नांदेडमध्ये एक चव्हाण भाजपसोबत, पण चिखलीकरांना आता दुसऱ्या चव्हाणांचं आव्हान

वसंत चव्हाण, अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडं राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असेल, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ.

राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेला हा जिल्हा आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही मुख्यमंत्री एकाच कुटुंबातले किंबहुना पिता-पुत्र होते. ते म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण.

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानं भाजपसमोरचं या मतदारसंघातलं आव्हान जणू संपुष्टातच आल्याचं म्हटलं जात होतं.

पण भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांसमोर काँग्रेसनं वसंत चव्हाण यांच्या रुपानं चांगला पर्याय मतदारांसमोर उभा केला आहे. त्यामुळं ही निवडणूक भाजपला अगदीच एकतर्फीही करण्यात यश मिळण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहे.

मतांचं ध्रुवीकरण, मराठा आरक्षणाचा मुद्दा हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळं या मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथीनंतरही चांगली लढत पाहायला मिळू शकते.

नांदेड मतदारसंघाचा इतिहास

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा अगदी पहिल्या म्हणजे 1952 च्या निवडणुकीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. 1977 आणि 1989 चा अपवाद वगळता 2004 पर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व या मतदारसंघात पाहायला मिळालं.

चव्हाण पिता-पुत्रांबरोबरच देवराव कांबळे, व्यंकटराव तारोदेकर, तुळशीदास जाधव, सूर्यकांता पाटील, भास्करराव खतगावकर अशा अनेक खासदारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं.

शंकरराव चव्हाण आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी
फोटो कॅप्शन, शंकरराव चव्हाण आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी

2004 भाजपनं या मतदारसंघात आघाडी घेत काँग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. पण परत 10 वर्षे काँग्रेसनं हा गड त्यांच्या ताब्यात ठेवला.

2014 च्या मोदी लाटेत तर काँग्रेसला राज्यात दोनच जागी विजय मिळाला होता. त्यापैकी एक नांदेड मतदारसंघ होता. अशोकराव चव्हाण हे स्वतः तेव्हा लोकसभेच्या रणांगणात उतरले होते.

विधानसभेतील जागा

पण 2019 मध्ये प्रतापराव चिखलीकरांनी त्याच अशोक चव्हाणांचा पराभव करत काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढली.

विधानसभा मतदारसंघांचा विचार करता नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

2019 मध्ये अशोक चव्हाण पराभूत

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप मिळवत असलेलं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी काँग्रेसनं मोठा डाव खेळत 2014 मध्ये पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवलं.

2019 मध्येही काँग्रेसनं अशोक चव्हाणांची उमेदवारी कायम ठेवली. चव्हाणांच्या रुपानं हा मतदारसंघ राखण्यात यश येईल अशी काँग्रेसला आशा होती. पण भाजपनं उमेदवार बदलला आणि प्रतापराव चिखलीकरांच्या रुपानं तगडा उमेदवार मैदानात उतरवला.

अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर
फोटो कॅप्शन, अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर

निवडणुकीत चिखलीकरांनी चव्हाणांना आव्हानच दिलं नाही तर त्यांचा पराभव करत काँग्रेस आणि चव्हाणांनाही मोठा धक्का दिला. पण भाजपच्या या विजयात मोठा वाटा होता तो वंचित बहुजन आघाडीचा.

त्याचं कारण म्हणजे चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना जवळपास 40 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यानं पराभूत केलं होतं. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखावर मतं घेतली होती.

काँग्रेसची बहुतांश मतं या निवडणुकीत वंचितकडं वळली असणार, असं मत नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांनी व्यक्त केलं.

त्यामुळं 2019 मध्ये पुन्हा काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आला आहे. आता हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपनं पुन्हा नवा डाव खेळला आहे.

चार वर्षांत कसं बदलत गेलं राजकारण

2019 मध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपनं नांदेड मतदारसंघात आपली मुळं आणखी घट्ट रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विधानसभेसाठी भाजपनं चांगली तयारी केली.

लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेडच्या 3 विधानसभांमध्ये काँग्रेस, 2 ठिकाणी भाजप तर शिवसेनेचा एक आमदार निवडून आला. पण त्यावेळी अशोकराव चव्हाण यांची शक्ती काँग्रेसच्या बाजुनं होती.

त्यानंतर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळं काँग्रेस राज्यात मविआच्या माध्यमातून सत्तेत आलं. अशोक चव्हाण या मंत्रिमंडळातही होते. पण नंतर पुन्हा उलथापालथ झाली. भाजपनं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवल्याच्या चर्चा झाल्या.

त्यानंतर अशोक चव्हाणांबाबतही अनेकदा अफवा उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशोकराव चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी भाकितं अनेक राजकीय विश्लेषकही करत होते.

अखेर गेल्या महिन्यात अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यामुळं या मतदारसंघातली समीकरणं आता पूर्णपणे बदलून गेली आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

काँग्रेसकडून 'चांगला उमेदवार'

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था असे वेगवेगळे मुद्दे संबंधित मतदारसंघांनुसार निवडणुकांवर परिणाम करणारे ठरू शकतात. पण हा परिणाम किती मोठा असेल याबाबत शाश्वती नाही.

मात्र, राज्यातील बदलेली राजकीय समीकरणं, लोकसभेच्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि आघाडी-महायुतीचं राजकारण याचा मात्र निवडणुकीवर चांगलाच प्रभाव पडणार हे जवळपास नक्की आहे.

वसंतराव चव्हाण

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, वसंतराव चव्हाण
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अशोक चव्हाणांच्या प्रवेशानं भाजपला विजय सहज शक्य वाटत असला तरी, काँग्रेसनं वसंत चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपला नक्कीच जास्त परिश्रम घ्यावे लागतील, असं मत नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांनी व्यक्त केलं.

वसंत चव्हाण यांच्या रुपानं काँग्रेसनं मराठा विरुद्ध मराठा उमेदवार मैदानात उतरवला आहे. वसंत चव्हाण हे काँग्रेसचे जुने नेते आहेत. सुरुवातीला शरद पवारांबरोबर आणि नंतर ते काँग्रेसबरोबर होते. सरपंच ते आमदार असा प्रवास असल्यानं वसंत चव्हाण यांचा जनसंपर्कही तगडा राहिलेला आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे वसंत चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर दोघांमध्ये नातेसंबंध आहे. त्यामुळं मतदारसंघातील त्यांचे नातेसंबंध किंवा सगेसोयरे हे सारखेच आहेत. त्यामुळं त्याचाही परिणाम नक्कीच पाहायला मिळेल.

नांदेड मतदारसंघात मुस्लिम मतांचं प्रमाण मोठं आहे. गेल्यावेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी असल्यानं मुस्लीम मतं काँग्रेसपासून दूर गेली होती. पण यावेळी ही मतं पुन्हा काँग्रेसच्या बाजूनं वळू शकतात.

त्याचबरोबर दलित मतंही यावेळी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसं झाल्यास काँग्रेस भाजपला चांगली टक्कर देऊ शकेन, असंही एकबोटे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर या मुद्द्याचा फटका किंवा फायदा कोणाला होणार यावरही बरंच काही अवलंबून असणार आहे.

एकूणच अशोकराव चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला आपल्या बाजून घेतल्यानंतर त्यांच्याबरोबरच भाजपसाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. आता मतदार अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा कायम ठेवणार की काँग्रेसची हे 4 जून रोजी स्पष्ट होईलच.

हेही वाचलंत का?