लेबनॉनमधील बैरुतला जेव्हा अरब देशांमधलं पॅरिस म्हटलं जायचं

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये सध्या शहरी संकट, अराजकता पसरली आहे. मात्र एकेकाळी जगातल्या सर्वांत सुंदर आणि समृद्ध शहरांमध्ये या शहराची गणना व्हायची.

1955 ते 1975 हा बैरुतचा सुवर्णकाळ होता. त्यावेळी बैरुत पश्चिम आशियातील एक महत्त्वाचं सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र होतं. तेव्हा ऐन अल एमराईसेह समुद्रकिनाऱ्यावर आलिशान पंचतारांकित हॉटेल उघडले होते.

समीर कासीर त्यांच्या ‘बैरुत’ या पुस्तकात त्या काळाचा उल्लेख करतात. ते लिहितात, “त्याच्याजवळच रु दे फिनीसी येथे रात्री नाईट क्लब सुरू झाले होते. तिथे हॉलिवूडमधील अभिनेते, उच्चभ्रू आणि तेलाच्या विहिरीचे मालक यायचे. त्याच्या जवळ एक अमेरिकन विद्यापीठ होतं. ते संपूर्ण शहरात असलेलं एक प्रकारचं बौद्धिक केंद्र होतं,”

मात्र सेंट जॉर्जेस हॉटेल इथली सर्वांत प्रसिद्ध जागा होती. प्रसिद्ध फ्रेंच वास्तूविशारद ऑगस्टे पेरे यांनी या हॉटेलची रचना केली होती.

1934 मध्ये तयार झालेलं हे हॉटेल लवकरच लोकांच्या पसंतीस पडू लागलं.

समीर कासीर त्यांच्या पुस्तकात लिहितात की, “या हॉटेलच्या लॉबीत प्रसिद्ध फ्रेंच अभिनेत्री ब्रिजेत बारदो, पीटर ओ टूल, मार्लन ब्रांडो, लिझ टेलर आणि रिचर्ड बर्टन नेहमी दिसायचे. राजेशाही घराण्यातील लोक जसे जॉर्डनचे राजे हुसैन, आणि इराणचे शाह रजा पहलवी त्यांची पत्नी सुरैया यांच्याबरोबर तिथे सुटीत यायचे.”

लेबनॉनमधील अर्थशास्त्रज्ञ जॉर्जेस कॉर्म यांनी ‘फ्रॅगमेंटेशन ऑफ मिडल इस्ट’ या पुस्तकात लिहितात, “अनेक लोकांना या शतकातील सर्वांत मोठे गुप्तहेर किम फिल्बी यांना हॉटेलच्या बाहेर बसलेले पाहिलं होतं. इथे बसलेले लोकांच्या नजरेस येणं हे अभिजात वर्गासाठी अभिमानाची गोष्ट होती,”

‘वोग” मासिकाच्या मते ‘त्याकाळातील बैरुतची तुलना एखाद्या अत्याधुनिक युरोपियन शहराशी केली जाऊ शकत होती,”

कलाकार, कवी आणि बुद्धिजीवी लोकांची पसंती

बैरुतच्या हमरा स्ट्रीटची तुलना पॅरिसच्या प्रसिद्ध शाँस एलीझे याच्याशी करण्यात यायची. या रस्त्यावर फॅशन स्टोअर, थिएटर, बुटीक, रेस्टॉरंट, कॅफे, हॉटेल, उघडले होते. तिथे जगभरातील कलाकार, कवी, बुद्धीजिवी, आणि लेखक बसलेले असायचे.

हमरा स्ट्रीटवर एक डझनापेक्षा जास्त चित्रपटगृह प्रसिद्ध होते. त्यात अलडोराडो, पिकाडिली, आणि वरसाए हे विशेष प्रसिद्ध होते.

