You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुखदेव यांची गोष्ट, ज्यांना भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी दिली होती
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
क्रांतिकारकांमध्ये सुखदेव एक रणनीतिकार किंवा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून प्रसिद्ध होते.
लाला लाजपत राय यांच्या मृत्यूनंतर क्रांतिकारकांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीचं अध्यक्षपद दुर्गा भाभींकडे होतं.
त्यांना सर्व जगाला दाखवून द्यायचं होतं की भारतीय लोक लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा सहजपणे स्वीकार करणार नाहीत. या बैठकीत भगत सिंह, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद होते.
दुर्गा भाभी यांनी जाहीर केलं की लाला लाजपत राय यांच्यावर लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्या जेम्स स्कॉटची हत्या करून लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल.
कुलदीप नय्यर यांनी 'विदाऊट फियर, द लाईफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंह' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "दुर्गा भाभी यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारलं की हे काम कोणाला करायचं आहे? त्यावर सर्व लोकांनी हात वर केले."
"सुखदेव यांना हे काम करायचं होतं. मात्र ते मुख्य रणनीतिकार असल्यामुळे त्यांची या कामासाठी निवड करण्यात आली नाही. त्यानंतर सुखदेव यांनी या कामासाठी भगत सिंह, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि जय गोपाल यांची निवड केली."
कुलदीप नय्यर लिहितात, "सुखदेव यांनी या कामाची योजना तयार केली. त्यानुसार भगत सिंह स्कॉटवर गोळी चालवणार होते. भगत सिंह यांचं नाव जाहीर होताच, त्या हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली की भगत सिंह यांची वाढती लोकप्रियता पाहून सुखदेव त्यांना हटवू तर पाहत नाहीत ना."
"ही गोष्ट अतिशय स्पष्ट होती की स्कॉटवर गोळी चालवणं कठीण होतं. मात्र हा हल्ला करून त्यानंतर पोलिसांच्या तावडीतून निसटणं त्याहूनही अधिक कठीण होतं."
"सुखदेव यांनी या कुजबुजीकडे दुर्लक्ष करून सर्व योजनेची आखणी केली. राजगुरूंवर भगत सिंह यांना कव्हर देण्याची जबाबदारी होती. तर त्यांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी चंद्रशेखर आझाद यांच्यावर होती. तर जय गोपाल जेम्स स्कॉटची ओळख पटवणार होते."
क्रांतिकारकांच्या पक्षानं नाव दिलं 'देहाती'
जय गोपाल यांच्या चुकीमुळे गोळी स्कॉटऐवजी सँडर्सला लागली. सुखदेव यांनीच योजना तयार केली की भगत सिंह देहरादून एक्सप्रेसनं कलकत्त्याला जातील.
सुखदेव यांनी आखणी केली की भगत सिंह हा प्रवास दुर्गा देवी यांचे पती म्हणून करतील.
तर दुर्गा देवी नाव बदलून सुजाता या नावानं प्रवास करणार होत्या. या प्रवासात भगत सिंह यांचं नाव रंजीत असणार होतं.
दुर्गा भाभी यांचा तीन वर्षांचा मुलगा सचिनदेखील त्यांच्याबरोबर जाणार होता. दरम्यान राजगुरू देखील त्यांच्यासोबत राहणार होते. मात्र नोकराच्या वेशात ते रेल्वेच्या दुसऱ्या डब्यात असणार होते.
हे नियोजन इतकं अचूक होतं की कोणीही भगत सिंहांना ओळखू शकलं नाही आणि ते लाहोरमधून सुरक्षितपणे बाहेर पडले.
सुखदेव यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1907 ला पंजाबातील लुधियानामध्ये झाला होता. ते क्रांतिकारकांच्या पक्षात 'देहाती' या नावानं ओळखलं जायचे.
शिव वर्मा सुखदेव यांचे निकटवर्तीय राहिले होते. त्यांनी 'रेमिनिसेंसेस ऑफ फेलो रेव्होल्युशनरीज' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात शिव वर्मा लिहितात, "मी त्यांचं नाव ऐकलं होतं. मात्र एक दिवस जेव्हा ते कोणतीही पूर्वसूचना न देता भगत सिंहांचं पत्र घेऊन कानपूरच्या डी ए व्ही कॉलेजमधील माझ्या खोलीत आले, तेव्हा त्यांच्याबद्दलच्या माझ्या सर्व धारणा हवेत विरून गेल्या."
