चंद्रपूर लोकसभा निकाल : मुनगंटिवार यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकरांना मोठी आघाडी

- Author, टीम बीबीसी मराठी
- Role, नवी दिल्ली
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटिवार यांच्या विरोधात मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.
याठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते. पण, त्यांचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा काँग्रेसने त्यांच्याच पत्नीसाठी ही जागा दिली आहे.
2019 ला मोदी लाट असतानाही भाजपच्या ताब्यातून खेचून आणलेला एकमेव मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर. हा मतदारसंघ उमेदवारीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला होता.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी चार टर्म भाजपच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा रोवला होता. राज्यात 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला फक्त चंद्रपूर जिंकण्यात यश मिळालं होतं.
कोण आहेत प्रतिभा धानोरकर?
प्रतिभा धानोरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह इथल्या आहेत. हाच वणी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो. वणी माहेर आणि सासर चंद्रपूर असल्याने दोन्हीकडून त्यांना राजकीय फायदा होतो.
त्यांनी उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना 'लेक वणीची, सून चंद्रपूरची' असा प्रचार सुरू केला होता. बाळू धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते तोपर्यंत प्रतिभा या राजकारणात प्रत्यक्ष सक्रीय नव्हत्या. पती राजकारणात आणि पत्नी समाजकार्यात असं समीकरण होतं. पण, 2019 ला बाळू धानोरकर लोकसभेवर निवडून गेले आणि प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्या सक्षम उमेदवार ठरणार नाही, असे अंदाज अनेकांनी बांधले होते.

फोटो स्रोत, PRATIBHA DHANORKAR
त्या चांगल्या मतांनी निवडूनही आल्या. यानंतर त्यांनी तृतीयपंथियांना आरक्षण देण्याची मागणी विधानसभेत केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तृतीय पंथीयांना पोलिस खात्यासह इतर खात्यात दोन टक्के आरक्षण आणि निवासाची सोय करावी, अशी मागणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.
प्रतिभा धानोरकर या धनुजे कुणबी आहेत. शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणारे वरोरा, आर्णी आणि वणी हे तीन विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहेत. त्यामुळे इथला मतदारवर्ग 2019 ला बाळू धानोरकरांच्या पाठिशी उभा होता.
2019 ला बहुसंख्येनं असलेला ओबीसी विरुद्ध इतर समाज अशी ही लढत झाली होती. त्यामुळे धानोरकरांना तेव्हा विजयश्री मिळवता आला, अशी चर्चा चंद्रपुरात होती.
सुधीर मुनगंटीवारांची ताकद
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिलेत. ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सहावेळी आमदार झाले. त्यांना फडणवीसांच्या मतदारसंघात अर्थमंत्र्यासारखं महत्वाचं खातंही मिळालं. शिवाय एक अभ्यासू व्यक्तीमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख आहे. त्यांची मतदारसंघातील पक्षसंघटनेवरही पकड आहे.
पण, अनुसूचित जाती, आदिवासी, मुस्लीम यासोबत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाची एकगठ्ठा मतं मिळतील अशी परिस्थिती नाही. शिवाय मुनगंटीवार हे स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छूक नव्हते.
शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. त्यामुळे सुरुवातीपासून कार्यकर्त्यांमध्ये लढण्याचा मेसेज जायला हवा होता तो गेला नाही. त्याचा फटका बसला का याचंही विश्लेषण करावं लागणार आहे.
मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर लढत
चंद्रपुरात 2019 च्या निवडणुकीपर्यंत जातीय समीकरणांवर लढत होत नव्हती. कारण, या जिल्ह्यात लोकसंख्येनं अंत्यत कमी असलेल्या जातीच्या मुनगंटीवार, भांगडीया, अहीर या नेत्यांचं वर्चस्व राहिलं. पण, 2019 ला पहिल्यांदाच अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य ओबीसी अशी लढत झाली.
बहुसंख्य असलेला ओबीसी समाज एकवटला गेला. पाच वर्षांतही ओबीसी समाज एकवटलेला दिसला. याचं उदाहरण म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघात झालेला अभिजीत वंजारी यांचा विजय आणि शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडबाले यांचा झालेला विजय. यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वादाने पुन्हा भर पडली.
मराठ्यांना कुणबी सर्टीफिकेट देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याला चंद्रपुरातून सर्वाधिक विरोध झाला. त्यामुळे 2024 ही निवडणूक याच मुद्द्यावर लढली गेल्याची शक्यता आहे. शिवाय अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य ओबीसी अशी ही लढत झाल्याची शक्यता आहे. या समीकरणात प्रतिभा धानोरकर फीट बसतात.

