You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दार्जिलिंग : मुसळधार पावसाने 23 मृत्यू, अनेक प्रवासी अडकले; स्थानिक म्हणतात, '27 वर्षांत असा विध्वंस पाहिला नाही'
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात शनिवारी (4 ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
दार्जिलिंगचे एसडीओ रिचर्ड लेप्चा म्हणाले की, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, 23 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
यातील सात जण दार्जिलिंग सबडिव्हिजनमध्ये आणि 11 जण मिरिकमध्ये मारले गेले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
प्रचंड पावसामुळे मिरिक-दूधियामधील लोखंडी पूल तुटला आहे. अनेक भागात घरं पडली आहेत.
जिल्हा प्रशासनातील सूत्रांनुसार, अनेक दुर्गम भागांमध्ये आतापर्यंत किती जीवितहानी झाले आहे आणि मालमत्तेचं किती नुकसान झालं आहे, याची पूर्ण माहिती मिळालेली नाही.
अनेक भाग पाण्याखाली, हजारो पर्यटक अडकले
दार्जिलिंग आणि सिक्कीमचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे. उत्तर बंगालमधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हजारो पर्यटक अडकले आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पर्यटकांना धीर धरण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आश्वासन दिले.
एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिसांची पथके मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
उत्तर बंगाल विकास मंत्री उदयन गुहा म्हणाले, "आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो."
दार्जिलिंग जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, मिरिकमध्ये 9, सुकियापोखरीमध्ये 7 आणि बिजनबारीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी दार्जिलिंगजवळील ढिगाऱ्यातून एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
स्थानिकांचं काय म्हणणं आहे?
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की गेल्या 27 वर्षांमध्ये त्यांनी इतका प्रचंड पाऊस आणि इतका विध्वंस पाहिलेला नाही.
विवेक प्रदान दार्जिलिंगच्या चौक बाजारातील रहिवासी आहेत. विवेक यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं की, "शनिवारी (4 ऑक्टोबर) सकाळपासूनच पाऊस पडत होता. मात्र संध्याकाळ होईपर्यंत खूपच मुसळधार पाऊस पडू लागला. संपूर्ण रात्रभर एक मिनिटदेखील न थांबता पाऊस पडत होता."
ते म्हणाले की पर्यटकांचा हंगाम असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. सोमवारी (6 ऑक्टोबर) लक्ष्मी पूजन असल्यामुळे यातील बहुतांश पर्यटकांना आजच परतायचं होतं. मात्र सिलीगुडीपर्यंत जाण्यासाठीचे सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे हजारो लोक इथे अडकले आहेत.
अलीपूर हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी (4 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी (5 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासांमध्ये फक्त दार्जिलिंगमध्येच 261 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
23 सप्टेंबरला कोलकात्यात 24 तासांमध्ये 251 मिमी पाऊस पडला होता.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेत झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या हानीवर शोक व्यक्त केला आहे.
कोलकात्यात त्या पत्रकारांना म्हणाल्या, "ही दुर्दैवी घटना आहे. मात्र नैसर्गिक संकटावर आपलं कोणतंही नियंत्रण नसतं. मी खूप दु:खी आहे. पावसामुळे भूतानमधून येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर बंगालचे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत."
रस्तेमार्गानं होणारा संपर्क तुटला
कर्सियांगचे एएसपी अभिषेक राय म्हणाले की दार्जिलिंग-कार्सियांगच्या मध्ये दिलारामजवळ भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.
मिरिक-दूधियाजवळ पूल तुटल्यामुळे दार्जिलिंगहून सिलीगुडीला जाणारा पर्यायी मार्गदेखील बंद झाला आहे.
सिक्कीम आणि कालिम्पोंग यांच्यातील संपर्कदेखील तुटला आहे.
हवामान विभागानं अलीपूरदुआर, कूचबिहार आणि जलपायगुडीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कूचबिहारमध्ये 190.2 मिमी, जलपायगुडीमध्ये 172 मिमी आणि सिलीगुडीमध्ये 134 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सकाळी 6 वाजेपासूनच कोलकात्यातील कंट्रोल रुममधून परिस्थितीवर लक्ष ठेवत मदत आणि बचाव कार्यावर देखरेख करत आहेत.
दार्जिलिंगमधील एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव सोमवारी (6 ऑक्टोबर) घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करतील. ते रविवारी (5 ऑक्टोबर) रात्री उशीरापर्यंत सिलीगुडीत पोहोचण्याचा अंदाज आहे.
सिक्कीमचा संपर्कदेखील तुटला
सिक्कीमला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 10 चे अनेक भाग तीस्ताच्या पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे या डोंगराळ राज्याचा संपर्क तुटला आहे.
तिथेदेखील शेकडो पर्यटक अडकले आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून सिक्कीममध्ये असलेल्या कोलकात्याच्या शुभोजित घोषाल यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं की, "आमची ट्रेन रात्री आहे. त्यासाठी आम्ही लांबच्या मार्गानं सिलीगुडीला पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र पर्यायी रस्तादेखील अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. ट्रेनच्या वेळेपर्यंत आम्ही स्टेशनवर पोहोचू की नाही, हे माहित नाही."
उत्तर बंगालमध्ये पूरसदृश परिस्थिती
भूतानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबतच शनिवारी (4 सप्टेंबर) रात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या भागातील अनेक नद्यांचा जलस्तर झपाट्याने वाढत आहे. जलपाईगुडी आणि अलीपुरदुआर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कूचबिहारच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, "तोर्षा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. या भागातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहत आहेत."
अलीपुरदुआरमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी दुपारी जिल्ह्यातील प्रसिद्ध जलदापाडा राष्ट्रीय उद्यानातील लाकडी पूल कोसळल्यामुळे पर्यटन लॉजमध्ये राहणारे पर्यटक अडकले आहेत.
या लॉजपर्यंत पोहोचण्यासाठी याच पुलाचा वापर होत होता. सध्या त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागातील बहुतांश रिसॉर्ट्स आणि होमस्टे पाण्याखाली गेले आहेत. सुमारे दीडशे पर्यटक तिथे अडकले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सततचा पाऊस आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
डुआर्स परिसरातील गोरुमारा राष्ट्रीय उद्यानाजवळील जलढाका नदीत एकशिंगी गेंड्याचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्या बाजूला, नक्षलबाडी परिसरात मेची नदीत हत्तीच्या पिल्लाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
अलीपुरदुआरमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ईशान्य सीमांत रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे प्रवक्त्याच्या माहितीनुसार, सध्या न्यू जलपाईगुडी-कोलकाता दरम्यान रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)