महेंद्रसिंह धोनी : वाढतं वय आणि फॉर्ममुळे दुर्लक्षित राहिलेल्या खेळाडूंना 'मॅच विनर' बनवणारा जादूगार...

फोटो स्रोत, BCCI/IPL
- Author, शिवकुमार राजकुलम
- Role, बीबीसी तमिळ
वर्ष 2008...
आयपीएलची सुरूवात झाली होती. त्यावर्षी मैदानात आठ टीम होत्या. पण फॅन्सचं लक्ष आणि आशा केंद्रित झाल्या होत्या डेक्कन चार्जर्सवर.
फॅन्सना वाटत होतं की, हा संघ त्यावर्षी ट्रॉफी जिंकेल. कारण या संघात शाहीद आफ्रिदी, गिब्ज, गिलख्रिस्ट, सायमंड्ससारखे दिग्गज होते. पण हा संघ तळाशी राहिला... 14 पैकी 12 मॅचेस ते हरले होते.
कागदावर हा संघ मजबूत दिसत असला, तरी व्हीव्हीएस लक्ष्मण कर्णधार म्हणून प्रभावी ठरला नव्हता, असं शाहीद आफ्रिदीने नंतर म्हटलं होतं.
आयपीएल सुरू असतानाच मध्येच डेक्कन चार्जर्सने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा त्यांना पुढच्या वर्षी झाला. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने पुढच्याच वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली.
मध्येच कर्णधार बदलण्याचा निर्णय घेणारा हा एकमेव संघ नव्हता. असाच इतिहास चेन्नई सुपर किंग्जचाही होता. आयपीएलच्या गेल्या दोन सीझनमध्ये मैदानावर उत्तम कामगिरी करणाऱ्या रवींद्र जाडेजाकडे गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोपविण्यात आलं.
धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर जाडेजा संघाला यशाच्या वाटेवरून घेऊन जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, वैयक्तिक कामगिरी आणि कर्णधारपदाची जबाबदारी यात जाडेजाची होणारी कसरत स्पष्ट दिसायला लागली. चेन्नई सुपर किंग्ज लागोपाठ सामने हारत होतं.
त्यामुळे आयपीएल सुरू असतानाच जाडेजाच्या जागी महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा कर्णधारपद सोपविण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. चेन्नई 9 व्या स्थानावर होती.
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असं झालं होतं की, चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्याआधी 2020 मध्ये युनायटेड अरब अमिरातीत झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईला प्ले ऑफपर्यंत पोहोचता आलं नव्हतं.
मोठ्या आशेनं नवीन कर्णधाराकडे सूत्रं सोपविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी 2022 ची आयपीएल अतिशय वाईट ठरली होती.
यावर्षी चेन्नई सुपर किंग्जची टीम गेल्या वर्षीच्या खेळाडूंसोबतच मैदानात उतरली होती. त्यांनी कोणताही मोठा बदल केला नव्हता. पण यावर्षी या टीमने जोरदार कमबॅक केलंय. सुरुवातीलाच त्यांनी सात पैकी पाच सामने जिंकत आपल्यात अजूनही जिंकण्याची क्षमता आहे, हे दाखवून दिलं.
हा बदल कसा घडला?
गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये असा काय बदल झालाय? याचं उत्तर आहे- कर्णधार.
जाडेजाच्या जागी कर्णधार म्हणून आलेल्या धोनीने त्याच्या आगळ्यावेगळ्या तंत्राने त्याच खेळांडूसोबत खेळताना आपल्या टीमला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणलं.
धोनीचं कर्णधारपद हाच इतर संघ आणि चेन्नई सुपर किंग्जमधला फरक आहे. एरव्ही सामान्य वाटणाऱ्या खेळाडूंनाही मॅच विनर बनवण्याची क्षमता धोनीमध्ये आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलमध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेली दुसरी एक टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. या संघाकडे नेहमीच सचिन, जयसूर्या, झहीर खान, रोहीत शर्मा, सूर्यकुमार, पोलार्ड, बुमराह, मलिंगा यांसारख्या खेळाडूंचा ताफा होता. त्यांच्याकडे सातत्याने मॅच जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत.
