हिजबुल्लाहचे नवीन प्रमुख नईम कासिम कोण आहेत? त्यांच्या निवडीवर इस्रायल काय म्हणालं?

    • Author, जॅकलिन हॉवर्ड
    • Role, बीबीसी न्यूज

हिजबुल्लाहने त्यांच्या नवीन प्रमुखाच्या नावाची घोषणा केली आहे. या संघटनेचे उपसचिव नईम कासिम यांची हिजबुल्लाहचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे.

हिजबुल्लाहचे माजी प्रमुख हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर नईम कासिम हे आता प्रमुखपदी असतील.

मागच्या महिन्यात लेबनॉनच्या बैरुतवर झालेल्या हवाई हल्ल्यात नसरल्लाह यांचा मृत्यू झाला होता.

हिजबुल्लाहच्या जिवंत असलेल्या काही प्रमुख नेत्यांमध्ये नईम कासिम यांचा समावेश होतो. इस्रायलने केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहच्या अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू झाला आहे.

मागच्या काही आठवड्यांमध्ये लेबनॉनमधील संघर्ष चिघळला असून, इस्रायलने लेबनॉनवरील हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. त्यातच हिजबुल्लाहने नईम कासिम यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

कोण आहेत नईम कासिम?

नईम कासिम हे गेल्या 30 वर्षांपासून हिजबुल्लाचे उप-सरचिटणीस म्हणून काम करत होते. या गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

नईम यांची निवड ही शूरा कौन्सिलने त्यांच्या नवीन नियमांनुसार केली असल्याचे हिजबुल्लाहने म्हटलं आहे. नईम कुठे राहतात, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.

काही रिपोर्ट्समध्ये नईम इराणला पळून गेल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

हिजबुल्लाहला इराणचा पाठिंबा आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल.

नईम कासिम यांचा जन्म 1953 साली बैरुतमध्ये झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाहच्या संस्थापक सदस्यांमध्ये नईम कासिम यांचा समावेश होतो.

हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर नईम कासिम यांनी तीनवेळा टेलिव्हिजनच्या माध्यमातून संबोधन केलं आहे.

हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करून नईम यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. या निवेदनात 'हिजबुल्लाहच्या मोर्चाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर' असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या निवेदनात हिजबुल्लाहच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या हसन नसरल्लाह आणि इतर नेत्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

नईम कासिम यांच्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, हे नियुक्ती 'तात्पुरत्या स्वरूपाची' असून दीर्घकाळ टिकणार नाही.

आतापर्यंत काय घडलं?

नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर हाशिम सैफीद्दीन यांना हिजबुल्लाहचे प्रमुख म्हणून नियुक्त केलं जाणार होतं. मात्र, 22 ऑक्टोबर रोजी इस्रायलने सांगितले की सैफीद्दीन देखील मारले गेले आहेत.

इस्रायलने घोषणा केल्याच्या तीन आठवड्यांपूर्वी सैफीद्दिन हे एका हवाई हल्ल्यात मारले गेले होते.

मागच्या काही आठवड्यांपासून इस्रायलने संपूर्ण लेबनॉनवर हवाई हल्ले केले आहेत.

हिजबुल्लाहच्या इमारती आणि हिजबुल्लाहच्या सैनिकांवर हे हल्ले केले जात असल्याचं इस्रायलने सांगितलं आहे.

सोमवारी रात्री इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या बेका खोऱ्यात हल्ला केला. हा भाग हिजबुल्लाचा मजबूत गड मानला जातो.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात किमान 60 लोक ठार झाले आहेत आणि 50 हून अधिक जखमी झाले आहेत.

या हल्ल्याबाबत इस्रायली लष्कराने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. लेबनॉनच्या सीमेवर सुरक्षेच्या कारणास्तव विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा इस्रायल प्रयत्न करत आहे. इस्रायलच्या सीमेवर हिजबुल्लाहकडून वारंवार हल्ले होत आहेत.

गेल्या वर्षभरात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायलने हिजबुल्लाबाबत कडक धोरण अवलंबले आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात 2,700 लोक मरण पावले आहेत आणि 12,500 लोक जखमी झाले आहेत.

हिजबुल्लाहने या एका वर्षात हजारो रॉकेट आणि ड्रोनने इस्रायलवर हल्ले केले आहेत. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात 59 इस्रायली नागरिक ठार झाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)