'हा आमच्या रक्ताला हात घालत आहे', भोरच्या विक्रम गायकवाडचा मृत्यू पैशामुळे की ऑनर किलिंग? वाचा

स्नेहा चव्हाण आणि विक्रम गायकवाड या दोघांनी 9 सप्टेंबर 2024 ला घरच्यांना न सांगता लग्न केलं होतं.

फोटो स्रोत, sagar gaikwad

फोटो कॅप्शन, स्नेहा चव्हाण आणि विक्रम गायकवाड या दोघांनी 9 सप्टेंबर 2024 ला घरच्यांना न सांगता लग्न केलं होतं.
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"हा आमच्या रक्ताला हात घालत आहे, असं आरोपी म्हणायचा. जातीतील मुलीसोबत विक्रमनं लग्न केल्यानं त्याचा अहंकार दुखावला, त्यातूनच त्यानं विक्रमचा खून केला."

पुण्यातल्या पोम्बर्डी नावाच्या गावातील तरुणाच्या निर्घृण हत्येबाबत त्याच्या काकांनी हा आरोप केला आहे.

भोर-महाड मार्गावरच्या या गावाच्या हद्दीतल्या कॅनॉलजवळ विक्रम गायकवाड या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली.

भोर तालुक्यातील उत्रौली गावामध्ये राहणाऱ्या विक्रम गायकवाड या उच्चशिक्षित दलित तरुणाचा त्याच्याच मित्रानं जीव घेतला आणि विक्रमचा खून केल्यानंतर आरोपी अनुज चव्हाण यानं स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन गुन्ह्याची देखील कबुली दिली.

आरोपीनं आर्थिक व्यवहाराचं कारण सांगितलं असलं तरी, कुटुंब आणि दलित संघटनांकडून ही हत्या ऑनर किलिंगच असल्याचा आरोप होत आहेत.

जातीच्या अहंकारातून ही हत्या झाल्याचं विक्रमच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. कारण काही महिन्यांपूर्वी विक्रमनं एका सवर्ण कुटुंबातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता आणि हा विवाह मोडण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केला होता.

संबंधित प्रकरणात पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

त्याचाच राग मनात धरून अनुज चव्हाण या 24 वर्षीय तरुणानं ही हत्या केली असल्याचा दावा विक्रमच्या कुटुंबियांनी केला आहे.

दरम्यान हे आंतरजातीय विवाहाचं प्रकरण काय आहे? पोलीस तपासात काय समोर आलं? दलित संघटना काय म्हणतात? हे जाणून घेऊयात.

त्या दिवशी काय घडलं?

विक्रम गायकवाडचा लहान भाऊ सागर गायकवाड यानं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी विक्रम नेहमीप्रमाणं त्याची चारचाकी गाडी घेऊन भोरला जिमसाठी गेला होता.

जिमवरून घरी परत येताना तो आरोपी अनुज चव्हाण याला भेटायला देखील जाणार होता. शेजारच्या वेनवडी गावात राहणारा अनुज हा विक्रमचा चांगला मित्र होता. त्यानं विक्रमकडून काही पैसे हातउसने घेतले होते.

तर तेच पैसे परत करणार असल्याचं सांगून त्या दिवशी त्यानं विक्रमला भेटायला बोलवलं होतं. जिमला जाण्याआधी विक्रमनं त्याचा भाऊ सागरला या सगळ्याची कल्पना दिली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दरम्यान विक्रम रोज रात्री 9 वाजेपर्यंत जिमवरून घरी येत असे, मात्र त्या दिवशी तो 9 वाजून गेले तरी तो घरी आला नव्हता. म्हणून त्याच्या घरचे त्याला फोन करत होते मात्र समोरून काही उत्तर येत नव्हतं.

शेवटी रात्री 10.49 च्या सुमारास विक्रमच्या आईनं त्याला पुन्हा फोन लावला असता एका अज्ञात व्यक्तीनं तो फोन उचलला आणि सांगितलं की हा फोन पुण्यातील गुलटेकडी येथील भाजी मंडईमध्ये आहे.

