‘तुम्हाला वाटेल की, जनावरांनीही असं जगू नये; पण आम्ही प्रत्यक्षात तसं जगतोय’

    • Author, कॅथरिन ब्यारुहंगा
    • Role, आफ्रिका प्रतिनिधी, बीबीसी न्यूज, पालोइच

दक्षिण सुदानमध्ये पालोइच विमानतळ आहे. हे विमानतळी एरव्ही दक्षिण सुदानच्या तेल क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी आणि कामगारांच्या आवाजाने दुमदुमलेला असतो. सुदानमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून या विमानतळाचा चेहरामोहराच बदललाय. विमानतळाला एखाद्या रेफ्युजी कॅम्पचं रूप आलंय. हे चित्र महिन्याभरापासून असंच आहे.

इथं ना स्वच्छतागृहं आहेत, ना पाणी, ना स्वयंपाकगृह. आहेत ती फक्त सुदानमधून बाहेर कुठे जाण्यासाठी विमानाची वाट पाहत बसणाऱ्यांची गर्दी. आपापल्या सामानाच्या आजूबाजूला बसलेली गर्दी. कुणी सामानावर झोपलंय, कुणी सामानाला टेकून बसलंय. कुणी तात्पुरतं तंबू बांधून त्यात बसलंय.

अस्थिर स्थितीतून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जाता येईल, या आशेनं सुदानच्या सीमेपासून चार तासांचा प्रवास करत हे सर्व लोक या विमानतळावर जमले आहेत. मात्र, विमानांच्या उड्डाणांची संख्या कमी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील लोक इथून सुरक्षित ठिकाणी कधी उड्डाण घेतील, याची कुठलीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.

या निर्वासितांपैकी अनेकजण एरिट्रियन्स आहेत. त्यांची ही फरफट दुसऱ्यांदा होतेय. आधी मूळ देशातून जीव वाचवण्यासाठी सुदानमध्ये आले आणि आता सुदानमधूनही दुसरीकडे जावं लागतंय.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या संघर्षापूर्वी सुदानमध्ये 1 लाख 36 हजार 000 एरिट्रियन निर्वासित होते.

अनेक एरिट्रियन्स पत्रकारांना आपलं नाव सांगत नाहीत. कारण त्यांना भीती आहे की, एरिट्रियन यंत्रणा त्यांचा बदला घेतील.

एरिट्रिया पूर्वी आफ्रिकेतील देश आहे. या देशातल्या लोकांच्या जवळपास सर्वच गोष्टींवर तिथल्या शासन-प्रशासनाचं नियंत्रण आहे. इथल्या लोकांना राष्ट्रसेवेची अनिवार्यता टाळायची आहे.

मात्र, टेस्फिट गिर्मे माझ्याशी बोलण्यास तयार झाले. ते पालोइचमध्ये पाच दिवसांपूर्वी पोहोचले आहेत.

आजूबाजूच्या तात्पुरत्या तंबूंकडे पाहत टेस्फिट म्हणतात, “इथं ज्याप्रकारे लोक राहतायेत, ते पाहता तुम्हालाही वाटेल की, हे जगणं एखाद्या जनावरालाही मिळू नये. पण असं जगणं आम्ही जगतोय.”

एकटाच असल्यानं टेस्फिट गिर्मे यांना इतरांपेक्षा नशीबवान असल्यासारखं वाटतं. टेस्फिट म्हणतात, “एकट्याला इथं राहणं तुलनेनं बरं आहे. असं बाहेर उघड्यावर झोपणं असो किंवा दिवसातून एकदाच खाणं असो. पण ज्यांना मुलं-बाळं आहेत, कुटुंब आहे, त्यांच्यासाठी हे सगळं फार अवघड आहे. इथं चार-पाच मुलं असलेले लोकही आहेत.”

गेल्यावर्षीच्या अखेरीस टेस्फिट गिर्मे एरिट्रियामधून पळून सुदानमध्ये आले. एरिट्रियामध्ये आर्थिक व्यवस्था पार कोलमडत जात असल्याचं लक्षात आल्यानंतर टेस्फिट यांनी रोजगाराच्या आशेनं सुदान गाठलं. पण दक्षिण सुदानमध्ये एरिट्रियन्स एखाद्या जाळ्यात अडकल्यासारखे अडकले.

सातशेहून अधिक एरिट्रियन्स मायदेशी परतले. सुदानमधल्या संघर्षामुळे पळून गेलेल्या केनियन, युगांडियन आणि सोमालियन नागरिकांना त्या त्या देशातील सरकारांनी परत पाठवलं. पण बहुतांश एरिट्रियन्सना एरिट्रियामध्ये परत जायचं नाहीय. त्यांचं म्हणणं आहे की, एकतर मायदेशी परत जाण्यास घाबरतायेत. शिवाय, मायदेशात त्यांना त्यांचं भविष्यही दिसत नाहीय.

टेस्फिट म्हणतात की, विमानतळावर असणाऱ्या एरिट्रियन्सना दक्षिण सुदानची राजधानी असलेल्या जुबा इथं जाण्यास बंदी घालण्यात आली होती. शिवाय, निर्वासित कॅम्पमध्ये जाण्यास त्यांनी नकार दिलाय.

उत्तर सुदानच्या दिशेनं तीन तासांचा प्रवास केल्यानंतर तिथं एक शराणार्थी कॅम्प आहे. तिथं वेगानं गर्दी होताना दिसतेय.

