You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यावरून नेतन्याहू यांच्या पुढील पावलांविषयी काय संकेत मिळतात?
- Author, जो फ्लोटो
- Role, मध्य पूर्व ब्युरो चीफ, बीबीसी न्यूज
इस्रायल आणि हमास, हिजबुल्लाह आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. फक्त मध्यपूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याविषयी चिंता निर्माण झाली आहे.
युद्ध थांबवण्यासाठी मोठा आंतरराष्ट्रीय दबाव येतो आहे. मात्र तरीदेखील इस्रायलनं आक्रमकपणे युद्ध सुरूच ठेवलं आहे. याबाबत इस्रायल आणि अमेरिकेत नेमकं काय राजकारण सुरू आहे, त्यातून काय चित्र दिसतं, याचा आढावा घेणार हा लेख.
इस्रायल लेबनॉनवर जमिनीवरून करत असलेल्या हल्ल्यांना दोन आठवडे पूर्ण होणार आहेत. तर हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल-हमास आणि इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष सुरू झाला होता.
तो संपण्याची अजूनही चिन्हे दिसत नाहीत. उलट त्याची व्याप्ती वाढत या युद्धाचं दुसरं वर्ष सुरू झालं आहे.
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी बैरूतवर इस्रायलच्या हवाई दलानं लागोपाठ दोन दिवस हल्ले केल्यानंतर युद्धविरामासाठी किंवा हे युद्ध थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन केलं जात आहे.
दक्षिण लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेतील सैनिकांना देखील इस्रायली सैनिकांच्या गोळीबाराला तोंड द्यावं लागतं आहे.
तर दुसऱ्या बाजूला गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे. मात्र असं असूनही उत्तर गाझा पट्टीतील जबालिया कॅम्पवर नवे हल्ले होत आहेत.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायली सैन्याकडून इराणला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची मोठी शक्यता आहे.
त्यातून या प्रदेशातील युद्धाची व्याप्ती आणखी वाढू शकते. म्हणूनच इस्रायलची मित्रराष्ट्रं त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला देत आहेत.
मात्र इस्रायल आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांच्या सैन्याकडून करण्यात येत असलेले हल्ले सुरूच आहेत. इस्रायल कोणाच्याही दबावाखाली येणार नाही आणि मागे हटणार नाही असंच दिसतं आहे.
इस्रायलच्या या आक्रमकतेमागे तीन कारणं आहेत, 7ऑक्टोबर, बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिका.
ही जानेवारी 2020 ची गोष्ट आहे. त्यावेळेस इराणचे जनरल कासिम सुलेमानी रात्रीच्या वेळेस एका विमानानं दमास्कसहून बगदाद विमानतळावर उतरले.
सुलेमानी इराणच्या कुख्यात कुड्स फोर्डचे प्रमुख होते. कुड्स फोर्स इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सचीच एक गुप्त शाखा आहे, जी परदेशातील कारवाया पार पाडते.
सुलेमानी यांची हत्या आणि नेतन्याहू यांची भीती
कुड्स चा अर्थ आहे जेरुसलम. तर कुड्स फोर्सचा मुख्य शत्रू आहे इस्रायल. इराक, लेबनॉन, पॅलेस्टाइन आणि इतर परदेशी ठिकाणी असणाऱ्या गुप्त सशस्त्र गटांना कुड्स फोर्डकडून शस्त्रास्त्रं, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जाते.
त्यावेळेस सुलेमानी इराणमधील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यानंतर ते इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती होते.
सुलेमानी यांचा ताफा विमानतळाहून निघताच, त्यावर ड्रोनद्वारे क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला आणि त्यात सुलेमानी मारले गेले.
इस्रायलनं त्यांच्या कट्टर शस्त्रूच्या लोकेशनबद्दल गोपनीय माहिती जरी पुरवली असली तरी हा ड्रोन मात्र अमेरिकेचा होता.
