You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यात उद्योजिकेला मृत्यूदंडाची शिक्षा
- Author, जोनाथन हेड
- Role, आग्नेय आशिया प्रतिनिधी
- Author, थू बुई
- Role, बीबीसी व्हिएतनामीज
व्हिएतनाममधील प्रॉपर्टी टायकून ट्रुओंग माय लान यांना जगातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याच्या सूत्रधार असल्याबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. ट्रुओंग माय लान यांनी या शिक्षेविरोधात अपील केलं होतं. मात्र, ते फेटाळण्यात आलं आहे.
68 वर्षांच्या ट्रुओंग माय लान आता मृत्यूच्या दारात उभ्या आहेत. तरीदेखील त्यांच्यासाठी एक संधी आहे. कारण व्हिएतनाममधील कायद्यानुसार जर त्यांनी केलेल्या घोटाळ्यातील 75 टक्के रक्कम परत केली तर त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून त्याचं रुपांतर जन्मठेपेत होईल.
एप्रिल महिन्यात ट्रायल कोर्टाला आढळलं की, ट्रुओंग माय लान यांनी गुप्तपणे सायगाव कमर्शियल बॅंकेवर (SCB) नियंत्रण मिळवलं आहे. ही व्हिएतनाममधील पाचवी सर्वात मोठी बॅंक आहे.
बँकेवरील आपल्या नियंत्रणाचा फायदा घेत ट्रुओंग यांनी 10 वर्षांहून अधिक कालावधीत बँकेतून कर्जे घेतली आहेत, तसंच रोख रक्कमही काढली आहे.
ही एकूण रक्कम 44 अब्ज डॉलर्स (34.5 अब्ज पौंड) इतकी प्रचंड आहे. यासाठी ट्रुओंग यांनी खोट्या, किंवा बनावट कंपन्यांच्या जाळ्याचा वापर केला.
सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की, यातील 27 अब्ज डॉलर्सच्या रकमेचा बेकायदेशीररित्या गैरवापर करण्यात आला. तर 12 अब्ज डॉलर्सच्या रकमेचा अपहार किंवा घोटाळा करण्यात आला. हा सर्वात मोठा गंभीर आर्थिक गुन्हा आहे आणि त्यासाठी ट्रुओंग यांनी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या प्रकरणातील निकाल हा दुर्मिळ आणि धक्कादायक होता. आर्थिक गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षा मिळालेल्या मोजक्या महिलांपैकी ट्रुओंग या एक आहेत.
9 अब्ज डॉलरची परतफेड आणि मृत्यूदंडातून सुटका
मंगळवारी (03 डिसेंबर) न्यायालयानं सांगितलं की, ट्रुओंग माय लान यांची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्यासाठी कोणताही आधार नाही. मात्र अजूनही त्या मृत्यूदंडाची शिक्षा टाळू शकतात.
जर त्यांनी 9 अब्ज डॉलर्सची रक्कम परत केली तर ही शिक्षा टळू शकते. म्हणजेच त्यांनी घोटाळा केलेल्या 12 अब्ज डॉलर्स रकमेच्या तीन-चतुर्थांश रक्कम परत करून त्यांना मृत्यूदंडातून सुटका करून घेता येणार आहे.
मृत्यूदंडाविरोधात ट्रुओंग माय लान यांनी केलेलं हे काही शेवटचं अपील नव्हतं. त्या अजूनही राष्ट्राध्यक्षांकडे शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका करू शकतात.
या खटल्यादरम्यान ट्रुओंग माय लान यांनी काहीवेळा विरोध दर्शविला होता. मात्र, मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधातील अपीलाच्या ताज्या सुनावणीच्या वेळेस त्या दु:खी झालेल्या आणि त्यांना पश्चाताप झालेला दिसत होता.
त्या म्हणाल्या की, देशाच्या विरोधात असं कृत्य केल्याबद्दल त्यांना लाज वाटते आणि बॅंकेकडून त्यांनी जी रक्कम घेतली आहे ती परत करण्याचाच विचार त्यांच्या मनात होता.
एक साध्या विक्रेत्या ते आघाडीच्या उद्योजिका
ट्रुओंग माय लान यांचा जन्म व्हिएतनामच्या हो चि मिन्ह सिटीमध्ये एका चिनी-व्हिएतनामी कुटुंबात झाला. आपल्या आईबरोबर सौंदर्य प्रसाधनं विकण्याचा एक स्टॉल बाजारात लावून त्यांनी सुरूवात केली होती.
1986 मध्ये व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्षानं आर्थिक सुधारणा लागू केल्यानंतर त्यांनी जमीन आणि मालमत्ता यांची खरेदी करण्यास सुरूवात केली. 1990 च्या दशकापर्यंत अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मालकीचे झाले होते.
एप्रिल महिन्यात जेव्हा त्यांना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्या व्हॅन थिन्ह फाट समूहाच्या (Van Thinh Phat Group) अध्यक्ष होत्या. हा समूह व्हिएतनाममधील रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचा आणि प्रख्यात समूह आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस गुयेन फू ट्रॉंग यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनाममध्ये "ब्लेझिंग फर्नेसेस" म्हणजे आगभट्टी या नावानं एक भ्रष्टाचार विरोधी मोहिम चालवण्यात आली होती.
