अमरावती लोकसभा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये वानखेडे-नवनीत राणांमध्ये रस्सीखेच

नवनीत राणा, बळवंत वानखेडे
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेडे आणि भाजपच्या नवनीत राणा यांच्यात रस्सीखेच असल्याचं सुरुवातीच्या कलांमधून पाहायला मिळालं आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दिनेश बूब हेही उमेदवार होते. पण त्यांचा फारसा परिणाम झालेला पाहायला मिळत नाही.

या मतदारसंघाचा विचार करता महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील अनेक मोठ्या नावांचा संबंध या मतदारसंघाशी आहे. त्यामुळं समृद्ध नेतृत्वाचा वारसा लाभलेला हा मतदारसंघ या निवडणुकीत कुणाच्या बाजूनं झुकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

राज्याच्या राजकारणात ज्याप्रकारचा गुंता आपल्याला सध्या पाहायला पाहायला मिळत आहे. त्याचे प्रतिबिंब या मतदारसंघाच्या निकालावर उमटणार अशी शक्यता एकूणच याठिकाणी घडणाऱ्या समीकरणांवरून सध्यातरी निर्माण झाल्याचं लक्षात येत आहे.

हे पाहण्यासाठी जावास्क्रिप्ट असलेला मॉडर्न ब्राऊजर आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे.

निकाल लागण्याची प्रतीक्षा
जिंकण्यासाठी 272 जागांची आवश्यकता
निकाल लागण्याची प्रतीक्षा
पेज अपडेट करण्यासाठी रिफ्रेश करा

राणांना होता विरोध!

नवनीत राणांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्याचं फारसं स्वागत झालं नाही. शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले आनंदराव अडसूळ हे राणा यांचे मुख्य विरोधक आहेत. त्यांच्यातील मतभेदांचा फटका राणांना बसणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

त्याशिवाय अमरावती मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचाही राणांना थेट विरोध असल्याचं पाहायला मिळालं होतं. शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून बच्चू कडुंची नाराजी वारंवार दिसून आली आहे.

राणा

फोटो स्रोत, ANI

काहीही झालं तरी राणांचा प्रचार करणार नसल्याचं कडू म्हणाले होते. त्यामुळं त्यांनी याठिकाणी उमेदवारही दिला. पण हा उमेदवार राष्ट्रवादीची मतं खाणार असं म्हटलं जात होतं. प्रत्यक्षात तसं झालेलं पाहायला मिळालं नाही.

यशोमती ठाकूर आणि राणा यांच्यातही राजकीय वैर असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळंच त्यांनीही वानखेडे यांच्यासाठी प्रयत्न केले असून, त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहेत बळवंत वानखेडे ?

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये अमरावती हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला होता. मतदारसंघामध्ये असलेली काँग्रेसची शक्ती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

काँग्रेसनं दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांना इथून उमेदवारी जाहीर केली.

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. ग्रामपंचायत ते आमदारकी असा बळवंत वानखेडे यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिल्याचं पाहायला मिळतं.

रिपाइंच्या गवई गटाकडून ग्रामपंचायत सदस्य बनल्यानंतर सरपंचही बनले होते. त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, सभापती, कृउबा संचालक अशा अनेक पदांवर काम केलं.

बळवंत वानखेडे

फोटो स्रोत, BALWANT WANKHEDE

बळवंत वानखेडे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंमधून बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला.

पण पुढच्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजनानंतर निर्माण झालेल्या एकूण परिस्थितीत वानखेडे यांचं या मतदारसंघातून नाव समोर आलं आहे.

विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडूनही वानखेडेंच्या नावाला फारसा विरोध किंवा आक्षेप दिसून आला नाही. काँग्रेसनं पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवल्याचं दिसून आलं.

समृद्ध नेतृत्वाचा राजकीय इतिहास

मतदारसंघाच्या इतिहासाचा विचार करता पंजाबराव देशमुखांसारख्या मोठ्या नावापासून या मतदारसंघाच्या लोकसभेतील नेतृत्वाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या पत्नी विमलबाई देशमुख याही या मतदारसंघाच्या खासदार राहिल्या.

त्याशिवाय नानासाहेब बोंडे, उषा चौधरी यांच्या माध्यमातून 1984 पर्यंत काँग्रेसचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिल्याचं दिसून आलं. त्यानंतर मात्र काँग्रेसला इथं धक्का बसला.

1991 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काँग्रेसला इथून विजय मिळवून दिला तो अखेरचा. नंतर इथं काँग्रेसचा खासदार निवडून आलेला नाही.

पण काँग्रेसबरोबर डाव्यांच्या भाकप, रिपाइं, शिवसेना अशा इतर पक्षांच्या नेत्यांनाही संधी देत याठिकाणच्या मतदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसलं. त्यामुळं सुदाम देशमुख, रासू गवई या नेत्यांना लोकसभेत मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

ग्राफिक्स

1999 पासून मतदारसंघावर शिवसेनेनं वर्चस्व मिळवल्याचं चित्र पाहायला मिळालं. 10 वर्षं शिवसेनेचे अनंत गुढे आणि त्यानंतर 10 वर्षं आनंदराव अडसूळ यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलं.

त्यानंतर 2019 मध्ये अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधात विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राणा यांना या निवडणुकीत मिळाला होता. त्यापूर्वी 2014 मध्ये त्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढूनच अडसुळांकडून पराभूत झाल्या होत्या.

2019 मध्ये राणांचा विजय

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीकडून आनंदराव अडसूळ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात प्रमुख उमेदवार होत्या अपक्ष नवनीत राणा.

नवनीत राणा यांना त्यावेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं पाठिंबा दिला होता. त्यामुळं आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात सर्व मतं एकवटली गेली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचाही फटका अडसूळ यांना बसला असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे या निवडणुकीत अडसूळ जवळपास 40 हजारांपेक्षा कमी मतांनी परभूत झाले होते. तर वंचितच्या उमेदवारानं तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे जवळपास 65 हजार मतं मिळवली होती.

राणा

फोटो स्रोत, ANI

आनंदराव अडसूळ आणि राणा यांच्यात या निवडणुकीत बराच संघर्ष पाहायला मिळाला होता. 2014 मध्ये राणा यांनी अडसुळांच्या विरोधात विनयभंगाचा आरोपही केला होता. तर 2019 मध्ये पराभवानंतर अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र प्रकरणी राणांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं आणि त्याचाच निकाल आता 1 एप्रिलला लागणार आहे.

मविआ विरुद्ध राणा संघर्ष!

राणा

फोटो स्रोत, ANI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रवी राणा आणि नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. त्या माध्यमातून ते अमरावती जिल्ह्यात राजकारण करतात. मात्र त्यांनी कायम सत्ताधारी पक्षाशी त्यांनी जुळवून घेतल्याचं पाहायला मिळालं, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं.

खरं म्हणजे नवनीत राणा 2019 ची निवडणूक लढताना अपक्ष उमेदवार असल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या त्या पुरस्कृत उमेदवार होत्या. पण सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांची केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर सरकार आणि राणा यांच्यात संघर्षही पाहायला मिळाला.

आधी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचं त्यांनी जाहीर केलं. पण पोलिसांनी अमरावतीतच त्यांना ताब्यात घेतलं.

त्यानंतर हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. तसंच मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठन करण्याची घोषणा त्यांनी केली होती.

त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आणि त्यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

एकूणच गेल्या चार वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी सातत्यानं महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. तसंच अमरावतीतील काही प्रकरणांमुळंही हे दाम्पत्य चर्चेत राहिलं.