या हल्ल्याबाबतची लक्षात घ्यावी अशी एक महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे, सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला नव्हता. तर हा आदेश तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.
नंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एका भाषणात सुलेमानी यांच्या हत्येचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, "मी ही गोष्ट कधीही विसरणार नाही की बेंजामिन नेतन्याहू यांनी आमच्यावर नामुष्कीची वेळ आणली."
एका वेगळ्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की त्यांना वाटत होतं की या हल्ल्यामध्ये इस्रायल अधिक सक्रिय भूमिका बजावेल.
ट्रम्प यांनी पुढे नेतन्याहू यांची तक्रार करत सांगितलं होतं की नेतन्याहू यांची इच्छा होती की अमेरिकेनं आपल्या शेवटच्या सैनिकापर्यंत इराणशी युद्ध करावं.
अर्थात ट्रम्प यांचं हे वक्तव्यं वादग्रस्त आहे. मात्र त्यावेळेस असं मानण्यात आलं होतं की या हत्येला पाठिंबा देणारे बेंजामिन नेत्यनाहू यांना या गोष्टीची चिंता वाटत होती की सुलेमानी यांच्यावरील हल्ल्यात इस्रायलचं सरकार थेट सहभागी झाल्यास इस्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो. हा हल्ला एकतर थेट इराणकडून केला जाईल किंवा लेबनॉन आणि पॅलेस्टाइनमधील गुप्त सशस्त्र गटांकडून केला जाईल.
इस्रायल इराणकडून एका छुप्या युद्धाला तोंड देत होतं. मात्र दोन्ही बाजूंकडून या गोष्टीची खबरदारी घेतली जात होती की हे युद्ध एका मर्यादित स्वरूपात राहावं आणि त्याची व्याप्ती वाढू नये.
मोठ्या स्वरुपात युद्ध सुरू करण्यासाठी समोरच्या बाजूला चिथावणी दिली जाऊ नये याची काळजी दोन्ही बाजूंकडून घेतली जात होती.
नेतन्याहू यांची आक्रमक भूमिका
त्यानंतर फक्त चारच वर्षांनी, याचवर्षी एप्रिल महिन्यात तेच बेंजामिन नेतन्याहू यांनी दमास्कस च्या अती महत्त्वाच्या भागातील इराणी दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करण्याचे आदेश दिले. या हल्ल्यात इराणचे दोन जनरल मारले गेले.
यानंतर जुलै महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहचे मिलिटरी कमांडर फौद शुकर यांच्या हत्येचे आदेश दिले. बैरूतमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
बॉब वुडवर्ड यांच्या नव्या पुस्तकानुसार, विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कथितरित्या या घटनेवर प्रचंड नाराज होते.
या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की जो संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका अनेक महिन्यांपासून प्रयत्न करते आहे, तो संघर्ष वाढवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान पावलं टाकत होते, म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडन नाराज होते.
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कथितरीत्या म्हटलं की, "तुम्हाला माहीत आहे, संपूर्ण जगात इस्रायलबद्दल नकारात्मक भावना वाढत चालली आहे. हे एक दुष्ट राष्ट्र आहे, इस्रायलचे लोक दुष्ट आहेत, हा दृष्टीकोन वाढतो आहे."
या एकाच इस्रायली पंतप्रधानांना एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षनं खूप सावध राहणारा म्हटलं तर दुसऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं खूप आक्रमक म्हटलं.
या दोन्ही गोष्टींमध्ये निर्णायक वळण, सात ऑक्टोबर 2023 च्या घटनेमुळे आलं. हा इस्रायलच्या इतिहासातील सर्वांत रक्तरंजित आणि भयानक दिवस होता. या दिवशी हमासनं इस्रायलवर केलेला हल्ला अभूतपूर्व होता.
या हल्ल्यामुळे इस्रायलचं राजकीय, लष्करी आणि हेरगिरीमधील अपयश सर्व जगासमोर आलं.