रेंकमध्ये अप्पर नाईल विद्यापीठाच्या मैदानात आजच्या घडीला सहा हजारहून अधिक लोक आहेत. ही संख्या वाढत जातेय आणि आजूबाजूची झुडुपं तोडून जागा तयार केली जातेय.

इथेच मी आणखी एका निर्वासिताला भेटले. ती तिच्या तीन मुलांसोबत एका वर्गाच्या पायऱ्यांवर बसली होती. तिचा नवरा त्यांच्यासाठी जेवण आणण्यासाठी शहरात गेला होता.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ती म्हणाली की, “मी माझ्या देशात राहू शकत नाही. कारण मी माझ्या देवाची तशी पूजा करू शकत नव्हती, जशी मला करायची होती. मी तिथे नाही राहू शकत.”

ती इव्हँजेलिकल ख्रिश्चन आहे आणि तिला एरिट्रियामध्ये धर्म पाळण्यास अडचणी येत होत्या. एरिट्रियामध्ये सरकारी पातळीवरून धार्मिक विधी नियंत्रित केल्या जातात. सरकारला मान्य नसलेल्या धर्मियांना तिथं तुरुंगात पाठवलं जातं.

खार्तूममधून पळाल्यानंतर दक्षिण सुदानच्या राजधानीत जाण्याची आशा तिला होती. पण तिथं पोहोचणं एक आव्हान बनत असल्याचं तिचं म्हणणं आहे.

“जुबामध्ये कुणीही जाऊ शकत नाही. एरिट्रियन्ससाठी रस्ता बंद आहे. पुढे काय होईल, याची मला कल्पना नाही,” असं ती सांगते.

दक्षिण सुदानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री डेंग डाऊ डेंग यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या कार्यालयाने एरिट्रियासह सर्व परदेशी दूतावासांशी संपर्क साधला आहे, जेणेकरून त्यांच्या नागरिकांना परत पाठवले जाईल.

मात्र, डेंग यांच्या मते, एरिट्रियन्सबाबत अडचण अशी आहे की, त्यांना मायदेशी परतायचं नाहीय आणि पर्यायानं त्यांच्या दूतावासाशी संपर्कही त्यांना साधायाचा नाहीय.

डेंग हे नाकारत नाहीत की, जे एरिट्रियन्स जुबाला पोहोचले आहेत, त्यांना परत पालोइचला पाठवलं जातंय. एरिट्रियन दूतावास त्यांना एरिट्रियाची राजधानी असलेल्या अस्माराला घेऊन जात नाहीत आणि जुबामध्ये निर्वासित छावणी सुद्धा नाहीय. त्यामुळे त्यांना दुसरं कुठेतरी न्यावं लागणारच होतं, असंही डेंग म्हणतात.

एरिट्रियाचे दीर्घकाळचे अध्यक्ष असलेले इसियास अफवेर्की यांनी त्या देशाच्या टीव्ही मीडियाशी बोलताना सांगितलं की, शेजारच्या देशातील म्हणजे सुदानच्या संघर्षामुळे पळून जाणाऱ्या प्रत्येकाचे एरिट्रिया स्वागत करेल.

“एरिट्रियाच्या सीमा खुल्या आहेत आणि तिथून येणाऱ्यांसाठी, मग ते सुदानी नागरिक असोत किंवा एरिट्रियन किंवा इतर, सगळ्यांना येण्याची मुभा असेल. आमच्याकडे जे काही आहे, ते सगळं त्यांना पुरवू.”

दक्षिण सुदानमधील पायाभूत सुविधांवर मोठा ताण येताना दिसतोय. कारण महिन्याभरात 60 हजार लोक देशात आले आहेत.

पालोइच विमातळावर मला काही दक्षिण सुदानी नागरिकही भेटले. हे लोक देशाच्या इतर भागात जाऊ इच्छित आहेत.

सँडी मॅन्जेइल पाच मुलांसह गेल्या दोन आठवड्यांपासून अडकून आहे.

ती म्हणते, “कालच त्यांनी आम्हाला तिकीट दिलं. ते तुम्हाला गेटवर थांबायला सांगतात, मग तुमचं तिकीट दाखवायचं आणि नंतर ते तुम्हाला घेऊन जातील किंवा नाही, हे तुमच्या नशिबावर असतं.”

“बऱ्याचदा ते तुमचं तिकीट घेतात आणि ते तुम्हाला घेऊन जातीलच असं नाही. उद्या किंवा परवा, किंवा कधीच नाही.”

सरकारनं पालोइच विमानतळावरून मोफत विमानसेवा सुरू केलीय. आतापर्यंत 7 हजार लोकांचं स्थलांतर केलं गेलंय. मात्र, बाहेर पडू इच्छिणाऱ्यांपैकी ही संख्या फारच छोटीशी आहे.

रेंक आणि पालोइचमधून सगळ्यांना बाहेर घेऊन जाणं आणि चांगलं अन्न मिळेल, औषधं मिळतील, चांगले राहू शकतील, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, 2013-2018 च्या गृहयुद्धापासून दक्षिण सुदानमध्ये क्वचितच डांबरी रस्ते झाले, फारच कमी देशाअंतर्गत उड्डाणं आहेत. देशाच्या काही भागांना अजूनही हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

कोणत्याही देशासाठी हे एक मोठं आव्हान आहे. शेजारी देशात संघर्ष असल्यानं दक्षिण सुदानमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढतच जात आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)