You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीराजे छत्रपतींचा हर हर महादेव बाबत आक्रमक पवित्रा #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. संभाजीराजे छत्रपतींचा हर हर महादेव बाबत आक्रमक पवित्रा
"हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल," असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे. हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती.
2. बिनडोक माणसं राज्यपाल पदावर नको- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी उदयनराजेंच्या भूमिकेचं स्वागत केलं. राज्यपाल नियुक्तीबद्दल यापुढे निकष ठरवले पाहिजे. कारण मी कुणीतरी झालो आणि राज्यपाल म्हणून मला पाठवलं तर ते चालणार नाही, असं ठाकरे म्हणाले.
केवळ माझा माणूस आहे पण तो बिनडोक असला तरी चालेल पण राज्यपाल म्हणून पाठवतो हे चालणार नाही, असं म्हणत ठाकरेंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
एवढंच नाहीतर भाजपमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नाराज असून ते एकत्र येत आहे. थोडा अवधी दिला होता, राज्यपाल बदलले जात असेल तर चांगलं आहे पण त्यांना पाठिंबा दिला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
अगदी आताच्या महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेसोबत केली जात असेल तर महाराष्ट्र काय आहे, तो दाखवून देण्याची वेळ आली आहे.
3. पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात घुसून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालेन- शहाजी बापू
“पक्षाने आदेश दिल्यास मी गमिनी काव्याने बेळगावात घुसून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून येईल आणि कोणाला कळूही देणार नाही” असं शहाजी बापू यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण तापले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.
अशातच महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र, कर्नाटक सरकारने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत स्पष्ट शब्दात नकार दिला होता. यावरून संतप्त प्रतिक्रिया येत असताना सांगोल्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
4. पक्ष बांधणीच्या आड कुणी आला तर त्याला तुडवा अन पुढे व्हा, मी वकिलांची फौज उभी करतो- राज ठाकरे
"जर पक्षवाढीच्या आड कुणी येत असेल तर त्यांना तुडवून पुढे जा. या सगळ्या लोकांना बाजूला सारुन तुम्ही पक्ष मोठा करा. घराघरात आपला पक्ष पोहोचला पाहिजे," असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महिलांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा. महिलांना आपल्या पक्षात येऊन काम करायचं आहे, पण त्यांचा विश्वास आपण संपादन करायला हवा. तुम्हाला यासाठी सर्व प्रकारची मदत मुंबईहून पुरवली जाईल. मुंबईला मी गेल्यानंतर तुमच्याकडे माणसं येतील आणि तुमच्याशी बोलतील. पुढच्या काही दिवसात पक्षाचे काही कार्यक्रम आपण करणार आहोत. तुम्ही काळजी न करता पक्षवाढीसाठी सर्वांना बाजूला सारुन काम करा.
येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाईट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत. ते लांजामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
5. त्यांना कानाखाली मारण्याची इच्छा झाली होती, अनुपम खेरांच्या भावना
"द कश्मिर फाईल्स या चित्रपटातून काश्मीरी पंडितांच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. माझ्यासारख्या अनेकांची ही कथा आहे. परंतु, ज्युरी नदाव लॅपिड यांच्या टीकेनंतर त्यांना कानाखाली मारण्याची इच्छा झाली होती, असे उत्तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एबीपी माझावरील 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
गोव्यात नुकत्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वात ज्युरी नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाचा 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' असा उल्लेख केला.
अनेक काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या करण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्यात आले. याबाबतची त्यांना माहिती देखील आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावरून जर लॅपिड असे वक्तव्य करत असतील तर मला वाटतं ते योग्य नाही.
कारण ते तेथे एक पाहुणे म्हणून आले होते. त्यांना आदराने तेथे बोलवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींवर बोलणं योग्य नव्हतं. लॅपिड यांच्या वक्तव्याने निम्या भारतातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी नाराजी अनुपम खेर यांनी यावेळी व्यक्त केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)