मिठाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? आहारात रोज किती मीठ असावं?

मीठामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. तसंच मानवी जीवनासाठीही मीठ अत्यंत गरजेचं आहे.

मिठात असलेल्या सोडियममुळे शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहण्यास आणि पेशींना पोषक तत्त्वं शोषून घेण्यासाठी मदत होते.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या ‘द फूड चेन’ या कार्यक्रमात मानवी शरीरात मिठाची भूमिका किती महत्त्वाची असते यावर आणि त्याच मिठाचं प्रमाण अधिक झाल्यास ते शरीरासाठी किती हानिकारक ठरू शकतं यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

मिठाचं महत्त्व

अमेरिकेतील रटगर्स विद्यापीठाचे न्यूट्रिशनल सायन्सेसचे प्राध्यापक पॉल ब्रेसलिन म्हणतात, “मीठ आयुष्यात अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषत: पेशींसाठी ते अतिशय महत्त्वाचं ठरतं.

यामध्ये सर्व मज्जातंतू, मेंदू, कणा, आणि सर्व स्नायूंचाही समावेश होतो. मीठ हे त्वचा आणि हाडांसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं.”

मात्र, योग्य प्रमाणात मिठाचं सेवन केलं नाही तर आपला जीवही जाऊ शकतो, असा इशारासुद्धा ते देतात.

सोडियमच्या अभावामुळं हिपोनटर्मिया होऊ शकतो. त्यामुळं भ्रमिष्टपणा, उलट्या येणं, चिडचिडेपणा, कोमा यांसारखी गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या जेवणात नियमितपणे 5 ग्रॅम म्हणजेच जवळपास एक चमचा एवढं मीठ असणं आवश्यक आहे. त्यात 2 ग्रॅम सोडियम असतं.

जागतिक पातळीवर बोलायचं झालं तर लोक सरासरी 11 ग्रॅम मिठाचं सेवन करतात. त्यामुळे हृदयरोग, गॅस्ट्रिक कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा आणि किडनीच्या विकारांचा धोका वाढतो.

जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की अतिरिक्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे दरवर्षी अंदाजे 18.9 लाख लोकांचा मृत्यू होतो.

या बातम्याही वाचा:

मिठाचे मुख्य ग्राहक कोण आहेत?

अनेक देशात प्रक्रिया केलेल्या पदार्थात मीठ जास्त असल्यामुळे मिठाचं खाण्याचंही प्रमाण वाढतं.

मात्र, यामागं काही ऐतिहासिक कारणंही असू शकतात. कझाकस्तानमधील लोक दिवसभरात जवळपास 17 ग्रॅम मीठ खातात. मिठाचं हे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जवळपास तिप्पट आहे.

मरियम या कझाकस्तानची राजधानी अस्ताना शहरामध्ये राहतात. त्या म्हणतात, “आमची परंपरा हे यामागचं कारण आहे. अनेक शतकांपासून आम्ही मैदानी भागांमध्ये भ्रमंती करायचो. हे करताना आम्ही खूप मांस घेऊन फिरायचो. ते सुरक्षित ठेवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जायचा.

अनेक कुटुंब थंडीत मिठाचा साठा तयार करून ठेवायचे. गाय, कोल्हा आणि अगदी घोड्यांच्या मांसाचाही साठा करून ठेवायचे. त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर मिठाची गरज भासायची.”

आठ वर्षांआधी मरियम यांच्या मुलीला आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना खाण्यात मीठ, फॅट आणि साखर यांचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला.

तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाने मिठाचं प्रमाण तातडीनं कमी केलं.

“दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा आम्ही डाएट करणं सुरू केलं तेव्हा पदार्थांची चव फारच वेगळी लागू लागली. म्हणजे, आपण एखादा अनोळखी पदार्थ खात आहोत की काय, असं वाटू लागलं,” असं त्या म्हणाल्या.

मात्र, ही अडचण खूप दिवस आली नाही. मरियम यांच्या कुटुंबाला बिगरमिठाचे पदार्थ खायची सवय झाली.

शरीरावर होणारा परिणाम

आपण मीठ खातो तेव्हा आपली जीभ आणि घशातील सॉफ्ट पॅलेटला त्याची जाणीव होते.

