वादळं आणि बंडखोरीला तोंड देत वास्को द गामाने भारतात ठेवलं होतं पहिलं पाऊल..

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
कोलंबस ज्यावेळी भारताचा शोध घेत अमेरिकेला पोहोचला त्यावेळी पोर्तुगालचा राजा जॉन याने भारताला पोहोचण्यासाठी समुद्री मार्ग शोधण्याचा विडा उचलला.
राजाने या कामासाठी तीन मोठे जहाज बनवण्याचा आदेश दिला. पण त्याचवेळा राजा जॉन आजारी पडला.
भारताचा रस्ता शोधण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच राजा जॉन यांची जीवनयात्रा संपली.
पण त्यांचे वारसदार इमॅन्युएल यालाही भारतात पोहचण्याच्या इच्छेने पछाडलेलं होतं.
आपल्या या मोहिमेला आकार देण्यासाठी त्यांनी कमांडर म्हणून वास्को द गामाला निवडलं.
वास्कोने आपल्या सोबत दोन जहाजांचे कमांडर म्हणून भाऊ पाओलो आणि मित्र निकोलस या दोघांना घेतलं.
25 मार्च 1497 रोजी रविवारच्या एका सकाळी लिस्बनच्या रस्त्यांवर लोकांची गर्दी जमली होती. त्यादिवशी नक्कीच काहीतरी मोठं, काही अविस्मरणीय असं होणार, याचा लोकांना अंदाज आलेला होता.
एका चौकातील चर्चमध्ये आपल्या मंत्र्यांसोबत पोर्तुगालचे राजे आणि राणी बसलेले होते. त्यांच्या समोर एक पडदा लावण्यात आला होता.
चर्चमधील बिशप वास्को द गामाच्या मोहिमेसाठी विशेष प्रार्थना करत होते. प्रार्थना संपताच राजा इमॅन्युएल पडद्यातून बाहेर आला. तिन्ही जहाजांच्या कमांडरनी त्याला गुडघ्यावर बसून अभिवादन केलं.
जीवघेण्या वादळाशी सामना
राजाच्या हाताचं चुंबन घेऊन वास्को द गामा एका अरबी घोड्यावर बसला.
यानंतर आयोजित मिरवणुकीत तो सर्वात पुढे चालू लागला. त्यांच्यासोबत इतर घोड्यांवर भाऊ पाओलो आणि मित्र निकोलस हेसुद्धा चालत होते.
त्यांच्या मागे चमकदार वर्दी परिधान केलेले जहाजाचे नाविक एकेक पाऊल टाकत परेडमधून पुढे जात होते.
वास्को द गामाची शोभायात्रा बंदरावर पोहोचली, त्यावेळी तोफेची सलामी देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
वास्को घोड्यावरून उतरला आणि त्यांच्या सॅन राफेल जहाजावर चढला. त्याचं जहाज बंदरावरून रवाना होताच तिथे उपस्थित लोकांनी त्याला अभिवादन केलं.
उत्तरादाखल वास्को आणि त्याच्या साथीदारांनीही हात हलवून अभिवादन केलं.
पहिल्या दिवशी वारे विरुद्ध दिशेने वाहत असल्याने वास्कोचं जहाज लिस्बनवरून निघून जवळच्या बेलेमपर्यंतच पोहोचू शकलं होतं.
तिसऱ्या दिवशी हवेने आपली दिशा बदलली. त्यामुळे वास्को द गामाचा ताफा वेगाने मार्गक्रमण करू लागला.
जॉर्ज एम टोले यांनी आपल्या द वोयाजेस अँड अॅडव्हेंचर्स ऑफ वास्को द गामा या पुस्तकात लिहिलं आहे, "तिन्ही जहाजं बरोबरच चालले होते. ती इतकी जवळ होते की त्या जहाजांचे कमांडर डेकवर उभे राहून एकमेकांशी बोलू शकत होते. पण कनारी आयलँड पार करताच त्यांचा सामना एका प्रचंड मोठ्या वादळाशी झाला."
"लाटा शांत झाल्या त्यावेळी वास्कोच्या सॅन राफेल जहाजाचा नामोनिशाणाही नव्हता. पण पाओलो आणि निकोलस यांनी केप वर्डेच्या दिशेने पुढे जाणं सुरू ठेवलं. ते केप वर्डेला पोहोचले तेव्हा वास्कोचा ताफा येताना पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी बिगुल वाजवून तोफेची सलामी देऊन या भेटीचा आनंद व्यक्त केला."