नेतन्याहूंच्या दोन्हीही भूमिकांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं ऐकलं नव्हतं.
या दोन्ही मुद्द्यांवरून हे लक्षात येतं की सध्या सुरू असलेलं युद्ध इस्रायल कशाप्रकारे पुढे नेत आहे.
नेतन्याहू यांना कोणत्या गोष्टीचा भरवसा
इस्रायलच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत असून हे युद्ध थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव येतो आहे. अमेरिका देखील युद्धविराम करण्यासाठी आग्रह धरते आहे.
हमास नं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचं व्यापक स्वरूप, त्यातील तीव्रता, आक्रमकपणा याचा इस्रायल आणि इस्रायलच्या समाजाच्या सुरक्षिततेच्या भावनेवर झालेला परिणाम या गोष्टींमुळे अलीकडच्या काळात झालेल्या कोणत्याही युद्धापेक्षा हे युद्ध वेगळं असणार आहे.
अमेरिका इस्रायलला अब्जावधी डॉलर्स किंमतीची शस्त्रास्त्रं देत आहे. मात्र गाझामध्ये होत असलेल्या पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूमुळे आणि या युद्धामुळे ते तोंड देत असलेल्या अडचणींमुळे अमेरिकन सरकार अस्वस्थ झालं आहे.
पॅलेस्टिनी लोकं ज्या परिस्थितीला तोंड देत आहेत ते लक्षात घेऊन देखील इस्रायली सरकारला मदत करण्याच्या अमेरिकेच्या धोरणामुळे अमेरिकन सरकारला राजकीयदृष्ट्या देखील फटका बसतो आहे.
या प्रदेशातील अमेरिकेच्या टीकाकारांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे की इस्रायलला सर्वाधिक मदत, अनुदान अमेरिकेकडून मिळत आहे. मात्र असं असताना देखील या महासत्तेचं तिथे काहीच ऐकलं जात नाही.
या युद्धात अमेरिकेच्या सूचना, आवाहन यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आहे.
एप्रिल महिन्यात इस्रायलवर इराणनं क्षेपणास्त्रं आणि रॉकेटनं हल्ला केला होता. त्यावेळेस इराणची क्षेपणास्त्रं पाडण्यासाठी अमेरिकेची लढाऊ विमानं देखील तैनात करण्यात आली होती.
यातून इस्रायलच्या सुरक्षेचा अमेरिकेसाठी काय अर्थ आहे, त्यांचं याबाबतीत काय धोरण आहे आणि युद्धात बदल करण्याच्या दबावाला इस्रायल कसं झुगारतं आहे ही गोष्ट दिसून येते.
याच वर्षी उन्हाळ्यात इस्रायलनं हिजबुल्लाहविरुद्धचा संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तोही अमेरिकेची परवानगी न घेता.
इस्रायलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ असणारे बेंजामिन नेतन्याहू यांना त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट कळाली आहे, ती म्हणजे अमेरिकेच्या दबावाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, मात्र तो दबाव सहन केला जाऊ शकतो किंवा हाताळला जाऊ शकतो.
नेतन्याहू यांना माहीत आहे की यावर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. अशावेळी आपल्या धोरणात बदल करायची वेळ येईल अशी कोणतीही कारवाई अमेरिकन सरकारकडून केली जाणार नाही.
अर्थात कोणत्याही स्थितीत त्यांना अमेरिकेबद्दल असंच वाटतं. शिवाय त्यांना हे देखील माहीत आहे की ते अमेरिकेच्या शत्रूंशी लढत आहेत.
वेगवेगळी समीकरणं
सध्या सुरू असलेल्या युद्धाचा विचार करता, बेंजामिन नेतन्याहू जी भूमिका घेत आहेत ती इस्रायलच्या मुख्य राजकीय प्रवाहापेक्षा वेगळी आहे असं मानणं चुकीचं ठरेल.
