मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वर्गाच्या दाराजवळ बसवून परीक्षा द्यायला लावली, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Special Arrangement / Getty Images

फोटो स्रोत, Special Arrangement / Getty Images

    • Author, झेवियर सेल्वाकुमार
    • Role, बीबीसी तमिळ

तामिळनाडूमधील एका खासगी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मासिक पाळीमुळं चक्क वर्गाच्या दरवाजाजवळ बसून पेपर लिहायला लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना कोईम्बतूर जिल्ह्यातील किनाथुक्कडावू जवळील एका खासगी शाळेत घडली. ही विद्यार्थिनी तिच्या पहिल्या मासिक पाळीनंतर परीक्षेसाठी शाळेत गेली होती. त्यावेळी संबंधित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला.

"परीक्षा लिहून परत आलेल्या माझ्या मुलीनं रात्री तिचे पाय खूप दुखत असल्याचं सांगितलं. पाळी येऊन तीन दिवस झाले होते. त्यामुळंच पाय दुखत असतील असं आम्हाला वाटलं. माझ्या पत्नीनं तिच्या पायाला तेल लावलं.

नंतर, माझ्या पत्नीनं तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली तेव्हा तिने रडत रडतच पाय दुखण्याचं कारण सांगितलं. माझ्या मुलीने तीन तास वर्गाच्या पायरीवर बसून पेपर लिहिला होता. त्यामुळं तिला वेदना असह्य होत होत्या," असं त्या विद्यार्थीनीचे वडील म्हणाले.

पालकांनी विनंती केल्यामुळं मुलीला स्वतंत्रपणे परीक्षेला बसवल्याचा दावा करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळा व्यवस्थापनाने बडतर्फ केलं आहे.

दरम्यान, मुलीला वेगळ्या वर्गात न बसवता वर्गाबाहेर का बसवलं गेलं? असं स्पष्टीकरण मागितल्याचं पोल्लाचीच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सृष्टी सिंह यांनी बीबीसी तामिळला सांगितलं.

कोईम्बतूरच्या किनाथुक्कडवू जवळील सेंगुताई पलायम येथील एका खासगी शाळेत त्याच भागातील एका मजुराची मुलगी आठव्या इयत्तेत शिकत आहे.

विद्यार्थिनीला 5 तारखेला पहिली मासिक पाळी आली होती. त्यानंतर ती परीक्षेसाठी शाळेत गेली. शाळेत त्या विद्यार्थिनीला पेपर लिहिण्यासाठी वर्गाबाहेर पायऱ्यांवर बसवण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

आईने येऊन प्रत्यक्ष व्हीडिओ काढला

परीक्षा चालू असताना शाळेत आलेल्या त्या विद्यार्थिनीच्या आईने याचे व्हीडिओ चित्रण केले. ते व्हीडिओ नंतर प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्या व्हिडिओत वर्गाबाहेर पायरीवर एकटी बसून ती विद्यार्थिनी परीक्षा देत असल्याचे दिसते. जेव्हा तिच्या आईने याचं कारण विचारलं तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर कर्मचारी आले आणि त्यांनी विद्यार्थिनीच्या आईला तुम्ही शाळेत अनाधिकृतपणे प्रवेश कसा केला आणि व्हीडिओ का काढला?, असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली, असं व्हीडिओत दिसतं.

या घटनेबद्दल बीबीसी तामिळशी बोलताना विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितलं की, "माझ्या सर्वात लहान मुलीला 5 तारखेला पाळी आली. ती 7 तारखेला परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली. त्या दिवशी तिला परीक्षा लिहिण्यासाठी वर्गाबाहेर एकटीला पायऱ्यांवर बसवलं.

Special Arrangement / Getty Images

फोटो स्रोत, Getty Images

आम्हाला ही गोष्ट रात्रीच कळाली. पण माझ्या पत्नीने प्रत्यक्षात जाऊन याची खात्री करण्यासाठी व्हीडिओ काढला," असं ते म्हणाले.