पण दुसरीकडे जर चेन्नई सुपर किंग्जचं उदाहरण घेतलं, तर त्यांच्याकडे प्रत्येक सीरिजमध्ये एक नवा मॅच विनर समोर आलेला पाहायला मिळतो.
स्वतः धोनी, सुरेश रैना आणि आता रवींद्र जाडेजा हे बऱ्याच वर्षांपासून चेन्नईच्या टीमचे आधारस्तंभ आहेत.
पण एरव्ही आयपीएलच्या प्रत्येक सीझनला चेन्नई सुपर किंग्जमध्ये असा एखादा खेळाडू मॅच विनर म्हणून समोर येतो, जो फारसा माहीत नसतो किंवा खूप नवखा असतो. याचं कारण म्हणजे टीम हाताळण्याचं कर्णधार म्हणून धोनीचं तंत्र.
‘कॅप्टन कूल’ धोनी
मैदानावर परिस्थिती कशीही असो धोनीचा संयम कधीच सुटलेला दिसत नाही. संघ कितीही अडचणीत असला तरीही तो डोकं शांत ठेवून कृती करतो, परिस्थिती योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो.
धोनीला आपल्या सहकाऱ्यांची बलस्थानं माहीत असतात, तसंच ते कुठे कमी पडतात हेही त्याला माहीत असतं. याचाच विचार करून त्यांना कसं वापरून घ्यायचं हे त्याला योग्य कळतं.
त्याचबरोबर विरुद्ध संघाच्याही जमेच्या आणि कमकुवत बाजू त्याला माहीत असतात. त्यानुसार तो स्ट्रॅटेजी ठरवतो, ज्याचा संघाला फायदा होता.
आकडेवारी, तंत्र, हुशारी याच्या पलिकडे जात स्वतःच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवत धाडसी निर्णय घेण्याच्या त्याच्या वृत्तीचं क्रीडा समीक्षक कायमच कौतुक करतात.
हा त्याचा गुण भारतीय संघाचं नेतृत्व करतानाही अनेकदा दिसला होता. पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीने रॉबिन उत्थप्पाला बॉलिंग करायला दिली. हा निर्णय सगळ्यांसाठीच अनपेक्षित होता.

फोटो स्रोत, Getty Images
याच वर्ल्ड कपच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातही धोनीने सगळ्याच क्रिकेटतज्ज्ञांना चकवणारा निर्णय घेतला होता. अगदी आणिबाणीच्या वेळेस जोगिंदर शर्माच्या हातात बॉल देऊन.
वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या सीरिजमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी निभावताना कोणी जे प्रयोग करायला धजावणार नाही, अशा गोष्टी करण्याचं धाडस धोनीनं दाखवलं. अशाच वेगळ्या आणि धाडसी निर्णयांमुळेच त्याने चेन्नई सुपर किंग्जलाही अनेकदा जिंकून दिलं आहे.
सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जवर 2016 आणि 2017 अशी दोन वर्षं बंदी घालण्यात आली होती.
2018 साली जेव्हा हा संघ मैदानावर उतरला तेव्हा ‘ज्येष्ठांची टीम’ म्हणून त्यांना हिणवण्यात आलं होतं. याचं कारण म्हणजे धोनीच्या टीममध्ये असलेले शेन वॉटसन, मोहम्मद ताहिर, ब्राव्हो, हरभजन सिंह हे खेळाडू वयाच्या पस्तिशीत होते.
या खेळाडूंनाच सोबत घेत धोनीने तरूणांची, उर्जेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आयपीएलची ट्रॉफी जिंकून दाखवली होती.
टीमच्या गोलंदाजीमधल्या उणीवांवर मात
आयपीएलमधल्या टीम्सचा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी कधीच सर्वोत्तम मानली गेली नव्हती. पण टीमच्या गोलंदाजीतल्या उणीवांवर धोनीने फिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरत मात केली. त्यामुळे प्रभावहीन वाटणारी चेन्नईची गोलंदाजी परिणामकारक ठरत गेली.
