सुदानमध्ये उपासमारीचं जीवघेणं संकट, सुमारे अडीच लाख लोक मृत्यूच्या दारात

    • Author, अब्दीरहिम सईद, अहमद नूर, पॉल कुसिआक, रिर्चड इरविन-ब्राऊन
    • Role, बीबीसी अरेबिक, बीबीसी व्हेरिफाय

सुदानमध्ये लष्कर आणि पॅरामिलिट्री रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यात संघर्ष सुरू होऊन वर्ष उलटून गेलं आहे. त्यामुळं देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजधानी खार्तूममध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली आणि त्यानंतर तिथं देशभरात हा हिंसाचार पसरला. त्यामुळे हजारो लोकांचा जीव गेला. तसंच, इमारती आणि पायाभूत सुविधांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

सुदानमध्ये सध्या उपासमारीचं जगातील सर्वात भयंकर संकट निर्माण झालं असल्याचं मत संयुक्त राष्ट्रांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसी अरेबिकशी बोलताना व्यक्त केलं.

"आमच्यासमोर भयंकर संकट निर्माण झालेलं आहे आणि ते दिवसेंदिवस अधिक भयंकर होत जाणार अशी आम्हाला भीती आहे," असं जागतिक खाद्य कार्यक्रमाचे सुदानमधील आपत्कालीन समन्वयक मायकल डनफोर्ड म्हणाले.

सध्या जवळपास 1 कोटी 80 लाख लोक उपासमारीचा सामना करत आहेत आणि हा आकडा 2.5 कोटींपर्यंत वाढू शकतो असंही ते म्हणाले. हा आकडा सुदानमधील लोकसंख्येच्या तुलनेत अर्ध्याहून जास्त आहे.

बचावकार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटलं की, आगामी काही महिन्यांत 2 लाख 20 हजार लोक उपासमारीमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात.

15 एप्रिल 2023 रोजी देशातील लष्कर आणि RSF यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला, त्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली. या ठिकाणी लोकांचं राज्य निर्माण व्हावं म्हणून तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय योजनेमुळं ही ठिणगी पडली होती.

संयुक्त राष्ट्रांनी मृतांचा अधिकृत आकडा 14 हजार असल्याचं सांगितलं आहे. पण हा आकडा खूप कमी असून प्रत्यक्षातील आकडा यापेक्षा खूप मोठा असू शकतो, असं तज्ज्ञांना वाटतं.

सुमारे 80 लाखांहून अधिक लोकांवर घर सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोकांवर देशांतर्गतच विस्थापणाची वेळ आली आहे, तर काहींनी सुदानच्या शेजारच्या देशांत पलायन केलं आहे.

ऐतिहासिक शहर भग्नावस्थेच्या मार्गावर

राजधानी खार्तूम यासह ओमदुरमन आणि बाहरी या जवळजवळ असलेल्या शहरांचा मिळून ग्रेटर खार्तूम भाग तयार होतो. संघर्षापूर्वीपर्यंत याठिकाणी सुमारे 70 लाख लोक राहत होते.

शहराच्या बहुतांश भागावर RSF नं ताबा मिळवला आहे. पण सैन्यानं आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी आता ओमदुरमनमधील राज्याच्या टीव्ही मुख्यालयावर ताबा मिळवला आहे.

बीबीसी व्हेरिफाय आणि बीबीसी अरेबिकनं पाहिलेल्या फोटो आणि व्हीडिओमध्ये दुकानं, रुग्णालयं, विद्यापीठं आणि बँकाँचं प्रचंड नुकसान झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

नष्ट झालेल्या इमारतींमध्ये प्रसिद्ध ग्रेटर नाईल पेट्रोलियम ऑइल कंपनी टॉवरचा समावेश आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हे टॉवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं.

तसंच, किमान तीन रुग्णालयं आणि एका विद्यापीठाचंही या संघर्षामुळं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

रुग्णालयांमध्ये प्रचंड प्रमाणावर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्याचं, खार्तूममधील डॉ. आला अल दीन अल नूर यांनी बीबीसी अरेबिकशी बोलताना सांगितलं.

"आम्हाला डॉक्टर म्हणून सुरक्षित वाटत नाही. वैद्यकीय पुरवठा आणि साहित्याचीही लूट झाली आहे," असं त्यांनी म्हटलं.

जागतिक खाद्य कार्यक्रमानं अशाप्रकारे पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान यामुळं मानवाधिकारांची स्थिती अधिक गंभीर बनत चालली असल्याचं म्हटलं आहे.

"यामुळं अन्नासंदर्भातील असुरक्षितता वाढत आहे," असं मत डनफोर्ड यांनी व्यक्त केलं.

बीबीसी व्हेरीफाय आणि बीबीसी अरेबिक यांनी खार्तूममधील अशा प्रकारच्या नुकसानीसंदर्भात इतर काही उदाहरणं मिळवली आहेत. त्यामुळंही संघर्ष अधिक गंभीर होत चालल्याचं दिसत आहे.