"मला वाटलं होतं की 'देहाती' म्हणून ओळखला जाणारी ही व्यक्ती खरोखरंच एखादा गावात राहणारा अशिक्षित किंवा कमी शिकलेला माणूस असेल. मात्र मी पाहिलं की तो एक मजबूत शरीरयष्टीचा माणूस होता. त्यांचा रंग गोरा होता आणि त्यांचे केस कुरळे, सुंदर होते."
"त्यांचे डोळे खूपच कोमल होते. माझ्या खोलीत ते काही दिवस राहिले. दरम्यान भगत सिंह देखील एक दिवसासाठी तिथे आले होते. त्यावेळेस मला माहीत झालं होतं की या 'देहाती'चं खरं नाव सुखदेव होतं."
मारहाण होऊनदेखील चेहऱ्यावर स्मितहास्य
सुखदेव यांना प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर हसण्याची सवय होती. त्यांच्याबरोबर कोणी हसलं नाही, तरी देखील ते एकटेच हसत असत. मग ते अचानक त्यांच्या हास्यावर ब्रेक लावल्यासारखे चूपदेखील व्हायचे.
त्यांचं स्मितहास्य लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं. त्यामध्ये समाजातील वाईट गोष्टी, परंपरा आणि राजकीय मतभेदांबद्दल तिरस्कार दिसून यायचा.
शिव वर्मा लिहितात, "लाहोरच्या तुरुंगात उपोषण करत असताना आम्हा सर्वांना मारहाण होत होती. आम्हा सर्वांना जबरदस्तीनं दूध पाजण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न होता."
"तुरुंग अधिक्षकांनी सुखदेव यांची कोठडी उघडण्यास सांगितली. कोठडी उघडताच सुखदेव बाहेर पळाले. दहा दिवसांपासून उपाशी असूनदेखील ते इतक्या वेगानं पळाले की त्यांना पकडणं कठीण झालं."
"मोठ्या प्रयत्नांनी त्यांना पकडण्यात आलं, तेव्हा सुखदेव यांनी काही शिपायांची धुलाई केली आणि काहीजणांचा दातांनी चावा घेतला. डॉक्टरकडे पाठवण्याआधी तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप मारहाण केली."
"सुखदेव यांना मारहाण होऊनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होतं."
वर्मा लिहितात, "पोलिसांनी जेव्हा त्यांना जबरदस्तीनं दूध पाजण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी पायांचा वापर करण्यास सुरुवात केली."
"जेव्हा इन्स्पेक्टर त्यांच्या अगदी जवळ गेला, तेव्हा सुखदेव यांनी कसातरी त्यांचा पाय सोडवून घेत त्या इन्स्पेक्टरला इतक्या जोरात लाथ घातली की तो काही फूट मागे जाऊन पडला. दरम्यान हे सर्व होत असताना सुखदेव सतत हसत होते."
मळकट कपड्यांमध्ये सुखदेवांचा वावर
सुखदेव यांचे कपडे नेहमीच घाणेरडे किंवा मळालेले असायचे. त्यांचा पोशाख म्हणजे एक मळालेला अलीगडी पायजमा आणि त्यावर त्याहून मळकट कुर्ता.
त्यांच्या कुर्त्याची सर्व बटणं उघडी असायची. बऱ्याचवेळा कुर्ता सरकून खांद्यावर यायचा. त्यांच्या डोक्यावर व्यापाऱ्यांसारखी एक गोल टोपी असायची. त्यावर तेल आणि धुळीचे थर जमा झालेले असायचे.
त्यांचे बूट मात्र महागडे असायचे. त्यांना त्यांच्या राहणीमान आणि कपड्यांवर कोणी टिप्पणी केलेली आवडत नसे.
एमएम जुनेजा यांनी 'शहीद सुखदेव की प्रामाणिक जीवनी' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "कोणीही सुखदेव यांच्या कपड्यांवर टिप्पणी केली की ते चिडायचे आणि म्हणायचे की मी इथे एखाद्या लफंग्याशी विवाह करण्यासाठी आलेलो नाही. जर तुम्हाला माझे कपड आवडत नसतील, तर तुम्ही तुमचे डोळे बंद करा."
"मात्र कधी-कधी ते पक्षाचं हित लक्षात घेऊन पांढरं धोतर आणि कुर्ता परिधान करायचे आणि टोपी घालायचे नाहीत."
