भारतात वेगाने वाढतोय वजन कमी करणाऱ्या औषधांचा बाजार, काय आहेत यामागचे गंभीर धोके?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेत गेल्या पाच वर्षांत सहापटीने वाढ झाली आहे.
मुंबई येथील मधुमेह (डायबेटिस) तज्ज्ञ राहुल बक्षी यांना सतत फोन येत असतात. पण त्यांना हे फोन केवळ रक्तातील साखर नियंत्रित न होणाऱ्या रुग्णांकडूनच म्हणजे मधुमेह असलेल्या रूग्णांकडूनच येत नाहीत.
आता तर तरुण व्यावसायिक लोकही एकच प्रश्न विचारताना दिसतात- "डॉक्टर, मला वजन कमी करण्याचं औषध सुरू करता येईल का?"
अलीकडेच 23 वर्षांचा एक तरुण राहुल बक्षींकडे आला. त्याला आपल्या वजनाबद्दल चिंता होती. कॉर्पोरेट नोकरीला लागल्यापासून त्याचं वजन 10 किलोने वाढलं होतं.
तो म्हणाला, "माझ्या जिममधील एक मित्र वजन कमी करणारं इंजेक्शन घेतो."
डॉ. बक्षी यांनी त्याला औषध देण्यास नकार दिला आणि विचारलं, "औषध घेऊन 10 किलो वजन कमी झाल्यावर पुढे काय करशील?"
ते म्हणाले, "औषध थांबवलं की वजन परत वाढतं, आणि जर व्यायाम न करता औषध चालू ठेवलंस, तर स्नायू (मसल्स) कमी होऊ लागतात. ही औषधं योग्य आहार आणि जीवनशैली बदलाची जागा घेऊ शकत नाहीत."
अशा प्रकारच्या चर्चा आता भारतातील शहरांमध्ये खूपच वाढल्या आहेत. कारण वजन कमी करणाऱ्या औषधांच्या मागणीत झपाट्याने वाढत आहे.
भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अति लठ्ठ प्रौढ लोक आहेत आणि तब्बल 7.70 कोटी लोक टाइप-2 डायबेटिसने ग्रस्त आहेत.
पचन मंदावतं, भूकही कमी करतं
मुळात मधुमेहावर उपचार करण्यासाठी तयार केलेली ही औषधं आता वजन कमी करण्यासाठी 'गेम चेंजर' म्हणून ओळखली जात आहेत. कारण त्यांचे परिणाम आधीच्या कोणत्याही उपचारांपेक्षा प्रभावी मानले जातात.
पण या औषधांची वाढती लोकप्रियता काही कठीण प्रश्नही निर्माण करते, जसं की डॉक्टरांच्या देखरेखीची गरज, चुकीच्या वापराचे धोके, आणि उपचार व जीवनशैली सुधारणा यांच्यातील अस्पष्ट रेषा.
दिल्लीतील फोर्टिस सी-डीओसी सेंटरचे प्रमुख आणि डायबेटिस व मेटाबॉलिक एंडोक्राइनोलॉजीचे तज्ज्ञ अनूप मिश्रा म्हणतात की, "वजन कमी करण्यासाठीची ही आतापर्यंतची सर्वात प्रभावी औषधं आहेत. यापूर्वी अनेक औषधं आली आणि गेली, पण या औषधांशी तुलना होऊ शकत नाही."
भारतातील वेगाने वाढणाऱ्या वजन कमी करणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेत सध्या दोन नवीन औषधांचा दबदबा आहे.
पहिलं म्हणजे सेमॅग्लुटाइड. हे डॅनिश औषध कंपनी नोवो नॉर्डिस्ककडून तयार केलं जातं. ते रायबेल्सस या नावाने गोळ्यांच्या स्वरूपात आणि वेगोवी या नावाने इंजेक्शनच्या स्वरूपात विकलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
ओझेम्पिक हेही याच औषधाचं इंजेक्शन आहे, जे भारतात मधुमेहासाठी मंजूर आहे, पण लठ्ठपणा कमी करण्यासाठी अजून ते उपलब्ध नाही.
दुसरं औषध म्हणजे टिर्झेपटाइड. हे अमेरिकन कंपनी एली लिलीकडून तयार केलं जातं आणि माउनजारो या नावाने विकलं जातं. हे मुख्यतः मधुमेहासाठी, पण भारतात आता वजन कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
ही दोन्ही औषधं जीएलपी-1 नावाच्या वर्गातील आहेत. ही औषधं शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचं अनुकरण करतात.
