You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयफोन-12 च्या विक्रीवर फ्रान्समध्ये तात्काळ बंदी, कारण ऐकून हैराण व्हाल
- Author, टॉम गेरकेन
- Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर
तुम्ही आयफोन-12 वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. फ्रान्सने अॅपलला आयफोन-12 च्या फोनची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
आयफोन-12 प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन सोडत असल्याच्या कारणामुळे फ्रान्स त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
तसंच, सध्या फ्रान्समध्ये जे आयफोन-12 वापरात आहेत, त्यांच्या मधला हा प्रॉब्लेम तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश तिथल्या नियामकाने दिले आहेत.
ANFR ही फ्रान्समधली इलेक्ट्रिक उपकरणं आणि त्यांच्यातल्या रेडिएशनचं नियमन करणारी संस्था आहे.
अॅपला सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून यावर तोडगा काढता आला नाही तर त्यांनी फ्रान्समध्ये विकलेले सर्व आफोन-12 माघारी मागवावेत, असा आदेश ANFRने दिला आहे.
पण WHOने मात्र गेल्या काही दिवसांमध्ये फोनमधून उत्सर्जित होणारं रेडिएशन मानवी आरोग्याला फार घातक नसल्याचं म्हटलं आहे.
2020 मध्ये आयफोन-12 लॉन्च झाला आहे. तेव्हापासून तो जगभारत विकला जात आहे.
ANFRच्या अहवालाचा आम्ही अभ्यास करत आहोत, असं अॅपलने बीबीसीला सांगितलं आहे.
“तसंच आम्ही त्यांना आतापर्यंतच्या लॅब टेस्टिंगचे सर्व अहवाल त्यांना सादर केले आहेत. तसंच त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आलेल्या टेस्टिंगचा अहवालसुद्धा सादर केलाय. आम्ही सर्व निकष पाळले आहेत. आम्ही सर्व नियमांचं पालन केलं आहे.”
आयफोन 12 किरणोत्सर्गाच्या स्तराचं योग्य पालन करण्यासाठी जगभारत ओळखला जातो, असा दावासुद्धा अॅपलने केला आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार फ्रान्सचे तंत्रज्ञानविषयक मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी फ्रेंच वृत्तपत्र ले पॅरिसियनला सांगितलंय की, या फोनमधून प्रमाणापेक्षा जास्त रेडिएशन होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयफोन -12 मध्ये ANFRला प्रमाणाबाहेर रेडिओ उत्सर्जन दिसून आलं आहे. जे घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, असंसुद्धा बॅरोट यांनी म्हटलं आहे.
येत्या 2 आठवड्यांमध्ये ऍपल यावर त्यांचं म्हणणं मांडणार आहे.
“जर त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर आम्ही फ्रान्समधले सर्व आयफोन-12 माघारी बोलावण्याचे आदेश देऊ. आमच्या इथं सर्वांसाठी कायदे समान आहेत. जगातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांसाठीसुद्धा,” असं बॅरोट म्हाणाले आहेत.
फ्रान्स त्यांचं हे संशोधन जगातील इतर संस्थांना उपलब्ध करून देणार आहे, त्यातून पुढे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
ANFR च्या संशोधनानुसार, जेव्हा आयफोन-12 मानवी शरीराच्या जवळ असतो, म्हणजेच जेव्हा तो खिशात असतो तेव्हा त्यातून प्रत्येक किलोग्रॅममागे 5.74 वॅट एवढं रेडिएशन येतंय जे ठरवून दिलेल्या प्रमाणाच्या बाहेर आहे. साधारण याचं प्रमाण प्रत्येक किलोग्रॅममागे 4 वॅट असणं अपेक्षित आहे.
तसंच फोन मानवी शरीरापासून काही अंतरावर असतानाही त्यातून येणारं रेडिएशन जास्त असल्याचं ANFR चं संशोधन सांगतं.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)