सांगलीत विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम; आता लढत कशी होणार?

सांगली लोकसभा मतदारसंघ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सांगली लोकसभा मतदारसंघ
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

सांगली या ठिकाणी आता लोकसभेच्या जागेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी आपला अर्ज परत घेतला नाही. तेव्हा सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता ते महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याविरोधात लढत देतील.

सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बरीच रस्सीखेच झाली शेवटी शिवसेनेला ( ठाकरे गट) ही जागा मिळाली. त्यांना ही जागा मिळाल्यावर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केला.

त्यांची मनधरणी करुन त्यांना अर्ज मागे घ्यावयास लावू असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांना होता पण आज अर्ज मागे घेतला नाही. आज ( 22 एप्रिल) रोजी सांगलीतील 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली पण विश्वास पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यानंतर आता ही लढत तिरंगी होईल असे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूरच्या बदल्यात आम्ही सांगली लढवत आहोत, हा शिवसेनेचा दावा आहे; तर वाटाघाटीत असं ठरलं नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं.

उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, सांगलीच्या जागेचा प्रश्न आता महाविकास आघाडीसाठी संपलेला आहे.

पण प्रत्यक्ष लढताना हा सांगलीच्या जागेचा प्रश्न महाविकास आघाडीला सतावणार असल्याची चिन्हं आहेत.

संजय राऊत यांनी म्हटलं होतं, “पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेकडे एकही जागा नाही. कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती. तीस वर्षे आम्ही ती जागा लढतोय. यावेळेस ती सीटिंग जागा होती. पण शाहू महाराजांचं नाव समोर आल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही ती जागा काँग्रेसला सोडली.”

“पश्चिम महाराष्ट्रात आपल्याकडे एकतरी जागा असावी म्हणून आम्ही सांगलीची जागा घेतली आणि ती सर्वांनी मिळून जिंकावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

‘ही तडजोड झालेली नाही’

काँग्रेसकडून ही जागा लढविण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

याआधी, विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी दिल्लीत सांगलीच्या तिढ्याबद्दल श्रेष्ठींची भेट घेतली होती. या भेटीनंतर या दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला होता.

त्यावेळी विशाल पाटील यांनी म्हटलं होतं, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून एकत्र राहिले आहेत. शिवसेना पहिल्यांदाच या आघाडीत आली आहे. त्यांंची वाटाघाटीची पद्धत कदाचित वेगळी असेल, पण सांगलीबाबत कोणतीही तडजोड झालेली नाही. त्यांनी उमेदवारी परस्पर जाहीर केली असेल, पण काँग्रेस जबाबदार पक्ष आहे. त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुटेल असं आश्वासन शीर्ष नेतृत्वाने आम्हाला दिलं आहे.”

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

दुसरीकडे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, “कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं ठरलेलंच नव्हतं. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ज्या पक्षातून निवडणूक लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्यातल्या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं होतं. शाहू महाराजांनी स्वतःहून काँग्रेस पक्ष निवडला.”

“हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे खासदार होते. शिवसेनेनं तिथे लढावं,” असंही त्यांनी म्हटलं.

आता सांगलीचा हा तिढा सुटणार की आघाडीत बिघाडी होणार हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सांगली मतदारसंघाचा इतिहास, काँग्रेस आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यासाठी हा मतदारसंघ का महत्त्वाचा आहे, शिवसेना अचानक या मतदारसंघासाठी आग्रही का झाली आहे, या प्रश्नांची उत्तरंही जाणून घ्यावी लागतील.

या सर्व पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत हेच दाखवत आपला अर्ज मागे घेतला नाही. लिफाफा या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत.

सांगली मतदारसंघाचा इतिहास

1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.

वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2009ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला.

पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

विशाल पाटील

फोटो स्रोत, Facebook

2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.

त्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका अशी सत्ताकेंद्रे एकापाठोपाठ एक गमावली.

2019 च्या निवडणुकीत काय घडलं होतं?

सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं.

2019 च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला.

"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे," अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती.

निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हते अशी स्थिती होती. कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता.

शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. विशाल पाटील म्हणजे वसंत दादांचे नातू. त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे.

संजयकाका पाटील

फोटो स्रोत, Facebook

त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने. पडळकर सुरुवातीला काँग्रेस - स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला.

आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगली मतं मिळणार असा कयास बांधला जात होता.

मात्र, पडळकरांना तिसर्‍या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला. परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला.

काँग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही का?

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत होता. विशेष करून वसंतदादा पाटील यांचे समर्थन असलेले किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यच इथून जनतेने खासदार म्हणून निवडून दिले.

2014 आणि 2019 ला नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सगळी समीकरणं बदलल्याचा उल्लेख वर केलाच आहे.

संजयकाका पाटील

मग आता पुन्हा काँग्रेस या मतदारसंघासाठी इतकी आग्रही का झाली आहे, याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांनी म्हटलं की, “सांगली आणि नंदुरबार हे असे जिल्हे आहेत जिथे काँग्रेस उमेदवार लोकसभेला हमखास निवडून येतो असे महाराष्ट्रभर बोलले जायचे. सातारा जिल्ह्यातून वेगळा होऊन सांगली जिल्हा तयार झाला तरी 1952 पासून इथे काँग्रेसचे वर्चस्व होते.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दादा कुटुंबातील सदस्य येथून पराभूत होत आहेत आणि दहा वर्षानंतर आता भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इन्कबन्सी फॅक्टर काम करेल असे त्यांना वाटत असल्याने गमावलेले महत्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्यांना या जागेचे आणि उमेदवारीचे महत्व वाटत आहे.”

