'ही' आहेत जगातील सर्वात महागडी शहरं, न्यूयॉर्क आणि सिंगापूर अव्वल स्थानी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मालू कर्सिनो
- Role, बीबीसी न्यूज
न्यूयॉर्क आणि सिंगापूर ही दोन शहरं जगातील सर्वात महागडी शहरं आहेत, असं इकोनॉमिस्ट इंटेलिजियन्स यूनिट (EIU) सर्व्हेच्या अहवालातून समोर आलंय.
न्यूयॉर्क शहर पहिल्यांदाच महागड्या शहरांच्या यादीत सर्वोच्च स्थानी विराजमान झालाय. गेल्यावर्षी पहिल्या स्थानी इस्रायलमधील तेल अवीव हे शहर होतं. यंदा मात्र तेल अवीव तिसऱ्या स्थानी आहे.
जगातील या महागड्या शहरांमध्ये राहण्याचा सरासरी खर्च 8.1 टक्के इतका आहे, असं EIU नं अहवालात म्हटलंय.
रशिया-युक्रेन संघर्ष आणि कोव्हिडमुळे पुरवठा साखळीवर झालेला परिणाम या कारणांमुळे राहणीमानाच्या खर्चात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.
इस्तांबुलमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात आहे. तिथल्या किंमती 86 टक्क्यांनी, बुएनोस आइरेसमध्ये 64 टक्के, तर तेहरानमध्ये 57 टक्क्यांनी वाढ झालीय.
अमेरिकेतील उच्च चलनवाढ हे न्यूयॉर्कचे अव्वल स्थान होण्याचे एक कारण होते.
लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को सुद्धा जगातल्या महागड्या शहरांमधील पहिल्या 10 मध्ये आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील महागाई गेल्या 40 वर्षातील सर्वोच्च स्थानी होती.
डॉलर मजबूत होत जाणं हेही अमेरिकेतील शहरं महागडी होण्यामागे कारण होतं.

फोटो स्रोत, Reuters
मॉस्को आणि सेंट पिटर्सबर्ग ही शहर अनुक्रमे 88 आणि 70 व्या स्थानांवरून 37 आणि 73 व्या स्थानी विराजमान झाले. पाश्चिमात्य देशांनी आणलेल्या निर्बंधांचा हा परिणाम मानला जातोय.
या सर्व्हेनं 173 देशांमधील वस्तू आणि सेवांचं अमेरिकन डॉलरसोबत तुलना केलीय. यात कीव्ह शहराचा समावेश करण्यात आलेला नाही.
उपासना दत्त या सर्व्हेच्या प्रमुख आहेत, त्या म्हणतात की, युक्रेनमधील युद्ध, पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध आणि चीनमधील झिरो-कोव्हिड पॉलिसी यांमुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झालाय.
“व्याजदरांच्या वाढत्या किंमती आणि एक्सचेंज रेट्समधील शिफ्ट यांचाही राहणीमानाच्या खर्चावर परिणाम झाला आहे,” असंही दत्त म्हणतात.
त्या पुढे म्हणतात की, EIU च्या सर्वेक्षणात 172 शहरांमध्ये सरासरी किंमत वाढ आम्ही 20 वर्षांमध्ये पाहिलेली सर्वात मोठी आहे, याचा आमच्याकडे डिजिटल डेटाही आहे.
जगातील सर्वात महागडी शहरं (2022)
1. न्यूयॉर्क
1. सिंगापूर
3. तेल अवीव
4. हाँगकाँग
4. लॉस एंजेलिस
6. झ्युरिक
7. जिनिव्हा
8. सॅन फ्रान्सिस्को
9. पॅरिस
10. सिडनी
10. कोपनहेगन
स्वस्त शहरं
161. कोलंबो
161. बंगळुरू
161. अल्गियर्स
164. चेन्नई
165. अहमदाबाद
166. अल्मॅटी
167. कराची
168. ताश्कंद
169. ट्युनिस
170. तेहरान
171. त्रिपोली
172. दमास्कस











