'माझ्या लेकराचा खून करणाऱ्यांना मन मोठं करून कसं माफ करायचं?' सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा प्रश्न

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी
फोटो कॅप्शन, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी
    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"आम्ही मागासवर्गीय जातीचे आहोत, आम्ही दगड फोडतो म्हणून सरकारला आमचा 'मजाक' वाटतोय. संतोष देशमुख या लेकराला न्याय मिळण्यासाठी आमदार, खासदार सरकार झटतंय. पण माझ्या लेकराला कधी न्याय मिळणार?" असा प्रश्न न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी विचारला.

त्यांनी पुढे आणखी एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, "आम्ही मोठ्या जातीचे असतो, आमच्याकडे पैसे असते, तर कदाचित आमच्या लेकराची हत्या करणाऱ्यांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झाले असते. मात्र, आम्ही गरीब आहोत म्हणून सरकारला आमची 'दया' येत नाही का?"

बीबीसी मराठीने परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी भेट दिली. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सोमनाथच्या मृत्यूला दोन महिने झाले.

10 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 याकाळात परभणीत नेमकं काय घडलं याबाबत बीबीसी मराठीने केलेला सविस्तर रिपोर्ट तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता.

झालेल्या कारवाईबाबत त्यांचे कुटुंबीय समाधानी आहेत का? स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी त्यांना याप्रकरणी आतापर्यंत झालेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी काही प्रयत्न केले का? सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी प्रकरणातील नागरिकांना न्याय मिळावा या मागणीसाठी काढलेल्या लाँगमार्चबाबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मागच्या दोन महिन्यांपासून विजया सूर्यवंशी आणि त्यांचं कुटुंब सोमनाथच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी ही मागणी करत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात 'अवाजवी बळाचा' वापर केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित केल्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेलाही दोन महिने झाले आहेत. मात्र आता याच अशोक घोरबांड यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. याच फोटोवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे निलंबित अधिकारी काय करत होते असा प्रश्न मृत सोमनाथच्या भावाने विचारला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परभणी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस अधिकारी अशोक घोरबांड

फोटो स्रोत, Facebook/RahulPradhan

फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परभणी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांच्या याच फोटोचा उल्लेख प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी केला आहे

'आम्ही मागास जातीचे म्हणून न्याय द्यायला उशीर केला होतोय का?'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर परभणी हिंसाचार प्रकरणाची विधीमंडळाला माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 डिसेंबर 2024 रोजी राज्य सरकारतर्फे सूर्यवंशी कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली होती.

या मदतीबाबत बोलताना विजया सूर्यवंशी म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत आम्ही नाकारली कारण आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या लेकराची हत्या ज्यांनी केली त्यांच्याविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. मुख्यमंत्री बीडला आले, पण त्यांना माझ्या घरापर्यंत येऊ वाटलं नाही. आमची विचारपूस करू वाटली नाही. आम्ही जातीने वडार आहोत, आम्ही दगड फोडतो म्हणून आम्हाला न्याय दिला जात नाही का?"

परभणी प्रकरणातल्या पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी 17 जानेवारी 2025 पासून 'परभणी ते मुंबई' असा लाँग मार्च काढला होता.

या मार्चला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. हा मोर्चा नाशिकपर्यंत आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मोर्चेकऱ्यांना थांबवलं.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी
फोटो कॅप्शन, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी

सरकारने न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याबाबत या दोघांनी सांगितलं आणि मुंबईला जाणारा मोर्चा नाशिक येथेच थांबला.

13 जानेवारी 2025 रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळ वापरलं का? याबाबत विभागीय चौकशी सुरू आहे."

न्यायाची मागणी करत काढलेल्या लाँग मार्चला थांबवण्यासाठी जे आश्वासन दिलं गेलं. त्याबाबत बोलताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल प्रधान म्हणाले, "हा मार्च थांबवण्यासाठी परभणीच्या प्रशासनाचं एक पत्र आंदोलकांना दिलं गेलं."

"परभणी प्रशासनाकडून दिलेले पत्र हे कुठल्याही ठोस कारवाईबाबत नाही. ते प्रशासकीय भाषेत 'न्यायालयीन चौकशी सुरू आहे. शासन स्तरावर बाब असून आपले म्हणणे शासनाकडे पाठविले आहे.' याच अर्थाचं आहे."

