ऑरी, जस्ट लुकिंग लाइक ए वॉव... 2023मध्ये सोशल मीडियावर काय काय व्हायरल झालं?

- Author, मेरिल सेबेस्टियन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2023 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आठवतात?
भारताने या वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला, तसंच देशात काही गोष्टींवरून वादही झाला.
काही घटनांमुळे भारतीय एकत्र आले. त्यांनी उत्सव साजरा केला. अधूनमधून त्यांनी संतापही व्यक्त केला.
2023 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच काही क्षणांबद्दल आपण जाणून घेऊया.
जस्ट लुकिंग लाइक अ वॉव!
दिल्लीतल्या जस्मिन कौर या महिनलेने एका व्हीडिओत 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव!’ असं म्हटलं आणि या वाक्याने सरत्या वर्षाच्या काळात सोशल मीडिया गाजवला.
जस्मिन कौर गेल्या 20 वर्षांपासून दिल्लीत कपड्यांचे दुकान चालवत आहेत.
ऑक्टोबर 2023मध्ये त्यांनी त्यांच्या स्टोअरमधील कपड्यांविषयी एक व्हीडिओ रेकॉर्ड केला.
त्यांनी आपल्या दुकानातील कपड्यांची माहिती देणारा एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्यांनी 'सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव!' अशा प्रकारे नवीन ड्रेसचं वर्णन केलं.
ते वाक्य इतकं लोकप्रिय झालं की, त्यानंतर इन्स्टाग्रामवर अनेकांनी त्यावर व्हीडिओ बनवले.
सुमारे 20 लाख इन्स्टाग्राम रील्सने कौरच्या आवाजात लिप-सिंकिंग तयार केले. ज्यामध्ये दीपिका पदुकोण सारखे बॉलिवूड कलाकार, संगीतकार आणि अगदी राजकारणी यांचा समावेश आहे.
प्रसिद्धी मिळाल्यानंतर जस्मिन यांनी आपण खूप आनंदी असल्याचं म्हटलं.
'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कौर यांनी म्हटलं, "मी 3 वर्षांपासून इन्स्टा लाइव्ह करतेय. अचानक मी व्हायरल झाले. प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनासने पण माझ्या वाक्यावर लिप-सिंकिंग केले. त्यामुळे मला माझं आयुष्य बदलल्यासारखं वाटलं."
अरे, हा कोण आहे ऑरी?
नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर एका व्यक्तीविषयी अनेकांना खूपच कुतूहल वाटलं. साहजिकच त्यानंतर लोकांनी ‘ऑरी कोण आहे’ हे गुगलवर सर्रास सर्च केले.
कारण ऑरीचे भारतातील सेलिब्रिटींसोबतचे फोटो व्हायरल होऊ लागले.
ऑरी उर्फ ओरहान अवतरामणी. दीपिका पदुकोण आणि करीना कपूर ते भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासोबतही ऑरीचे फोटो दिसले.
ऑरी सुपरस्टार शाहरुख खानच्या घरी पार्टी करताना दिसला.
पण ऑरी इतका लोकप्रिय होण्यामागे काय कारण असावं, तो काय उद्योग करत असावा, या प्रश्नाचा अनेकांनी शोध घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी ऑरीनेच 'कॉस्मोपॉलिटन इंडिया'च्या मुलाखतीत स्वत:च्या कामाविषयी सांगितलं. त्यामध्ये तो म्हणाला, “मी स्वतःवर काम करतो."
दुसऱ्या एका मुलाखतीत तो म्हणतो, "मी माझं जीवन माझ्या मनाप्रमाणे जगत आहे आणि माझ्यात एक जिगर आहे."
त्याची ही उत्तरे लोकांना गोंधळात टाकत आणि आश्चर्यचकित करत राहिली.
पण प्रत्यक्षात ऑरी हा टॉम फोर्ड आणि प्राडासारख्या मोठ्या ब्रँडसोबत काम करतो. ऑरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विशेष उत्पादन व्यवस्थापक आहे.
सुधा मूर्तींच्या 'चमचा'चा किस्सा
परदेशात प्रवास करताना मांसाहाराशी संपर्क टाळण्यासाठी मी स्वतःचे अन्न आणि चमचे घेऊन जाते, असं प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांनी सांगितलं.
त्यांच्या या वक्तव्यावर मीडियात उलटसुलट चर्चा झाली.
मूर्ती यांनी म्हटलं होतं की "माझी सर्वात मोठी भीती ही आहे की एकच चमचा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांसाठी वापरला जात असावा."
सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करणारे आणि त्यांचा बचाव करणारे असे दोन गट पडले.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यांनी त्याचे समर्थन केले त्यांनी म्हटलं की, ही त्यांची वैयक्तिक निवडीची बाब आहे
टीकाकारांच्या म्हणण्यानुसार 'हे विचार म्हणजे भारतातील जातव्यवस्था आणि ब्राम्हणवादाच्या तथाकथित शुद्धतेचं उदाहरण आहे.'
काही लोकांनी त्यांचे जावई ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे प्लेटमध्ये मांसाहारी पदार्थ वाढून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
तरुणांनी किती तास काम करावे?
सुधा मूर्ती यांच्या विधानानंतर काही महिन्यांनी त्यांचे पती आणि भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतील अब्जाधीश नारायण मूर्ती हे पण चर्चेत राहिले.
त्यांनी एका पॉडकास्टमध्ये तरुण भारतीयांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचे आवाहन केले.
"जोवर आपण आपली कार्य उत्पादकता सुधारत नाही तोपर्यंत आपण प्रचंड प्रगती केलेल्या देशांशी स्पर्धा करू शकणार नाही," असं नारायण मूर्ती म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
नारायण मूर्ती यांना इतर उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेची हीच गरज, असल्याचं उद्योगजगत म्हणाले.
पण सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर कर्मचार्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून खराब कार्यसंस्कृतीला चालना दिल्याबद्दल टीका केली.
भारतीय आधीच विकसित देशांपेक्षा कमी पैशात जास्त काळ काम करतायत हे निदर्शनास आणून दिलं.
ही चर्चा अशा वेळी घडली जेव्हा विकसित देश कामाचे आठवडे कमी करण्याचा प्रयोग करत होते.
व्हायरल आजी-आजोबा
केरळमधील रेतनम्मा आणि तुलसीधरन 2016 च्या डिस्ने अॅनिमेटेड चित्रपट 'झूटोपिया' मधील एक दृश्य पुन्हा तयार करण्यासाठी व्हायरल झाले.
या व्हिडिओमध्ये हे वृद्ध जोडपे चित्रपटातील दोन मुख्य पात्रांच्या सेल्फी पोजची कॉपी करताना दाखवले आहे. एका आठवड्यात हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एक कोटी वेळा पाहिला गेला.
हे वृद्ध जोडपे आपल्या नातवंडांच्या मदतीने 'अचमास' नावाने इन्स्टाग्राम अकाउंट चालवतं.
त्यांचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी शूट करण्यात आला होता. परंतु नोव्हेंबरमध्ये पोस्ट करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Instagram
तेव्हा चित्रपटातील सेल्फी दृश्ये पुन्हा तयार करणे हा Instagram Reels वर एक लोकप्रिय ट्रेंड बनला होता.
“एक जोडपं म्हणून आम्ही दहा लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे,” असं रेतनम्मा यांनी मल्याळी मनोरमाला सांगितले.
त्यांचा व्हिडिओ आता 141 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
ऑस्करमध्ये भारतीय सिनेमा
2023 वर्षाच्या सुरुवातीला दिग्दर्शक कार्तिक गोन्साल्विस आणि निर्माता गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' या डॉक्युमेंट्रीने ऑस्कर जिंकला.
ऑस्कर पुरस्कार जिंकणारी ही पहिली भारतीय डॉक्यूमेंट्री आहे.
या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून बोम्मन आणि बेली या भारतीय जोडप्याची आणि त्यांच्या एका अनाथ हत्तीच्या बाळाशी असलेल्या नात्याची कथा सांगण्यात आली आहे.
दुसरीकडे 2022 मध्ये तेलगू सिनमा RRR रिलीज झाला. तेव्हा पासून तो देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला.

फोटो स्रोत, RRR
सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याने देखील इतिहास रचला. ऑस्कर जिंकणारे हे भारतीय सिनेमातील पहिले गाणे ठरले.
या ब्लॉकबस्टर गाण्याने लेडी गागा आणि रिहाना सारख्या दिग्गजांना त्याच्या श्रेणीत पराभूत केले.
भारत पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला
23 ऑगस्ट 2023 हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण ठरला. कारण भारताचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारे जगातील पहिले मिशन ठरले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे भारत हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीननंतर चौथा देश ठरला.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचं हे यश कोट्यवधी भारतीयांनी साजरं केलं. जगभरातूनही भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला.
इस्रोन चंद्रावरील लँडिंग युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले. ते एकाचवेळी 80 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. यामुळे व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एक नवा रेकॉर्ड तयार झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