"काही महिने पुढे चालल्यानंतर वास्कोचा ताफा सेंट हेलेना बेपर्यंत पोहोचला. पण त्यावेळी तिथे राहणाऱ्या काही लोकांनी वास्कोच्या ताफ्यावर हल्ला चढवला. बाण लागून वास्को जखमी झाला, पण या झटापटीत कुणाचीही जीवितहानी मात्र झाली नाही."
जहाजावरचं बंड
वास्को पुढे निघाला पण पुन्हा एक मोठं समुद्री वादळ अचानक समोर आलं.
हे वादळ इतकं मोठं होतं की जहाजाच्या डेकवरही पाणी जमा झालं. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उडून जाण्याच्या भीतीने नाविकांनी स्वतःला दोरखंडांनी बांधून घेतलं होतं.
जहाजातून मोठा आवाज येऊ लागला. कोणत्याही क्षणी जहाजाचे तुकडे होतील की काय, अशी स्थिती होती.

फोटो स्रोत, Getty Images
नाविक इतके घाबरले की त्यांनी वास्कोला पोर्तुगालच्या दिशेने मागे फिरण्याची विनंती केली.
मात्र, वास्कोने त्याला नकार दिला. आपण भारतात जाऊ किंवा इथेच मरून जाऊ, अशी भूमिका त्याने घेतली.
संजय सुब्रमण्यम आपल्या द करिअर अँड लिजंड ऑफ वास्को द गामा या पुस्तकात लिहितात, "जेव्हा वादळ थोडं शांत झालं, त्यावेळी तिन्ही जहाज पुन्हा सोबत चालू लागले. सॅन राफेल जहाजातील नाविक सॅन गॅब्रियाल आणि सॅन मिगुएल हे दोघे आपल्या साथीदारांना भडकवू लागले. कमांडरचा म्हणजेच वास्को द गामाचा आदेश मानू नका, असं ते त्यांना सांगत होते.
वास्कोने हे बंड मोडून काढण्यासाठी सगळ्या बंडखोरांना कैद केलं. प्रवास पूर्ण करून पुन्हा पोर्तुगालला परत पोहोचेपर्यंत त्यांना अशा पद्धतीने बेड्यांमध्येच ठेवलं जाईल, असं तो त्यांना म्हणाला.
अशा प्रकारे वास्कोने जहाजावरचं बंड पूर्णपणे मोडून काढलं.
मेलिंदाच्या राजाने केलं स्वागत
या वादळाने तिन्ही जहाजांना प्रचंड नुकसान झालं. काही ठिकाणी छिद्रं पडली. तर पिण्याच्या पाण्याचा साठाही जवळपास संपला होता.
जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक्यांना समुद्राच्या पाण्याचा वापर करावा लागत होता.
यानंतर दहा दिवसांनी वास्कोच्या जहाजांचा ताफा एका नदीच्या तोंडाशी पोहोचला. याठिकाणी नांगर टाकण्याचा निर्णय वास्कोने घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
तिन्ही जहाजांमधील परिस्थितीत तपासण्यात आली. त्यावेळी सेंट मिगुएल पुढे जाण्याच्या स्थितीत नसल्याचं निदर्शनास आल्याने त्याला तिथेच सोडून त्याच्या इतर नाविकांना इतर दोन जहाजांमध्ये हलवण्यात आलं.
मार्च महिन्याअखेरपर्यंत वास्कोने मोझांबिकच्या बंदरावर नांगर टाकला. पण तिथल्या शेखचा विरोध पाहून वास्कोने पुढे जाण्याचं ठरवलं.
किनाऱ्याला लागूनच प्रवास करत वास्को मेलिंदाला पोहोचला. तिथला राजा आणि इतरांनी अत्यंत आदरातिथ्याने त्याचं स्वागत केलं.
तिथला राजा वास्कोला जहाजावरच भेटण्यासाठी आला. वास्कोने आपल्यासमोर एक खुर्ची ठेवून राजाला बसण्यास सांगितलं.
तिथे उपस्थित एका आफ्रिकन गुलामाने दोघांच्या मध्ये दुभाषी म्हणून संवादाची देवाणघेवाण केली.
