2023 हे पृथ्वीवरील आजवरचं सर्वांत उष्ण वर्ष जाहीर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्क पॉयंटिंग आणि एरवान रिव्हॉल्ट
- Role, बीबीसी न्यूज क्लायमेट अँड व्हेरिफाय डेटा जर्नालिझम टिम्स
2023 हे वर्ष अधिकृतपणे आजवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे. मानवनिर्मित हवामान बदल आणि नैसर्गिक एल निनोच्या प्रभावामुळं हे घडलं आहे.
मानवानं मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाच्या वापराला सुरुवात करण्याच्या आधीच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत मागचं वर्ष हे 1.48 अंशांनी अधिक उष्ण असल्याचं, युरोपियन महासंघाच्या हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
बीबीसीच्या विश्लेषणावरून लक्षात येतं की, जुलैपासून जवळपास प्रत्येक दिवशी वर्षाच्या वेळेनुसार हवेतील नवीन विक्रमी जागतिक तापमान नोंदवलेलं आहे.
समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानानंही यापूर्वीचे उच्चांक मोडीत काढले आहेत.
युकेनं 2023 मध्ये आजवरच्या इतिहासातील दुसरे सर्वांत उष्ण वर्ष अनुभवले असल्याचं हवामान विभागाच्या कार्यालयाकडून गेल्या आठवड्यात सांगण्यात आलं.
हे विक्रम जगाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामानासंबंधीच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या सीमा ओलांडण्याच्या दिशेनं नेत आहेत.
टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील हवामान शास्त्राचे प्राध्यापक अँड्र्यू डेसलर म्हणाले की, "मला फक्त 2023 हे वर्ष विक्रमी उष्ण ठरलं यानंच धक्का बसला असं नाही तर, ज्या फरकानं यानं विक्रम मोडला त्याचंही मला आश्चर्य वाटलं."

प्राध्यापक डेसलर यांच्या मते, 'ही सरासरी संपूर्ण जगभरातील आहे याचा विचार करता, यातील काही विक्रमांमधील फरक खरंच आश्चर्यकारक आहे.'
असाधारण उष्णता
मानवातर्फे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडसारख्या हरितगृह वायूंचं विक्रमी प्रमाणात उत्सर्जन केलं जात आहे. त्यामुळं सध्याचं जग हे 100 वर्षांपूर्वी होतं, त्यापेक्षा खूप जास्त उष्ण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.
पण 12 महिन्यांपूर्वी कोणत्याही प्रमुख विज्ञान संस्थेनं 2023 हे आजवरचं सर्वांत उष्ण वर्ष ठरेल असा अंदाज वर्तवला नव्हता. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सध्या पृथ्वीवरील हवामान अत्यंत क्लिष्ट पद्धतीनं वर्तन करत आहे.
वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांदरम्यान काही मोजक्या दिवशीच तापमानाचे विक्रम मोडीत निघाले होते.
पण त्यानंतरच्या म्हणजे 2023 च्या नंतरच्या सहा महिन्यांमध्ये जगामध्ये नवनव्या आणि न मोडता येणाऱ्या विक्रमांची एक साखळी पाहायला मिळाली.
खालील कॅलेंडर चार्ट पाहा. त्यात प्रत्येक ब्लॉक 2023 या वर्षातील एका दिवसाचं प्रतिनिधित्व करतो. गडद लाल रंगामध्ये दाखवलेल्या ब्लॉकच्या दिवशी विक्रम मोडले गेले आहेत. जुनपासून पुढं पाहिलं तर रोज नवीन विक्रम रचले गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या डेटाचं बीबीसीनं विश्लेषण केलं. त्यानुसार, वर्षातील 200 पेक्षा जास्त दिवशी नवीन विक्रम झाल्याचं यातून स्पष्ट होतं.
गेल्या काही काळातील तापमानातील वाढ ही प्रामुख्यानं एल निनोमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहेत. त्यामुळं दीर्घकालीन मानवनिर्मित उष्णतेची सर्वोच्च पातळी गाठली आहे.