मीही त्याच शाळेत शिकलो. त्या ठिकाणी काम करणारे काही शिक्षक आणि काही कर्मचारी समाजाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात आणि त्यांच्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला.

या घटनेने खळबळ उडाली तेव्हा पत्रकारांनी दि. 10 एप्रिल रोजी कोईम्बतूर येथे आलेले तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांना, "कोईम्बतूरमधील खासगी शाळांमध्ये अशा घटना वारंवार का होत आहेत?" असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्रिमहोदयांनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे उत्तर दिले.

महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी शासकीय सुट्टी असल्याने शाळा बंद होत्या. सकाळी सहाय्यक पोलीस अधीक्षक सृष्टी सिंह यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शाळेत जाऊन तपासणी केली.

शाळेच्या व्यवस्थापक कल्पना देवी यांच्याशी बीबीसी तामिळने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाल्यानंतर त्याचा या बातमीत समावेश केला जाईल.

'अस्पृश्यता' हे कारण?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या संदर्भात, पीपल्स लिबरेशन फ्रंटचे कोईम्बतूर जिल्हा अध्यक्ष थंबू यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी पोल्लाचीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

"ती विद्यार्थिनी अरुंधथियार समाजाची असल्यानं, अस्पृश्यतेच्या कारणास्तव वर्गाच्या बाहेर बसवून तिला परीक्षा द्यायला लावली. त्यामुळं संबंधितांवर कारवाई करावी," अशी मागणी त्या अर्जात करण्यात आली आहे.

पोलिसांनी शाळेत तपास केला तेव्हा विद्यार्थिनीच्या पालकांनी विनंती केल्यामुळंच तिला वर्गाबाहेर पेपर लिहिण्याची परवानगी देण्यात आल्याचं शाळा प्रशासनानं स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं.

याबाबत बीबीसी तामिळशी बोलताना सहाय्यक पोलीस अधीक्षक सृष्टी सिंह यांनी सांगितलं की, "विद्यार्थिनीच्या आईने पहिल्यांदा वर्ग शिक्षकांशी फोनवर संपर्क साधला आणि मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली आहे. त्यामुळं तिला स्वतंत्रपणे परीक्षा लिहायला लावणं शक्य आहे का," असं विचारलं.

परीक्षा असल्याने मुलीच्या आईला शाळेच्या मुख्याध्यापिकांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. विद्यार्थिनीच्या आईने स्वतंत्रपणे परीक्षा लिहिण्याची विनंती केली होती, असं शाळेच्या मुख्याध्यापिकांनी यावेळी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, "त्या विद्यार्थिनीने रात्री पाय दुखत असल्याचे सांगितलं तेव्हाच तिच्या आईला हे कळलं की तिला बाहेर बसून परीक्षा द्यावी लागली असेल. दुसऱ्या दिवशी सर्वांचे क्लास होते पण त्यांनी विद्यार्थिनीला पाठवले नाही. परीक्षा 9 एप्रिललाच असल्यामुळं त्यांनी तिला थेट परीक्षेला पाठवलं.

मुलीच्या वडिलांनी शाळेच्या व्यवस्थापनाने केलेल्या वक्तव्याचा विरोध केला आणि ते म्हणाले की, त्यांच्या मुलीने मासिक पाळीच्या कारणास्तव परीक्षा देणं सक्तीचं आहे का, असं विचारलं.

त्यावेळी त्यांनी परीक्षा देणं अनिवार्य असल्याचं म्हटलं. त्यावेळी त्यांनी मुलीला स्वतंत्रपणे परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली, असंही त्यांनी बीबीसी तामिळला सांगितलं.

"हे खरं आहे की, आम्ही स्वतंत्रपणे बसून परीक्षा द्यायला परवानगी मागितली. आम्ही त्यांना वेगळ्या वर्गात किंवा हॉलमध्ये टेबल देऊन परीक्षा घेण्यात यावी अशी विनंती केली, '' असं विद्यार्थिनीचे वडील म्हणाले.

