रोहित शर्मानं 16 महिन्यांनंतर असं काय केलं, की सगळेच त्याचं कौतुक करत आहेत ?

फोटो स्रोत, ANI
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट रविवारी इंग्लंडविरोधात तळपली तेव्हा टीकाकारांची तोंडं पुन्हा एकदा बंद झाली.
कटकमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतानं इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीने भारताचा मालिकेतील विजय निश्चित झालाय.
पहिल्या वन डे सामन्याप्रमाणेच विजयी धाव रवींद्र जडेजाच्या बॅटमधून आली असली तरीही या सामन्याचा हिरो ठरला रोहित शर्मा. रोहितनं त्यांच्या आक्रमक खेळीनं इंग्लंडनं दिलेलं 305 धावांचं लक्ष्य संघासाठी अगदी सोपं करून टाकलं.
गेल्या काही सामन्यांमध्ये विशेषतः कसोटीत रोहित शर्माचा फॉर्म हरवल्याचं पाहायला मिळालं होतं. सलग दोन कसोटी मालिका गमावल्यामुळं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.
या टीकेनंतर कर्णधारपदी त्याच्या जागी कोण येणार यावरही चर्चा व्हायला सुरुवात झाली. पण कटकमधील वनडे मध्ये त्यानं केलेल्या शतकी खेळीनं आता त्याच्यावरील टीकेला पूर्णविराम मिळाला आहे. तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आलेल्या या शतकानं भारतीयांच्या आशाही उंचावल्या आहेत.
रोहित शर्मानं या सामन्यात सुरुवातीपासूनच षटकार खेचत आक्रमक खेळी करायला सुरुवात केली. त्याची नजर चेंडूवर स्थिरावल्यानंतर जणू त्याला तो चेंडू फुटबॉलसारखा दिसत असावा. नंतर त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांटी चौकार आणि षटकारांनी धुलाई करत त्यांची लय पूर्णपणे बिघडवली.
रोहितनं 90 चेंडूंच्या या खेळीत 12 चौकार आणि सात षटकारांसह 119 धावा केल्या. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट 132 पेक्षा जास्त होता.
रोहितनं तब्बल 16 महिन्यांनंतर शतकी खेळी केली आहे. यापूर्वी 2023 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं शतक झळकावलं होतं. त्यानंतर 13 सामन्यांत त्याला शतकी खेळी करता आली नाही. एकदिवसीय कारकिर्दीतलं रोहितचं हे 32 वं शतक ठरलं.
एकदिवसीय कारकिर्दीतलं रोहित शर्माचं हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. कटकच्या मैदानावर त्यानं 76 चेंडूत शतक पूर्ण केलं.
तर 2023 च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं 63 चेंडूत कारकिर्दीतलं सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं.


गोलंदाजांना नामोहरम करण्याची कला
सामनावीर ठरलेला रोहित पुरस्कार स्वीकारताना म्हणाला की, "मैदानावर पाऊल ठेवताच मला इंग्लंडच्या गोलंदाजांची योजना लक्षात आली.
माझ्या शरीरावर गोलंदाजी करण्याची आणि मला रूम न देण्याची त्यांची योजना होती. पण त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं यासाठी माझ्याकडेही योजना तयार होती."
"मला फलंदाजी करताना आणि संघासाठी धावा करताना खूप मजा आली. ही एक महत्त्वाची मालिका आहे. वन डे सामन्यात कशी फलंदाजी करायची याची योजना आखून मी मैदानात उतरलो होतो. त्यात मला शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचं चांगलं सहकार्य मिळालं," असं रोहितनं सांगितलं.
या शतकासह रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतकं करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
त्यानं कारकिर्दीतलं 49 वं शतक झळकावत राहुल द्रविड (48) ला मागं टाकलं. त्याच्या पुढं फक्त सचिन तेंडुलकर (100) आणि विराट कोहली (81) हे दोघंच आहेत.
दुबई आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची सलामी जोडी काय असेल याबाबत व्यवस्थापन या मालिकेत निर्णय घेणार आहे.

फोटो स्रोत, ANI
पहिल्या सामन्यात रोहितचा पार्टनर म्हणून यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली. पण पदार्पणाच्या सामन्यात तो प्रभाव पाडू शकला नाही.
पहिल्या वनडे सामन्यात शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याच्या कामगिरीनं त्याला प्रभाव टाकण्यात यशही आलं. पण तरी या सामन्यात मात्र रोहितचा जोडीदार म्हणून पुन्हा शुबमनला संधी मिळाली.
या जोडीनं पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आणि 136 धावांच्या भागिदारीनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीला कोण येणार या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
शुबमनने या मालिकेत सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 52 चेंडूत 60 धावा करून सर्वांवर चांगला प्रभाव टाकला आहे. त्यात त्यानं नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.
शुबमन या मालिकेत उपकर्णधारही आहे. दोन्ही डावात त्यानं जो आत्मविश्वास दाखवला त्यामुळं भविष्यात कर्णधारपदासाठीचा त्याचा दावा आणखी मजबूत होत आहे.
विराटच्या नशिबी पुन्हा अपयश
विराट कोहलीही बऱ्याच काळापासून त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलेला नाही. त्यानं मैदानावर येताच ज्या पद्धतीनं कव्हर ड्राईव्ह लगावला, त्यावरून तो फॉर्मात काही असं अजिबात जाणवत नव्हतं.
पण आदिल रशीदच्या गोलंदाजीवर ज्या पद्धतीनं झेलबाद झाला त्यामुळं तो चांगलाच निराश झाला.
आधी पंचांनी आउट दिलं नाही. पण रेफरल घेतल्यावर चेंडू किंचित बॅटला घासून गेल्याचं स्पष्ट झालं. रोहितप्रमाणेच विराटलाही चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एका चांगल्या खेळीची अपेक्ष आहे.
श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये असणं हीही भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळं फलंदाजी चांगलीच मजबूत दिसू लागली आहे. तळापर्यंत असलेल्या फलंदाजीमुळं मधल्या फलंदाजांना अपयश आल्यानंतरही काही वेळा भारतीय डाव शक्यतो कधी ट्रॅकवरून उतरला नाही.
रवींद्र जडेजाची कामगिरीही शक्यतो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कायमच चांगली राहिली आहे.

फोटो स्रोत, ANI
भारताकडून मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. दोघांनीही स्टंपच्या बाहेर ठेवण्याची रणनीती अवलंबली. पण इंग्लंडचे सलामीवीर सॉल्ट आणि डकेट यांनी आक्रमक पद्धतीने त्याविरोधात धावा केल्या.
त्यांच्या धावगतीला आळा घालण्यासाठी रोहितला सुरुवातीलाच जडेजाला गोलंदाजीसाठी आणावं लागलं. दहा ओव्हरमध्ये जडेजाचे 50 टक्के चेंडू डॉट ठरले. म्हणजे त्यावर धावा झाल्या नाहीत.
एवढंच नाही महत्त्वाच्या क्षणी त्यानं बेन डकेट आणि जो रूट यांचे बळीही घेतले. त्याचा परिणाम म्हणजे इंग्लंडची धावसंख्या 25-30 धावांनी घटली.
जडेजाने 10 ओव्हरमध्ये 35 धावा देत 3 बळी घेतले. या सामन्यात कोच गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी कुलदीप यादवच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्याला संघात कुलदीप यादवची जागा घ्यायची असेल तर त्याला आणखी विकेट घ्याव्या लागतील.
(लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