"हेच पत्र तर परभणी येथे धरणे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी द्यायला तयार होते. त्यावर समाधान नसल्यामुळेच लाँग मार्च काढला होता," अशी माहिती राहुल प्रधान यांनी दिली.

सुरेश धस

फोटो स्रोत, Facebook/mlasureshdhas

मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना आमदार सुरेश धस म्हणाले, "परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करणे, हे संयुक्तिक होणार नाही. आता पोलीस खात्यानं पोलिसांची बऱ्यापैकी कान उघाडणी केलेली आहे. मोठ्या मनाने पोलिसांना माफ करून टाका."

सुरेश धस यांनी केलेल्या या आवाहनानंतर वियजा सुर्यवंशी यांनी प्रश्न विचारला की, "माझ्या लेकरांचा खून ज्यांनी केला त्यांना मी मोठ्या मनाने कशी माफ करू? तुमच्या लेकराचा खून करणाऱ्यांना तुम्ही असंच सोडून दिलं असतं का?"

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात चुकीची माहिती दिल्याचा आरोप

परभणी प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "जाळपोळीच्या व्हीडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यात सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोनवेळा त्यांना दंडाधिकाऱ्यासमोर उभं करण्यात आलं."

"दंडाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आदेशात त्यांना स्पष्टपणे विचारलेलं आहे की, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का? त्यांनी कुठलीही मारहाण झालेली नसल्याचं सांगितलं. ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हीडिओ उपलब्ध आहेत, त्यामध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही."

devendra

फडणवीस पुढे म्हणाले, "सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये अशी माहिती दिलीय की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. तसेच त्यांना ब्रेथलेसनेस आहे असं देखील लिहिलेलं आहे."

"त्यांच्या जुन्या जखमांचा देखील उल्लेख त्यामध्ये आहे. पोलीस कोठडीतून ते न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांनी जळजळ होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि मग त्यांना मृत घोषित करण्यात आलं."

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना फडणवीस यांनी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, MaharashtraAssembly

फोटो कॅप्शन, 20 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात परभणी प्रकरणाची माहिती दिली

विधिमंडळात माहिती देताना फडणवीस म्हणाले, "ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत त्यांचं निरसन झालं पाहिजे. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी केली जाईल. याप्रकरणी वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी संपेपर्यंत त्यांना निलंबित केलं जाईल."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती चुकीची असल्याचं सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी खांद्याच्या जखमेचा उल्लेख केला. माझ्या भावाला कधीही असली जखम झालेली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी राज्याला खरं सांगावं, पोस्टमॉर्टेम अहवालात असा स्पष्ट उल्लेख आहे की, माझ्या भावाचा मृत्यू मारहाणीनंतर झालेला आहे."

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या अशोक घरबांड यांना निलंबित केलं ते एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यामध्ये दिसतात. सुरेश धस म्हणतात पोलिसांना माफ करा. आम्ही काय समजायचं?"

"सरकार पोलिसांची पाठराखण करत आहे. आम्हाला न्याय दिला जात नाही याचं कारण एकच की इथे जातीभेद होत आहे. संतोष देशमुख प्रकरणात चौकशा करून गुन्हे दाखल झाले, अटक झाली, पण आमच्या प्रकरणात फक्त न्यायालयीन चौकशी आणि मदतीची घोषणा केली जात आहे."

सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी
फोटो कॅप्शन, सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी

महाराष्ट्र सरकारने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्ही. एल. अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीला 6 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते केशव वाघमारे म्हणाले, "यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये अशा समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यांचा पूर्वानुभव पाहता अशा समितीकडून न्यायाची अपेक्षा ठेवणं अवघड आहे. कारण अशा समित्यांच्या शिफारशी सरकारला बंधनकारक नसतात आणि प्रत्यक्षात न्याय मिळण्यास त्यामुळे विलंब होतो."

'आता त्या पोलिसांची किळस वाटते'

परभणीच्या प्रियदर्शिनी नगरमध्ये वत्सलाबाई मानवते राहतात. आम्ही यापूर्वी त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांच्यावर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यावेळी त्यांच्या हातावर मारहाणीचे मोठे व्रण स्पष्ट दिसत होते. मागच्या दोन महिन्यांमध्ये झालेली कारवाई, त्यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केलेलं वक्तव्य याबाबत त्यांनी बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली.

