उस्ताद झाकिर हुसैन यांचा तबला बनवणाऱ्या मराठी मुलाला राष्ट्रीय पुरस्कार

- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
कुठल्याही तबला वादकासाठी आपला तबला म्हणजे जीव की प्राण असतो. प्रत्येक तबला वादक हा आपल्या आवडी निवडीनुसार तबला बनवून घेतो. त्याची चाचणी घेतो. त्यामुळे जसं तबला वाजवणं ही कला आहे तसंच बनवणं देखील कला ठरते, असं तबला बनवणारे सांगतात.
हे काम अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असतं. कुणी शिकवून ही कला आत्मसात करता येईलच याची काही शाश्वती नसते पण जेव्हा एखादी व्यक्ती या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवते तेव्हा मात्र वाद्यनिर्मिती करणाऱ्या सर्वांसाठीच हा आनंदाचा क्षण ठरतो.
किशोर व्हटकर यांना तबला निर्मितीसाठी यंदाचा संगीत नाटक अकादमीचा “उस्ताद बिसमिल्लाह खाँ युवा पुरस्कार 2020” ने सन्मानित करण्यात आलं आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे केवळ तबला निर्मिती करणाऱ्यांनाच नाही तर वाद्यनिर्मिती करणाऱ्यांना आनंद झाल्याचे संदेश आपल्याकडे येत आहे असं किशोर यांनी सांगितलं.
“तबला मेकिंग म्हणजे माझ्यासाठी विश्व आहे. कारण हा तबला मेकिंग मुळेच मी जगात ओळखला जातो. आणि या तबला मेकिंग मुळेच आज मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,” हे शब्द आहेत मुंबईचा तबला कारागिर किशोर व्हटकर यांचे.
“...यामुळे मलाही तबला निर्मिती क्षेत्रात यावसं वाटलं”
किशोर यांना तबला बनवण्याची कला त्यांचे वडील हरिदास व्हटकर यांच्याकडून मिळाली आहे.
तबला निर्मिती या कलेकडे आपण कसे आकर्षित झालो याबद्दल किशोर सांगतात, “माझ्या लहानपणी माझे वडील भारतातील दिग्गज लोकांसाठी घरात तबले बनवत असत. यामध्ये यामध्ये उस्ताद झाकिर हुसैन, पंडित आनंद चटर्जी, पंडित सुरेश तळवळकर, पंडित विजय घाटे अशा अनेक दिग्गज मंडळींसाठी त्यांनी तबले बनवले आहेत.”
“अशा या जगप्रसिद्ध व्यक्ती, ज्यांना भेटायला जगभरातील लोक आतूर असतात, अशा व्यक्ती माझ्या बाबांकडे येऊन तबला बनवून घेतात. माझ्या बाबांजवळ येऊन ते प्रेमाने बसतात. त्यांच्यावर प्रेम करतात ते केवळ त्यांच्या कलेमुळेच. त्यामुळे आपणही याच क्षेत्रात जायचं असं त्यावेळी वाटत होतं.”

“विशेष सांगायचं म्हणजे ही मंडळीही मला नेहमी सांगायची की, बाळा बघ शिक्षण घेऊन माणूस कोणत्याही हुद्द्यावर जाऊ शकतो. परंतु तबला मेकर ही कला शिक्षण शिकून येणार नाही, तर ते जन्मजात तुमच्यात असायला हवं. अनेक वर्षानंतर लाखांमध्ये एखादा असा सुंदर तबला मेकर जन्माला येतो, तसेच तुझे वडील आहेत," किशोर सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"तुला हा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे मला ते एक प्रोत्साहन मिळत गेलं. माझ्या बाबांचे जागोजागी होणारे सत्कार मी बघत होतो. लोकांकडून त्यांना मिळणारा मान सन्मान बघत होतो. या सगळ्या गोष्टी माझ्या मनावर घर करत गेल्या आणि मी आपोआपच या क्षेत्राकडे वळलो,” असं किशोर सांगतात.

उस्ताद झाकिर हुसैन यांच्याकडून मिळालं 1100 रुपयांचं बक्षीस
लहानपणी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या घरी जाण्याचा योग किशोर यांना आला. त्या दिवसाची आठवण आजही किशोर यांच्या मनात ताजी आहे.
ते सांगतात, “मी बाबांबरोबर जेव्हा दुकानात जात होतो, तेव्हा मी नुकतेच काम शिकायला सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मला दिग्गज लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली. मी डायरेक्ट फायनल ट्यूनिंग जरी करत नसलो तरी त्यांच्या तबल्यांना शाई लावणं, झाकिर भाईंच्या तबल्याच्या वाद्या लावणं अशी कामं मी करत होतो.
हळूहळू असं सगळं करता करता एक दिवस तर मी उस्तादजींच्या घरी जाऊन त्यांच्यासमोर त्यांचा तबला सेट करून दिला. विशेष म्हणजे त्यांना तो इतका आवडला की, त्यांनी माझ्या हातात 1100 रुपयांचं बक्षीस दिलं. या गोष्टीला साक्षीदार म्हणजे तिथे ज्येष्ठ नर्तिका सितारादेवी होत्या.
त्यांनी स्वतः समोरून मला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या “अरे वा मी जबसे आई हु, तबसे देख रही हूँ, की तुम मसाला लगाते जा रहे हो, जा रहे हो, और तबले का जो टोन है जो उसकी आस है उसमें इम्प्रूवमेंट ही होती जा रही है. बेटा बहुत बडे कलाकार बनोगे,” असा आशीर्वाद मला त्यांनी दिला अशा सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत गेल्या.