यानंतर वास्कोने तिथून पुढे जाण्याची इच्छा प्रकट केली. मात्र राजाने म्हटलं की पुढचे तीन महिने त्यासाठी वाट पाहावी लागेल. त्यानंतरच आपल्याला हव्या त्या पद्धतीने वारे वाहतील. त्यानंतरच भारताच्या दिशेने जाता येईल.
वास्कोने हा काळ आपल्या जहाजांची दुरुस्ती करण्यात घालवला. जहाजात पिण्याचं पाणी भरून ठेवलं गेलं. जहाजावर मटण, भाजी आणि फळे यांचा साठा करून ठेवण्यात आला.
भारताचा किनारा पाहताच वास्को द गामा भावनिक
6 ऑगस्ट रोजी वास्को द गामाने पुढील प्रवास सुरू केला. तोपर्यंत वास्को जमिनीला लागूनच पुढे जात होता. पण आता त्याला पहिल्यांदा खोल समुद्राच्या मध्यात जायचं होतं.
दरम्यान मेलिंदा येथून आणलेल्या काही कृष्णवर्णीय लोकांसोबत त्याने दुभाषीच्या माध्यमातून चर्चा केली.

फोटो स्रोत, GYAN
भारत आणि येथील लोकांबाबत तो माहिती गोळा करत होता.
यानंतर 19 दिवसांनंतर एके दिवशी मेलिंदा येथून आपल्या सोबत आलेल्या एका पायलटने वास्कोला म्हटलं, "कॅप्टन, मला वाटतं की आपण भारताच्या किनाऱ्याच्या खूप जवळ आलो आहोत. शक्यतो उद्या सकाळपर्यंत आपल्याला भारताच्या भूमीचं दर्शन होईल. त्या रात्री वास्को झोपू शकला नाही."
जॉर्ज एम टोले लिहितात, "रात्रभर वास्को आपल्या साथीदारांसोबत डेकवर थांबून होते. त्याची नजर पूर्वेच्या दिशेने होती. भारताच्या भूमिचं पहिलं दर्शन घेण्यासाठी तो आतूर झाला होता."
"तेवढ्यात लोकांचा गोंधळ सुरू झाला. भूमि, भूमि, भूमि. त्यानंतर जहाजाच्या पायलटने वास्कोसमोर मान झुकवली आणि भारताच्या दिशेने बोट दाखवत तो म्हणाला, हीच आहे भारताची भूमी. तिथे उपस्थित नाविकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. देवाचे आभार मानण्यासाठी वास्को गुडघ्यावर बसला. त्याच्या साथीदारांनीही त्याचं अनुकरण केलं."
स्थानिक नौकांनी घेरलं
भारताच्या किनाऱ्यावरील स्थानिक मच्छिमारांनी वास्कोच्या ताफ्यातील जहाजांनी नांगर टाकताना पाहिलं. ते वास्कोच्या ताफ्याच्या दिशेने गेले. ते म्हणाले की तुम्ही कालिकतपासून 12 मैल दक्षिणेकडे आहात. वास्कोला दुरूनच कालिकतमधील घुमट आणि मिनार नजरेस पडले.

फोटो स्रोत, CAMBRIDGE UNIVERSITY PRESS
पुढच्या दिवशी सकाळ होताच वास्कोने पाहिलं की कित्येक नौकांनी त्याच्या दोन जहाजांना घेरलेलं आहे. त्यामध्ये काळ्या वर्णाचे भारतीय स्वार होते. त्यांचं पूर्ण शरीर उघडं होतं. पण खालील बाजूला विविध रंगांच्या कापडाने झाकलेलं होतं.
त्या सर्वांना जाणून घ्यायचं होतं की हे लोक कोण आहेत आणि इथे कशासाठी आले आहेत.
त्या नौकांमध्ये काही स्थानिक मच्छिमारांच्या होड्याही होत्या. वास्कोने ते पाहताच काही मासे विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली.
दरम्यान, काही अनोळखी लोक कालिकतला आले आहेत, अशी खबर स्थानिक राजा झामोरिनपर्यंत पोहोचली.
झामोरिनने आपल्या मच्छिमारांना आदेश दिला की अंजीर, नारळ आणि कोंबड्या घेऊन त्या जहाजांपर्यंत पोहोचवाव्यात. त्या अनोळखी लोकांबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करून आणावी, असंही राजाने सांगितलं.