तो फोन त्यांना त्यांच्या भाजी वाहतूक करण्याच्या वाहनामध्ये सापडला आहे असं देखील त्यांनी विक्रमच्या आईला सांगितलं.

विक्रम गायकवाडचा फोटो

फोटो स्रोत, sagar gaikwad

फोटो कॅप्शन, घरच्यांकडून दोघांच्या जीवाला धोका असल्यानं सावध राहण्यास स्नेहानं विक्रमला सांगितलं होतं.

हे ऐकल्यानंतर विक्रमच्या कुटुंबीयांची चिंता अजूनच वाढली, कारण जिमला जाण्याआधी विक्रमनं त्याचे काका विठ्ठल गायकवाड यांना, आपल्याला कोणीतरी मारणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यामुळे त्यांनी तात्काळ भोर पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथं जाऊन पोलिसांना त्यांनी सर्व हकिकत सांगितल्यानंतर विक्रमचा शोध सुरू झाला.

आंतरजातीय विवाहामुळे जीव गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप

आंतरजातीय विवाहामुळे विक्रमला त्याचा जीव गमवावा लागल्याचा असा त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. या प्रकरणाबाबत बीबीसी मराठीशी विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड यांनी संवाद साधला.

त्यांनी सांगितल्यानुसार, विक्रमचे शेजारच्या कान्हवडी गावात राहणाऱ्या स्नेहा संदीप चव्हाण सवर्ण कुटुंबातील मुलीशी गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

त्या दोघांनी 9 सप्टेंबर 2024 ला रजिस्टर पद्धतीनं कोणालाही कळू न देता लग्न केलं होतं.

मात्र योग्य वेळ आल्यावर घरी आपल्या लग्नाबद्दल सांगता येईल असं ठरवून ते दोघेही आपापल्या कुटुंबासोबत वेगवेगळं राहत होते.

मात्र जानेवारी महिन्यात ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी लग्न केलं होतं तिथून एक पत्र मुलीच्या घरी गेलं.

ते पत्र तिच्या घरच्यांच्या हाती लागलं आणि तेव्हा त्यांच्या लग्नाची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली.

मुलगा दलित समाजातील असल्यामुळं मुलीच्या घरच्यांनी त्यांचा हा विवाह स्वीकारण्यास नकार दिला आणि हे लग्न मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरूवात केली, असं विक्रमच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

विक्रम गायकवाड

फोटो स्रोत, sagar gaikwad

फोटो कॅप्शन, खून झाला त्या रात्री 2 च्या सुमारास विक्रमची गाडी पोम्बर्डी गावच्या हद्दीत असलेल्या कॅनॉलजवळ सापडली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विक्रमचे काका विठ्ठल यांनी सांगितले, "तिच्या घरच्यांनी विक्रमवर स्नेहाला सोडचिठ्ठी देण्यासाठी विविध प्रकारे दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांनी आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्षांसोबत बैठक देखील घेतली.

"त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी तंटामुक्ती अध्यक्षांना सगळा प्रकार सांगून विक्रम आणि स्नेहाचं लग्नं मोडण्याबाबत चर्चा केली."

"मात्र त्या चर्चेदरम्यान मुलीनंच लग्न मोडण्यास नकार दिला, शिवाय तिनंच या लग्नासाठी विक्रमला विचारणा केली होती हे देखील सगळ्यांसमोर कबूल केलं.

"ते ऐकल्यानंतर गावातील तंटामुक्ती अध्यक्षांनी त्या बैठकीत सगळ्यांना सांगितलं की मुला-मुलीची संमती नसेल तर आपण हे लग्न मोडू शकत नाही, त्यांना विभक्त करू शकत नाही," असं विठ्ठल गायकवाड यांनी सांगितलं.

