सुदानमधले भारतीय काय काम करतात? दोन्ही देशातले संबंध कसे आहेत?

"आम्हाला भारत सरकारकडून संदेश मिळाला की तुमची प्रतीक्षा संपते आहे. पण तूर्तास आमच्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीत," हे शब्द आहेत प्रभू एस. के यांचे. ते सुदानच्या अलफशरमध्ये अडकले आहेत.

व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी माझ्या गावी गरम मसाला, प्लास्टिक, कापडापासून बनवलेली फुलं विकण्याचं काम करत असे. पण यात यश मिळू शकलं नाही. माझ्या गावातून काही माणसं सुदानला आली होती. आम्ही तिथे आयुर्वेदिक औषधं विकण्याचं काम करतो असं त्यांनी सांगितलं. हे समजल्यावर मी माझ्या बायकोसह इथे आलो".

प्रभू कर्नाटकातल्या चन्नागिरीचे आहेत. 10 महिन्यांपूर्वीच ते सुदानला आले आहेत.

ते सांगतात, "मी आयुर्वेदिक औषधं विकण्याचं काम करतो. मला औषधांबद्दल माहिती आहे. डायबेटिस, गॅस, सांधेदुखी, डोकेदुखी याकरता औषधं तसंच डोक्यावरच्या केसांसाठी तेलही विकतो".

बोलणं सुरू असतानाच त्यांनी फोन कट केला. घरमालक आल्याचं त्यांनी सांगितलं. इथून निघून जा असं तो सांगत आहे असं ते म्हणाले.

काळजीत पडलेले प्रभू सांगतात, "जशी बस येईल तसे आम्ही निघू. आमच्याच गावातली 50 हून अधिक माणसं इथे आहेत. बसमध्ये दोन सुरक्षारक्षक असतील तर चांगलं आहे. कारण लूटमारीचे प्रकार समोर येत आहेत."

उत्तरपूर्व आफ्रिकेतील सुदान या देशात लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष सुरू आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट करुन म्हटलं आहे की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मायदेशी रवाना झाली आहे. आयएनएस सुमेधा 278 भारतीय नागरिकांसह सुदानमधून जेदाहसाठी रवाना झालं आहे.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सोमवारी घोषणा केली होती की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी कार्यान्वित करण्यात आलं आहे. सुदानच्या बंदरावर 500 भारतीय नागरिक एकत्र आले आहेत. काही लोक वाटेत आहेत. आपली जहाजं आणि विमानं त्यांना घेऊन मायदेशी येण्यासाठी तयार आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुदानच्या विविध भागांमध्ये मिळून 3000 भारतीय नागरिक अडकले आहेत.

यापैकी 180हून अधिक माणसं कर्नाटकातल्या हक्की-पिक्की समाजाची आहेत. प्रभू हे सुद्धा हक्कीपिक्की समाजाचे आहेत.

भारतातल्या पश्चिम आणि दक्षिणेकडच्या जंगल भागात या समाजाचे लोक राहतात. पक्ष्यांची शिकार करण्याचं काम या समाजाची माणसं करतात.

बंगळुरूतील स्थानिक पत्रकार इम्रान कुरेशी यांनी सांगितलं की, "या समाजाची माणसं आतापर्यंत चिमण्यांना मारण्याचं काम करत असत. त्याच्यावर बंदी घालण्यात आल्याने आता या समाजाची माणसं पाय दुखणे, गॅस अशा समस्यांसाठी औषधी वनस्पतींपासून औषधं-तेल काढण्याचं काम ते करतात.

या समाजाची माणसं आता आपली उत्पादनं आफ्रिकेतील देश, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये विकतात".

भारत आणि सुदानचे संबंध

सुदानमध्ये राजदूत म्हणून काम पाहिलेल्या दीपक वोहरा यांनी सांगितलं की, "सुदानमध्ये भारतीयांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. सुदानच्या लोकांना भारतीयांबद्दल विश्वास वाटतो". दीपक 2005 ते 2010 या कालावधीत सुदानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते.

ते सांगतात, "मी दोन मुख्य घटनांचा साक्षीदार होतो. 2005 मध्ये सुदान सरकार आणि बंडखोर यांच्यात शांतता करार झाला. त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीरक्षक दलाचा भाग म्हणून भारतीय लष्कराची एक तुकडी सुदानमध्ये पाठवण्यात आली होती. 2011 मध्ये साऊथ सुदान वेगळा झाला.

सुदानच्या विविध भागातून असंख्य लोक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात".

"भारतीय हे वैद्यकीय शास्त्रात जाणकार असतात असं सुदानमधील सर्वसामान्य माणसाचं मत आहे. सुदानमध्ये आयुर्वेदिक औषधं, तेल विकणाऱ्या लोकांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, इथे आयुर्वेदिक उत्पादनं अतिशय प्रसिद्ध आहेत. तिथल्या लोकांचा भारतीयांवर विश्वासही आहे. आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती तसंच विक्री करणारे लोक तिथे गेले असावेत".

