चंद्रकांत पाटील : ‘पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणं बाहेर काढेन’

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1) चंद्रकांत पाटील : ‘पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणं बाहेर काढेन’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय. लोकमतनं ही बातमी दिलीय.

“रोहित पवारांना बाबासाहेब आंबेडकर वाचून माझ्याकडे यायला सांगा. मी वाचलेत बाबासाहेब. रोहित पवार, मी तुझ्यासारखं घरातील राजकीय परंपरेने मोठा झालेलो नाही. चळवळीतून मोठा झालेलो आहे. एका गिरणी कामगाराचा मुलगा आम्हाला डायरेक्ट चॅलेंज करतो, हे पवारांच्या पोटात खुपतेय. पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार. सर्व प्रकरणे बाहेर काढणार,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

“माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसंच, “माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली, त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती,” असे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

2) शाईफेक प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली – राज ठाकरे

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी झालेली कारवाई मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

“चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकप्रकरणी 11 पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावरील मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. त्यानंतर या सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन मी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी माझ्या विनंतीचा मान ठेवत 307 चं कलम शिथिल करण्याची तयारी दाखलवली,” असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याच्या प्रकरणानंतर घटनास्थळी असलेल्या 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं. शिवाय, शाई फेकणाऱ्या तिघांवर गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु, आज चंद्रकांत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणी नरमाईची भूमिका घेत शाई फेकणाऱ्यांसह कोणावरही कारवाई करून नका, माझी कोणाबाबतही तक्रार नाही, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या नरमाईच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

3) पश्चिम बंगाल – हिंसा प्रकरणातल्या आरोपीचा सीबीआय कोठडीत आत्महत्या

पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसेप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी लालोन शेख याचा तुरुंगात आत्महत्या केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

लालोन शेख याला झारखंडमधील पाकुरमधून अटक केली होती.

लालोनला अटक केल्यानंतर सीबीआयनं तयार केलेल्या तात्पुरत्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्या अटकेची जबाबदारी सीबीआयकडे होती.

बिरभूममधील हिंसेत 10 जणांचा जीव गेला होता. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. तसंच, जाळपोळीत अनेक घरंही जळून खाक झाली होती.

4) पाकिस्तानी OTT प्लॅटफॉर्मला भारतात बंदी

पाकिस्तानी ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या Vidly TV वर भारतात बंदी आणण्यात आलीय. या प्लॅटफॉर्मची वेबसाईट, दोन मोबाईल अॅप, चार सोशल मीडिया अकाऊंट्स आणि एक स्मार्ट टीव्हीवर बंदी घालण्यात आलीय. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.

या प्लॅटफॉर्मवरून ‘सेवक : द कन्फेशन्स’ नावाची सीरीज लॉन्च करण्यात आली होती. यातून भारतविरोधी मजकूर प्रसिद्ध करण्यात येत असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या अन्वये ही कारवाई करण्यात आलीय.

5) ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही – नितेश राणे

“ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही,” अशी धमकी नितेश राणेंनी ग्रामस्थांना दिलीय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन राणेंवर टीकास्र डागलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

नितेश राणे म्हणाले, “ग्रामपंचायतीत राणेंच्या विचारांचा सरपंच न निवडल्यास एका रुपयाचाही निधी देणार नाही. ही धमकी समजा किंवा इतर काही.”

“इतकंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. त्यामुळे मतदानावेळी हे लक्षात ठेवा,” असंही नितेश राणेंनी म्हटलंय.

भाजप आमदार नितेश राणेंनी ज्या गावात निधी न देण्याची धमकी दिली. त्या नांदगावात 11 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सत्तेसाठी एका पॅनलचे 6 नगरसेवक जिंकणं गरजेचं असतं. सध्या या ग्रामपंचायतीत 11 पैकी 10 सदस्य भाजपचे आहेत.