याच गोष्टीमुळे धोनी कर्णधार म्हणून इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
न्यूझीलँडचा केली जेमीसन हा दुखापतीमुळे सध्याच्या आयपीएलमध्ये खेळत नाहीये. दीपक चहरही नाहीये. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजीतल्या उणीवा अजून उघड्या पडल्या आहेत.
प्रचंड किंमत मोजून खरेदी केलेला बेन स्टोकही पूर्णपणे फिट नाहीये. चेन्नईचे दोन्ही स्पिनर्स फॉर्ममध्ये नाहीयेत. थोडक्यात, ‘डेथ ओव्हर’मध्ये कामी येतील असे बॉलर्स आताच्या टीममध्ये नाहीयेत.
या परिस्थितीत धोनीने त्याचा अनुभव आणि शहाणपणा पणाला लावला.

फोटो स्रोत, Getty Images
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हर्समध्ये काहीशा नर्व्हस वाटणाऱ्या मथिश पथिराणाजवळ जाऊन धोनी त्याला काहीतरी समजावून सांगत होता. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला समजावून सांगावं तशी त्याची पद्धत होती.
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी यासंबंधी केलेलं ट्वीटही व्हायरल झालं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
श्रीलंकेचा मथिश पथिराणा हा ‘छोटा मलिंगा’ म्हणून ओळखला जातो. धोनीने स्वतः त्याच्या गोलंदाजीवर बॅटिंग केली.
तुषार देशपांडेलाही धोनीकडूनच प्रेरणा मिळाली, त्याच्या खेळातही ते दिसतंय. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दीपक चहरही परतलाय. या सगळ्यांना सोबत घेऊन धोनी यश मिळवतोय.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या या सगळ्या नेतृत्वगुणांचा परिपाक पाहायला मिळाला. मंगळवारी (23 मे) झालेल्या क्वालिफायर1च्या लढतीत चेन्नईने गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवला आणि चेन्नई सुपर किंग्सने दिमाखात दहाव्यांदा आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
धोनीने फिल्डिंगमध्ये वेळोवेळी जे बदल केले त्यामुळे गुजरातचे बॅट्समन स्थिरावूच शकले नाहीत.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला धोनीच्या चतुराईने चकवलं. तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर कट करण्याचा हार्दिकचा प्रयत्न जडेजाच्या हातात जाऊन विसावला. दासून शनकाने 16 चेंडूत 17 धावा केल्या पण जडेजाच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा त्याचा प्रयत्न तीक्ष्णच्या हातात गेला.
यानंतर जडेजाच्या अफलातून फिरकीसमोर डेव्हिड मिलर अचंबित झाला. मिलरसारख्या अनुभवी खेळाडूला माघारी धाडत जडेजाने गुजरातच्या डावाला खिंडार पाडलं.
गुजरातचा आधारस्तंभ असलेल्या शुबमन गिललाही धोनीच्या स्ट्रॅटेजीने गोंधळात पाडलं. दीपक चहरचा धीमा उसळता चेंडू शुबमन गिलने खेळला, पण तो अपेक्षित अंतर गाठू शकला नाही. डेव्हॉन कॉनवेने झेल टिपत गिलची खेळी संपुष्टात आणली.
धोनीने घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक ठरत गेला आणि सामना चेन्नईच्या नियंत्रणात आला.
दुर्लक्षित खेळाडूंना बनवलं मॅच विनर्स

फोटो स्रोत, BCCI/IPL
टीमसाठी खेळाडू खरेदी करताना धोनीचा जो दृष्टिकोन आहे, तो पण वेगळा आहे. वय किंवा फॉर्म नसल्यामुळे इतर संघांकडून ज्या खेळाडूंकडे दुर्लक्ष झालं, अशांना धोनीनं निवडलं. केवळ निवडलंच नाही, तर त्यांच्या जोरावर सामनेही जिंकून दाखवले.
शेन वॉटसन, मोईन अली, रॉबिन उथप्पा... ही यादी मोठी आहे. या यादीतलं अजून एक नाव म्हणजे अजिंक्य राहाणे.
रवींद्र जाडेजा आणि मोईन अलीचा अपवाद वगळता चेन्नई सुपर किंग्जच्या टीममधील कोणताही खेळाडू कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय संघात खेळला नाहीये किंवा आंतरराष्ट्रीय सामने खेळला नाहीये. अशा संघाला सोबत घेऊन धोनीने चेन्नईला आयपीएलच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी संघ बनवलं आहे.
