कार वापरताय? मग या 9 टिप्स तुमच्यासाठीच आहेत..

कार चालक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी

"मी 40 हजार किलोमीटरचा प्रवास केलेलाच नाही, मग मी टायर का बदलावा?”

निहारिका कार शोरूमच्या मेकॅनिकशी वाद घालत होती.

"तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण ते टायर चार वर्षे जुने आहेत. त्यामुळे ते बदलले पाहिजेत.” शोरूमच्या मेकॅनिकने उत्तर दिलं.

“काल पाऊस पडत असताना, मी एसी चालू केला तर मित्राने मला करू नको म्हणून सांगितलं.

आता मी टायरचा वापर जास्त केलेला नसताना मेकॅनिक सांगतोय की टायर बदलावे लागतील.

तुम्हीच सांगा मी आता काय करायला हवं? विचार करत निहारिका शोरूमबाहेर आली.

निहारिकाप्रमाणेच आपल्यापैकीही बहुतांश जण कार वापरतात. पण कार वापरासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्याने आपली अनेक ठिकाणी अडचण होते.

याबाबत बीबीसीने सत्य गोपाल यांच्याशी चर्चा केली. त्यांना ऑटोमोबाईल अभियंता म्हणून 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा सारांश प्रश्नोत्तर स्वरुपात..

1. गाडी वापरली नसली तरी टायर बदलावेत का?

आपण कार वापरतो किंवा नाही याचा विचार न करता दर तीन ते चार वर्षांनी टायर बदलण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

असं केल्यास टायर फुटून अपघात होण्याची शक्यता कमी होते.

टायर

साधारपणपणे आपल्या गाडीने दररोज दहा-वीस किलोमीटरचा प्रवास करतो. यावेळी टायरमधील हवेचा दाब 30 ते 35 पर्यंत वाढतो. हा दाब सहन करण्यासाठी टायर सक्षम असले पाहिजेत.

वरून आपल्या लक्षात येणार नाही. पण तीन ते चार वर्षे जुने टायर हा दबाव सहन करू शकत नाहीत.

अशा स्थितीत 80 किमी प्रतितास वेग ओलांडल्यानंतर जुन्या टायरचा स्फोट होऊन अपघाताला निमंत्रण मिळतं.

2. हझार्ड/इमर्जन्सी बटण कधी चालू करावं?

कोणत्याही कारमध्ये आपत्कालीन स्थितीत पार्किंग लाईट सुरू करण्यासाठी एक त्रिकोणी बटण असतं. याला हझार्ड किंवा इमर्जन्सी बटण असं संबोधलं जातं.

हे बटण दाबल्यास पार्किंगच्या सगळ्या लाईट सुरू होतात.

अनेकजण चौकाचौकात थांबल्यानंतर किंवा कुठेही पार्किंग करताना त्याचा वापर करतात.

हझार्ड बटण

पण या बटणाचा वापर केवळ धोक्याची सूचना देण्यासाठी करण्यात यावा. गाडी पंक्चर झाल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे थांबा घ्यावा लागल्यास हे बटण दाबून लाईट सुरू करावी.

त्यामुळे, ही गाडी पाहणाऱ्या व्यक्तीला धोक्याची सूचना मिळू शकेल. म्हणून याचा वापर जपून केला पाहिजे.

3. एअर बॅग असल्यास सीट बेल्ट घालण्याची गरज नाही का?

कारमधील एअर बॅग ही दुय्यम प्रतिरोधक प्रणाली (SRS) आहे. प्राथमिक प्रतिरोधक प्रणाली म्हणून सीट बेल्ट यालाच मान्यता आहे.

याचा अर्थ कधीही कार चालवताना प्रथम प्राधान्य हे सीट बेल्ट लावून दक्षता घेण्यालाच आहे.

सीट बेल्ट

अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा स्टेअरिंगवर आदळतो. याच दरम्यान एअर बॅग उघडल्यास त्यामुळे उलट जास्त इजा होण्याची शक्यता असते.

पण सीट बेल्ट घातलेला असल्यास आपण समोर आदळत नाही आणि एअर बॅगचं कामही योग्यरित्या पार पाडलं जातं.

4. कारमध्ये परफ्यूम वापरावा का?

कारमधून प्रवास करत असताना परफ्यूम वापरल्यानंतर प्रवाशांना श्वासोच्छवास घेताना त्रास झाल्याचं आपण अनेकवेळा पाहतो.

याचं कारण आपण लक्षात घ्यायला हवं.

परफ्यूममध्ये काही प्रमाणात अल्कोहोलचा वापर करण्यात येतो. तर, कारमधून प्रवास करत असताना आतमध्ये ऑक्सिजन कमी असतो.

