IND vs AUS : ‘या’ 5 चुकांमुळे भारतानं गमावला विश्वचषक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंंकार डंके
- Role, बीबीसी मराठीसाठी
भारतीय क्रिकेट संघाची वन-डे विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची प्रतीक्षा आणखी 4 वर्षांसाठी लांबलीय. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियानं 6 विकेट्सनं पराभव केला.
भारतीय संघानं निर्णायक क्षणी निराश केलं. विजेतेपदाच्या अगदी उंबरठ्यावर येऊनही संघाला ‘नॉकआऊट पंच’ लगावता आला नाही. रोहित शर्माच्या टीमनं केलेल्या 5 चुकांमुळे 12 वर्षांनंतर वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याची संधी भारतानं गमावली.
1. रोहित शर्माचा ‘तो’ फटका
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियानं संध्याकाळी बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार करत 300 धावा करणं आवश्यक होतं.
शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतरही रोहित शर्मानं धावगती कमी होऊ दिली नव्हती. विराट कोहलीनंही मिचेल स्टार्कच्या एकाच ओव्हरमध्ये 3 चौकार लगावत आक्रमक सुरूवात केली.
टीम इंडियानं मोठ्या धावसंख्येचा पाया रचला असं वाटत असतानाच रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला. ट्रॅव्हिस हेडनं मागं पळत जात त्याचा सुंदर झेल घेतला.
रोहित बाद होण्यात हेडच्या अफलातून फिल्डिंगचा मोठा वाटा होता, हे खरं आहे. पण, ग्लेन मॅक्सवेलच्या त्यापूर्वीच्या 2 बॉलवर 10 धावा आलेल्या असताना रोहितनं आणखी एक उंच फटका मारण्याची गरज होती का? हा प्रश्न भारतीय चाहत्यांना नेहमी सतावणार आहे.
रोहित आणि विराट या सर्वांत अनुभवी भारतीय फलंदांजामध्ये एका मोठ्या भागिदारीची तेव्हा टीमला गरज होती. ती शक्यताही दिसत होती. पण, रोहितच्या त्या उंच फटक्यानं सारं गणित बिघडलं. ऑस्ट्रेलियाला सामन्यात प्रथमच संधी निर्माण झाली.
2. रोहितनंतरची संथ फलंदाजी
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संथ झालेल्या भारतीय फलंदाजीनं शेवटपर्यंत वेग पकडलाच नाही. के.एल. राहुलनं 104 बॉलच्या खेळीत फक्त एकच चौकार लगावला.
ग्लेन मॅक्सवेल, मिच मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या तिघांनी मिळून पाचव्या गोलंदाजाचा 10 कोटा पूर्ण केला. यापैकी एकालाही रोहितनंतर कुणी टार्गेट केलं नाही. त्यांनी 10 ओव्हर्समध्ये फक्त 44 धावा दिल्या.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतरच्या 40.2 ओव्हर्समध्ये भारतानं फक्त 5 चौकार लगावले. रोहितनंतर कुणालाही षटकार मारता आला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
3. 6 ते 11 क्रमांकाचं अपयश
टीम इंडियाच्या पहिल्या पाच फलंदाजांची या स्पर्धेतील सरासरी 50 पेक्षा जास्त होती. पण 6 ते 11 क्रमांकाच्या फलंदाजांनी मिळून संपूर्ण स्पर्धेत फक्त 240 धावा केल्या. या विश्वचषकातील अन्य कोणत्याही संघापेक्षा या कमी धावा आहेत.
रविंद्र जाडेजा आणि सूर्यकुमार यादवकडून फायनलमध्ये उपयुक्त खेळीची अपेक्षा होती. जाडेजा फलंदाजीत आणि सूर्यकुमार यादव फिनिशर म्हणून अपयशी ठरला.
4. प्लॅन B फेल
वर्ल्ड कप फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळताना प्लॅन Bची देखील आवश्यकता होती. टीम इंडियानं काही प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत.
रोहित आणि विराट 30 ओव्हर्सच्या आत बाद झाल्यानंतर शेवटपर्यंत कोण खेळणार? सूर्यकुमार यादव तळाच्या फलंदाजांसोबत कसा खेळणार?
बुमरा आणि शमीनं गोलंदाजी सुरूवात केल्यानंतर सिराज मधल्या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करणार?
या प्रश्नावर संघ व्यवस्थापनानं रणनीती आखली असेल. फायनलपूर्वी त्याची गरज भासली नाही. सर्वांत निर्णायक सामन्यात ही रणनीती फेल ठरली.
हेड आणि लबुशेन पाचही प्रमुख गोलंदाजांना दाद देत नव्हते. ती जोडी फोडण्यासाठी सहावा गोलंदाज रोहित शर्माकडं नव्हता.
5. नॉक आऊट पंचचा अभाव
240 धावांचं संरक्षण करण्यासाठी टीम इंडियाला झटपट विकेट्स आवश्यक होत्या. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीनं त्या पद्धतीनं सुरूवातही करून दिली.
ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 47 झाली होती. त्यावेळी टीम इंडियाला सामन्यावर वर्चस्व गाजवता आलं नाही.
ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन जोडीनं कधीही विजयासाठी आवश्यक असलेला रनरेट वाढू दिला नाही. गरज भासली तेव्हा चौकार आणि षटकार लगावत दडपण कमी केलं. त्यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 192 धावांची भागिदारी केली.
संपूर्ण स्पर्धेत गाजलेल्या भारतीय गोलंदाजीला ही जोडी लवकर फोडता आली नाही. ‘नॉक आऊट’ पंच लगावण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








