सिगारेट ब्रँड वूडबाईन हा होता.
कोक्रेन म्हणाल्या की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डीएनएची माहिती मिळवता येऊ शकेल, असी त्यांना आशा होती .
त्यांनी माहितीपटात सांगितलं की, "मग प्रकरणाचा छडा लावणारा क्षण आला. आमच्यासाठी हे प्रचंड मोठं यश होतं. सिगारेटच्या तुकड्यातून आधी आम्हाला डीएनए प्रोफाईल मिळालं नव्हतं. मात्र, आता आम्हाला त्यातून एका पुरुषाचं पूर्ण डीएनए प्रोफाईल मिळालं."
"असं यश यापूर्वी आम्हाला कधीही मिळालं नव्हतं. या प्रकरणातील फॉरेन्सिक सायन्सचा हा पहिलाच महत्त्वाचा पुरावा ठरला."
डीएनए प्रोफायलिंगमधून आलेली माहिती स्कॉटिश डीएनए डेटाबेसला पाठवण्यात आली. त्यातून मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगारांच्या हजारो डीएनए प्रोफाईलबरोबर पडताळणी करण्यात आली.
त्यातून जो निष्कर्ष समोर आला तो कोक्रेन यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आला.

फोटो स्रोत, Firecrest
त्यात "डायरेक्ट मॅच" असं लिहिलेलं होतं.
"त्याक्षणी माझ्या अंगावर खरंच शहारे आले," असं त्या म्हणाल्या.
मेरी यांच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या सिगारेटच्या थोटक्याचं जे डीएनए प्रोफायलिंग होतं ते, ग्रॅहम मॅकगिल नावाच्या व्यक्तीशी मिळत होतं.
मला मिळालेल्या माहितीनुसार त्याला अनेक लैंगिक गुन्ह्यांसाठी गंभीर शिक्षा झाली होती.
"मेरी यांच्या हत्येला तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या पुराव्याच्या डीएनए प्रोफायलिंगशी जुळणारी व्यक्ती आम्हाला सापडली होती."
डीएनए जुळला, पण आरोपी तुरुंगातच
या बहुप्रतिक्षित तपासामुळं एक गोंधळ निर्माण झाला. कारण, ज्या मॅकगिलचं डीएनए प्रोफाईल जुळत होतं त्याला बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नासाठी शिक्षा झाली होती आणि मेरी यांची हत्या झाली तेव्हा तो तुरुंगात होता.
नोंदींवरून असंही दिसून आलं की, 5 ऑक्टोबर 1984 पर्यंत त्याची तुरुंगातून सुटका झाली नव्हती. मेरी शेवटच्या जिवंत दिसल्यानंतर नऊ दिवसापर्यंत तो तुरुंगातच होता.
हत्येचं हे गूढ उकलण्याचं काम माजी डिटेक्टिव्ह सार्जंट केनी मॅककबिन यांच्यावर सोपवण्यात आलं.
कोक्रेन यांना असंही सांगण्यात आलं की, हे प्रकरण भक्कमपणे मांडण्यासाठी आणखी फॉरेन्सिक पुराव्यांची आवश्यकता आहे.
या प्रकरणाच्या तपासामुळं त्या आणखी एका "जुन्या डीएनए प्रोफाईलपर्यंत" पोहोचल्या. तो म्हणजे मेरी यांचा गळा दाबण्यासाठी वापरल्या गेलेल्या ड्रेसिंग गाऊनची फीत.
कोक्रेन यांना वाटलं की या गाऊनचा वापर गळा आवळण्यासाठी करणाऱ्या व्यक्तीनं त्याला स्पर्श केला असण्याची दाट शक्यता होती.