झामोरिनला दिल्या भेटवस्तू
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर वास्को कालिकतचा राजा झामोरिन याला भेटण्यासाठी जाईल, असं ठरलं.
झामोरिनला भेट स्वरुपात देण्यासाठी वास्कोने आपल्यासोबत लाल कापड, मखमल, पिवळं सॅटीनचं कापड, 50 टोप्या, 50 हस्तिदंताचे चाकू आणि मौल्यवान कापडाने मढवलेली एक खुर्ची अशा काही वस्तू नेल्या.

फोटो स्रोत, Getty Images
संजय सुब्रमण्यम लिहितात, "वास्कोने निळ्या सॅटीन कापडाची ट्युनिक परिधान केलेली होती. त्याच्या कंबरेवर बांधलेल्या बेल्टवर सोन्याची मूठ असलेली कट्यार लटकत होती. शिवाय डोक्यावर निळ्या रंगाची मखमली टोपी होती. त्याच्या मध्ये पांढऱ्या रंगाचं एक पंखही लावलेलं होतं. सोबतच पायात पांढऱ्या रंगाचे बूट होते.
वास्कोच्या पुढे त्याचे 12 अंगरक्षक चालत होते. त्यांच्या हातात राजा झामोरिनसाठी घेतलेल्या भेटवस्तू होत्या. या सगळ्यांच्या पुढे काही लोक बिगुल वाजवत पुढे जात होते.
चारही बाजूंना इतकी गर्दी होती की वास्कोला त्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागली.
त्यावेळी वास्को विचार करत होता की भारतात आपला कशा पद्धतीने सन्मान केला जात आहे, हे पोर्तुगालच्या लोकांनी पाहायला हवं होतं.
वास्कोची झामोरिनशी भेट
वास्को राजा झामोरिनसमोर पोहोचला, त्यावेळी त्याने तीनवेळा आपलं डोकं झुकवलं.
झामोरिनने आपल्या बाजूला ठेवलेल्या खुर्चीच्या दिशेने इशारा करत वास्कोला बसण्यास सांगितलं. यानंतर त्याच्यासमोर खाण्यासाठी अंजीर, केळी आणि फणस ठेवण्यात आले. फळे खाल्यानंतर पोर्तुगाली लोकांना तहान लागली.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्ज एम टोले लिहितात, "त्यांना सांगण्यात आलं की तांब्याला ओठ न लावता पाणी प्यावं. त्यांच्या ओंजळीत पाणी टाकलं गेलं. त्यावेळी ते पाणी पिताना काहींना ठसका लागला. तर काहींनी सगळं पाणी आपल्या अंगावर सांडून घेतलं. हे पाहून राजा झामोरिनला हसू आलं.
वास्कोने दुभाषीच्या मदतीने झामोरिनला विनंती केली की त्याने भेट म्हणून आणलेल्या खुर्चीवर आसन ग्रहण करावं.
टोले यांनी लिहिलं आहे, "वास्कोने झामोरिनला संबोधित करताना म्हटलं की तुम्ही महान आहात. सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक आहात. आम्ही सगळे जण तुमच्या पायाची धूळ आहोत. पोर्तुगालच्या राजांनी तुमच्या पराक्रमाचे किस्से ऐकले आहेत. तुमच्याशी मैत्री करण्यासाठी त्यांनी माझ्यामार्फत संदेश पाठवला आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही आमच्या जहाजात येण्याची कृपा करावी. इथून तुमच्या महानतेचे किस्से घेऊन आम्ही आमच्या देशात परत जाऊ. आपल्यातील संपर्कामुळे कालिकतच्या लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होईल."
झामोरिनने याचं उत्तर देताना म्हटलं, "तुम्ही इथे ज्यासाठी आला आहात, ते सगळं सामान घेऊन जाण्याची परवानगी आहे. तुम्ही शहरात जाऊन आपलं मनोरंजन करू शकता. तुम्हाला कुणीच त्रास देणार नाही."
काही महिन्यांनी पोर्तुगालला परत...
यानंतर झामोरिन याने वास्कोला अनेक प्रश्न विचारले. जसं की पोर्तुगाल इथून किती लांब आहे? त्यांचा देश किती मोठा आहे? तिथं काय पिकतं? त्यांच्याजवळ किती जहाजं आहेत? त्यांचं सैन्य किती मोठं आहे?...