दरम्यान या बैठकीला विक्रम आणि त्याच्या कुटुंबीयांना बोलवण्यात आलं नव्हतं. हा सगळा प्रकार गावातील तंटामुक्ती अध्यक्षांनी विक्रमला आणि त्याच्या कुटुंबीयांना फोन करून कळवला असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्याच्या काकांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, "त्या बैठकीनंतर चार दिवसांनी स्नेहा आमच्या शेतामध्ये विक्रमला भेटायला आली होती. ते दोघंही लग्न मोडायला तयार नसल्यानं तिच्या घरातलं वातावरण खूप तापलं आहे असं तिनं विक्रमला सांगितलं. तसंच त्या दोघांच्याही जीवाला तिच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचं सांगून ती निघून गेली."

"ज्या दिवशी विक्रमची हत्या झाली त्या दिवशीही विक्रमच्या काही मित्रांनी त्याला सांगितलं होतं की मुलीचा चुलत भाऊ शहरातून काही माणसं तुला मारण्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुला उचलणार आहे तर तू सावध राहा",असंही पुढं ते म्हणाले.

विक्रमची पत्नी स्नेहा चव्हाण कुठे आहे विचारल्यानंतर विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले की स्नेहा तिच्या आई-वडिलांच्या घरी आहे. तिच्यावर तिच्या घरच्यांचा दबाव आहे. त्यामुळे विक्रमच्या मृत्यूनंतर तिच्याशी संपर्क झालेला नाही.

बीबीसी मराठीने स्नेहा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला.

आरोपीचा या प्रकरणाशी संबंध काय?

खरंतर आरोपी अनुज चव्हाणचं गाव, विक्रमचं गाव आणि विक्रमनं जिच्याशी लग्न केलं ती स्नेहा चव्हाण या तिघांचीही गावं वेगवेगळी आहेत.

त्यामुळे आरोपी अनुज चव्हाणचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याबद्दल विचारलं असता विक्रमचे काका विठ्ठल गायकवाड म्हणाले, "तिघांची गावं जरी वेगवेगळी असली तरी ती 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर शेजारी शेजारीच आहेत.

त्यामुळेच आरोपी अनुज चव्हाण हा जसा विक्रमचा चांगला मित्र होता, तसाच तो त्या मुलीच्या म्हणजे स्नेहा चव्हाणच्या भावचाही चांगला मित्र आहे. शिवाय ते एकमेकांचे नातेवाईकही आहेत."

"त्यामुळेच काहीही करून विक्रम स्नेहाला सोडचिठ्ठी द्यायला तयार होत नाही हे पाहून मुलीच्या वडिलांनी व काही नातेवाईकांनी भोरच्या वेनवडी गावात राहणारा त्यांचा नातेवाईक अनुज चव्हाण याच्या कानावर हा प्रकार घातला."

कोट कार्ड

"अनुज जरी विक्रमचा चांगला मित्र होता तरी त्याच्या जातीतील मुलीसोबत विक्रमनं लग्न केल्यानं त्याचा जातीय अहंकार दुखावला गेला होता.

"यानं आमच्या रक्ताला हात घातलाय', असा तो मधल्या काळात विक्रमबाबत इतरांना बोलायचा आणि त्याच रागातून त्यानं विक्रमचा खून केला." असं देखील पुढं ते म्हणाले.

ते म्हणतात, " त्या रात्री 8.30 वाजता भोरमध्ये विक्रमला मी जिमच्या दिशेनं जाताना पाहिलं होतं मात्र तो जिमकडं न जाता अनुजनं बोलवलेल्या ठिकाणी गेला होता. तिथंच त्यांनी विक्रमचा घात केला आणि जिथं कोणाचं फारसं येणं जाणं नसतं अशा ठिकाणी त्याचा मृतदेह टाकून दिला."

असा शोध लागला

विठ्ठल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम हा भोर चौपाटी येथे चहा पिताना दिसल्याची माहिती मिळाल्यानं संबंधित ठिकाणी जाऊन पोलिसांनी आणि विक्रमच्या कुटुंबीयांनी तिथं असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं.

