You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलसोबतच्या शस्त्रसंधी करारावर हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम यांनी काय प्रतिक्रिया दिली?
लेबनॉनमधील इराणपुरस्कृत सशस्त्र गट हिजबुल्लाहचे प्रमुख नईम कासिम यांनी इस्रायलसोबत झालेल्या शस्त्रसंधी करारावर पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत या कराराला हिजबुल्लाहचा ‘महान विजय’ असं म्हणत लेबनॉनच्या लोकांच्या धैर्याची प्रशंसा केली.
गेल्या मंगळवारी (28 नोव्हेंबर) इस्रायल आणि हिजबुल्लाह दरम्यान शस्त्रसंधी करार झाला, जो बुधवारपासून (29 नोव्हेंबर) लागू करण्यात आला. मात्र, यानंतरही दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर शस्त्रसंधी करार उल्लंघनाचे आरोप केले जात आहेत.
अमेरिका आणि फ्रान्सच्या मध्यस्थीनं हा करार करण्यात आलाय. त्याच्या अटींमध्ये असं नमूद केलंय की 60 दिवसांच्या आत हिजबुल्ल्लाह आपल्या सशस्त्र सैनिकांना ब्लू लाइनमधून मागे फिरायला सांगतील. तर इस्रायली सैनिक दक्षिण लेबनॉनमधून टप्प्याटप्प्यानं परततील.
हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम काय म्हणाले?
हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम यांनी शुक्रवारी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी या शस्त्रसंधी कराराला गटाचा ‘मोठा विजय’ म्हणत जुलै 2006 साली झालेल्या विजयापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं.
इस्रायलचे हिजबुल्लादरम्यान याआधी 2006 साली युद्ध झाले होते.
हिजबुल्लाह प्रमुख म्हणाले, “आम्ही जिंकलो कारण आम्ही शत्रूंना हिजबुल्लाहला नष्ट करण्यापासून रोखले होते. आमचा विजय झाला कारण आम्ही त्यांचा कडवटपणे सामना केला.”
पुढे ते म्हणाले, “पॅलेस्टाईनला आमचा सदैव पाठिंबा राहिल. आम्हाला युद्ध नको असं आम्ही वारंवार सांगितलंय मात्र, आम्ही गाझाला पाठिंबा देऊ इच्छितो पंरतु, जर इस्रायलनं युद्ध लादलं तर आम्ही त्यासाठी तयार आहोत.”
शस्त्रसंधी कराराच्या घोषणेवेळी राष्ट्रपती जो बायडन म्हणाले होते की, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील युद्ध संपवणं हा या 'शस्त्रसंधी करारा'चा उद्देश आहे.
या युद्धात लेबनॉनचे हजारो नागरिक मारल्या गेले तर दोन्ही देशांतील हजारो नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं.
दरम्यान, शुक्रवारी (29 नोव्हेंबर) इस्रायलीली सेनेने दक्षिण लेबनॉनमधील 60 गावांतील नागरिकांना परत न जाण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील अनेक मैल खोलवरचा भाग दर्शविणारा नकाशा जारी केला आहे.
इस्रायली सैन्याने आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, “रहिवाशांनी येथे परत येऊ नये आणि जो कोणी परत येईल तो काही घडल्यास त्यासाठी स्वत: जबाबदार राहील.”
दक्षिण लेबनॉनमध्ये गोंधळाची स्थिती
शस्त्रसंधी करारादरम्यान, हिजबुल्लाह आणि इस्रायल या दोघांनीही एकमेकांवर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय.
लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, शस्त्रसंधीच्या अवघ्या दोन दिवसांनंतर, दक्षिण लेबनॉनच्या सीमेजवळील खियाम गावात अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांवर इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला.
इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “गेल्या काही तासांत इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनच्या खियाम भागात संशयितांवर कारवाई केली आहे.”
“इस्रायलच्या सुरक्षेसाठी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य तैनात राहील,” असंही इस्रायलच्या प्रवक्त्यानं नमूद केलं.
इस्रायली सैन्याकडून असंही सांगण्यात आलं आहे की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या स्थानांवर हवाई हल्ले केले आहेत. शस्त्रसंधीनंतर सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला आहे.