शिवसेना आग्रही पण या मतदारसंघात ताकद किती?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भाजप-शिवसेना युतीमध्ये सांगली मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला होता. मग आता शिवसेना या मतदारसंघासाठी आग्रही का झाली आहे? पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये शिवसेना तुलनेने अधिक प्रभावी आहे, मात्र इथले दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. शिवाय आघाडीमधील वाटाघाटीत कोल्हापूर काँग्रेसकडे गेल्याने, पक्षातील फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सेनेला हक्काच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे.

याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार शिवाजी मोहिते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “शिवसेना सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत आग्रही आहे याचे मुख्य कारण विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपामधून होत असलेला विरोध.

"मूळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघांमध्ये आता भाजप विरोधातला उमेदवार निवडून येऊ शकतो याची खात्री ठाकरे सेनेला आहे आणि त्यामुळेच कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा सांगितलेला आहे. कारण सांगली मधून शिवसेनेचा खासदार निवडून येऊ शकतो याचं कारण भाजपाविरोधी मतांचे एकत्रीकरण होईल अशी अपेक्षा ठाकरे गटाला आहे,” मोहिते सांगतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेनेला भाजपविरोधी मतं मिळण्याची अपेक्षा असली, तरी मुळात इथे त्यांची ताकद खरंच आहे का?

याविषयी बोलताना शिवराज काटकर यांनी सांगितलं की, “या मतदार संघात सेनेची ताकद नगण्य आहे. मात्र, त्यांचा मतदार निश्चित आहे. जेव्हा जेव्हा या मतदाराला सेनेसाठी मतदान करण्याची संधी मिळाली, तेव्हा उमेदवार तगडा असेल तर 40 हजारापर्यंत मतदान तासगाव कवठे महांकाळ, मिरज, जत, सांगली अशा मतदार संघात देखील मिळाले आहे.

सांगली, मिरज या दोन विधानसभा मतदार संघात सेनेने बूथ रचना भक्कम केली असून इतर ठिकाणीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्ष फुटीनंतर तिथले संघटनात्मक नेटवर्क कमी झाले आहे. जिल्ह्यात शिवसेनेची स्वतःची एकही ग्राम पंचायतीत सत्ता नाही किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीत सदस्य नाही.”

काँग्रेस-शिवसेनेच्या या वादात राष्ट्रवादीचं मौन का?

एकीकडे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगलीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मौन बाळगलं आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेचा मुद्दा उपस्थित होण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगलीतील प्रमुख नेते जयंत पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील इतिहास.

या दोन्ही घराण्यांमध्ये सांगलीवर वर्चस्व मिळवण्याचा संघर्ष हा वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यापासूनच सुरू असलेला दिसतो. या संघर्षातून राजारामबापू पाटील यांनी 1978 साली जनता पक्षाचीही वाट धरली होती.

वसंतदादा यांची पुढची पिढी प्रकाशबापू पाटील आणि मदन पाटील यांच्या रुपाने राजकारणात सक्रीय झाली, तर राजारामबापू पाटील यांचे पुत्र जयंत पाटील हेही राजकारणात आले. मात्र, प्रकाशबापू-मदन पाटील यांच्या राजकारणात जयंत पाटील काहीसे मागे राहिले होते.

वसंतदादांची तिसरी पिढी राजकारणात आली, तेव्हा मात्र जयंत पाटील हे सांगलीच्या आणि राज्याच्या राजकारणात बरेच पुढे आले होते. त्यांनी सांगली जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समितीवरही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. वसंतदादा घराण्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांशीही हातमिळवणी केल्याची चर्चा होती.

जयंत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

महाविकास आघाडी सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात सामंजस्य दिसून आलं असल्याचं निरीक्षण शिवराज काटकर नोंदवतात.

“वसंतदादा परिवाराला पुनरुज्जीवनाची संधी मिळत नसेल आणि चंद्रहार पाटील यांच्या सारखा कधी काळी त्यांच्याच पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य असलेला मल्ल उमेदवार असेल तर त्याला मदत करण्यास ते पुढे येऊ शकतात. अर्थात यापूर्वी दादा घराण्याशी असलेल्या उघड संघर्षात जयंत पाटील खासदार संजय काका पाटील यांनाही पाठबळ देत होते. ते एकीकडे आणि त्यांचे कार्यकर्ते दुसरीकडे असे निवडणुकीतील चित्र होते. आताही संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यापैकी ज्याचे वारे वाहू लागेल त्या वाऱ्याच्या गतीत आपलीही शक्ती लावण्याचा मुत्सद्दी पणा जयंत पाटील दाखवतील अशी चिन्हे आहेत,” असं काटकर सांगतात.

एकूणच काँग्रेस आणि सेनेमधला सांगलीच्या जागेचा तिढा सुटला तरी ही लढत रंजक होणार हे नक्की.