ब्रिटनचं सर्वात प्रसिद्ध झाड तोडणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

जगप्रसिद्ध सायकॅमोर गॅप हा वृक्ष बेकायदेशीरपणे तोडल्याबद्दल दोन व्यक्तींना 4 वर्षे आणि 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. न्यूकॅसल क्राऊन कोर्टानं 15 जुलै रोजी ही शिक्षा सुनावली.

हे झाडं 1991 ला एका चित्रपटात दिसल्यानंतर अत्यंत लोकप्रिय झालं होतं.

इंग्लंडमधील जागतिक वारसा स्थळ हेड्रियनच्या भिंतीजवळील हे झाड डॅनियल मायकेल ग्रॅहम (39) आणि अडम कॅरदर्स (32) या दोघांनी सप्टेंबर 2023 मध्ये चेनसॉनं तोडलं होतं.

त्यांनी झाड तोडतानाचा व्हीडिओही काढला. याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांच्यावर मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

त्यांनी दारूच्या नशेत हा मुर्खपणा केलेला आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षानं केला. मात्र, न्यायमूर्ती क्रिस्टिना लॅम्बर्ट यांनी त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला.

न्यायमूर्ती म्हणाले, "यामागे त्यांचा स्पष्ट हेतू दिसत नसला, तरी झाड तोडून लोकांमध्ये संताप निर्माण करून त्यांना आनंद झाल्याचं दिसतं."

100 वर्षे जुनं झाड

झाड तोडल्यानंतर जनतेनं प्रचंड रोष व्यक्त केला. या विरोधानंतर त्यांची मैत्री तुटली, असं आरोपीचं म्हणणं होतं.

तर दुसरीकडं 100 वर्षे जुनं हे झाड जपणाऱ्या नॅशनल ट्रस्टनं हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, असं म्हटलं.

दोघंही 28 सप्टेंबर 2023 च्या पहाटे अंधाराचा फायदा घेत घटनास्थळी पोहोचले.

त्यावेळी स्टॉर्म अग्नेस हे चक्रीवादळ आलं होतं. त्यात वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करत त्यांनी झाड हेड्रियनच्या भिंतीवर पाडलं.

कोर्टात झाडाच्या किमतीबद्दलही युक्तिवाद झाला. फिर्यादी पक्षानं झाडाची किंमत 4 लाख 58 हजार डॉलर्स इतकी सांगितली, तर बचाव पक्षानं 1 लाख 50 हजार डॉलर्स असल्याचं म्हटलं.

पण, या खटल्यात झाडाची किंमत इतकी महत्वाची नसल्याचं न्यायमूर्ती लॅम्बर्ट यांनी स्पष्ट केलं.

न्यायमूर्ती लॅम्बर्ट यांनी सांगितलं की, सायकॅमोर गॅप झाडं हे नॉर्थम्बरलँडचं एक प्रतिक होतं आणि हेड्रियन भिंतीच्या परिसरात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचं प्रतिक म्हणून त्याकडं बघितलं जात होतं.

त्यांनी असंही म्हटलं की, हे स्थळ शांत आणि निसर्गरम्य असून लोक वारंवार त्या ठिकाणी भेट देतात. अनेकांच्या भावनाही त्या ठिकाणासोबत जुळलेल्या आहेत.

हा फक्त फुशारकी मारण्याचा प्रकार

कोर्टाच्या निर्णयात असंही म्हटलं की, कॅरदर्सनं स्प्रे पेंट आणि चेनसॉचा वापर करून झाड तोडलं आणि ग्रॅहमने हा संपूर्ण प्रकारचा आपल्या मोबाईलमध्ये व्हीडिओ काढला.

न्यायमूर्ती लॅम्बर्ट यांनी सांगितलं त्यांचा नेमका हेतू माहीत नाही. पण, हा फक्त फुशारकी मारण्याचा प्रकार आहे आणि याबद्दल ते समाधानी दिसत आहेत. झाड तोडल्यामुळे जो जनक्षोभ उसळला त्याचा या दोघांना आनंद झाला.

झाड तोडल्यानंतर त्यांची बदनामी झाली त्याचाही आनंद हे दोघे घेत होते, असंही न्यायमूर्तींनी म्हटलं.

कोर्टानं कॅरदरर्सच्या मद्यप्राशन केल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच या कामासाठी कौशल्य आणि समन्वयाची गरज होती. दोघांनीही ही योजना आखली होती, असं नमूद केलं.

रॉबिन हूड या चित्रपटात झळकल्यानंतर मिळाली प्रसिद्धी

सायकामोर गॅप हे सायकारमेर मेपल प्रजातीचं होतं.

हे झाडं 1800 च्या उत्तरार्धात टेकड्यांमध्ये लावण्यात आलं होतं. हे या परिसरातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणून उभं राहावं, असा उद्देश होता.

पण, फक्त प्रतिकच नव्हे, तर लोकप्रिय पर्यटन आणि रोम साम्राज्याच्या पूर्वीच्या सीमारेषेवरील एक प्रतिक होतं.

हे झाड 1991 मध्ये केविन कॉस्टनर यांची प्रमुख भूमिका असलेल्या रॉबिन हूड या चित्रपटात झळकल्यानंतर जागतिक स्तरावर प्रसिद्धी झोतात आलं. त्यानंतर कलाकारांमध्येही खूप लोकप्रिय ठरलं.

नॅशनल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अँड्यू पोडे म्हणाले, "हे अतिशय प्रसिद्ध असलेलं झाडं आता कधीच परत येणार नाही. हे झाड नॅशनल ट्रस्टकडून जपलं जात होतं. हे जनतेचं झाड होतं."

"सायकामोर गॅप या झाडासोबत अनेकांच्या भावना जुळलेल्या होत्या," असंही त्यांनी नमूद केलं.

हे झाड कापल्यामुळे अनेकांनी भावना व्यक्त केल्या असून जगभरात एक तीव्र शोकाची भावना निर्माण झाली होती.

हे विध्वंसक क्रूर आणि निरर्थक कृत्य समजण्याच्या पलीकडे होतं. तसेच झाडं रोमन भिंतीवर कोसळणं हा देखील अत्यंत निष्काळजीपणा होता.

आता झाडाच्या बुंध्यातून नवीन कोंब फुटले असून झाड जगण्याची शक्यता आहे. त्याच्या बियांपासून नवीन रोपे तयार करून ती संपूर्ण यूकेमध्ये लावली जातील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)