मुनगंटीवार पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, त्यामधून त्यांनी केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू होती. पण, तरीही मुनगंटीवारांना चंद्रपूरमधून किती पाठिंबा मिळेल? असा मुद्दा होता.
जातीय समीकरणं आणि मतदारसंघाची रचना
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे. वणी, आर्णी आणि वरोरा या तीन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कुणबी मतदार आहेत. त्यामुळे इथल्या प्रत्येक निवडणुकीत कुणबी मतदार निर्णायक ठरतो.
कुणबी मतांमुळे 2019 ला बाळू धानोरकर यांचा विजय सुकर झाला होता. तसंच या मतदारसंघात आंबेडकरी चळवळींचाही मोठा प्रभाव आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आधी चंद्रपुरातलाच भाग येत होता. पण, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला.
चंद्रपुरातील चार आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तयार होतो.
सहा विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल
चंद्रपुरात कोणाचा विजय होणार यामागे विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
वणीमधून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णीमधून संदीप धुर्वे हे भाजपचे आमदार आहेत. बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत ज्यांना सध्या भाजपनं लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.
राजूरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, वरोरामधून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या आमदार आहेत.
चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असून त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे.
काँग्रेसच्या गडाला भाजपनं असा लावला सुरुंग
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. 1952 ला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजय झाली होते. त्यानंतर 1957 मध्ये व्ही. एन. स्वामी यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यश मिळवलं.
पण, 1962 मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवार लाल श्यामशाह लाल भगवानशाह यांनी जिंकला. पुढे 1967 आणि 1977 चा अपवाद वगळता चंद्रपूरने काँग्रेसचे खासदार दिल्लीत पाठवले. पण, हंसराज अहीर यांनी 1996 ला काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला.
पण, काँग्रेसनं 1998 आणि 1999 मध्ये पुन्हा जोरदार कमबॅक केलं. नरेश पुगलिया यांनी दोन्हीवेळेला काँग्रेसला त्यांचा गड परत मिळवून दिला. 2004 ला हंसराज यांनी पुन्हा बाजी मारली.
अहीर चंद्रपुरातून सलग तीन टर्म निवडून आले. त्यामुळे 2014 ला मोदी सरकारमध्येही हंसराज अहीर यांच्यावर चंद्रपूरची धुरा सोपवली होती. त्यातही त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवलं.
पण, सलग चार टर्म खासदार राहिलेल्या हंसराज अहीर यांना हरवून बाळू धानोरकरांनी 2019 ला इतिहास रचला होता.
अशोक चव्हाणांची ती ऑडिओ क्लीप आणि बाळू धानोरकरांना उमेदवारी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत होता.
सुरुवातीला काँग्रेसकडून विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण, पाहुण्याला म्हणजेच जिल्ह्याबाहेर नेत्याला उमेदवारी का? असा सवाल करत मुत्तेमवारांना विरोध झाला.
विशाल यांनी माघार घेतली. इतक्यात बाळू धानोरकर हे उमेदवारीसाठी इच्छूक होतेच. त्यासाठी त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता. पण, इतकं झाल्यावरही काँग्रेसकडून तेली समाजाच्या विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाली.
याच उमेदवारीच्या नाट्यात तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लीप चांगलीच गाजली.

फोटो स्रोत, FACEBOOK
धानोरकरांच्या उमेदवारीवरून माझ्या हातात काहीच नाही, असं चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी थेट राहुल गांधी यांना फोन केला.
शेवटी ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलून बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. ज्या धानोरकरांच्या उमेदवारीसाठी इतकं नाट्य झालं त्यांनीच काँग्रेसला राज्यात एक जागा दिली.
अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडासाफ झाला असताना सलग चार टर्म भाजपकडे असलेला मतदारसंघ धानोरकरांनी खेचून आणला.
काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, अशा घोषणा भाजपकडून करण्यात येतात. पण, 2019 ला काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं ते चंद्रपुरात.
तेव्हापासून भाजपनं हा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी कसरत सुरू केली आहे. जे. पी. नड्डांपासून देवेंद्र फडणवीसांच्या या मतदारसंघात सभा झाल्या. हा मतदारसंघ परत मिळवून देण्याची जबाबदारी भाजपनं सुधीर मुनगंटीवारांवर सोपवली आहे.
बाळू धानोरकरांचं अकाली निधन
बाळू धानोरकर यांनी राज्यात काँग्रेसला एकमेव जागा मिळवून दिली. पण, त्यांना खासदारकीची टर्म पूर्ण करायला मिळाली नाही. त्यांचं मे 2023 मध्ये किडनीच्या आजाराने निधन झालं. त्यामुळे नियमानुसार या मतदारसंघात पोटनिवडणूक लागणं अपेक्षित होतं.
त्यामध्येही बाळू धानोरकरांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर या दावेदार होत्या. पण पोटनिवडणूक न लागता आता थेट लोकसभेची निवडणूक लागली आहे.

फोटो स्रोत, Pratibha Dhanorkar Facebook
प्रतिभा धानोरकरांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. नैसर्गिक न्यायाप्रमाणे उमेदवारीवर माझा हक्क आहे आणि ही उमेदवारी आपल्याला मिळणार असं प्रतिभा धानोरकर सांगत होत्या. त्यांनी सोशल मीडियावरून तशा पोस्ट देखील लिहिल्या आहेत. त्यानंतर त्यांनाच उमेदवारी देण्यात आली.