अंतर्गत राजकारणात त्यांच्यावर दबाव आहे की त्यांनी फक्त हिजबुल्लाहवरच नाही तर इराणवर देखील जोरदार हल्ला करावा.
मागील महिन्यात अमेरिका आणि फ्रान्सनं लेबनॉनमध्ये युद्धबंदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळेस या 21 दिवसांच्या युद्धविरामाला सर्वाधिक विरोध इस्रायलमधील विरोधी पक्षांनी केला होता.
यामध्ये इस्रायलमधील प्रमुख डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा देखील समावेश आहे.
सध्या इस्रायल आक्रमकपणे युद्ध पुढे रेटतं आहे, त्यांना युद्ध सुरूच ठेवायचं आहे. यामागचं कारण फक्त इतकंच नाही की त्यांना वाटतं की ते आंतरराष्ट्रीय दबाव झुकारू शकतात.
तर यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सात ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर त्यांच्या सहनशीलतेमध्येही मोठा बदल झाला आहे.
अनेक वर्षांपासून उत्तर इस्रायलमधील भागांवर हल्ला चढवण्याचं उद्दिष्ट हिजबुल्लाहनं निश्चित केलेलं आहे.
आता इस्रायली लोकांना त्यांच्या घरांमध्ये सशस्त्र लोकं शिरण्याच्या धोक्याला तोंड द्यावं लागतं आहे. या धोक्याला नियंत्रणात ठेवलं जाऊ शकत नाही. हा धोका संपवावाच लागेल.
या धोक्याबद्दल इस्रायलची धारणा, भूमिका देखील बदलली आहे. या भागात सैन्य कारवाईबाबत आखण्यात आलेली एक मर्यादा रेषा आता संपली आहे.
मागील काही वर्षांमध्ये अशा अनेक घटना घडल्या होत्या, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात युद्धाचा भडका उडू शकत होता.
उदाहरणार्थ तेहरान, बैरूत, तेल अवीव आणि यरूशलम वर झालेले बॉम्बहल्ले आणि क्षेपणास्त्रं हल्ले.
इस्रायलनं हमासच्या प्रमुखांची म्हणजे इस्माईल हानिये यांची हत्या ते तेहरानमध्ये इराणचे पाहुणे असताना केली होती. तर हिजबुल्लाहला निशाण्यावर घेताना इस्रायलनं या संघटनेचे प्रमुख हसन नसरल्लाह सहीत त्यांच्या संपूर्ण नेतृत्व फळीलाच संपवलं आहे.
इस्रायलनं सीरियामधील एका राजनयिक इमारतीत असलेल्या इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील हत्या केली.
आतापर्यंत हिजबुल्लाहनं इस्रायलवर 9,000 क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. यामध्ये रॉकेट आणि ड्रोनचा देखील समावेश आहे. तेल अवीव देखील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला.
तर इराणचा पाठिंबा असलेल्या हुती या येमेनमधील संघटनेनं इस्रायली शहरांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. ही क्षेपणास्त्रं मध्य इस्रायलच्या आकाशात शिरताच इस्रायली सैन्यानं ती पाडली होती.
मागील सहा महिन्यांमध्ये इराणनं इस्रायलवर एकदा नाहीतर दोनदा मोठे क्षेपणास्त्रं हल्ले केले आहेत. या दोन्ही हल्ल्यांमध्ये मिळून इराणनं 500 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. आता इस्रायलनं लेबनॉनमध्ये जमिनीवर लष्करी हल्ले करण्यास सुरूवात केली आहे.
भूतकाळात जर असं झालं असतं तर यातील कोणत्याही घटनेमुळे या प्रदेशात मोठ्या युद्धाची सुरूवात झाली असती. आता हे पाहावं लागणार आहे की सर्वसाधारणपणे सावध राहणाऱ्या आणि धोका टाळणाऱ्या इस्रायलच्या पंतप्रधानांचं पुढील पाऊल काय असणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)