शिव वर्मा यांना कपड्यांची भेट
1928 मध्ये शिव वर्मा यांनी अमृतसरमध्ये सुखदेव यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली होती.शिव वर्मा लिहितात, "त्या दिवसांमध्ये ते त्यांच्या महागड्या बूटांऐवजी चर्मकारानं बनवलेले सर्वसामान्य बूट वापरत होते. त्या बुटांचा वापर ते चप्पलेसारखा करत असत."
"ते त्यांच्या कपड्यांकडे भलेही लक्ष देत नसतील, मात्र त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले कपडे घातल्यावर आनंद व्हायचा. एकदा त्यांनी माझ्यासाठी एक पंजाबी पायजमा, कुर्ता, कोट, पगडी आणि बूट विकत आणले."
"सुखदेव यांनी आग्रह धरल्यावर मी त्यांनी आणलेले कपडे घातले. त्यांनी त्यांच्या हातानं माझी पगडी व्यवस्थित डोक्यावर बसवली. मग त्यांनी थोडं लांबून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता तू अगदी पंजाबी दिसतो आहेस."
"मी त्यांना सांगितलं की तुम्हीसुद्धा कपडे बदला. मात्र त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, त्या लोकांना वाटू दे की मी तुझा नोकर आहे."
नायट्रिक अॅसिडचा वापर करून गोंदवलेली अक्षरं हटवली
सुखदेव यांना जाईच्या फुलाचे गजरे खूप आवडायचे. ते अनेकदा जाईच्या फुलाचे गजरे त्यांच्या मानेभोवती घालत असत. त्यांना मक्याचं भाजलेलं कणीस खायलादेखील खूप आवडायचं.
ते एकदम बरेच कणसं विकत घ्यायचे आणि मग ती कणसं खात रस्त्यावरून चालायचे.
सुखदेव स्वभावानं हट्टी असण्याबरोबरच थोडेसे विक्षिप्तदेखील होते. एकदा त्यांनी माझ्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची ठरवली.
एमएम जुनेजा लिहितात, "विद्यार्थी दशेत जेव्हा सुखदेव यांचा क्रांतिकारकांशी कोणताही संबंध नव्हता, तेव्हा त्यांनी त्यांच्या डाव्या हातावर 'ओम' आणि त्यांचं नाव गोंदवून घेतलं होतं."
"भूमिगत झालेले असताना या खुणेमुळे ते पकडले जाण्याची शक्यता होती. त्या दिवसांमध्ये आग्र्यात बॉम्ब बनवण्यासाठी नायट्रिक अॅसिड लपवून ठेवण्यात आलं होतं."
"सुखदेव यांनी कोणालाही न सांगता, बरंच नायट्रिक अॅसिड त्यांच्या हातावरील गोंदवलेल्या खुणेवर टाकलं."
"संध्याकाळपर्यंत त्या जागी फोड आले आणि त्यांचा हात सुजला. त्यांना तापदेखील चढला. मात्र याबद्दल त्यांनी कोणालाही सांगितलं नाही."
जुनेजा लिहितात, "सुखदेव यांनी दुसऱ्या दिवशी आंघोळ करण्यासाठी म्हणून जेव्हा त्यांचा कुर्ता काढला, तेव्हा कुठे त्यांच्या सहकाऱ्यांना ही गोष्ट माहीत झाली."
"ते पाहून चंद्रशेखर आझाद आणि भगत सिंह त्यांना रागावले. तेव्हा सुखदेव यांनी हसत हसत उत्तर दिलं की मला माझी ओळख पटवणारी खूण नष्ट करायची होती. तसंच हे देखील पाहायचं होतं की अॅसिडमुळे किती आग होते."
"यादरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप समजावलं की या जखमेवर त्यांनी मलम लावावं, मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही."
मेणबत्तीच्या ज्योतीनं भाजून घेतला हात
हातावर अॅसिड टाकून घेतल्यावरही सुखदेव यांच्या नावाचा एक भाग तसाच राहिला. एक दिवस ते दुर्गा भाभींच्या घरी गेले.
दुर्गा भाभींचे पती भगवती चरण वोहरा कुठेतरी गेलेले होते. दुर्गा भाभी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या. सुखदेव भगवतींच्या खोलीत गुपचूप बसलेले होते.
मलविंदरजीत सिंह बडाइच यांनी दुर्गा भाभींचं चरित्र लिहिलं आहे.
त्यात ते लिहितात, "बराच वेळ जेव्हा खोलीतून कोणताही आवाज आला नाही, तेव्हा दुर्गा भाभी त्यांच्या पतीच्या खोलीत आल्या. त्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं, त्यामुळे त्या थक्क झाल्या. टेबलावर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीसमोर सुखदेव त्यांचा हात धरून बसले होते."
