श्रीलंका : पेट्रोलसाठी दहा दिवस रांगेत, गाडीतच झोप आणि ऑफिसचं काम- ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, EPA
- Author, सिकंदर किरमानी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
श्रीलंकेत गाडीत पेट्रोल भरायचं असेल तर तासनतास रांगेत उभं राहणं ही सामान्य बाब झाली आहे.
श्रीलंका हा देश सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे आणि देशाची पेट्रोल आयात करण्याची क्षमता कमी आहे.
राजधानीचं शहर कोलंबो इथे पेट्रोलसाठी 5 किलोमीटरहून अधिक लांबीची रांग आहे. तिथं आमची भेट 43 वर्षांचे एका मिनीबसचे चालक प्रथम यांच्याशी झाली. ते दहा दिवसांपासून रांगेत होते.
त्यांनी सांगितलं, "मी गेल्या गुरुवारपासून माझ्या गाडीतच झोपत आहे. हे खूपच वाईट आहे. पण मी करणार ती काय? इतकं थांबूनही मला पूर्ण टँक भरून पेट्रोल मिळणार नाहीये.
प्रथम पर्यटकांना फिरवायचं काम करतात. याआधी ते त्यांना दूरवर घेऊन जात असत. पण आता ते शक्य नाही. आता ते पर्यटकांची केवळ विमानतळापासून ने-आण करतात.
दहा दिवस रांगेत राहूनही त्यांना केवळ तीन दिवस पुरेल इतकंच पेट्रोल मिळालं आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रांगेत उभं राहावं लागलं.
प्रथम यांचा भाऊ आणि मुलगा आळीपाळीनं येतात आणि रांगेत उभे राहतात. जेणेकरून प्रथम घरी जाऊन आराम करू शकतील.

त्यांच्या मागे दोन खासगी बसेस उभ्या दिसतात. कंडक्टर गुना आणि ड्रायव्हर निशांत खूप दूरवर राहतात. त्यामुळे ते इथं असलेल्या सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत.
"मी तीन दिवसांत एकदाच अंघोळ करतो. लघवीसाठी 20 रुपये आणि अंघोळीसाठी 80 रुपये लागतात," असं ते सांगतात.
दयनीय परिस्थिती
देशातील वाढत्या महागाईमुळेही हे लोक त्रस्त आहेत. श्रीलंकेतील महागाई 50 टक्क्यांवर पोहचली आहे. आर्थिकच नव्हे तर देश राजकीय संकटातही सापडला आहे. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे देश सोडून पळून गेले आहेत आणि त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
कोरोना काळात देशातील पर्यटन उद्योगाचं कंबरडं मोडल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण, यासाठी कर कपात आणि रासायनिक खतांवर बंदी यांसारखी सरकारची आर्थिक धोरणं कारणीभूत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
श्रीलंकेत सध्या परकीय गंगाजळीची प्रचंड कमतरता आहे आणि देशाला अशास्थितीत आयात, तेल, औषधं तसंच खाद्यान्न अशा गरजांची पूर्तता करायची आहे. गुना बस कंडक्टर आहेत आणि सरकारविरोधी निदर्शनांमध्ये तेसुद्धा सहभागी झाले होते. ते राष्ट्रपतींच्या घरात घुसले होते.
राष्ट्रपतींच्या राहणीमानाची पद्धत पाहून मला आश्चर्य वाटलं, असं ते सांगतात.

याच रांगेत मागे दोन भाऊ दिसून आले. यातला एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहे, तर दुसरा बँकर. यांच्या कुटुंबातले काही जण रात्री रांगेत उभे राहतात,तर काही दिवसा. काहीजण गाडीतच झोपतात, जेणेकरून चोरांपासून बचाव करता येईल.
इवांथा सांगतात की, "खूपच वाईट परिस्थिती आहे. मी शब्दांत ती सांगू शकत नाही."
ते शेजारच्या कॅफेमध्ये बसून किंवा गाडीत बसूनच त्यांचं काम पूर्ण करतात. रांगेत उभे असलेल्या लोकांच्या बंधुभावाची ते प्रशंसा करतात.
काही जणांनी रांगेतील लोकांमध्ये भांडणं होत असल्याचंही सांगितलं. पण, या लोकांमधील आपआपसांत जी समज आहे त्याची इवांथा प्रशंसा करतात. शेजारच्या व्यापाऱ्यांनी मला त्यांचं टॉयलेट वापरण्याची परवानगी दिल्याचं ते उदाहरणादाखल सांगतात.
ते पुढे सांगतात, "एकदा मी गाडीत झोपलेलो होतो तेव्हा कुणीतरी माझी चप्पल घेऊन पळून गेलं. पण, त्यानं त्याची जुनी आणि फाटकी चप्पल मात्र तिथंच ठेवली."
पण, आता श्रीलंकेच्या राष्ट्रपतिपदी कोण येईल, यावर इवांथा इतर श्रीलंकन नागरिकांप्रमाणेच चिंतेत आहेत. त्यांचे मित्र सुनूस सांगतात, "रनिल विक्रमसिंघे हे दुसरे राजपक्षेच आहेत."
काळजीवाहू राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे हे नवे नेते म्हणून समोर येतील अशी चिंता इथल्या नागरिकांना आहे.
'वेळ वाया घालवणं'
या आठवड्यात विक्रमसिंघे यांची राष्ट्रपतिपदी नियुक्ती होईल असं सांगितलं जात आहे. पण, आम्ही त्यांचा स्वीकार करणार नाही, असं विरोध करणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. दुसरे नेतेही स्वत:चं नाव पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
देशाची सूत्रे कुणाच्याही हातात जावो, या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणं अवघड काम असणार आहे. आयएमएफसोबत एक बेलआऊट करार कायम करणे हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय देशात इंधन आणणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Reuters
एका नव्या योजनेअंतर्गत लोक पेट्रोल आणण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी करू शकतात. पण देशाची परिस्थिती बदलायची असल्यास अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि यात काही वर्षं निघून जातील.
रांगेत शेवटी उभे असलेले चंद्रा पुढच्या आठवड्यापर्यंत गाडीत थांबण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या गाडीत खूप कमी पेट्रोल शिल्लक आहे. त्यांना गाडीला धक्का देतच ती पुढे ढकलावी लागणार आहे.
ते निराश होऊन सांगतात, "मी केवळ माझा वेळ वाया घालवत आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