ट्रुओंग माय लान यांना बॅंकेतील घोटाळा प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाणं हा त्या मोहिमेतील नाट्यमय क्षण होता.
या प्रकरणात कोणाकोणाला किती शिक्षा?
या प्रकरणातील उर्वरित सर्व 85 जणांना दोषी ठरवण्यात आलं. यातील चार जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तर ट्रुओंग माय लान यांचे पती आणि भाची यांच्यासह उर्वरित दोषींना 3 वर्षांपासून ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
ट्रुओंग माय लान यांनी सायगाव कमर्शियल बॅंकेत केलेल्या घोटाळ्यामुळे ती बॅंक तर आर्थिक अडचणीत आलीच त्याचबरोबर एकूणच बँकिंग क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आलं होतं. या मोठ्या संकटावर मात करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ व्हिएतनाम ला अब्जावधी डॉलर्सची भांडवली मदत सायगाव कमर्शियल बॅंकेला करावी लागली.
या प्रकरणात सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता की ट्रुओंग यांचे गुन्हे प्रचंड स्वरुपाचे आहेत. याआधी त्या प्रकारचं उदाहरण घडलेलं नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा सुनावताना कोणतीही दया दाखवता जाऊ नये.
ट्रुओंग माय लान यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की मृत्यूदंड टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या 9 अब्ज डॉलर रकमेची लवकरात लवकर व्यवस्था करण्यासाठी त्या काम करत आहेत. मात्र त्यांच्या मालमत्ता विकून रोख रक्कम उभारणं कठीण झालं आहे.
हो चि मिन्ह सिटीमधील काही आलिशान मालमत्ता सैद्धांतिकदृष्ट्या लवकर विकल्या जाऊ शकतात. मात्र, त्यांची इतर मालमत्ता या शेअर्सच्या स्वरुपात आहे किंवा इतर मालमत्ता किंवा इतर व्यवसायांमध्ये भागीदाराच्या स्वरुपात आहे.
संपूर्ण देशभरात एक हजाराहून अधिक विविध मालमत्ता या घोटाळ्याशी निगडीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या मालमत्ता सध्या गोठवल्या आहेत.
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, ट्रुओंग माय लान यांनी सरकारला रक्कम परत करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी मित्रांकडे देखील मदत मागितली आहे.
ट्रुओंग यांची शिक्षा कमी करण्यासाठी युक्तिवाद
आर्थिक कारणांच्या आधारे न्यायाधीशांनी शिक्षेबाबत नरमाई दाखवावी यासाठी ट्रुओंग यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. ते म्हणाले की, ट्रुओंग यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली असताना त्यांच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीची विक्री करून त्यातून सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी वाटाघाटी करणं त्यांच्यासाठी कठीण होईल. यातून ट्रुओंग यांना 9 अब्ज डॉलरची रक्कम उभी करणं कठीण जाईल.
वकील पुढे म्हणाले की जर ट्रुओंग यांना त्याऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली तर आवश्यक ती रक्कम उभारण्यासाठी त्या अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतील.
ट्रुओंग यांचे वकील गुयेन हाय थिएप यांनी त्यांचं अपील फेटाळलं जाण्यापूर्वी बीबीसीला सांगितलं की, "ट्रुओंग यांच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य प्रत्यक्षात नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेल्या रकमेपेक्षा अधिक आहे."
"मात्र, या मालमत्ता विकण्याचे प्रयत्न करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ आवश्यक आहे. कारण त्यांची बरीचशी मालमत्ता रिअल इस्टेटच्या स्वरुपात आहे आणि ती विकण्यासाठी वेळ लागेल. ट्रुओंग माय लान यांना आशा आहे की नुकसान भरपाईची रक्कम देता यावी यासाठी न्यायालय त्यांच्यासाठी सर्वात अनुकूल स्थिती निर्माण करेल."
काहीजणांची अपेक्षा होती की, ट्रुओंग यांच्या वकिलांच्या या युक्तिवादामुळे न्यायाधीशाचं मत परिवर्तन होईल. मात्र आता प्रत्यक्षात नुकसान भरपाईची रक्कम उभारण्यासाठी ट्रुओंग यांची शर्यत मृत्यूदंडाच्या शिक्षेशी आहे.
मृत्यूदंड टाळण्यासाठी त्यांना वेळेत ही रक्कम परत करावी लागेल.
व्हिएतनामील मृत्यूदंडाची स्थिती
व्हिएतनाममध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेला देशाचं गुपीत मानलं जातं. किती जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे याची माहिती सरकार प्रसिद्ध करत नाही.
अर्थात मानवाधिकार गटांचं म्हणणं आहे की, ही शिक्षा सुनावण्यात आलेले व्हिएतनाममध्ये 1,000 हून अधिक जण आहेत आणि व्हिएतनाम हा जगात सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या देशांपैकी एक आहे.
सामान्यपणे तिथे मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी प्रदीर्घ विलंब होतो. अनेकदा शिक्षा देण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. कैद्यांना मात्र यासंदर्भात फारच थोड्या सूचना दिल्या जातात.
जर मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याआधी ट्रुओंग माय लान 9 अब्ज डॉलर रकमेची परतफेड करू शकल्या तर कदाचित त्यांचा जीव वाचेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)