ज्या झाडासाठी राष्ट्रीय महामार्ग वळवला होता ते झाड आज कोसळले, पर्यावरणप्रेमींवर शोककळा

    • Author, सरफराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, सांगलीहून

सांगली जिल्ह्यातील भोसे गावाच्या हद्दीत असलेलं 400 वर्षांपूर्वीचं झाड राष्ट्रीय महामार्गात जाणार होतं. हे झाड वाचावं यासाठी वृक्षप्रेमींनी आणि गावकऱ्यांनी मोहीम राबवली होती.

तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे झाड तोडलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

हे झाड वाचावं म्हणून राष्ट्रीय महामार्ग देखील वळवण्यात आला होता. पण, आता ज्या झाडासाठी एवढा खटाटोप केला ते झाडंच कोसळलं आहे.

400 वर्षांपूर्वीच्या या झाडाचं असणारं महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारने रस्त्यामध्ये बदल केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या पाऊसामुळे अखेर हे झाडं उन्मळून पडलं आहे.

हा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष नेमका कुठे होता?

सांगलीजवळच्या मिरज तालुक्यातल्या भोसे जवळ असणाऱ्या यल्लमा मंदिराजवळ, रत्नागिरी- नागपूर महामार्गावर हा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष होता.

हा वटवृक्ष कोसळल्याने सांगलीतले पर्यावरण प्रेमी गहिवरले आहेत.हा भला मोठा वटवृक्ष हजारो पक्षांसाठी आधारवड होता.

इतकंच नव्हे तर रत्नागिरी नागपूर महामार्ग होण्याआधी हा वटवृक्ष पंढरपूर कडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आणि वाटसरूंसाठी मायेची सावली देणारा देखील होता असं पर्यावरणप्रेमींचं मत आहे.

मंदिराच्या शेजारी असणारा हा भला मोठा वटवृक्ष सुमारे पाचशे मीटर चौरसच्या परिघात पसरला होता. त्याच्या पारंब्या अगदी जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या.

याआधी काय घडलं होतं?

2020 मध्ये रत्नागिरी-नागपूर महामार्ग निर्माण करताना हा वटवृक्ष महामार्गाच्या निर्मिती मध्ये अडसरा ठरत असल्याने तो काढून टाकण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता.

मात्र, हा ऐतिहासिक वटवृक्षाचा ठेवा जोपासण्यासाठी सांगलीतल्या पर्यावरण प्रेमींनी आंदोलन रुपी चळवळ सुरू केली होती.

वडाचे झाड किमान 1000 वर्षं जगते. त्यापासून आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने असंख्य फायदे मिळतात. पण 400 वर्ष जुनं झाड आता तोडण्यात येणार होतं.

ऐतिहासिक वारसा असलेल्या या झाडाला तोडल्यानंतर पुन्हा असे झाड येण्यासाठी 400 वर्ष वाट पहावी लागली असती. त्यामुळे महामार्गसाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा अन्यथा उपोषणाचा इशारा वृक्षप्रेमी प्रवीण शिंदे यांनी दिला त्यावेळी दिला होता.

वडाच्या या झाडाला वाचवण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला सह्याद्री वनराईचे सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांनी पाठिंबा दिला होता. तर वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर मदतीचे आश्वासनही दिलं होतं.

आषाढी वारीदरम्यान मिरजमार्गे पंढरपूरला जाताना शेकडो वारकरी याच झाडाखाली विसावा घेत असत. पर्यावरणाचा समतोल राखणारे हे झाड तोडू नये अशी विनंती भोसे गावातील गावकऱ्यांनी केली होती.

वडाच्या झाडाचे संवर्धन करावे या मागणीसाठी निसर्गप्रेमी आणि भोसे गावातील गावकऱ्यांनी या झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन केलं होतं. यावेळी झाड वाचलेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तर वारकरी संप्रदायातील लोकांनी झाडाखाली टाळ मृदंग वाजवत भजन करत झाड वाचवण्यासाठी साद घातली होती.

हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा तर आहेच पण हे वटवाघूळ आणि दुर्मिळ प्रजातींचे निवासस्थान आहे त्यामुळं हा वटवृक्ष तोडण्यात येऊ नये अशी विनंती सांगलीचे त्यावेळचे खासदार संजयकाका पाटील यानी पत्राद्वारे नितीन गडकरी यांना केली होती.

शिवकालीन वड वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेची राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली होती. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र पाठवलं होतं. त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे झाड तोडू,नये अशी विनंती केली होती.

त्यानंतर नितीन गडकरींच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रत्नागिरी- नागपूर महामार्गा बनवताना रस्त्याला वळवण्यात आलं झाडाच्या अगदी 100 फूट अंतरावरुन वळसा घालून राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास नेला.पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनाची यशानंतर 400 वर्षांपूर्वीचा ठेवा हा जोपासला गेला.

अखेर हे झाड पडलं...

गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच या वटवृक्षाच्या ठिकाणी पर्यावरण प्रेमींकडून मातीचा भराव टाकण्यात आला होता.

मात्र गेल्या चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे हा 400 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वटवृक्ष अखेर कोसळला. जमिनीतून हा वृक्ष मुळांसकट उन्मळून पडला आहे.

ज्या झाडासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दिशा बदलण्यात आला कोसळल्याने पर्यावरण प्रेमी गहिवरले आहेत.

वटवृक्ष संवर्धनासाठी काम करणारे पर्यावरण प्रेमी प्रवीण शिंदे म्हणाले की, "वटवृक्ष जोपासण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले, यातून या चारशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाची नोंद 'हेरिटेज ट्री' म्हणून देखील झाली. नागपूर-रत्नागिरी महामार्ग बनवताना तो जोपासला गेला, त्यानंतर भोसे ग्रामपंचायतकडे हे झाड संभाळण्याची जबाबदारी होती."

"आता हा वटवृक्ष कोसळलय,पण या वृक्षाचे पुन्हा नव्या वटवृक्षांमध्ये रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चारशे वर्षांपूर्वीच्या झाड असल्याने त्याच्या 400 फांद्या तयार करून, त्या अग्रणी धुळगाव,भोसे आणि मिरज या ठिकाणी रोप स्वरूपात लावण्यात येणार आहेत.

"यामुळे हा वटवृक्ष पुन्हा उभा राहू शकेल. त्याचबरोबर या वटवृक्षाच्या आठवणी कायमस्वरूपी राहण्यासाठी त्याच ठिकाणी वटवृक्षाच्या बुंध्यांचं स्मारक उभारलं जाणार आहे," प्रवीण शिंदे सांगतात.