लोकसभा 2024 : यवतमाळमध्ये भावना गवळींचा पत्ता कट, राजश्री पाटीलांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी

लोकसभा निवडणूक

यवतमाळ-वाशिममधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी यांच्याऐवजी संजय राठोड यांच्या उमेदवारीची चर्चाही सुरू होती.

पण या दोन्ही नावांऐवजी तिसराच पर्याय समोर आला.

हेमंत पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भावना गवळी

फोटो स्रोत, Facebook

हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे.

हेमंत पाटील यांना आधी जाहीर केलेली उमेदवारी बदलून बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हिंगोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा प्रचंड विरोध होता.

हिंगोलीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत पाटील यांच्या उमेदवारीविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

हेमंत पाटील आणि बाबुराव कदम कोहळीकर

फोटो स्रोत, Facebook

भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “इथे भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे इथे भाजपचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता घोषित केलेला उमेदवार बदलावा यासाठी आम्ही तीनही आमदार पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा करणार आहोत.”

भाजपच्या आमदारांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती.

या सगळ्या घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे गटाने आपला जाहीर केलेला उमेदवारच बदलला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी 28 मार्चला जाहीर केली होती. 8 उमेदवारांची ही पहिली यादी होती.

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तिथून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे गेली 2 टर्म खासदार आहेत. भाजप या ठिकणी गेल्या काही दिवसांपासून जोर लावत आहे.

या यादीमध्ये शिंदेंनी विद्यमान खासदारांपैकी एकाचंच तिकीट कापलं आहे.

रामटेकमधून सध्याचे खसादार कृपाल तुमाने यांंचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून विद्यमान खासदार संजय मंडलीक टक्कर देतील.

तर धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाची पहिली यादी

  • मावळ - श्रीरंग बारणे
  • हिंगोली - बाबूराव कदम कोहळीकर
  • बुलडाणा - प्रतापराव जाधव
  • दक्षिण-मध्य मुंबई - राहुल शेवाळे
  • रामटेक - राजू पारवे
  • हातकणंगले - धैर्यशील माने
  • कोल्हापूर - संजय मंडलीक
  • शिर्डी - सदाशिव लोखंडे
  • यवतमाळ - राजश्री पाटील
एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Facebook

मावळ, बुलडाणा, हिंगोली, दक्षिण-मध्य मुंबई आणि शिर्डीमध्ये थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.

मावळमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता शिदेंनी त्यांच्याविरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे.

बुलडाण्यातसुद्धा ठाकरे विरुद्ध शिंदे थेट लढत होणार आहे. तिथं उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिंदेंनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात आहेत. तिथं आता त्यांच्यात आणि ठाकरे गटाच्या नागेश पाटीलांमध्ये लढत होणार आहे.

दक्षिण मध्य मुंबईच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. कारण तिथं उद्धव ठाकरे यांच्या अनिल देसाईंसमोर विद्यमान खासदार राहुल शेवाळे असणार आहेत.

शिर्डीत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदेंनी पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी याठिकाणी आधीच भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

अभिनेते गोविंदांचा शिवसेनेत प्रवेश

अभिनेते गोविंदा यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.

अभिनेते गोविंदांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत उत्तर-पश्चिम मतदारसंघातून म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे अमोल किर्तीकर यांच्या विरोधात गोविंदा लोकसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले.

पक्ष प्रवेशावेळी गोविंदा म्हणाले की, "मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला जी जबाबदारी देईल, ती योग्य रितीने पार पाडेन."

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

सिनेसृष्टी मुंबईत आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचं यावेळी गोविंदा यांनी म्हटलं.

लोकसभा निवडणूक लढवणार का, याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, गोविंदा म्हणाले, अजून ते काही ठरवलं नाहीय.

तर एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी (गोविंदा) अशी कुठलीही अट घातली नाहीय. ते 14 वर्षे राजकीय वनवासात होते, आता चांगली माणसं सत्तेत आहेत, म्हणून ते समोर आलेत. ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील.

जेव्हा जेव्हा सिनेकलाकारांवर संकट आलं होतं, तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मदत केली होती, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

यापूर्वी 2004 साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोविंदा यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव गोविंदांनी केला होता.

2004 ते 2009 हा खासदार म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गोविंदा यांनी निवडणूक लढली नाही आणि ते राजकारणातूनही बाहेर पडले होते.