पचन थोडं मंद करून आणि मेंदूमधील भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर परिणाम करून ही औषधं माणसाला लवकर पोट भरल्यासारखं वाटायला लावतात आणि ते समाधान जास्त वेळ टिकतं.
काही आठवड्यातच कमी होऊ लागतं वजन
ही औषधं शक्यतो आठवड्यातून एकदा घेतली जातात आणि हात, मांड्या किंवा पोटात इंजेक्शनद्वारे स्वतःच द्यायची असतात.
ही औषधं भूक कमी करतात, आणि माउनजारोच्या बाबतीत तर ते शरीराचे मेटाबॉलिझम आणि ऊर्जा संतुलनही सुधारतात.
उपचाराची सुरुवात कमी डोसपासून (मात्रा) केली जाते आणि हळूहळू ती स्थिर किंवा कायम डोसपर्यंत वाढवली जाते. यामुळे काही आठवड्यांतच वजन कमी होण्यास सुरूवात होते.
डॉक्टर इशारा देतात की, औषध घेणं बंद केल्यानंतर एका वर्षाच्या आत अनेकांचं वजन परत वाढतं. कारण शरीर वजन कमी होण्याला प्रतिकार करतं आणि जुन्या खाण्याच्या सवयी पुन्हा सुरू होतात.
तसंच, व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगशिवाय ही औषधं दीर्घकाळ वापरल्यास फक्त चरबीच नाही तर स्नायूही कमी होतात.

फोटो स्रोत, Getty Images
सर्व लोकांना जीएलपी-1 औषधांचा सारखाच परिणाम होत नाही. बहुतेक लोकांचं वजन आपल्या शरीराच्या सुमारे 15 टक्के इतकं कमी झाल्यावर स्थिर राहतं.
या औषधांचे काही दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असतात, जसं की मळमळ, जुलाब, आणि काही दुर्मिळ पण गंभीर समस्या जसं की पित्ताशयात खडे (गॅलस्टोन), स्वादुपिंडदाह (पँक्रियाटायटिस) आणि मसल्स कमी होणे.
भारतामध्ये आधीच जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रथिने असलेला आहार घेतला जातो. ज्यामुळे सार्कोपेनिक ओबेसिटी (लठ्ठपणा) म्हणजेच चरबी वाढताना स्नायू कमी होण्याची समस्या दिसते.
त्यामुळे पुरेशा प्रमाणात प्रथिनं आणि व्यायामाशिवाय वजन कमी करणं यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते.
डॉ. बक्षी म्हणतात, "माध्यमं आणि सोशल मीडियावर या औषधांची खूप चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही किलो वजन कमी करण्याची घाई असलेल्या श्रीमंत भारतीयांमध्ये ही औषधं आता एक प्रकारची फॅशन किंवा क्रेझ बनली आहेत."
अवघ्या पाच वर्षांत तब्बल सहापट वाढ
दिल्लीतील एका डॉक्टरांच्या मते, अलीकडे झालेल्या वैद्यकीय परिषदेतही या औषधांबद्दल वेड्यासारखी उत्सुकता स्पष्ट दिसून आली.
ते म्हणाले, "नवीन औषध बाजारात आल्यानंतर तीन महिन्यांत मी सुमारे शंभर रुग्णांवर उपचार केले. पण माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, त्याने हजाराहून अधिक लोकांवर उपचार केले आणि त्यांपैकी बहुतेक जण काळ्या बाजारातून आणलेली आयात केलेली इंजेक्शनं वापरतात."
संशोधन संस्था फार्मारॅकच्या माहितीनुसार, भारतातील लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांची बाजारपेठ 2021 मध्ये 16 दशलक्ष डॉलर (सुमारे 130 कोटी रुपये) इतकी होती, आणि आज ती जवळपास 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 830 कोटी रुपये) झाली आहे.
म्हणजेच अवघ्या पाच वर्षांत यात सहापटीने वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Prashanth Vishwanathan/Bloomberg via Getty Images
फार्मारॅकच्या माहितीनुसार, नोवो नॉर्डिस्क कंपनी आपल्या सेमॅग्लुटाइड औषधांसह या बाजारपेठेत आघाडीवर आहे.
2022 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या रायबेल्सस या औषधाचं संपूर्ण बाजारपेठेत सुमारे दोन-तृतीयांश इतका हिस्सा आहे.