ओमदुरमन आणि बाहरी या शहरांना जोडणारा शंबत पूल गेल्या नोव्हेंबर महिन्यात कोसळला होता. RSF च्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं. ते या पुलाचा वापर नाईल नदी ओलांडून लढाऊ विमानं आणि उपकरणांच्या वाहतुकीसाठी करायचे.

जानेवारी महिन्यामध्ये खार्तूमच्या उत्तरेला असलेल्या अल जैली या ऑइल रिफायनरीमध्ये झालेल्या संघर्षानंतर इथं आग लागली होती. हे ठिकाण संघर्ष सुरू असलेल्या दोन्ही गटांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं.

नोव्हेंबर 2023 ते यावर्षीच्या जानेवारीदरम्यान तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 32 मोठ्या टाक्यांचं नुकसान झालं असल्याची माहिती, युकेतील संस्था द कॉन्फ्लिक्ट आणि एन्व्हायरमेंट ऑब्झर्व्हेटरीमधील संशोधक लिओन मोरलँड यांनी दिली.

"इथं तेलगळती होत असल्यानं ते तेल जमिनीतील पाणी आणि कृषी क्षेत्रात पोहोचू शकतं," असं त्यांनी बीबीसी अरेबिकशी बोलताना सांगितलं.

"या नव्या प्रदूषणामुळे आधीच दूषित असलेला याठिकाणचा भाग आणखी प्रदूषित होईल. उपग्रहाद्वारे दिसणाऱ्या दृश्यावरून आधीच इथं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं."

उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या फोटोंवरून खार्तूममधील तीन वॉटर पंपिंग स्टेशनवरील टाक्या रिकाम्या असल्याचंही समोर आलं आहे. पण ते कसं घडलं याबाबत मात्र, काहीही माहिती नाही.

गेल्या चार महिन्यांपासून याठिकाणी वीज आणि पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचं खार्तूममधील 31 वर्षीय हसन मोहम्मद यांनी बीबीसी अरेबिकशी बोलताना सांगितलं.

"आम्हाला स्वच्छ पाण्यासाठी खूप लांबपर्यंत पायपीट करावी लागते, किंवा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळं आजार पसरण्याची शक्यता आहे," असंही ते म्हणाले.

याठिकाणी संघर्षाला सुरुवात झाल्यापासूनच खार्तूमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली. हे विमानतळ संघर्षाचं केंद्र बनल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं देशभरातील पुरवठ्यावर प्रचंड परिणाम झाला.

संघर्षाच्या सुरुवातीच्या 48 तासांमधले विमानतळावरील काही व्हिडिओही आम्ही तपासले आहेत.

बीबीसी व्हेरिफायनं पाहिलेला पहिला व्हिडिओ 15 एप्रिल 2023 चा रनवेच्या उत्तर भागातील होता. त्याठिकाणी RSF चे जवान पळत जाताना आणि विमानतळाच्या मुख्य इमारतीजवळ गोळीबार करत असल्याचं, व्हिडिओमध्ये दिसत होतं.

थोड्याच वेळात रनवेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका विमानामधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचं दुसऱ्या व्हिडिओत पाहायला मिळत होतं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये जमिनीवरील विमानं दिसत होती, त्यातही दुसऱ्या विमानांना आग लागल्याचं दिसत होतं. पण ते विमानतळाच्या पूर्व दिशेला होतं.

लष्कर आणि RSF या दोघांवरही खार्तूममध्ये महत्त्वाच्या वास्तूंचं नुकसान केल्याचा आरोप आहे. पण दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

संघर्षाचा अंत दृष्टीक्षेपात नाही

सुदानच्या इतर भागांमध्येही संघर्ष सुरू आहे. विशेषतः पश्चिम भागाला असलेल्या दारफूरमध्ये. त्याठिकाणी आफ्रिकन आणि अरब समुदायांमध्ये अनेक वर्षांपासून हिंसाचार पाहायला मिळत आहे.

सेंटर फॉर इनफॉरमेशन रेझिलन्स या युके सरकारच्या निधीवर चालणाऱ्या रिसर्च ग्रुपच्या संशोधनानुसार पश्चिम सुदानमधील 100 हून अधिक गावांमध्ये जाळपोळ झाली आहे.

सुदानमधील आर्थिक तज्ज्ञ वेल फाहमी यांनी युद्धाचा अर्थव्यवस्था आणि खाद्य यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला असल्याचं म्हटलं आहे.

"अर्थव्यवस्था निम्म्यानं आकुंचन पावली आहे आणि कृषी क्षेत्रातली जवळपास 60% कामं थांबली आहेत," असं ते म्हणाले.

जागतिक खाद्य कार्यक्रमातही तशीच निराशा आहे.

"सुदानमध्ये आज जे काही घडत आहे ती मोठी शोकांतिका आहे. ते आता मर्यादेपलिकडं गेलं आहे, असं आमचं मत आहे," असं मायकल डनफोर्ड म्हणाले.

सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये चर्चेसाठी प्रयत्न सुरू असतानाच शस्त्रसंधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही अनेक प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अद्याप यश आलेलं नाही.

(अतिरिक्त वार्तांकन-समिरा अलसैदी आणि बेनेडिक्ट जर्मन)