पुरस्कार मिळाल्याचं जेव्हा वडीलांना सांगितलं...
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर किशोरने जेव्हा ही गोष्ट त्याच्या बाबांना सांगितली तेव्हा त्यांना खूप आनंद झाल्याचं कळतो. तो प्रसंग सांगताना किशोरला गहिवरून येतं.
“माझ्या बाबांना आयुष्यभर अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी अनेक सत्कार स्वीकारले, सन्मान स्वीकारले. हे सगळं मिळालं, पण आपल्या मुलाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही गोष्ट त्यांच्या विचारांच्या पलीकडचीच होती. त्यांना त्या दिवशी खूप भरून आलं. त्यांनी माझी खूप प्रशंसा केली. पाठ थोपटली आणि त्यांना झालेला आनंद मी शब्दात नाही व्यक्त करू शकत,” किशोर सांगतात.

“हा पुरस्कार माझ्या मुलाला नसून तो सर्व तबला कारागिरांना आहे”
मुलाला मिळालेला पुरस्कार हा केवळ त्याला एकट्याला नसून तो समस्त तबला निर्मिती करणाऱ्या कारागिरांना मिळाला आहे, असं किशोरचे वडील हरिदास व्हटकर सांगतात.
“माझ्या मुलाला अवॉर्ड मिळाला याचा तर आनंद होताच, पण याच्यापेक्षाही जास्त आणि मोठा आनंद एक तबला मेकरला मिळाला म्हणून होता. माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडतंय म्हणून याचा आनंद होता. हा मान सन्मान फार पूर्वीच मिळायला हवा होता. असो मात्र यामुळे आता तबला मेकर्सकडे सर्वांचे लक्ष जाईल. या पुरस्कारामुळं आता या क्षेत्राकडे आता अधिकाधिक तरुण वळतील अशी मला आशा आहे,” हरिदास व्हटकर सांगतात.

ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते कारण...
कोणतीही शास्त्रीय वाद्य निर्मितीची कला ही बहुधा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते. सहसा बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात येत नाही.
याचं कारण किशोर सांगतो की, “आपल्या देशातील बालमजूर या कायद्यामुळं इतर लोक या क्षेत्राकडे येत नाहीत. दोन वर्षाच्या मुलाला जर आपण गाणं शिकवलं, वाजवणं शिकवलं तर तेव्हा कुठे तो वयाच्या 18 व्या 20 व्या वर्षी एक चांगला कलाकार बनतो. कारण संगीत जोपर्यंत तुमच्या कानावर दररोज पडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्राविण्य मिळू शकत नाही."
"तसं तबला बनवत असताना पण सुराचंच काम चालतं. मग एखाद्या लहान मुलाला जर आम्ही आमच्या दुकानात त्याच्या आवडीनुसार बसवायला लागलो, तर त्याला बसण्याची आम्हाला परवानगी नाहीये. कारण बालमजूर हा कायदा असा आहे की, असं दिसल्यावर बालमजुरांवर लक्ष ठेवणारा जो शासनाचा विभाग आहे त्यांना असं वाटू शकतं की आम्ही काहीतरी बालमजुरी करून घेतोय. त्यामुळे काय होतं की या क्षेत्रात आवड असणाऱ्या परिवारातील जे लोक आहेत त्यांची मुलं लहानपणापासून आमच्या दुकानात बसू शकत नाहीत."
"जर ती लहानपणापासून हे शिकत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे हे ज्ञान येऊ शकत नाही. वयाच्या 18 व्या वर्षानंतर तो मुलगा तबला निर्मितीचं शिक्षण शिकायला लागला तर तिथूनं पुढे पंधरा वर्षे तो हे शिक्षण घेणार आणि त्याच्यानंतर तो आयुष्यात कधी सेटल होणार,” हरिदास सांगतात.

मागील 8 वर्षात भारतातून सर्वाधिक संगीत वाद्यांची निर्यात
संगीत वाद्यांच्या निर्मिती याकडे व्यवसाय म्हणून कसं पाहता येईल याबाबत माहिती देताना किशोर सांगतात की, "नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या 'मन की बात'मध्ये भारतीय वाद्यांबद्दल माहिती दिली. त्यात मोदी म्हणाले, मागील 8 वर्षामध्ये भारतातून संगीत वाद्यांच्या निर्यातीत साडेतीन टक्क्यांनी वाढ झालीये.
"तर इलेक्ट्रिकल संगीत वाद्यांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांची निर्यात 60 टक्क्यांनी वाढलीये. यावरून असे दिसून येते की, भारतीय संगीताची आवड जगभरात वाढत आहे.”
याचाच अर्थ व्यवसाय म्हणून जर कुणी संगीत वाद्यांच्या निर्मितीकडे पाहत असेल तर त्याला भवितव्य आहे असं किशोर सांगतात.
किशोर पुढे सांगतात, यामुळे सरकारने या क्षेत्राकडे कलेचे क्षेत्र म्हणून पाहावे.
“जर जगभरात आपल्या भारतातून एवढे वाद्य निर्यात होत असतील, तर नक्कीच आपल्याला ही वाद्य बनवणाऱ्यांचीही गरज आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. जसे गायन आहे, वादन आहे त्याच प्रमाणे वाद्य निर्मिती या क्षेत्राकडेही पाहावं.
"तसंच या क्षेत्रांना जी स्कॉलरशिप सरकार देते त्याच प्रमाणे वाद्य निर्मिती क्षेत्रालाही स्कॉलरशिप द्यावी जेणे करून या क्षेत्राकडे जास्तीत जास्त तरूण येतील आणि ही कला जिवंत राहाण्यासाठी मदत होईल,” असं किशोर सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








