You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भगतसिंह कोश्यारी नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर कसे? उद्धव ठाकरेंचा सवाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आज आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज (11 डिसेंबर) समृद्धी महामार्गासह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी नागपुरात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
या कार्यक्रमातील कोश्यारी यांच्या उपस्थितीवर ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला.
समृद्धी महामार्ग मी केला, मी केला, असं कुणीही म्हणू नये. हा महामार्ग जनतेच्या सहकार्यामुळे तयार झाला आहे. हा करदात्यांच्या पैशाने तयार झालेला रस्ता आहे, असं ठाकरे म्हणाले,
महामार्ग आधीच तयार झालेला असताना सुरुवातीला 200-225 किलोमीटरचा रस्ता जनतेसाठी खुला करणे अपेक्षित होते, मात्र त्याचा आज मुहूर्त लागला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
नरेंद्र मोदी- सध्या राजकारणात शॉर्टकटची विकृती, त्याचा विकासावर परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडलं आहे.
नागपूरच्या टेकडी गणपतीला नमन करून नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.
डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात किती वेगाने काम करत आहे, हे आज दिसून आलं, असं त्यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींनी म्हटलं की, समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूरचं अंतर कमी करणारच आहे, पण 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हिटीचा लाभ होईल. शेतकरी, उद्योजकांना या योजनेचा लाभ होईल.
पायाभूत सुविधांचा विचार निर्जीव इमारती आणि फ्लाओव्हर एवढाच मर्यादित करायला नको, त्याचा परिप्रेक्ष्य अधिक मोठा आहे. पायाभूत सुविधांचा मानवी संवेदनांमधून विचार व्हायला हवा, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
असंवेदनशील दृष्टिने पायाभूत प्रकल्पांचा विचार केल्यास काय होतं हे सांगताना पंतप्रधानांनी गोसी खुर्द प्रकल्पाचं उदाहरण दिलं. विलंबामुळे गोसी खुर्द प्रकल्पाचा खर्च चारशे कोटींहून 1800 कोटींवर गेल्याचं त्यांनी सांगितलं.
आम्ही ‘सब का साथ, सब का विकास, सब का प्रयास’ या धर्तीवर काम करत आहोत.
देशाच्या राजकारणात शॉर्टकटची विकृती
भारताच्या राजकारणात शॉर्टकटच्या राजकारणाची, करदात्यांची कमाई उधळण्याची विकृती सध्या देशात येत आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
त्यांनी म्हटलं, “करदात्यांची कमाई उधळणारे हे जनतेचे खरे शत्रू आहेत. त्यांचा उद्देश केवळ सत्तेत येणं असतो, ते देश घडवू शकत नाहीत.”
आज भारत महासत्ता बनण्यासाठी प्रयत्नशील असताना, काही राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी देशाचं नुकसान करत आहेत, असं मोदींनी म्हटलं. देशाच्या स्थायी विकासासाठी लाँग टर्म व्हिजन असणं गरजेचं आहे.
'समृद्धी महामार्ग गतिशक्तीचं उदाहरण ठरेल'
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं, की वीस वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं गेलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली, साथ दिली आणि हे स्वप्न साकार झालं.
फडणवीस यांनी म्हटलं, “भूमी अधिग्रहण हा मुख्य विषय होता. ज्यासाठी प्रचंड पैसा गरजेचा होता, कोणतीही बँक द्यायला तयार नव्हती. आम्ही एमएमआरडीए, सिडकोकडून पैसे घेतले. काही महिन्यांत सातशे कोटी रुपयांच्या जमिनीचं अधिग्रहण झालं.”
येणाऱ्या काही वर्षांत या महामार्गावरून आम्हाला 50 हजार कोटींचा महसूल मिळेल, जो आम्ही अन्य प्रकल्पांत गुंतवू शकतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला गतिशक्तीचं एक उत्तम मॉडेल दिलं आहे आणि समृद्धी महामार्ग याच गतिशक्तीचं उदाहरण ठरेल, “ असं फडणवीस यांनी म्हटलं.
“नागपूरमध्ये आता मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी पाहायला मिळेल,” असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
हा अभिमान, आनंद आणि गर्वाचा क्षण- एकनाथ शिंदे
“समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण केवळ स्वप्नपूर्तीचा नाही; तर आनंदाचा, अभिमानाचा आणि गर्वाचाही आहे. या महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं गेलंय याचाही मला आनंद आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उद्घाटन सोहळ्यात बोलताना म्हटलं.
भूमिअधिग्रहणात अडचणी आणण्याचे प्रयत्न झाले. पण आम्ही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील हा विश्वास दिला आणि विक्रमी वेळेत जमिनीचं अधिग्रहण पूर्ण केल्याचंही शिंदेंनी सांगितलं.
एकनाथ शिंदेनी म्हटलं, “हा इको फ्रेंडली रस्ता आहे. हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे. हा केवळ हायवे नाही, तर गेम चेंजर प्रकल्प आहे. हा महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा नवीन प्रकल्प ठरेल. या हायवेच्या दोन्ही मार्गावर आम्ही इंडस्ट्रीअल हब तयार करण्याचा विचार करत आहोत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडलं.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
वेगवेगळ्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी रविवारी (11 डिसेंबर) नागपुरात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते बिलासपूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधील प्रवाशांशीही संवाद साधला.
नरेंद्र मोदींनी फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनवरुन खापरी पर्यंत नागपूर मेट्रोने प्रवास केला.
पंतप्रधान भारतीय रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प, अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आणि बाराशे एचपीच्या लोकोमोटीव्ह सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन करणार आहेत.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नागपूरचेही लोकार्पण झालं. यासोबतच सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (म्हणजेच सीटीएस) चंद्रपूरचेही लोकार्पण झालं.
नागपूर महानगरपालिकेतर्फे नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
शिंदे-फडणवीस यांनी घेतली होती ट्रायल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावरून नागपूर ते नाशिक प्रवास करून ट्रायल घेतली होती.
गेल्या आठवड्यात सकाळी अकराच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणीस सुरुवात केली.
यावेळी बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.दोघांनी नागपूर ते शिर्डी असा प्रवास करून या महामार्गाचा आढावा घेतला होता.
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे?
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.
20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र
50 हून अधिक उड्डाणपूल, 24 इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट असतील. दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा असेल. फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील. समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसेच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हा महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महामार्गावर लँडस्केपींग, ब्रिज ब्युटीफीकेशनची सुविधा असेल.
हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनी विरोधक यंत्रणा य बसवण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी 503 किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला आहे. 1 मे ला त्याचं उद्घाटन होईल. 2022 पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं गेलय. सध्या 44% काम पूर्ण झाले आहे.
सुरुवातीला विरोध नंतर बाळासाहेबांचंच नाव
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पासाठी जमिन भूसंपादनाला अनेक ठिकाणी कडाडून विरोध झाला. पाच पट मोबदला देऊन जमिन भूसंपादीत करण्यात आली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध केला पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली. या महामार्गाला हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावं देण्याची मागणी 2014 च्या युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा आग्रह होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे नावं बदलून हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)