अल निनो ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यात पूर्व प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील गरम पाण्यामुळं वातावरणात अधिक उष्णता पसरते.
पण, या एल निनोच्या टप्प्याच्या सुरुवातीलाच हवेतील तापमानात असामान्य अशी वाढ पाहायला मिळाली आहे. एल निनो त्याच्या सर्वोच्च पातळीवर 2024 च्या सुरुवातीपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवलेली नव्हती.
त्यामुळं हवामानामध्ये नेमका कशा प्रकारचा बदल होणार याबाबत शास्त्रज्ञांना नेमकी काहीही खात्री नाही.
"परिणामी 2023 हे वर्ष एवढं उष्ण का होतं, अशा रंजक प्रश्नांची एक मालिकाच समोर उभी राहिली आहे," असं मत अमेरिकेतील विज्ञान संस्था बर्कले अर्थमधील हवामान शास्त्रज्ञ झेके हॉसफादर यांनी मांडलं.
जगभरात जाणवले परिणाम
2023 मधील उष्णतेचं आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ती बऱ्याच अंशी जगभरात सर्वच ठिकाणी जाणवली.
नकाशावर दाखवल्याप्रमाणे, जगाचा जवळपास संपूर्ण भाग हा अलीकडच्या 1991-2020 या काळाच्या तुलनेत उष्ण होता.
मुळात याच काळामध्ये उष्णतेचं प्रमाण हे इसवीसन 1800 च्या नंतर म्हणजे, जेव्हा मानवानं मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधन जाळायला सुरुवात केली त्यापेक्षा 0.9 अंशाने अधिक होतं.

या विक्रमी जागतिक उष्णतेमुळं 2023 मध्ये जगभरातील अनेक भागांमध्ये हवामानाशी संबंधित गंभीर घटनांना अधिक तीव्र रूप धारण करण्यास मदत केली आहे.
यात कॅनडा आणि अमेरिकेतील उष्णतेची लाट आणि वणव्याच्या घटना तसंच पूर्व आफ्रिकेतील दीर्घकाळ चाललेला दुष्काळ आणि नंतरची पूरस्थिती यांचा समावेश होता.
यापैकी अनेक घटना यापूर्वीच्या तुलनेत अधिक तीव्र किंवा वर्षातील असामान्य काळामध्ये घडल्या आहेत.

"हे सर्व आकड्यांपेक्षा खूप अधिक आहे," असं 2016 ते 2023 या दरम्यान जागतिक हवामान विज्ञान संघटनेचे सरचिटणीस राहिलेले प्राध्यापक पेटेरी तालास म्हणाले.
"हवामानातील टोकाच्या बदलामुळं दैनंदिन पातळीवर जीवनमान आणि रोजगार नष्ट होत आहे."
हवेचं तापमान पृथ्वीच्या वेगानं बदलणाऱ्या हवामानाचं एकमेव मापक आहे. अगदी 2023 मध्येही:
- अंटार्क्टिकमधील सागरी बर्फाची पातळी "आश्चर्यकारक" नीचांकावर पोहोचली आहे, तसंच आर्क्टिक मधील सागरी बर्फाची पातळीही सरासरीच्या खाली सरकली आहे.
- पश्चिम उत्तर अमेरिका आणि युरोपियन आल्प्समधील ग्लेशियरमध्येही जास्त प्रमाणात वितळण्याचा हंगाम पाहायला मिळाला, त्यामुळं समुद्राच्या पातळीत वाढ झाली.
- उत्तर अटलांटिकसह अनेक ठिकाणी समुद्राच्या उष्ण वाऱ्यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान उच्चांकांवर पोहोचल्याची नोंद झाली आहे.
प्रत्यक्षात, कोपर्निकसच्या माहितीवरून बीबीसीनं केल्या विश्लेषणानुसार 4 मेनंतर जगभरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानानं सातत्यानं विक्रमी वाढ नोंदवली आहे. अनेकदा तर मोठ्या फरकानं विक्रम नोंदवल्याचं पाहायला मिळालं आहे.