"त्यांच्या हातावरील त्यांचं नाव असलेली चामडी जळत होती. यावेळेस त्यांना ते गोंदवलेलं नाव पूर्णपणे नष्ट करायचं होतं. दुर्गा भाभींनी चटकन ती मेणबत्ती विझवली आणि सुखदेवना त्या चांगल्याच रागावल्या. त्यावर सुखदेव यांनी फक्त स्मित हास्य केलं आणि काहीही बोलले नाहीत."
तुरुंगात उपोषणाच्या वेळेस जेव्हा डॉक्टर त्यांच्या पोटात रबरी नळी टाकून जबरदस्तीनं त्यांना दूध पाजण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा त्यांना खूपच लाजिरवाणं वाटायचं.
सुखदेव त्यांच्या तोंडात बोटं घालून उलटी करण्याचा प्रयत्न करायचे. दोन वेळा असं करण्यात त्यांना यश मिळालं. नंतर मात्र त्यांच्या गळ्याला याची सवय झाली.
मग त्यांनी कोणाकडून तरी ऐकलं की माशी गिळल्यामुळे उलटी येते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जबरदस्तीनं दूध पाजताच, ते एक माशी पकडून ती गिळून टाकायचे. मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही.
भगत सिंह आणि सुखदेव यांच्यातील वादविवाद
इतर क्रांतिकारकांपेक्षा सुखदेव यांचं भगत सिंह यांच्यावर जास्त प्रेम होतं. ते दोघे जेव्हा भेटायचे, तेव्हा एकमेकांची जोरात गळाभेट घ्यायचे आणि तासनतास बोलायचे.
क्रांतिकारकांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या ज्या बैठकीत हे ठरवण्यात आलं होतं की असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकायचा आहे, त्या बैठकीत सुखदेव नव्हते.
भगत सिंह यांनी आग्रह धरला की बॉम्ब ते स्वत:च फेकतील. मात्र केंद्रीय समितीतील इतर सदस्यांना हे मान्य नव्हतं.
त्यामुळे असं ठरवण्यात आलं की हे काम इतर कोणीतरी करेल. दोन-तीन दिवसांनी जेव्हा सुखदेव यांना ही गोष्ट माहित झाली तेव्हा त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला.
शिव वर्मा लिहितात, "जेव्हा सुखदेव केंद्रीय समितीतील इतर सदस्यांचं मन वळवू शकले नाहीत, तेव्हा ते थेट भगत सिंहांशी बोलले. त्यांनी भगत सिंहांबद्दल कडवट शब्द वापरले."
सुखदेव म्हणाले, "तुम्ही अहंकारी झाला आहात. तुम्हाला वाटू लागलं आहे की पार्टी फक्त तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला मृत्यूची भीती वाटू लागली आहे. तुम्ही भित्रे झाले आहात."
"पार्टीच्या मूल्यांची मांडणी तुमच्यापेक्षा इतर कोणीही अधिक चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत, ही बाब तुम्हाला मान्य असताना, असेंब्लीमध्ये इतर कोणीतरी बॉम्ब फेकेल हा निर्णय तुम्ही केंद्रीय समितीला का घेऊ दिलात."
शिव वर्मा लिहितात, क्रांतिकारी परमानंद यांच्याबद्दलच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा सुखदेव यांनी संदर्भ दिला. त्यात म्हटलं होतं की ते वैयक्तिक पातळीवर भित्रे होते. त्यामुळे त्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इतरांना पुढे केलं.
मग सुखदेव भगत सिंहांना म्हणाले, "एक दिवस तुमच्याबद्दल देखील असंच लिहिलं जाईल."
सुखदेवच्या सांगण्यावरून बॉम्ब फेकण्यासाठी भगत सिंहांची निवड
भगत सिंह जसजसा विरोध करत राहिले, तसतसे सुखदेव यांचे शब्द तिखट होत गेले.
मग भगत सिंह सुखदेवना म्हणाले की तुम्ही माझा अपमान करत आहात. त्यावर सुखदेव उत्तरले, "मी फक्त माझ्या मित्रासाठी असलेलं कर्तव्य निभावतो आहे."
भगत सिंहांच्या विनंतीवरून पुन्हा केंद्रीय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुखदेव एक शब्दही न बोलता बसून राहिले.
