या बेटावर लोक नग्न होऊन फिरतात आणि त्याचसाठी ही जागा प्रसिद्ध आहे

फोटो स्रोत, Demetrios Ioannou
- Author, डेमिट्रोस आयनू
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
ग्रीक बेट गॅव्हडोस खूप प्रसिद्ध आहे. मी तिथे फिरत असताना एका फलकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्यावर लिहिलं होतं, ‘नग्नतेवर आता बंदी आहे, कपडे काढून फिरू नका’.
गॅव्हडोस लिबियन समुद्रातलं बेट आहे. हे बेट म्हणजे युरोपचं दक्षिणेकडचं शेवटचं टोक. इथे अगदी आताआतापर्यंत समुद्र किनाऱ्यावर नग्न फिरायला परवानगी होती.
तसं ग्रीस देशात नग्नतेला सरसकट परवानगी नाही, फक्त न्युडिस्ट रिसॉर्टमध्ये संपूर्ण नग्नता चालू शकते, पण गॅव्हडोसमध्ये तसं नव्हतं. इथे नग्न असण्यावर कोणतीही बंदी नव्हती आणि पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करायचे.
“गॅव्हडोसमध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य आहे ते जगात कुठेच नाही,” गॅव्हडोस एफएमचे मालक व्हॅलिसिस झॉनरस म्हणतात.
“मी इथे आयुष्यभर राहीन. पण असं काही पाहायला मिळेलं असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं,” गॅव्हडोसच्या एका बीचवर नग्नतेवर बंदी घातल्याबद्दल ते बोलत होते.
जुलै 2023 मध्ये गॅव्हडोसच्या महापौरांनी इथल्या साराकिंको समुद्र किनाऱ्यावर नग्न वावरण्यास बंदी घातली. तसा फलकही तिथे लावला.
त्यानंतर वादाला तोंड फुटलं. इथे येणारे पर्यटक आणि काही स्थानिकांनी याला विरोध केला. गॅव्हडोसच्या ‘मुक्त’ संस्कृतीवर बंधनं येत आहेत असंही काहींनी म्हटलं.
पण स्थानिक माध्यमांशी बोलताना महापौर लिलियन स्टेफानकी म्हणाल्या, “फक्त पर्यटकांना नग्नतेवर घातलेल्या बंदीवर आक्षेप आहे. इथल्या स्थानिकांना तर अशा प्रकारचे नियम कित्येक वर्षांपासून हवेत. त्यांना अशा प्रकारचे समुद्र किनारे हवेत जिथे सहकुटुंब जाता येईल.”

फोटो स्रोत, Demetrios Ioannou
या बेटावरच्या इतर समुद्र किनाऱ्यांवर अजून बंदी आलेली नाही, पण साराकिंको बीचवर नग्न वावरण्यावर बंदी घातल्यानंतर इतर ठिकाणीही असे नियम लागू केले जाऊ शकतात अशी अनेकांना भीती आहे. असं झालं तर गॅव्हडोसच्या मुल्यांवरच घाला घातला जाईल असं त्यांना वाटतं.
गॅव्हाडोस बेटावरच्या समुद्र किनाऱ्यांवर नग्न वावरता येतं, तसंच तिथे तंबू ठोकून राहाता ही येतं. त्यावरही बंदी नाही. पर्यटक इथे येतात. समुद्र किनाऱ्यांवर तंबू ठोकून राहातात, स्वतःचं जेवण स्वतः बनवतात आणि नग्न वावरतात. त्यामुळे 1960 च्या दशकांपासून हिप्पी आणि बोहिमियन पर्यटकांमध्ये हे समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत.
गॅव्हडोसचे माजी महापौर गेली कालीनीकू म्हणतात, “मी तर असं ऐकलंय की इथे आता कँपिंग आणि तंबू ठोकून राहाण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. तसं झालं तर हे बेट आणि इथला आर्थिक विकास धोक्यात येईल.”
ते पुढे म्हणतात, “ मी महापौर असताना दरवर्षी आम्हाला नग्नता आणि कँपिंग अधिकृत करण्यासाठी कार्यवाही करावी लागायची. 1992 पासून अशी कार्यवाही करणं सुरू झालं. याचा उद्देश नग्न फिरणाऱ्या सुरक्षित वाटावं हा होता.”
30 किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या या बेटाचा उल्लेख ग्रीक महाकाव्यात आढळतो. होमर या ग्रीक कवीने म्हटलंय की गॅव्हाडोस म्हणजेच ग्रीक पुराणकथांमधली जागा. इथे कॅलिप्सोने ऑडिससला बंधक बनवून सात वर्षं ठेवलं होतं.

