उष्णतेच्या लाटेत युरोप होरपळतोय, काय आहेत कारणं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मालू करसिनो
- Role, बीबीसी न्यूज
पश्चिम युरोपातील लोकांना सध्या एकदम तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय. अत्यंत उष्ण हवा उत्तरेच्या दिशेने सरकत असल्यामुळे या प्रदेशात काल मंगळवार 19 जुलै रोजी पारा चढल्याचं दिसून आलं.
फ्रान्स आणि युकेमध्ये हवामान गरम राहाणार असल्याचं 18 जुलै रोजीच स्पष्ट करण्यात आलं. 18 जुलै रोजी स्पेनमध्ये तापमान 43 अंश सेल्सियस इतकं होतं.
फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन आणि ग्रीसमध्ये जंगलाला आग लागल्यामुळे लोकांना आपली घरं सोडून सुरक्षित स्थळी जावं लागलं आहे.
ब्रिटन लवकरच आपला आजवरचा सर्वाधिक उष्णतेचा दिवस अनुभवेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. फ्रान्समध्येही काही ठिकाणी हवामान अत्यंत तप्त आहे.
फ्रेंच हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या देशात अनेक शहरांत आजवरचा सर्वात तप्त दिवस आलेला आहे. पश्चिमेचं शहर नॉटमध्ये पारा 42 अंशांवर जाऊन पोहोचला होता.
युरोपातील अनेक देशांमध्ये नजिकच्या काळात लागलेल्या आगीमुळे 30 हजारांपेक्षा अधिक लोकांना आपली घरं सोडावी लागली. अनेक पाळीव प्राण्यांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.
फ्रान्समधील जेरोंद या पर्यटनस्थळावरही मोठा परिणाम दिसून आलाय. इथं गेल्या मंगळवारी आगीमुळे 17 हजार हेक्टर्स जमिनीचं नुकसान झालंय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
स्पेनमध्ये जमोरा प्रांतात आगीमुळे दोघांचा मृत्यू झालाय. रेल्वेरुळांजवळच आग लागल्यामुळे तेथील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. पोर्तुगालमध्ये आगीपासून संरक्षण होण्यासाठी स्थलांतर करताना एका ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झालाय
जेरोंद प्रांताचे अध्यक्ष खुआन-लुक ग्लेयेज यांनी ही आग राक्षसी असल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, REUTERS/Isabel Infantes
ते म्हणाले, "हा ऑक्टोपससारखा दिसणारा राक्षस आहे तो मोठा होतच चालला आहे. तापमानामुळे, हवेमुळे, आर्द्रता कमी झाल्यामुळे... हा मोठा होत चाललेला राक्षस आहे. त्याच्याविरोधात लढणं फार कठीण आहे."
जेरोंद संदर्भातील अहवालावर बीबीसी प्रतिनिधी लूसी विल्यम्सन सांगतात, जोपर्यंत हवा कोरडी आहे आणि हवा आपली दिशा बदलतेय तोवर यातून दिलासा मिळणार नाही.

फोटो स्रोत, REUTERS/Tom Nicholson
ब्रिटनमध्ये सोमवार सर्वात गरम दिवसांपैकी एक होता. सोमवारी पूर्व इंग्लंडमधील सफॉल्कमध्ये तापमान 38.1 अंश सेल्सियस नोंदवले गेले.
हे तापमान वाढू शकते असं हवामान विभाग सांगतो.
गरम हवेपासून सुटका करण्यााठी नदी आणि तलावात पोहायला जाणाऱ्या लोकांपैकी 4 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. उष्णतेमुळे ट्रेन तसेच लंडनच्या लटन विमानतळावर विमानाचे उड्डाणही थांबवण्यात आलेय
नेदरलँडमध्ये सोमवार हा या वर्षातला सर्वात उष्ण दिवस ठरला. वेस्टडोर्प शहरात 33.6 अंश तापमान नोंदवले गेले.
उ्षण हवा उत्तरेच्या दिशेन सरकत असून त्यामुळे बेल्जियम आणि जर्मनीत येत्या काही दिवसात तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता आहे.
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मृत्यू
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये उष्णतेमुळे अनेक लोकांचा मृत्यू ओढावला आहे.
पोर्तुगालमध्ये गेल्या गुरुवारी तापमान 47 अंशांवर पोहोचलं होतं. जुलै महिन्यातलं ते सर्वोच्च तापमान आहे. देशातल्या अनेक भागांमध्ये वणवे लागण्याची भीती मोसम विभागाने व्यक्त केली होती

फोटो स्रोत, EPA/SDIS 33 HANDOUT
स्थानिक माध्यमांनी उत्तर मुहसा नगरपालिकेने 300 लोकांना वणव्यातून वाचवण्यासाठी घरांतून सुरक्षित स्थळी नेलंय. 2017मध्ये जंगलाला लागलेल्या वणव्यात 66 लोक मृत्युमुखी पडले होते.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
स्पेनमध्ये सुमारे 20 ठिकाणी वणवे भडकले आहेत. पोर्तुगाल-स्पेन सीमेवर आगीमुळे ट्रेन थांबवण्यात आली. या ट्रेनमध्ये बसलेल्या व्यक्तीने या आगीचा व्हीडिओ चित्रित केला आहे. तज्ज्ञांच्यामते हवामान बदलामुळे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात उष्ण हवा वाहात आहे. ही हवा दीर्घकाळ राहात असून अधिक गरम होत चालली आहे.
औद्योगीकरणामुळे जगभरात तापमान आधीच 1.1 अंश सेल्सियसने वाढले आहे. जगभरातल्या विविध देशांच्या सरकारांनी कार्बन उत्सर्जन थांबवले नाही तर तापमान वाढत राहिल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