फोटो स्रोत, Getty Images
वास्कोने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. वास्को राजाच्या महालातून बाहेर पडला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. त्याच्या सहकाऱ्यांनी कशीबशी एका घोड्याची व्यवस्था केली. पण त्यावर बसायला काहीही नव्हतं. त्यामुळे वास्को त्यावर बसला नाही. तो भिजत भिजत चालतच पुढे गेला.
कालिकतमध्ये काही महिने राहिल्यावर 1498 साली त्याने पुन्हा पोर्तुगालच्या दिशेने मोर्चा वळवला, तोपर्यंत पोर्तुगाल सोडून त्याला 19 महिने झाले होते. कालिकतमधून तो गोव्याला गेला. तिथं एके रात्री वास्कोच्या जहाजांवर हल्ला झाला परंतु वास्कोच्या सहकाऱ्यांनी तो परतवून लावला.
पोर्तुगालला परतताना वास्को पुन्हा मेलिंदा थांबला. तिथं 12 दिवस काढून पोर्तुगालच्या दिशेने निघाला. त्याचं जहाज केप वर्देजवळ गेलं तेव्हा त्याचा भाऊ पाओलो आजारी पडला. काही दिवसांतच तिथं त्याचा मृत्यू झाला. आपल्या भावावर वास्कोने तिथंच अंत्यसंस्कार केले.
लिस्बनमध्ये अभूतपूर्व स्वागत
वास्को पोर्तुगालमध्ये पोहोचण्याआधीच त्याच्या मोहिमेला यश आल्याची बातमी तिथं पोहोचली होती. तो लिस्बनला पोहोचला तेव्हा सगळं शहर त्याच्या स्वागतासाठी आलेलं होतं. त्याचं जहाज बंदराजवळ येताच तोफा उडवून त्याचं स्वागत करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
जहाजातून उतरताना लोकांनी वास्कोचं निरीक्षण केलं तेव्हा त्याची दाढी फारच वाढल्याचं दिसत होतं आणि चेहराही दुःखी वाटत होता. मग तो राजाच्या महाला गेला तेव्हा राजा इमॅन्युएलने त्याचं आसनातून उठून स्वागत केलं. वास्कोनं गुडघ्यावर बसून रितीप्रमाण राजाच्या हातावर ओठ टेकले. पण राजानं त्याला मिठीच मारली.
वास्कोचा दौरा 25 मार्च 1497 ते 18 सप्टेंबर 1499 अशी साधारण अडीच वर्षं सुरू होती. दौऱ्याच्या सुरुवातीला 100 लोक त्याच्या दलात होते ते आता एकतृतियांश इतकेच उरले होते.
मोहिमेच्या सुरुवातीला नवंकोरं असणारं त्याचं जहाज आता एकदम जुनाट झालेलं होतं. अशाप्रकारच्या मोहिमांसाठी ते आता उपयोगात येणारं राहिलं नव्हतं.
वास्कोच्या दोनवेळा भारतमोहिमा
वास्कोच्या दलातल्या लोकांना भरपूर पैसा बक्षीस म्हणून मिळाल. त्यांच्या सहचारिणींना पाच किलो मसाले मिळाले. मोहिमेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबाना त्यांचं पूर्ण वेतन आणि भारतातून आणलेल्या सामानातला वाटा मिळाला. वास्कोला राजाने डॉन पदवी दिली आणि त्याला पेन्शनही दिली.

फोटो स्रोत, Getty Images
वास्कोचं जन्मगाव सायनसचं लॉर्डपद वास्कोला मिळालं. हळूहळू त्याची महती युरोपभर पसरली. तो कोलंबसला आव्हान समजला जाऊ लागला आणि पोर्तुगालची शान, आदर्श म्हणून मिरवला जाऊ लागला.
1502मध्ये तो पुन्हा एकदा कालिकतला आला. 1524मध्ये व्हॉईसरॉय पदावर नेमणूक होऊन त्याला कालिकतला पाठवण्यात आलं. त्याच वर्षी कोचीमध्ये त्याचं निधन झालं.
14 वर्षांनी त्याचं पार्थिव पोर्तुगालला नेण्यात आलं आणि तिथं राजकीय इतमामात त्याचं दफन झालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