फोटो स्रोत, Alamy
हे बेट मूळ ग्रीस देशापासून फारच लांब आहे, त्यामुळे 1930 च्या काळात ग्रीक सरकार कम्युनिस्टांना हद्दपार करायला इथे पाठवायचं.
1971 च्या सर्व्हेप्रमाणे इथे फक्त 142 पूर्णवेळ रहिवाशी होते. पण जसंजसं हिप्पी कल्चर वाढत गेलं तसं इथे येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण वाढलं. वेगळ्या पद्धतीने जगू पाहाणारे लोक इथे येत होते. त्यातूनच या बेटाची एक वेगळी संस्कृती विकसित झाली.
ज्या दिवशी मी साराकिंकोला आलो, मी त्रिप्ती बीचवर जाण्यासाठी तळपत्या उन्हात 10 किलोमीटर चालत गेलो. या बेटावर एक लाकडी खुर्ची गाडली आहे, इथे बसून युरोपच्या सर्वात दक्षिण बिंदूकडे पाहाता येतं.
ही खुर्ची काही रशियन वैज्ञानिकांनी बनवली आहे, जे 1986 च्या चेर्नोबिल दुर्घटनेनंतर इथे आले होते.
असं म्हणतात की हे वैज्ञानिक घातक रेडिएशनच्या संपर्कात आले होते आणि सोव्हिएत डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की अत्यंत स्वच्छ हवेत राहा तर बरे व्हाल. म्हणूनच ते इथे आले होते. इथे आल्यानंतर त्यांनी लाकडी खुर्ची बनवली आणि सिमेंटने ती बीचवरच्या एका टेकडीवर पक्क बसवली. तिथे बसून ते समोर पसरलेल्या अथांग सागराकडे पहायचे आणि मोकळ्या हवेत श्वास घ्यायचे.
इथेच मला भेटले निकोस लॉऊजिकीस. ते आणि त्यांचं कुटुंब इथे राहातं.
“मी आयुष्यभर इथे राहिलो,” निकोस त्यांच्या ग्रीक आईस्ड कॉफीचा घोट घेता घेता म्हणतात. “त्रिप्ती भागात आमचं पहिलं घर होतं. लोक इथे फिरायला यायचे. आमचं घर पाहून प्यायला पाणी मागायचे. मग मी इथे छोटा कॅफे उघडण्याचं ठरवलं.”
निकोसच्या कॅफेला आता नऊ वर्षं झालीत. त्यांच्या कॅफेत मिळणारी बकऱ्याच्या मांसाची एक डिश फारच प्रसिद्ध आहे.
“मी इथे स्वयंपाक करतो. आम्ही जे मांस वापरतो, ते प्राणी आम्ही स्वतः पाळलेले असतात.”
नग्न बीच बंद करण्याच्या महापौरांच्या निर्णयाबद्दल निकोस फारसे खूश नाहीत. त्यांना वाटतं त्यामुळे या बेटाची गंमतच निघून जाईल.
“या निर्णयामुळे अनेक पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या. पर्यटकांमुळे मला माझं कुटुंब पोसता येतं. ते या बेटावर पैसे खर्च करतात म्हणून आमची घरं चालतात. ते पर्यटक माझ्या कॅफेत कधीही नग्नावस्थेत आलेले नाहीत. ते आमचा आदर करतात,” निकोस म्हणतात.
स्थानिकांच्या मते यंदाच्या उन्हाळ्यात सारासिंको बीचवर फारच कमी लोक होते. हा बीच जवळपास रिकामाच होता म्हणा ना. व्हॅलिसिस झॉनरस म्हणतात, “जे लोक सहसा सारासिंको बीचवर यायचे ते दुसऱ्या बीचवर गेले.”

फोटो स्रोत, Demetrios Ioannou
सारासिंको बीचजवळच सर्वाधिक बार, कॅफे आणि छोटे बाजार आहेत. पर्यटकांची सर्वाधिक गर्दी याच भागात असते. पण नग्न फिरण्यावर बंदी घातल्यानंतर हा बीच रिकामा पडला. नग्नतेवर बंदी घालण्याच्या नियमाविरोधात स्थानिकांनी आंदोलनही केलं. सोशल मीडियावरही चळवळ चालवण्यात आली.
2021 च्या जनगणनेनुसार 208 लोक कायमस्वरूपी गॅव्हाडोस बेटावर राहातात. व्हॅलिसिस झॉनरस यांच्या मते बेटावर पूर्णवेळ राहाणारे लोक फार फार तर 70 असतील.
इथे हिवाळा तीव्र असतो. जोराचे वारे वाहात असतात. या काळात जीवनावश्यक गोष्टी घेऊन येणाऱ्या बोटीही येत नाही, त्यामुळे इथे राहाणं आणखी अवघड होतं.
निकोस म्हणतात, “उन्हाळ्यात तुम्हाला इथे अनेक लोक दिसतील पण हिवाळ्यात मात्र हे बेट सुनंसुनं असतं.
इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नावाखाली फक्त दोन जुन्या बसेस आहेत. या बेटावरच्या उंचसखल रस्त्यांवर खडखडत या बसेस चालत असतात. या बसमध्येही तुम्हाला जमिनीवर समुद्र किनाऱ्यावरची वाळू सापडते.
बदामाचं दूध किंवा ग्लुटन फ्री प्रोडक्ट अशी नावं इथे अजून कोणी ऐकलेली नाहीत.
“या बेटावर 25 वर्षांपूर्वी वीज आली,” इथल्या आणखी एक रहिवासी वाईलाकाकी म्हणतात. त्यांच्याकडे 10 बकरे, 5 मेंढ्या आणि बऱ्याचशा कोंबड्या आहेत.
“त्यापूर्वी आम्ही सगळंच हाताने करायचो. इथे कोणाकडे कार नव्हत्या. आमच्याकडे गाढवं असायची आणि आम्ही त्यावरच बसून इकडून तिकडे जायचो,” त्या जुन्या आठवणी सांगतात.
“आता वीजेसाठी जनरेटर्स आहेत. हे बेट बदलतंय,” त्या म्हणाल्या. तरीही गॅव्हाडोससारखी दुसरी जागा नाही हे सांगायला त्या विसरल्या नाहीत आणि मला म्हणाल्या की पुढच्या वर्षी नक्की ये.
गॅव्हाडोसच्या एका बीचवर नग्नतेवर बंदी घातली आहे. ती आता संपूर्ण बेटावर पसरणार का? पुढच्या वर्षी काय होणार कोणालाच माहीत नाहीये.
पण कालीनीकू म्हणतात, “इथे नग्न आणि कपडे घालणारे लोक एकाच वेळी वास्तव्य करत होते आहेत. इथे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमचे पंख पसरून उडू शकता.”
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