प्रा. बेस्लिन सांगतात की, “मिठामुळे शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळते. सोडियममुळे मिठाचे खडे तयार होतात. ते लाळेत जाऊन स्वादाच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना सक्रिय करतात. त्यामुळं विजेचा एक छोटा स्पार्क तयार होतो.”

त्यांच्या मते, मिठामुळे विचार आणि संवेदना जागवणारे सिग्नल्स प्रसारित केले जातात. त्यामुळे शरीर आणि मेंदूला उत्तेजना मिळते.

मिठाचं किती प्रमाण अधिक समजलं जातं?

शरीरावर मिठाच्या पातळीचा किती परिणाम होतो, तो व्यक्तीच्या अनुवांशिक रचनेवर अवलंबून आहे.

जगात एक अब्जपेक्षा अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. मिठाचं सेवन कमी केल्यामुळं हा त्रास कमी होण्यास आणि उपचार करण्यात मदत मिळते.

ऑस्ट्रेलियामध्ये न्यू कॅसल विद्यापीठातील पोषण आणि आहार विज्ञानाचे प्राध्यापक क्लेअर कॉलिन्स म्हणतात की, “शरीरात जास्त मीठ असतं तेव्हा शरीर पहिल्यांदा ते पातळ करण्याचं काम करतं. शरीर पाण्याचं संतुलन कायम ठेवतं. त्यामुळं इतर पातळ पदार्थांना चारही बाजूंनी पंप करण्यासाठी तुमच्या शरीराचा रक्तदाब वाढू लागतो.”

त्याचे परिणाम शक्यतो वाईट होतात. प्रा. क्लेअर कॉलिन्स म्हणतात, “तुमच्या शरीरातील रक्तपेशी आणि त्यातही मेंदूतील रक्तपेशी कमकुवत असतील तर पक्षाघात होऊ शकतो.”

ब्रिटनमध्ये मिठाचा सरासरी खप प्रतिदिन आठ ग्रॅमपर्यंत कमी झाला आहे. अद्यापही तो सहा ग्रॅमपेक्षा अधिक आहे. खाद्यपदार्थ निर्मात्यांना मिठाचं प्रमाण कमी करण्यासाठी काही कडक नियम घालून दिले असल्याने मिठाचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.

वेगवेगळ्या देशांमध्ये निर्धारित प्रमाणातील मिठाचं सेवन वेगवेगळं असतं. तुमच्या शरीरात मीठ खूप जास्त आहे की खूप कमी आहे, ते लघवीची चाचणी केल्यास समजून येतं.

तुम्ही किती मीठ खाता याचा अंदाज लावण्यासाठी तुम्ही एखाद्या फूड डायरीचा किंवा ॲपचा उपयोग करू शकता. त्यात खाण्याच्या लेबलवर असलेलं सोडिअमचं प्रमाण दिसून येतं.

कॉलिन्स यांच्या मते कोणतीच पद्धत पूर्णपणे अचूक नाहीये, पण तरीही आपल्याला एक अंदाज येण्यास नक्कीच मदत होते.

मिठाचं प्रमाण कमी करण्याचे उपाय

खाण्यातील मिठाचं प्रमाण कमी करणं ही बाब सोपी नाही.

अस्ताना म्हणजे कझाकस्तानच्या राजधानीत बेशबर्मक म्हणजे पास्त्याबरोबर उकडलेलं मांस खाणं हा राष्ट्रीय पदार्थ आहे. त्याच्या सेवनाला विरोध करण्यासाठी मरियम संघर्ष करत आहेत.

तिचे आईवडील अधिक मीठ खाण्याचे धोके माहिती असतानाही प्रमाण कमी करण्यास फारसे उत्सुक नाहीत.

प्रा. कॉलिन्स आपल्याला असा एखादा ब्रेड, पास्ता किंवा खाद्यपदार्थ शोधायला सांगतात ज्यात मिठाचं प्रमाण अत्यल्प असेल.

“जर तुम्ही स्वत: स्वयंपाक करत असाल तर त्यामध्ये मिठाऐवजी औषधी वनस्पती किंवा मसाल्यांचा वापर करा,” असा सल्ला ते देतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)