You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाळासाहेबांचा नातू राहुल गांधींना मिठी मारतो, मग कुणाचा DNA तपासावा?'
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. बाळासाहेब ठाकरेंचा नातू राहुल गांधींना मिठी मारतो, मग कुणाचा DNA तपासावा? – रामदास कदम
तुम्ही रक्ताने बाळासाहेबांचे वारसदार असाल, पण विचारांनी नाही. आमचा DNA काय तपासता? आदित्य ठाकरेंनी थेट काँग्रेसच्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारली, मग कुणाचा DNA तपासणार, असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, मुलगा म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या नावावार बाजार कुणी मांडला, याचं आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल, तेव्हा मी माझं दुकान बंद करून टाकेन, मग आता त्याच राहुल गांधींना बाळासाहेबांचा नातू जाऊन मिठी मारतोय, मग DNA कुणाचा तपासावा?
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 57 टक्के तर शिवसेना आमदारांना 16 टक्के निधी असायचा. शिवसेना आमदारांवर प्रचंड अन्याय होत असताना पक्ष फुटला तरी चालेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायचं नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती, असा आरोप कदम यांनी केला. ही बातमी लोकमतने दिली.
2. मुंबईत गोवर नियंत्रणासाठी जनजागृतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष सूचना
मुंबईत गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत गोवरमुळे 7 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. त्यासाठी लसीकरणावर भर द्यावा. आवश्यक असल्यास लसीकरणाविषयी जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईत जानेवारी महिन्यापासून गोवरचे 142 गोवरचे आढळले आहेत. तर सद्यस्थितीत 61 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. कोरोना काळात नागरिक आपल्या मुलांना गोवरची लस देऊ शकले नाहीत, त्यामुळे गोवरचा प्रसार वाढताना दिसत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ही बातमी झी 24 तासने दिली.
3. राहुल गांधींच्या निषेधार्थ मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. याबाबत विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
आज (18 नोव्हेंबर) राहुल गांधी यांची एक सभा अकोला जिल्ह्यातील शेगावमध्ये नियोजित आहे. याठिकाणी जाऊन राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्याचा पवित्रा मनसेने घेतला आहे.
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती काल प्रसारमाध्यमांना दिली. तसंच ते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शेगावच्या दिशेने रवाना झाले.
“आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जे करु ते लोकशाही मार्गानेच करु. पोलीस पोलिसांचं काम करतील. कायदा कायद्याचं काम करेल. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करु,” असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. अजित पवार यांच्याविरोधात अण्णा हजारेंची कोर्टात धाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा मैदानात उतरले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणात आज (18 नोव्हेंबर) उद्या कोर्टात सुनावणी होणार असल्याचं वृत्त आहे.
ज्येष्ठ विधीज्ञ सतीश तळेकर हे अण्णा हजारे यांची बाजू मांडणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण पुन्हा उघडून घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचं मुंबई सत्र विशेष न्यायालयात सांगितलं होतं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
5. राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणा, आमदार रवी राणा यांची मागणी
श्रद्धा वालकर खून प्रकरणाची सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. श्रध्दाच्या वडिलांनी या खूनामागे ‘लव्ह जिहाद’ची शंका व्यक्त केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘लव्ह जिहाद’ची शंका व्यक्त केली असून उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही असा ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा, अशी मागणी राणा यांनी केली आहे.
“श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी कायदा बनवण्यात आला आहे. त्या कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे”, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे. तसेच हा मुद्दा मी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात करणार असल्याचेही ते म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)