फोटो स्रोत, Firecrest
कोक्रेन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत फ्लोरोसंट प्रकाशात कापडाचे ते तुकडे हळूहळू एकत्र जोडले. तीन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच त्यांनी ते कापड डीएनए प्रोफायलिंगसाठी वापरलं.
त्या म्हणाल्या, गाऊनच्या दोरीच्या किंवा फितीच्या गाठींवर आम्हाला ग्रॅहम मॅकगिलच्या डीएनएशी जुळणारा महत्त्वाचा पुरावा सापडला.
"त्यानं गाऊनची दोरी किंवा फित मेरी यांच्या गळ्याभोवती आवळली होती आणि मेरी यांचा गळा दाबण्यासाठी त्याला गाठी मारल्या होत्या," असं कोक्रेन म्हणाल्या.
त्याचबरोबर मॅकगिल याच्या सीमेनचे म्हणजे वीर्याचे अंशही मेरी यांच्या हिरव्या ड्रेसवर सापडले.
फॉरेन्सिक पुराव्यांपलीकडचा पुरावा होता आवश्यक
मात्र, आता निवृत्त झालेल्या मॅककबिन यांनी माहितीपटात सांगितलं की, आरोपीला दोषी ठरवण्यासाठी फक्त हे फॉरेन्सिक पुरावे पुरेसे नव्हते.
ते म्हणाले, "आमच्याकडं कोणता डीएनए त्यानं फरक पडणार नव्हता."
"तो दोषी नाही हे सांगताना मॅकगिलकडे ठोस पुरावाही होता. तो म्हणजे, तुरुंगात असताना हत्या कशी करणार?"
हत्येच्या वेळी एचएमपी एडिंगबर्गची पुनर्बांधणी करण्यात आली होती. त्यामुळं संगणकांवर नोंदी करण्याच्या आधीच्या काळातील कागदपत्रे हरवली होती. त्यामुळं जुन्या नोंदी सापडणं कठीण होतं.
मॅककबिन या प्रकरणाचा तपास करत नॅशनल रेकॉर्ड ऑफ स्कॉटलंडपर्यंत पोहोचले. हे एडिंगबर्गच्या मध्यवर्ती भागात आहे. तिथेच त्यांनी गव्हर्रनच्या जर्नल किंवा लॉग बूकचा मागोवा घेतला.
तिथे त्यांना सापडलेल्या नोंदीमुळे या प्रकरणात सर्वकाही बदललं.

फोटो स्रोत, Crown Office
मॅकगिल याच्या कैदी क्रमांकापुढे त्याचं नाव "जी मॅकगिल" असं लिहिलेलं होतं आणि "टीएफएफ" (TFF) हे त्याचं संक्षिप्त रुप होतं.
माजी डिटेक्टिव्ह सार्जंट मॅककबिन म्हणाले, "त्याचा अर्थ ट्रेनिंग फॉर फ्रीडम (TFF) असा होता. म्हणजेच आठवड्याच्या शेवटी घरी जाण्याची परवानगी."
तपास पथकाला त्या कागदपत्रांमध्ये असं आढळलं की, मॅकगिल आठवड्याच्या शेवटी दोन दिवस तुरुंगाबाहेर गेला होता. तसंच त्याला जोडून मॅकगिलला तीन दिवसांची प्री-पॅरोलची रजा मिळाली होती. त्यामुळे तो 27 सप्टेंबर 1984 ला तो तुरुंगात परत आला होता.
माजी वरिष्ठ तपास अधिकारी मार्क हेंडरसन म्हणाले की, "आम्हाला हवा असलेला निर्णायक, ठोस पुरावा तोच होता."
गुन्हेगाराला अटक आणि शिक्षा
अखेर 4 डिसेंबर 2019 ला मॅकगिलला अटक करण्यात आली.
त्यावेळेही तो लैंगिक गुन्ह्यांमधील गुन्हेगार अशीच त्याची ओळख होती. ग्लासगोच्या परिसरातील रेनफ्रूशायरमधील लिनवूडमधील एका कंपनीत फॅब्रिकेटर म्हणून काम करत होता.
गिना म्हणाल्या की, गुन्हेगार सापडल्याच्या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला. "माझ्या आयुष्यात मला हा क्षण पाहायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं."
एप्रिल 2021 मध्ये मेरी यांच्या हत्या प्रकरणावर चार दिवस चाललेल्या खटल्यात अखेर मॅकगिल दोषी ठरला. त्याला किमान 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

फोटो स्रोत, Police Scotland
या खटल्याचे न्यायाधीश होते लॉर्ड बर्न्स. ग्लासगो उच्च न्यायालयात त्यांनी सांगितलं की, मॅकगिल यानं मेरी यांची हत्या केली तेव्हा तो 22 वर्षांचा होता. मात्र, या खटल्यातील आरोपी म्हणून तो न्यायालयात 59 वर्षांचा असताना आला.
ते पुढे म्हणाले, "मेरी यांची हत्या कोणी केली हे कळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला इतका प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागली."
"मेरी यांच्यासोबत काय घडलं हे एक दिवस त्यांना कळेल या गोष्टीची आशा त्यांनी कधीही सोडली नव्हती," असंही ते पुढे म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