इस्रायली सैन्याने याबाबतचा एक व्हीडिओही प्रसिद्ध केला आहे. यामध्ये एका ट्रकवर हवाई हल्ला झाल्याचं दिसत असून तो एक मिसाइल लाँचर असल्याचं म्हटलं गेलंय.
शस्त्रसंधी करार उल्लंघनाच्या घटना
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन्ही बाजूंना शस्त्रसंधी उल्लंघनाच्या सर्व घटनांना तत्काळ थांबवण्यास सांगितलं आहे.
गुरुवारी (28 नोव्हेंबर) लेबनॉनचे कार्यकारी पंतप्रधान नजीब मिकाती यांच्याशी फोनवर बोलताना मॅक्रॉन यांनी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधी करार लागू करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याच्या गोष्टींवर भर दिला.
तर, दक्षिण लेबनॉनमधील अल-बिसारियाहचे महापौर नाझीह ईद यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “इस्रायली सैन्यानं ज्या भागात हल्ला केला तो जंगलाचा भाग असून त्या भागात लोकवस्ती नाहीये.”
लेबनॉनच्या सुरक्षा दलांकडून इस्रायलवर सातत्याने कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय.
लेबनॉनच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, सीमेवरील गावावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, “दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी कारमधून प्रवास करणाऱ्यांत संशयित लोक आढळून आले असून हे कराराच्या अटींचं उल्लंघन आहे.”
इस्रायली लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलंय की, ‘इस्रायली सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. इस्रायली सैनिकांनी अजूनही दक्षिण लेबनॉनमध्ये आपला तळ ठोकून आहेत. युद्धविराम कराराचे उल्लंघन टाळण्यासाठी ते तेथेच राहतील असं म्हटलं जातंय.’
इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ हर्झी हेलेवी म्हणाले की, ‘इस्रायल या कराराची सक्तीने आणि निर्णायकपणे अंमलबजावणी करेल. हा करार होण्यासाठी इस्रायलने खूप प्रयत्न केले आहेत.’
इस्रायल आणि हिजबुल्लाहकडून केले जाणारे दावे
ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 3961 लेबनीज नागरिक मारले गेले असल्याचं लेबनॉनकडून सांगण्यात आलंय. तर, यातील बहुतांश मृत्यू मागील काही आठवड्यातच झाल्यांचही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
दुसरीकडे इस्त्रायलने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिजबुल्लाहसोबतच्या संघर्षात त्यांचे 82 सैनिक आणि 47 नागरिक मारले गेले आहेत.
इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहसोबतच्या 14 महिन्यांतील संघर्षाच्या संदर्भातून ही आकडेवारी सादर केलीय.
टाइम्स ऑफ इस्रायलने लष्कराच्या हवाल्याने म्हटलं आहे की, इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या 12500 ठिकाणांना लक्ष्य केलं असून यामध्ये 1600 कमांड सेंटर आणि 1000 शस्त्रास्त्रांच्या गोदामांचा समावेश आहे.
दुसरीकडे, इस्त्रायलने एक निवेदन जारी केलं असून, या संघर्षात हिजबुल्लाहचे 2500 सदस्य गेल्याचं सांगण्यात आलंय. हा आकडा 3500 पर्यंत जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केलीय. मृत्यू झालेल्यांमध्ये हिजबुल्लाहचे प्रमुख नेते हसन नसरल्लाहसह इतर 13 प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.
हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करत म्हटलंय की अलीकडच्या काळात “शत्रूकडून झालेल्या हल्ल्यातील नुकासानाने” त्यांना हा करार करण्यास भाग पाडले आहे.
या निवेदनानुसार, लेबनॉनमधील हल्ल्यांदरम्यानच्या संघर्षात 130 इस्रायली सैनिक मारले गेले असून 1250 हुन अधिक जखमी झाले आहेत.
दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इशारा दिलाय की, लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करारासंबंधित अटींचं उल्लंघन झाल्यास हिजबुल्लाहला ‘भीषण युद्धाला सामोरे जावं’ लागेल.
इस्रायली चॅनल 14 ला दिलेल्या मुलाखतीत नेतान्याहू म्हणाले की, “कराराचे उल्लंघन झाल्यास परिस्थितीनुसार आपण इस्त्रायली सैन्याला अधिक आक्रमक हल्ले करण्याचे निर्देश देऊ.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.