बैरुतच्या मधोमध जुन्या काळातले बाजार भरायचे. तिथून स्थानिक लोक खरेदी करत असत. बैरुतवर फ्रान्सचा प्रभाव होता. कारण पहिल्या महायुद्धापासून तिथे फ्रान्सचा दबदबा होता आणि 1943 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं होतं.

बैरुत शहरात 1952 मध्ये स्पोर्टिंग क्लबची सुरुवात झाली होती. तिथे यशस्वी उद्योजक पोहून झाल्यावर दुपारनंतर कॉकटेल घेण्यासाठी जायचे.

समुद्रकिनाऱ्यावर कॅसिनो दो लुबान जगभरातील जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा होता. मात्र तिथे ड्युक एलिंग्टन सारखे पियानिस्ट आणि जॅक ब्रेल सारखे गायक आपली कला सादर करायचे.

या बातम्याही वाचा:

त्या काळात बैरुत बँकिंग, वाणिज्य आणि पर्यटनाचं केंद्र होतं. भूमध्य समुद्राच्या पूर्वेला, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशात काम करणाऱ्या कंपन्या बैरुतमध्ये आपलं मुख्यालय बांधत असत. कारण तिथे दळणवळणाची साधनं उत्तम होती, शाळा आणि विद्यापीठेही भरपूर होती.

अनेक चित्रपटांचं शूटिंग

लेबनॉनमध्ये एका बाजूला बर्फाने आच्छादलेले डोंगर होते तर एका बाजूला समुद्रकिनारा

तिथले लोक जगभरातून येणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी तत्पर असायचे.

त्यावेळी जे लोक लहानाचे मोठे झाले तेव्हा ते तिथल्या उन्हाळ्याची आठवण काढतात. तेव्हा बैरुतमध्ये अनेक पर्यटक यायचे.

संपूर्ण देशात हिरवळ होती आणि लोक जागोजागी सहलीला जायचे.

साठच्या दशकात चित्रपट अभिनेते आणि गुप्तहेरांमध्ये बैरुतला ग्लॅमर किंवा प्रतिष्ठा मिळवून देण्यात चित्रपटांचा मोठा वाटा होता.

चित्रपट निर्मात्या कंपन्यांसाठी बैरुत एक आकर्षणाचं केंद्र होतं तसंच तिथे करव्यवस्था सुद्धा बरीच शिथिल होती.

50 च्या दशकात लेबनॉन एक समृद्ध देश होता. त्याचं मुख्य कारण तिथे असलेलं उदारमतवादी आर्थिक धोरण होतं. त्यात सामाजिक आणि आर्थिक विकासाला फारसं महत्त्व दिलं नव्हतं.

1965 मध्ये तयार झालेल्या ‘24 अवर्स टू किल’ या चित्रपटात बैरुत आणि आसपासच्या भागातला दृश्यांचा चांगला उपयोग केला होता.

याच चित्रपटात मिकी रुनीचा अभिनयपण चांगला होता. या चित्रपटात आधुनिक बैरुत, तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, सेंट जॉर्जेस हॉटेल, कसीनो डु लिबानच्या मनमोहक दृश्यांमुळे प्रेक्षक भारावून गेले होते

त्याचप्रमाणे ‘सिक्रेट एजंट 777’, ‘वेअर द स्पाइज आर’, ‘एजंट 505’ सारख्या चित्रपटांच्या कथेचं केंद्रबिंदू बैरुत शहर होतं.

1975 नंतर वातावरण बदललं

1975 नंतर बैरूतचं वातावरण बदललं आणि तिथे गृहयुद्धाची सुरुवात झाली होती.

पुढच्या 15 वर्षांमध्ये बैरुतमध्ये हिंसाचारात कमीत कमी दीड लाख लोकांचा जीव गेला, आणि जवळजवळ 10 लाख लोकांना बैरुत सोडावं लागलं.

बैरुतची दोन भागात फाळणी झाली होती. शहरातल्या हिरव्या रेषेच्या अल्याड आणि पल्याड अशी शहराची विभागणी होती.