दीपक पुढे सांगतात, "दारफुरमधली स्थिती चांगली नाही. तिथे संघर्ष घडतो आहे. तिथे धोका असूनही भारतीय तिथे का जातात माहिती नाही. आयुर्वेदिक उत्पादनं विकायला जात आहेत असं सांगण्यात येतं. कदाचित याचा अर्थ असा असू शकतो की सुदानमधील आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळेच आयुर्वेदिक उपचार प्रचिलत झाले आहेत".

"आयुर्वेदिक औषधं, तेल खरेदी करण्यासाठी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही. घरपोच या वस्तू मिळतात. कदाचित त्यामुळेच भारतीय नागरिक सुदानमध्ये जात असावेत", असं ते सांगतात.

सुदान आणि भारत संबंध

दीपक वोहरा यांच्या मते सुदानमध्ये स्थायिक झालेले भारतीय निर्यातीचं काम करतात.

"सुदानमधले भारतीय मायदेशातून तसंच चीनमधून कपडे, अन्य वस्तू खरेदी करतात आणि सुदानमध्ये विकतात. पण कोणत्याही स्वरुपाच्या कारखान्यात किंवा उद्योगात भारतीय माणसं नाहीत. त्यांना खूप मान मिळतो.

रिपब्लिक ऑफ सुदान मध्ये खूप सारे गुजराती बांधव आहेत. तिथे 70 टक्के गुजराती माणसं आहेत.

रिपब्लिक ऑफ साऊथ सुदानमध्ये भारताच्या विविध राज्यातून आलेले लोक वसले आहेत".

सुदानमध्ये काय चाललं आहे?

सुदान लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स हे निमलष्कर यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत चारशेहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.

ही लढाई सुरू होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. 15 एप्रिलला हा संघर्ष सुरू झाला होता.

संघर्षाचं केंद्रबिंदू सुदानी आर्म्ड फोर्सेसचे प्रमुख अब्देल फतेह अल बुरहान आणि निमलष्करी दलाचे म्हणजे रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे प्रमुख मोहम्मद हामदान दगालो यांच्याभोवती आहे. हमादान हे हेमेदती नावानेही ओळखले जातात.

याआधी या दोघांनी एकत्रितही काम केलं आहे. देशात सत्तांतर घडवून आणण्यात या दोघांची मोलाची भूमिका आहे.

सुदानवर वर्चस्व मिळवण्यासाठी लष्कर आणि निमलष्कर यांच्यात संघर्ष सुरू आहे.

तेल आणि सोन्याचं भांडार

सुदानच्या आर्थिक स्थितीविषयी सांगायचं तर इथल्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 700 डॉलर आहे.

सुदानमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेले दीपक वोहरा सांगतात की ते दक्षिण, पश्चिम आणि उत्तर सुदानमध्ये खूप फिरले आहेत.

ते सांगतात, "1970मध्ये सुदानमध्ये खनिज तेलाचे साठे सापडले होते. यामुळे सुदानच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली होती. यामुळे भारतीय नागरिक तिथे जात असतात. भारतातून ओएनजीसीचे कर्मचारी 1990 मध्ये तिथे गेले होते. दक्षिण सुदान स्वतंत्र झाल्यानंतर अनेक भारतीय तिथे स्थायिक झाले".

2011 मध्ये साऊथ सुदान देशाची निर्मिती झाली. 80 टक्के तेलाचे साठे या नव्या देशात गेले. सरकारी आकडेवारीनुसार 2022 मध्ये सुदानने केलेल्या निर्यातीपैकी 41.8 टन सोन्याच्या निर्यातीतून 2.5 अब्ज डॉलरची कमाई केली होती.

सुदानमधल्या संकटासंदर्भातील जाणकार शेविट वोल्डमायकल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आर्थिक संकटाला सामोरं जाणाऱ्या देशासाठी सोन्याचे साठ हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. लष्कर आणि निमलष्कर यांच्यातील संघर्षात डावपेचांचा भाग म्हणून सोन्याचे साठे, त्यातून मिळणारे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत.

माजी राजदूत दीपक वोहरा यांनी सांगितलं की, "ज्या पद्धतीने युक्रेनमधल्या अडकलेल्या भारतीयांची यशस्वी सुटका करण्यात आली होती. याआधीही भारताने अशा स्वरुपाची मोहीम हाती घेतली होती. केवळ भारतीयच नव्हे तर सुदानमध्ये अडकलेल्या अन्य देशातील लोकांचीही सुटका करण्यात भारताची भूमिका निर्णायक आहे".

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)