ज्या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं त्याच ठिकाणी बसून त्या बीबीसीशी बोलत होत्या. त्यांना अटक झाली त्या दिवसाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "त्यादिवशी पोलीस लोकांच्या घरांची दारं तोडून, त्यांना बाहेर काढून मारहाण करत होते."

"मी त्यांचे व्हीडिओ काढत होते. मी व्हीडिओ काढत असताना पोलिसांनी मला बघितलं आणि माझ्या घरासमोरच मला पकडलं. त्यांनी इथंच मला मारायला सुरुवात केली."

"पोलिसांनी त्यांच्या हातात असलेल्या प्लास्टिकच्या काठीनं मारलं, लाथांनी मारलं, माझे केस धरून जोरात ओढलं. मारहाण करताना ते मला काहीच बोलत नव्हते. मी त्यांना विचारत होते की, मला नेमकं तुम्ही का मारत आहात? मी नेमका काय गुन्हा केलाय?"

"त्यावर पोलीस म्हणत होते, 'तुम्ही महार लोकं जास्त माजलेत, आज तुम्हाला दाखवतोच.' माझ्या घरासमोर पोलिसांनी गोल रिंगण करून मला मारलं."

"मी अंगावर गाऊन नेसली होती. त्याच कपड्यात मला ते पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. मी त्यांना म्हणाले की, तुम्ही मला गाऊनवर का नेतायत? त्यावर ते म्हणाले, आम्ही नागडं करूनही नेऊ शकतो. तुला तर आम्ही गाऊनवर नेतोय."

"पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कुणी केस धरले, कुणी माझ्या गचांडीला पकडलं, एखाद्या दहशतवाद्याला सुद्धा पकडत नाहीत, तसं मला पकडलं. तसं पकडून मला त्यांनी ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेलं."

"पोलिसांनी आम्हाला भयानक मारहाण केली, मुलींचे, महिलांचे पाय सरळ करून त्यावर दोन तीन पुरुष उभे राहिले. त्यांच्याकडे गिरणीच्या पट्ट्यासारखा एक पट्टा होता, त्याच्याने भयानक मारहाण केली जात होती."

वत्सलाबाई मानवते
फोटो कॅप्शन, वत्सलाबाई मानवते

वत्सलाबाई मानवते म्हणाल्या, "पोलिसांकडून ही अपेक्षा असते की, त्यांनी आमचं संरक्षण करावं. पण मला मारहाण केलेल्या पोलिसांकडे बघून मला किळस येत आहे, एवढा राग आमच्या मनात आहे." वत्सलाबाई मानवते यांनी याबाबत कोर्टाच्या मार्फत तक्रार दाखल केली आहे."

वत्सलाबाई मानवते यांनी पोलिसांनी कोम्बिंग केल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "याप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू आहे. पोलिसांनी कोम्बिंग केलं नाही."

"11 डिसेंबरला दगडफेक, जाळपोळीच्या घटनेमध्ये जी धरपकड केली त्यातलेच आरोपी अटकेत आहेत. 11 तारखेनंतर कुणालाही अटक केली नाही, पोलीस कुणाच्याही घरी गेले नाही. पोलिसांनी दहशत निर्माण केली किंवा कोम्बिंग केलं असा काही प्रकार नाही."

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE

फोटो कॅप्शन, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की, "वत्सलाबाई मानवते या हायपर अग्रेसिव्ह (अतिआक्रमक) होत्या. त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला. त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत. तो हल्ला झाल्यानंतर वत्सलाबाई मानवते यांना जबरदस्ती उचलून न्यावं लागलं."

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याबाबत वत्सलाबाई मानवते म्हणाल्या, "मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी कधीच कुणावर हात उचलत नाही, मी बाबासाहेबांची मुलगी आहे. मी कधीच बेकायदेशीर काम करणार नाही."

मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात खरी माहिती घेऊन ती मांडावी अशी मागणी वत्सलाबाई मानवते यांनी केली आहे.

विजया सूर्यवंशी यांनी सरकार कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, "संतोष देशमुख प्रकरणात सरकारने ज्या वेगाने कारवाई केली, तेवढंच दुर्लक्ष माझ्या लेकराकडे केलं गेलं आहे."

"सोमनाथला मारहाण करणाऱ्या प्रत्येक पोलिसावर कारवाई झाली पाहिजे. यासोबतच आमच्या महिलांना, लहान मुलांना ज्यांनी ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत. माझ्या लेकराचा खून केलेल्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे," अशी मागणी विजया सूर्यवंशी यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)