एली लिली कंपनीचं टिर्झेपटाइड, जे माउनजारो या नावाने विकलं जातं, हे औषध या वर्षी बाजारपेठेत आलं आणि सप्टेंबरपर्यंत भारतातील दुसरं सर्वाधिक विक्री होणारं ब्रँडेड औषध ठरलं.
या औषधांच्या इंजेक्शन पेनची महिन्याची किंमत (चार डोससाठी) सुमारे 14,000 ते 27,000 रूपये (अंदाजे 157–300 डॉलर) इतकी आहे. जी बहुतांश भारतीयांसाठी खूप महागडी मानली जाते.
केंद्रीय मंत्र्यांचा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
आत्तापर्यंत भारतात दिसत असलेली ही वाढ फक्त हिमनगाचं टोक असू शकते. मार्चमध्ये सेमॅग्लुटाइड या औषधाचं पेटंट संपणार आहे.
हेच घटक ओझेम्पिक आणि वेगोवी या औषधांमध्ये वापरलं जातं. पेटंट संपल्यावर या औषधांच्या स्वस्त 'जेनरिक' आवृत्त्या बाजारपेठेत येऊ शकतात, ज्यामुळे ती जास्त लोकांना परवडणारी आणि उपलब्ध होतील.
जेफरीज या गुंतवणूक बँकेनं याचं वर्णन 'भारतासाठी जादूच्या गोळीचा क्षण' असं केलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जर योग्य किंमत ठेवली, लोकांनी ही औषधं घेतली आणि सरकारनं प्रोत्साहन दिलं, तर सेमॅग्लुटाइडची बाजारपेठ भारतात तब्बल 1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
फार्मारॅकच्या उपाध्यक्ष शीतल सापळे म्हणतात, "आम्ही ऐकलं आहे की सुमारे दहा-बार कंपन्यांनी रायबेल्सस या गोळ्यांच्या जेनरिक आवृत्त्या तयार करून ठेवल्या आहेत. पण त्या स्वस्त आणि सहज उपलब्ध झाल्यावर, त्यांचा चुकीचा वापर होण्याचा धोकाही वाढेल."

फोटो स्रोत, Getty Images
डॉक्टर सांगतात की, काही जिम ट्रेनर, डाएटिशियन आणि ब्युटी क्लिनिकचे कर्मचारी, ज्यांना औषध लिहून देण्याचा अधिकार नाही, ते लोकांना वजन कमी करणाऱ्या औषधांचा उच्च डोस देत आहेत.
काही ऑनलाइन फार्मसी तर प्रिस्क्रिप्शनशिवाय फक्त फोनवर थोडं बोलून ही औषधं घरी पोहोचवत आहेत.
काही ब्युटीशियन तर 'ब्रायडल पॅकेज' नावाने अशी औषधं देतात, ज्यात लग्नापूर्वी पटकन वजन कमी करण्याचं आश्वासन दिलं जातं.
यामुळे खोटी किंवा बनावट औषधं बाजारात येण्याची भीती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या नव्या औषधांबाबत लोकांना 'सावधगिरी बाळगण्याचा' सल्ला दिला आहे.
मुंबईतील छातीचे तज्ज्ञ (चेस्ट फिजिशियन) डॉ. भौमिक कामदार सांगतात की, "एका रुग्णानं मला विचारलं की, ही नवीन औषधं त्याच्या मुलीचं लग्न होण्यापूर्वी, म्हणजे तीन महिन्यांत सात किलो वजन कमी करण्यात मदत करू शकतील का? त्याला जाणून घ्यायचं होतं की ही औषधं खरंच काम करतात का."
लठ्ठपणामुळे गंभीर आजाराचे धोके
डॉक्टरांच्या मते, भारतातील एक मोठी अडचण म्हणजे लोक लठ्ठपणाकडे कसं पाहतात. त्यावरूनच वजन कमी करण्याचा त्यांचा दृष्टिकोन तयार होतो.
मुंबईतील बॅरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला म्हणतात, "बहुतांश लोकांना हे समजत नाही की, लठ्ठपणा हा एक दीर्घकालीन आणि परत परत होणारा आजार आहे. अनेक जण क्रॅश डायट करतात, काही किलो वजन कमी करतात, पण नंतर पूर्वीपेक्षा जास्त वजन पुन्हा वाढतं."
ते पुढे म्हणतात, "इथं जर एखाद्याचं वजन जास्त असेल, तर लोक समजतात की तो चांगलं खातो, सुखवस्तू आहे. आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत करत इतकं पुढे गेलो आहोत की, लठ्ठपणाचं सामान्यीकरणच करून टाकलं आहे."