कार

कारमध्ये असलेल्या ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया परफ्यूममधील अल्कोहोलशी होते. त्यामुळे अशा वेळी गाडीत एक कोंदट वातावरण तयार होतं.

वापरलेलं परफ्यूम कारमध्ये विविध ठिकाणी पसरलेलं असतं. म्हणजेच त्यामधील अल्कोहोलही आतमध्ये विविध ठिकाणी पसरलेलं असतं.

अशा स्थितीत आग लागल्यास परफ्यूममुळे ती जास्त भडकण्याची शक्यता बळावते.

म्हणूनच कारमध्ये परफ्यूम न वापरणं हेच बरं असतं.

5. हवेत धुके असताना काय करावं?

पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्यामुळे हवेत अचानक बदल होतात.

अशा वेळी कारच्या आतील तापमान आणि बाहेरील तापमान यातील फरकामुळे खिडकीच्या समोरील आणि मागील काचेवर तसंच बाजूच्या आरशांवर ओलसर थर तयार होतो.

हे टाळण्यासाठी गाडीतील एसी थोडा वेळ चालू करता येऊ शकतो. किंवा खिडकीच्या काचा काही वेळ खाली घेऊन आतील आणि बाहेरील तापमान एकरूप होऊ द्यावं.

6. कारमधील उष्णता कमी करण्यासाठी काय करावं?

उन्हात उभ्या असलेल्या कारच्या आतमध्ये उष्णता प्रचंड वाढते. अशा वेळी कार पार्किंग करून सोडण्यापूर्वी 'क्रॉस खिडक्या' काहीशा उघड्या ठेवल्या पाहिजेत.

कार

उदाहरणार्थ, समोरील डाव्या बाजूची खिडकी आणि उजव्या बाजूची मागील खिडकी काहीशी उघडी ठेवावी. असं केल्यास आतील उष्णता निघून जाईल.

यानंतर, कार सुरू करण्यापूर्वी सगळ्या खिडक्या खाली करून किमान अर्धा-एक किलोमीटर तशीच गाडी चालवावी. सोबत ब्लोअरही चालू करावा. असं केल्यास आतील उष्णता लवकर बाहेर पडते.

यानंतर, एसी लावल्यास कार लवकर थंड होईल.

7. इच्छित स्थळी पोहोचल्यावर गाडी लगेच बंद करावी का?

50 किलोमीटरपेक्षा जास्त कार चालवल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण थांबल्यास लगेच इंजीन बंद करू नये.

अशा स्थितीत इंजीन दोन ते तीन मिनिटे सुरू ठेवावं. त्यानंतर ते बंद करावं.

असं करण्यामागचं कारण म्हणजे, कारमधील तापमानामुळे टर्बो चार्जर आणि इतर उपकरणे एकाच वेळी सामान्य स्थितीत येऊ शकत नाहीत.

म्हणून, त्यांना सामान्य स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि नंतर कारचं इंजीन बंद करावं.

असं केल्यास, कारमधील उपकरणे जास्त काळ सुस्थितीत राहतील.

8. उतारावर कार बंद करून न्यूट्रलवर चालवावी का?

साधारपणपणे उतार असलेल्या रस्त्यावर दुचाकीचालक पेट्रोल वाचवण्यासाठी गाडीचं इंजीन बंद करून पुढे नेतात. पण कारसाठी असं कधीच करू नका.

कारण उतारावर तुम्ही गिअर न्यूट्रल ठेवून कार चालवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही कारवरील नियंत्रण गमावण्याची शक्यता असते.

कार

कितीही अनुभवी असलात तरीही असं करणं योग्य नाही.

कारण कारमध्ये गिअर बदलत असताना ऑटोमेटिक ब्रेकिंगची यंत्रणाही कार्यरत असते.

या यंत्रणेमुळे घाटरस्त्यांवर किंवा तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर प्रवास करताना गाडीचं नियंत्रण आपल्या हातात राहण्यास मदत होते.

पण अशा वेळी कार न्यूट्रल असल्यास गिअर आणि ब्रेक सक्रिय नसतात. त्यातून धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

9. कारची उंची बदलते का?

प्रवाशांच्या संख्येनुसार कारची उंची काही प्रमाणात बदलू शकते, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.

कारच्या उंचीत बदल होताच आपल्याला हेड लाईटचा प्रकाश कसा पडतो, ते तपासून पाहणं गरजेचं असतं. कारच्या बदललेल्या उंचीनुसार, प्रकाशयोजना करण्यासाठी एक लेव्हलरची सोय केलेली असते.

वाहन चालवणाऱ्यांसाठीच नव्हे तर इतरांसाठीही ते महत्त्वाचं असतं. या लेव्हलरचा योग्य प्रकारे उपयोग करावा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)