भगत सिंहांनी आग्रह धरल्यानंतर केंद्रीय समितीनं त्यांचा निर्णय बदलला आणि असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याची जबाबदारी भगत सिंहांवर देण्यात आली.
एक शब्ददेखील न बोलता सुखदेव त्याच संध्याकाळी लाहोरला निघून गेले. नंतर दुर्गा भाभींनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिलं, "दुसऱ्या दिवशी जेव्हा सुखदेव लाहोरला पोहोचले, तेव्हा त्यांचे डोळे सुजलेले होते. बहुधा ते रात्रभर रडत होते."
"ते कोणाशीही बोलले नाहीत. मात्र आतून ते हादरलेले होते. त्यांनी त्यांच्या सर्वात प्रिय मित्राला त्याचं उद्दिष्टं पूर्ण करण्यास सांगितलं होतं."
"सुखदेवना माहीत होतं की अटक झाल्यानंतर भगत सिंह तुरुंगातून जिवंत बाहेर येणं जवळपास अशक्य होतं."
भगत सिंह आणि राजगुरू फाशीच्या दोरखंडाच्या दिशेनं
असेंब्लीतील घटनेनंतर काही दिवसांनी सुखदेव यांनादेखील अटक करण्यात आली. लाहोर कट प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. भगत सिंह आणि राजगुरू यांच्याबरोबर सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
आधी या तिघांना 24 मार्चला फाशी देण्याचं ठरलं होतं. मग मात्र सरकारनं 12 तास आधीच म्हणजे 23 मार्चलाच त्यांना फाशी देण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे वकील प्राण नाथ मेहता जेव्हा त्यांना भेटायला आले, तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की जेलरकडून त्यांनी कॅरम बोर्ड परत घ्यावा.
भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी सरकारकडे मागणी केली होती की त्यांना राजकीय कैद्याप्रमाणे फायरिंग स्क्वाडकडून मारण्यात यावं. गुन्हेगारांप्रमाणे त्यांना फाशी दिली जाऊ नये. मात्र सरकारनं त्यांची मागणी मान्य केली नाही.
सतविंदर सिंह यांनी 'द एक्झिक्युशन ऑफ भगत सिंह' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू एकमेकांचा हात हातात घेऊन फाशीच्या दोरखंडाकडे निघाले."
"भगत सिंह मध्ये होते, सुखदेव त्यांच्या डावीकडे आणि राजगुरू त्यांच्या उजव्या बाजूला चालत होते. त्यांच्या पुढे तुरुंगातील कर्मचारी चालत होते."
अचानक त्या तिघांनी स्वातंत्र्यावरील त्यांचं आवडतं गाणं गायला सुरुवात केली. ते गाणं होतं, 'दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फ़त, मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी'."
सर्वात आधी सुखदेवना फाशी, शेवटच्या क्षणीदेखील तिघांचं धीरोदात्त वर्तन
कुलदीप नय्यर लिहितात, "एक-एक करत तिघांचंही वजन करण्यात आलं आणि मग त्यांना शेवटचं स्नान करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतंर त्या तिघांनी काळ्या रंगाचे कपडे घालण्यात आले. त्यांचे चेहरे मात्र उघडे होते."
"त्यांचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते. मग त्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील फाशीच्या दोराचा चुंबन घेतलं. जल्लाद मसीहनं त्या सर्वांना विचारलं की सर्वात आधी कोण फाशी घेणार? त्यावर सुखदेव म्हणाले की, सर्वात आधी ते फासावर जातील."
त्यानंतर एकेक करत सर्वांना फाशी देण्यात आली. डॉक्टर लेफ्टनंट कर्नल जे जे नेल्सन आणि डॉक्टर एनएस सोधी यांनी त्यांची तपासणी केली आणि तिघांनाही मृत जाहीर केलं.
तुरुंगातील एक अधिकारी या तीन शूरांच्या धाडसानं इतका प्रभावित झाला की त्यानं या तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा आदेश मानण्यास नकार दिला. त्याला त्याच क्षणी निलंबित करण्यात आलं.
आधी या तिघांवर तुरुंगातच अंत्यसंस्कार करण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र तुरुंगाबाहेर हजारोंची गर्दी जमली होती. ती गर्दी पाहून सरकारला हा निर्णय बदलावा लागला.
रात्र होता-होता तुरुंगाच्या मागील बाजूची भिंत तोडून एक ट्रक आत आणण्यात आला आणि या तिन्ही क्रांतिकारकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)