तर विक्रम त्याची चारचाकी गाडी घेऊन भोर-महाड रस्त्यानं पुढं गेल्याचं आढळून आलं. त्यानंतर शोध घेतला असता त्याच रात्री 2 च्या सुमारास विक्रमची गाडी पोम्बर्डी गावच्या हद्दीत असलेल्या कॅनॉलजवळ अनुज चव्हाण यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या विश्वा स्टोन क्रशर येथे सापडली.

विक्रमच्या गाडीजवळ जाऊन पाहणी केली असता गाडीच्या दरवाज्याला रक्त लागलेलं दिसलं म्हणून दरवाजा उघडून आत पाहिलं तर ड्रायव्हर सिटवर देखील रक्त सांडलेलं आढळून आलं.

म्हणून सागर गायकवाड, त्याचे काका आणि पोलिसांनी आसपासच्या परिसरात विक्रमचा शोध घ्यायला सुरुवात केली.

विक्रम गायकवाड्या कुटुंबातील सदस्य

फोटो स्रोत, sagar gaikwad

फोटो कॅप्शन, हा प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचा दावा विक्रमच्या कुटुंबियांनी केला आहे.

त्यावेळी गाडीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या कॅनॉलच्या कडेला विक्रम रक्तानं माखलेल्या अवस्थेत पडला होता.

त्याच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्रानं 18 ते 20 गंभीर वार केलेले दिसत होते. त्याच्या गुप्तांगावर देखील भयानक वार करण्यात आले होते.

सागर यांनी त्यांचा भाऊ विक्रमला जागं करण्याचा खुप प्रयत्न केला, परंतु विक्रमनं कोणतीही हालचाल केली नाही.

त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विक्रमला तात्काळ रामबाग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मात्र उपचारापूर्वीच विक्रमचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ऑनर किलिंगचेच प्रकरण असल्याचा दलित संघटनांचा आरोप

आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांकडून जाणिवपुर्वक आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही हत्या केली असल्याचं भासवलं जात आहे असा आरोप या संघटनांकडून केला जात आहे.

तसेच या घटनेला दहा दिवस लोटल्यानंतरसुद्धा पोलिसांचा तपास हा अत्यंत चुकीच्या दिशेनं सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

त्यामुळेच या संघटनांकडून 18 फेब्रुवारी रोजी भोरमधील तहसील कार्यालयावर निषेध म्हणून मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता.

सदर प्रकरण हे ऑनर किलिंगचा असून त्या दृष्टीनं पारदर्शक आणि योग्य तपास व्हायला हवा अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे आणि रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे आणि इतर आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी केली.

मूक मोर्चा

फोटो स्रोत, sagar gaikwad

फोटो कॅप्शन, 18 फेब्रुवारी रोजी भोरमधील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता.

यावेळी माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे म्हणाले, "ही घटना घडली त्या दिवशी विक्रमच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या होण्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडं व्यक्त केली होती.

"परंतु पोलिसांनी या प्रकरणाकडं दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर लगेचच विक्रमची हत्या झाली. त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून जर विक्रमला संरक्षण दिलं असतं तर त्याचा जीव वाचला असता."

"शिवाय खून झाला त्या दिवशी विक्रम घराबाहेर पडल्यापासूनचा सगळा घटनाक्रम पाहिल्यावर हे स्पष्ट होतं की पूर्ण कट रचून हा खून करण्यात आला आहे. हे एक ऑनर किलिंगचेच प्रकरण असल्याचा आमचा सगळ्यांचा आरोप आहे", असंही पुढं ते म्हणाले.

कारण कोटींच्या घरात राहणारी एक गर्भश्रीमंत व्यक्ती फक्त दोन लाखांसाठी कोणाचा असा खून करत नाही असं देखील त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं.

दरम्यान पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना या प्रकरणाबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलंय," या प्रकरणात सगळ्या बाजूंनी विचार करून त्या दृष्टीनं आमचा तपास चालू आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची शक्यता किंवा आरोप नाकारत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.