रोहित शर्माची सिडनी कसोटीतून अचानक माघार, निवृत्ती घेण्यावर काय म्हणाला?

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील भारत आणि ऑस्ट्रेलियातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं सामन्यातून विश्रांती घेतली आहे. त्याच्या जागी गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताच्या संघाचं नेतृत्व करत आहेत.

सामना सुरू होण्यापूर्वीच रोहित विश्रांती घेणार असल्याचं बुमराहनं जाहीर केलं होतं. आतापर्यंत रोहितनं संघाचं उत्तम नेतृत्व केल्याचंही बुमराह म्हणाला.

आराम करण्याचा निर्णय रोहितनं स्वतःहून घेतला, की कामगिरी निराशाजनक असल्याने त्याला संघातून काढलं गेलं, याबद्दल चर्चा सुरू झाली. सोबतच, रोहित शर्मा कसोटी सामन्यांतून निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चाही रंगत आहे. मात्र, रोहितनं या शक्यता फेटाळल्या आहेत.

रोहित शर्मानं शनिवारी सामन्यादरम्यान समालोचकांशी बोलताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या. निवृत्ती घेतली नसल्याचं रोहितनं जाहीर केलं.

बॉर्डर-गावस्कर चषकात ऑस्ट्रेलिया विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाते. त्यात भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे.

रोहितने काय म्हटलं?

बॉर्डर-गावसकर चषकातल्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा खेळत नसून, जसप्रीत बुमराह कर्णधार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बॉर्डर-गावसकर चषकातल्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा खेळत नसून, जसप्रीत बुमराह कर्णधार आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, "मी निवृत्ती घेतलेली नाही. उलट या मी कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कठीण असला, तरी तो विचारपूर्वक घेतला होता."

निवृत्तीशी संबंधित प्रश्नांबाबत रोहित म्हणाला की, "मी सिडनीला पोहोचताच सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही काय करायचं हे इतर लोक कसं ठरवणार?"

तो म्हणाला, "माझ्या बॅटमधून धावा येत नव्हत्या पण भविष्यातही तसंच असेल असं नाही. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाने मी खूप प्रभावित झालो आहे. मी कुठेही चाललो नाही. फक्त मी फॉर्ममध्ये नाही त्यामुळे या सामन्यात खेळत नाही. क्रिकेटमध्ये आपण बरंच काही पाहिले आहे, प्रत्येक मिनिटाला जीवन बदलते. परिस्थिती बदलली तरी आपण वास्तववादी असलं पाहिजे."

रोहित म्हणाला, मी एवढ्या लांबून बाहेर बसायला आलेलो नाही. मी सामना जिंकवण्यासाठी आलो आहे. या संघाला सामना जिंकायचा आहे. हाच उद्देश आहे. काहीवेळा तुम्हाला संघाला काय हवे आहे हे समजून घ्यावे लागते. संघाचा विचार केला नाही तर कसं चालेल?

ग्राफिक्स
ग्राफिक्स

शुक्रवारी सिडनीत सुरू झालेल्या पाचव्या सामन्यात भारताची सुरुवातीची कामगिरी खराब झाली. रोहितच्या जागी आलेला गिल फक्त 20 धावाच करू शकला. लंचपर्यंत चार भारतीय फलंदाज बाद झाले होते.

भारताचा पहिला डावात अवघ्या 185 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या सामन्यात पराभवानंतर माध्यमांमध्ये भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

सामन्यातील अपयशासाठी रोहितला जबाबदार धरल्यानं त्याला शिक्षा मिळणार अशी चर्चा होती. त्यात गुरूवारी पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितऐवजी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आल्यानं चर्चांना अधिक वेग आला.

"रोहितबाबत सगळं ठिक आहे. मुख्य प्रशिक्षक आला आहे, हे पुरेसं आहे. नाणेफेक होण्याआधी फायनल 11 खेळाडूंमध्ये रोहित असेल की नाही, याचा निर्णय घेतला जाईल," असं गंभीरनं तिथं म्हटलं होतं.

गेल्या काही सामन्यांतली रोहित शर्मा यांची कामगिरी खराब राहिली आहे. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या काही सामन्यांतली रोहित शर्मा यांची कामगिरी खराब राहिली आहे. (फाइल फोटो)

'द टाइम्स' वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखातून रोहित सिडनी कसोटी खेळणार नसल्याचे संकेत मिळू लागले होते.

भारतीय क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी नववर्षाच्या स्वागत सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं. तिथं रोहित माध्यमांशी बोलणार होता. पण ऐनवेळी त्याला मागे सारून मुख्य प्रशिक्षक गंभीरनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित तिथंच होता, असं वृत्तपत्रानं म्हटलं होतं.

त्याचवेळी पडद्यामागं भारतीय क्रिकेट संघात सारं काही अलबेल नसल्याचा अंदाज लावला जाऊ लागला. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळं मुख्य प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार रोहित यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

रोहित न खेळण्याबद्दल माजी क्रिकेटपटू काय म्हणाले ?

रोहित शर्मानं स्वतः न खेळण्याचा निर्णय घेतला की, त्याला बसवण्यात आलं याबाबत माजी क्रिकेटपटुंमध्ये मतं-मतांतरं दिसून येत आहेत.

"कोणत्याही देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार कसोटीतील निर्णायक सामन्याआधी बाहेर पडायचा निर्णय घेत नाही. नक्कीच त्याला काढलं असेल. पण हे स्पष्टपणे का सांगत नाहीत ते कळत नाही," असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर म्हणाला.