2024 आणि नंतरसाठीचा एक इशारा
2024 हे वर्ष कदाचित 2023 पेक्षा अधिक उष्ण असू शकतं. कारण समुद्राच्या पृष्ठभागावरील काही उष्णता ही हवामानात मिसळली जाते. मात्र त्याचवेळी सध्याच्या एल निनोच्या विचित्र वर्तनाचा विचार करता याबाबत निश्चित सांगणं कठीणच आहे, असं डॉ. हॉसफादर यांनी म्हटलं.
युकेच्या हवामान विभागानुसार, यामुळं 2024 मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण वर्षामध्ये 1.5 अंश उष्णता वाढीची पातळीही ओलांडली जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
जागतिक हवामान बदलाचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी 2015 मध्ये पॅरिसमध्ये जवळपास 200 देशांनी ही पातळी नियंत्रणात आणण्याबाबत सहमती दर्शवली होती.
यावरून 20 ते 30 वर्षांच्या दीर्घकालीन सरासरीचा संदर्भ मिळतो. त्यामुळं 2024 मध्ये एका वर्षाचं उल्लंघन होणं म्हणजे पॅरिस कराराचं उल्लंघन ठरत नाही.

पण यामुळं आपण कोणत्या दिशेला प्रवास करत आहोत हे स्पष्ट होतं. कारण प्रत्येक उष्ण वर्ष जगाला दीर्घकालीन 1.5 अंशापेक्षा अधिकची पातळी ओलांडण्याच्या जवळ घेऊन जात आहे.
एल निनो सारख्या नैसर्गिक कारणांमुळं विशिष्ट वर्षांमध्ये तापमानात वाढ किंवा घट होत असली तरी या दीर्घकालीन हवामान बदलाच्या कलासाठी मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. तसंच 2023 मध्ये वाढलेलं तापमान हे या नैसर्गिक कारणांपेक्षा खूप वेगळं आहे.
वरील चार्ट पाहा. 1998 आणि 2016 ही विक्रमी वर्षे होती. त्यावेळी एल निनोच्या अधिक प्रभावामुळं तापमान वाढलं होतं. पण हे विक्रम 2023 च्या या गडद लाल रंगाच्या आसपासही दिसत नाहीत.
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या उपसंचालक डॉक्टर समंथा बर्गेस म्हणाल्या की, "2023 हे एक असाधारण वर्ष होतं. कारण या वर्षामध्ये सारखे विक्रम वरखाली होत होते."
हा नवा इशारा COP28 या हवामान परिषदेनंतर देण्यात आला आहे. या परिषदेत जगभरातील देशांनी वाढत्या तापमानाचं मुख्य कारण म्हणजे, जीवाश्म इंधनाचा सामना करण्याच्या मुद्द्यावर एकमत दर्शवलं.
या कराराची भाषा ही अनेकांना हवी होती त्या तुलनेत कमकुवत होती असं म्हटलं गेलं. कारण यात देशांवर कृती करण्याबाबत बंधनं नव्हती. पण यामुळं इलेक्ट्रिक वाहनं आणि अक्षय ऊर्जा यासंदर्भात पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
1.5 अंशापर्यंत मर्यादित राहण्याचं उद्दिष्ट साध्य झालं नाही तरी, यामुळं हवामान बदलाचे गंभीर परिणाम आटोक्यात आणण्यासाठी अजूनही महत्त्वाचा फरक पडू शकतो, असं संशोधक म्हणतात.
लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील हवामान शास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. फ्रेडरिक ओट्टो म्हणाले की,"आपण 1.6 अंशापर्यंत पोहोचलो तरी माघार घेण्यापेक्षा किंवा 3 अंशाच्या जवळ जाण्यापेक्षा ते अधिक योग्य आहे. कारण सध्याच्या धोरणामुळं आपण 3 अंशाच्या दिशेनंही जाऊ शकतो."
"तापमान वाढीचा विचार करता, एका अंशाचा दहावा भागदेखील महत्त्वाचा आहे."
अतिरिक्त वार्तांकन बेकी डेल आणि केट गेनर.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