डॉक्टर सांगतात की, लठ्ठपणा अनेक आजारांचं प्रमुख कारण ठरू शकतो. डॉ. लकडावाला म्हणतात, "लठ्ठपणाचा संबंध किमान 20 प्रकारच्या कर्करोगांशी, वंध्यत्वाशी, संधिवाताशी (ऑस्टिओआर्थरायटिस) आणि फॅटी लिव्हरशी आहे, जो आता लिव्हर सिरॉसिसच्या प्रमुख कारणांपैकी एक बनला आहे."
जगभरातील आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असतानाही, आजही लठ्ठपणाची अचूक व्याख्या किंवा वर्गीकरणावर एकमत झालेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"या नव्या औषधांच्या आगमनानंतर दृष्टिकोन बदलला आहे. आता लठ्ठपणाकडे फक्त जीवनशैलीची चूक म्हणून नव्हे, तर एका आजारासारखं पाहिलं जात आहे."
आता विविध क्षेत्रांतील डॉक्टरही वजन कमी करणारी औषधं केवळ लठ्ठपणा किंवा मधुमेहासाठीच नव्हे, तर इतर कारणांसाठीही वापरू लागले आहेत.
एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ज्ञ) आणि (नेफ्रोलॉजिस्ट) किडनी तज्ज्ञ आता ही औषधं जास्त वजन असलेल्या रुग्णांना हृदय आणि मूत्रपिंडाचं आरोग्य सुधारावं यासाठी देत आहेत. उदाहरणार्थ, अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट बसवण्याची तयारी करणाऱ्या रुग्णांनाही ही औषधं दिली जात आहेत.
हाडांचे तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक सर्जन) आता गुडघ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचं वजन कमी व्हावं म्हणून ही औषधं देतात.
तसंच, छातीचे तज्ज्ञ (चेस्ट फिजिशियन) ही औषधं स्लीप अॅपनिया असलेल्या रुग्णांसाठी वापरतात. हा असा विकार आहे ज्यात झोपेत श्वसनमार्गात अडथळे येतात.
'औषधं, इंजेक्शनशिवायही कमी होऊ शकतं वजन'
डॉ. कामदार सांगतात की, "जे स्लीप अॅपनिया असलेले रुग्ण कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) मशीन वापरणं टाळतात, त्यांच्यासाठी ही औषधं उपयुक्त ठरतात. कारण वजन कमी झाल्यानं त्यांची झोप आणि श्वसन दोन्ही सुधारतात."
भारतामध्ये वाढत्या लठ्ठपणासोबत बॅरिएट्रिक सर्जरी (वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया) ही झपाट्याने वाढली आहे.
2004 मध्ये अशा फक्त 200 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पण 2022 पर्यंत हा आकडा 40 हजार वर पोहोचला आहे. म्हणजे तब्बल 200 पट इतकी वाढ झाली आहे.
डॉ. लकडावाला यांच्यासारखे सर्जन आता अनेक तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याचे कार्यक्रम चालवतात. या कार्यक्रमांत, वजन कमी करणारी औषधं घेणाऱ्या रुग्णांना प्रथम एंडोक्रायनॉलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते सहा महिने ठेवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "आम्ही ही औषधं सहजपणे देत नाही. जे रुग्ण या औषधांना प्रतिसाद देत नाहीत किंवा ज्यांचा लठ्ठपणा खूप गंभीर आहे, त्यांचाच शस्त्रक्रियेसाठी विचार केला जातो."
ते शहरातील झटपट उपाय शोधणाऱ्या लोकांना स्पष्ट संदेश देतात, "फक्त दिसण्यासाठी (कॉस्मेटिक) वजन कमी करायचं म्हणून ही औषधं वापरू नका; ती फक्त तेव्हाच वापरा जेव्हा जास्त वजनामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे."
आणि जे फक्त 5 ते 10 किलो वजन पटकन कमी करण्याच्या मागे लागले आहेत, त्यांचं काय?
त्यांचा सल्ला अगदी सोपा आहे, "साखर पूर्ण बंद करा. तोच सर्वात मोठा शत्रू आहे. साखर कमी केली नाही, तर वजन कमी होणार नाही. आठवड्यात चार दिवस व्यायाम करा, म्हणजे तुम्ही 5 ते 7 किलो वजन औषधं किंवा इंजेक्शनशिवायच कमी करू शकता."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