असं स्पष्टपणे सांगणं याचा अर्थ त्याला कायमचं काढून टाकलंय असा होत नाही. खराब कामगिरी असणं हा काही गुन्हा नाही. हा खेळ आहे आणि असं होतंच असतं, असंही टेलर म्हणाले.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं या प्रकरणावर सुनील गावसकरांचं म्हणणं प्रसिद्ध केलं आहे. "माझ्या मते, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यासाठी भारत पात्भाठरला नाही तर मेलबर्नमधील सामना रोहितचा अखेरचा कसोटी सामना ठरेल," असं ते म्हणाले.

जसप्रीत बुमराह, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील कसोटीची सुरुवात इंग्लंड मालिकेपासून होईल. त्यासाठी 2027 चा अंतिम सामना खेळू शकतील अशाच खेळाडूंना निवड समिती प्राधान्य देईल.

भारत अंतिम फेरीत पोहोचेल, की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र, अंतिम सामन्यापर्यंत खेळू शकणाऱ्या खेळाडूंचाच निवड समिती विचार करेल, असंही गावस्कर पुढं म्हणाले.

गावस्करांच्या या मताशी रवी शास्त्री सहमत असल्याचंही पीटीआयनं सांगितलं आहे. या मालिकेनंतर रोहित शर्मा कसोटी सामन्यांतून निरोप घेऊ शकतो, असं रवी शास्त्रींनी सांगितलं.

"खेळाची लय बिघडलेली असते आणि मानसिक तणाव असतो तेव्हा असं होतं. धावा काढता येत नाहीत. याची जबाबदारी घेत कर्णधाराच्या सामन्यातून बाहेर राहण्याचा निर्णय साहसी आहे असं मी मानतो," असं रवी शास्त्री म्हणाले.

माजी क्रिकेटर आणि गोलंदाज इरफान पठाणनंही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया गिली.

"रोहित शर्माला यासाठी झगडावं असं माझं मत आहे. त्यानं हे मध्येच सोडून द्यावं असं मला वाटत नाही. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनं खूप काही केलं आहे आणि परिस्थिती बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे," असं इरफाननं लिहिलं.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

रोहितच्या सिडनीतील सामना न खेळण्याच्या निर्णयावर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. रोहित शर्मासाठी वाईट वाटत असल्याचं एका चाहत्याने एक्सवर लिहिलं.

"त्यानं अशा प्रकारे थांबलेलं पाहून दुःख होतं आहे. पण त्यानं गिलला बाहेर ठेवलं. जिथं के. एल. राहुल चांगली कामगिरी करत होता तिथं त्याला खेळू दिलं नाही. त्यामुळं त्यानंच ही परिस्थिती ओढावून घेतली," असं एका चाहत्याने म्हटलं.

"टी20 सामन्यात भारताला विश्वचषक विजेता बनवणारा कर्णधार रोहित शर्माचा अपमान केला गेला आणि टीममधून काढून टाकंलं. रोहित शर्माला निरोपाचा एक सामना मिळायला हवा होता ना?" असंही एका चाहत्यानं एक्सवर लिहिलं.

सौरभ गांगुलीचा रोहित शर्मावर विश्वास होता. नीट न खेळण्याऱ्यांना बाहेर काढण्याचं धाडस गांगुलीत होतं. पण पाचव्या स्टम्पवर पडलेला चेंडूही न सोडणाऱ्या खेळाडूंना काढण्याची सध्याच्या प्रशिक्षकांमध्ये नाही, असंही एका चाहत्याने लिहिलं आहे.

रोहित शर्माची खराब कामगिरी

रोहितची कसोटीतील कामगिरी गेल्या काही दिवसांत चांगली राहिली नाही. गेल्या नऊ कसोटी सामन्यांत रोहितने 10.93 च्या सरासरीने धावा केल्या. या मालिकेच्या पाच डावांत त्याची सरासरी फक्त 6.2 इतकी होती.

रोहितला आणखी खेळण्याची इच्छा आहे आणि त्याच्यात अजूनही क्षमता आहे, असं त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले होते. कधीही सामन्याची परिस्थिती बदलण्याची क्षमता असलेला तो फलंदाज आहे, असं लाड म्हणाले.

त्याच्या फूटवर्कबाबत काही अडचणी असल्याचंही त्यांनी मान्य केलं. पण ही समस्या काही कायमची नाही. तरीही गंभीर यांचं बोलणं ऐकून रोहितसाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचं त्यांना वाटू लागलं आहे.

मैदानावर उतरल्याक्षणी रोहित गोलंदाजावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नांत बाद होत आहे. गेल्या दोन वर्षांत तो असाच खेळच आहे. अशा प्रयत्नांत तो अनेकदा बाद होतोय.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेट विश्वात होणाऱ्या बदलाचे संकेत सगळ्यात आधी महान फलंदाज सुनील गावस्करांनी दिल्याचं म्हटलं जात आहे.

मेलबर्नमधल्या कसोटी सामन्यात भारत हरल्यानंतर गावस्करांनी रोहित समजूदार खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. संघावर त्याला स्वतःचं ओझं टाकायचं नाही. तो क्रिकेटला वाहून घेतलेला आणि खेळाबद्दल आदर असणारा खेळाडू असल्याचंही गावस्करनं म्हटलं होतं.

"त्यामुळं येत्या काही सामन्यांमध्ये त्यानं पुरेशा धावा काढल्या नाही, तर तो स्वतःच निवृत्ती जाहीर करेल, असं वाटत, असल्याचं गावस्कर म्हणाले होते. .

मेलबर्नमधल्या अपयशानंतर रोहितनंही फलंदाज म्हणून संघासाठी पुरेसं योगदान देता आलं नसल्याचं म्हटलं होतं. स्वतःच्याच धावा पाहिल्यावर चांगलं वाटत नसल्याचंही तो म्हणाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)