पूर्व भागात ख्रिश्चन सैनिकांचा दबदबा होता. पश्चिम क्षेत्रात पॅलेस्टिनी आणि सुन्नी योद्ध्यांचा गड होता. बैरुतच्या सुवर्णकाळाच्या खुणा म्हणजे सेंट जॉर्जेस सारखे हॉटेल गृहयुद्धात उद्धवस्त झाले होते. या हॉटेलवर कधी एका गटाचा तर कधी दुसऱ्या गटाचा ताबा असायचा.

1978 मध्ये बैरुतमध्ये सीरियाचे सैनिक आले. ते पूर्व भागावर तोफा डागत असत. 1982 मध्ये लेबनॉन युद्घधाच्या वेळी पश्चिम बैरुतचा बराच मोठा भाग इस्रायलच्या नियंत्रणात होता.

1982 मध्ये इस्रायलच्या हल्ल्यानंतर ‘अरामको वर्ल्ड मॅगझिन’ मध्ये अनेक युरोपीय लोकांचे लेख छापले होते. त्यात युद्धाच्या आधी लेबनॉनचं वर्णन करताना तिथली निरागसता, समृद्ध अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात आलं होतं.

मात्र असं सगळं असताना अनेक लोकांनी त्या कठीण दिवसात बैरुतमध्येच आसरा घेतला. त्यात महान उर्दू कवी फैज अहमद फैज यांचाही समावेश होता.

जनरल झिया उल हक यांच्या काळात त्यांना पाकिस्तानात राहणं कठीण झालं होतं. त्यामुळे बैरुतमध्ये अशांतता असताना देखील काही वर्षं तिथे राहिले होते. तिथे राहून त्यांनी ‘लोटस’ मासिकाचं संपादन केलं होतं.

1982 मध्ये बैरुतवर हल्ला झाला तेव्हा बैरुत सोडून त्यांना आपल्या देशाची वाट धरावी लागली.

शहराने पाहिले विध्वंसाचे अनेक टप्पे

1990 मध्ये युद्ध संपल्यावर बैरुतच्या पुननिर्माणाचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि शहराने आपलं जुनं वैभव प्राप्त करण्याच्या दिशेने पावलं टाकली होती.

तिथे एशिया क्लब बास्केटबॉल आणि आशिया कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

इतकंच नाही तर बैरुतमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये तीनदा मिस युरोप ही स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली आहे. 2017 मध्ये एक्झिक्युटिव्ह मासिकाने लिहिलं होतं की लेबनॉन आता पुन्हा पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

तिथे होणारे डिझाईन आणि आर्ट फेस्टिव्हलमध्ये अनेक कलाकार त्यांची उपस्थिती नोंदवायचे.

‘आर्टनेट पोस्ट’ मध्ये छापलेल्या एका लेखात म्हटलं होतं की, “ भलेही बैरुतमझध्ये स्थलांतरितांची समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव, राजकीय अस्थैर्य असली तरी तिथलं कलेचं वातावरण अबाधित आहे,”

मात्र असं असलं तरी भूतकाळाने बैरुतची पाठ सोडली नाही बैरुतचा ऱ्हास हीच त्या शहराची एक प्रकारची ओळख झाली.

अनेक दशकं हे शहर एका संकटातून दुसऱ्या संकटात जात राहिलं. मरणाऱ्यांची संख्याही वाढू लागली.

इथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. 4 ऑगस्ट 2020 ला बैरुत बंदरात एक मोठा स्फोट झाला. त्यात 180 लोक मारले गेले आणि 6000 लोक जखमी झाले.

या स्फोटाने शहराच्या एका मोठ्या भागाला उद्ध्वस्त केलं आणि जवळजवळ 3 लाख लोक मारले गेले. बैरुतवर वारंवार होणारे इस्रायली हल्ल्यामुळे विध्वंसापासून अजूनही हे शहर फारसं लांब गेलेलं नाही हे ध्यानात येतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)