धोनी आणि सीएसकेचं नातं
धोनी आणि सीएसकेचं नातं तुटणारं नाहीये. धोनीने सातत्याने चेन्नई हे आपलं दुसरं घर असल्याचं म्हटलं आहे.
ज्या दिवशी सीएसकेवरची दोन वर्षांची बंदी उठली होती, त्या दिवशी धोनी भावूक झाला होता. हरभजन सिंहने कॉमेंट्रीदरम्यान सांगितलं की, चेन्नईची टीम मैदानावर परतली त्या रात्री जेवणाच्यावेळी धोनीच्या भावना दिसून येत होत्या.
त्यावेळी उपस्थित असलेल्या मोहम्मद ताहिरनेही या आठवणीला दुजोरा दिला. हरभजन आणि मोहम्मद ताहिर दोघेही त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळले होते. हरभजनने धोनीचं कर्णधार म्हणूनही कौतुक केलं.

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय पातळीवर धोनीनं कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी अशा तिन्ही प्रकारात भारताचं जवळपास 9 वर्षं नेतृत्व केलं. विकेट कीपर, बॅट्समन आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कर्णधार अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या.
चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्वही धोनीने अगदी पहिल्यापासून केलंय आणि तिथेही त्याने फॅन्सने निराश केलं नाही.
धोनीने आयपीएलच्या 226 सामन्यात चेन्नईचं नेतृत्व केलंय आणि त्यांपैकी 132 सामने जिंकून दिलेत.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर किंग्ज यांचीच विजयाची टक्केवारी इतकी आहे.
वयाच्या 41 व्या वर्षीही धोनी ‘डेथ ओव्हर्स’मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला बॅट्समन आहे.
ही धोनीची शेवटची आयपीएल?

फोटो स्रोत, BCCI/IPL
यंदाची आयपीएल ही धोनीची शेवटची असेल असं सुरुवातीपासून म्हटलं जात आहे. कदाचित त्यामुळेच चेन्नईच्या प्रत्येक मॅचदरम्यान स्टेडियममध्ये ‘धोनी, धोनी’चा जल्लोष ऐकू येतो.
गुजरात टायटन्ससोबतच्या कालच्या (23 मे) सामन्यानंतरही धोनीला हा प्रश्न विचारला गेला.
त्यावर उत्तर देताना त्यानं म्हटलं, “मी चेन्नईत येत राहीन खेळाडू म्हणून किंवा अन्य काही म्हणून. आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणार की नाही हे ठरवायला 8-9 महिने आहेत. माझ्याकडे भरपूर वेळ आहे.
डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होईल. मी सीएसकेसाठी येत राहीन. जानेवारीपासून मी घरापासून दूर आहे. मार्चमध्ये सरावाला सुरुवात केली. स्पर्धा संपेपर्यंत मे महिन्याची अखेर होईल. दोन महिने खेळत राहणं सोपं नाही. बघूया कसं होतंय”
आयपीएलच्या 14 सीझनचा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्ज 12 वेळा प्ले ऑफपर्यंत पोहोचला. 10 वेळा या संघाने अंतिम फेरी गाठली आणि चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलीये.
रविवारी (28 मे) चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या फायनलमध्ये दहाव्यांदा खेळणार आहे. अंतिम लढतीत चेन्नईचा मुकाबला लखनौ, मुंबई किंवा गुजरात यांच्यापैकी कोणाशी होतो हे अजून ठरायचं आहे. पण समोर कोणीही असलं तरी धोनी सीएसकेला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून देईल असं फॅन्सना वाटतंय.
शांतपणा, आश्वसकता, साधेपणा, विचार करण्याची वेगळी पद्धत, तरुणांना मैत्रीपूर्ण मार्गदर्शन हे नेत्याचे गुण मानले जातात. धोनीमध्ये ते दिसतात, म्हणूनच फॅन्सच्या नजरेत ‘थाला’ धोनीची उंची अधिक आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