परंतु, शाळेतील शिक्षकांनी तिला वर्गाबाहेर पायऱ्यांवर बसवून तीन तासांची परीक्षा लिहायला लावली,''असं तिच्या वडिलांनी सांगितलं.

सहाय्यक पोलीस अधीक्षक सृष्टी सिंह यांनी या संदर्भात शाळा प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागवल्याचे सांगितलं. यापूर्वी अशा प्रकारची घटना या शाळेत घडली का, याची चौकशी करू, असंही त्या म्हणाल्या.

"मुख्याध्यापकांच्या कक्षात अनेक टेबल आणि खुर्च्या आहेत. तुम्ही तिला तिथे लिहायला बसवू शकला असता. प्रश्न असा आहे की, तिला बाहेर बसून लिहायला का लावलं गेलं,'' असा सवाल सृष्टी सिंह यांनी केला.

या घटनेच्या संदर्भात, विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नेगामम पोलीस ठाण्यात शाळेच्या सहाय्यक सचिव आणि मुख्याध्यापिका आनंदी, कार्यालय सहाय्यक शांती, सचिव तंगवेल पांडियान यांच्यावर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या 3(1)(आर) आणि 3(1)(झेडए)(डी) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेत विद्यार्थिनीच्या पालकांनी विद्यार्थिनीला वयात आल्याचं कारण देत तिला एकटीलाच परीक्षेला बसू देण्याची मागणी करणं चुकीचं असल्याचे सांगत अनेक जण शाळा प्रशासनावर टीका करत आहेत.

याबाबत बीबीसी तामिळशी बोलताना डेमोक्रॅटिक मातर संघाच्या राज्य सरचिटणीस राधिका म्हणाल्या, " त्या विद्यार्थिनीला स्वतंत्रपणे परीक्षा लिहायला द्यावं, असं पालकांनी सांगितलं असं म्हणता येणार नाही.

पण तुमच्या पाल्याला इतर सर्वांसोबत पेपर लिहू द्या, असं सांगून त्यांना जाणीव करून देणं हे शिक्षकांचं कर्तव्य आहे. तसं न करता वर्गाबाहेर पायऱ्यांवर एकटं बसवणं मान्य नाही," असं त्या म्हणाल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी

दरम्यान, पोलीस अधिकारी शाळेत तपास करत असतानाच, तामिळनाडूच्या शालेय शिक्षण विभागानं सर्व शाळांना परिपत्रक जारी करून 'विद्यार्थ्यांना अशा प्रकारे परीक्षा देण्यासाठी एकटं बसवू नये', असं म्हटलं आहे.

यानंतर तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अन्बिल महेश यांनी त्यांच्या 'एक्स' या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली.

"त्या खासगी शाळेची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे. मुलांवर होणारे अत्याचार कोणत्याही स्वरुपात खपवून घेतले जाणार नाहीत. प्रिय विद्यार्थिनी तिथं एकटी बसलेली नाही! आम्ही तिथे आहोत. चला सर्वजण एक राहूयात," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

चौकशीनंतर आता सर्वच शाळांना सूचना...

कोईम्बतूरचे जिल्हा शिक्षण अधिकारी (प्रभारी) गोमथी म्हणाल्या, "आम्ही शाळेची तपासणी केली आहे. अजून पालकांशी बोललो नाही. पहिले पाऊल म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आनंदी यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. पुढील पाऊल शिक्षण विभागाचे उच्च अधिकारी उचलतील, असंही त्यांनी म्हटलं.

चौकशी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, त्यानंतर अंतिम कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे परिपत्रक शाळांना देण्यात आले आहे.

मुख्यतः सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि त्यासंबंधीच्या सुविधा देण्यासही सांगण्यात आलं आहे. यापुढे त्याची अधिक काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलली जातील,'' असंही गोमथी यांनी यावेळी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)