वय वर्ष फक्त 100; शंभरी गाठणाऱ्यांचा आकडा जगभरात 5 लाखांपेक्षा जास्त

फोटो स्रोत, Family Album/Joao Marinho Neto
- Author, फर्नांडो दुआर्ते
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
112 वर्षांचे जोआओ मरीनो नेटो हे सध्या जगातले सर्वात वयोवृद्ध पुरुष आहेत.
नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा खरंतर जोआओ यांच्यासाठी नेहमीसारखाच होता. गेल्या 10 वर्षांपासून ते ब्राझीलच्या नैऋत्येला असलेल्या अप्युअरेस नावाच्या शहरात ज्येष्ठांसाठी असणाऱ्या संस्थेत राहतात.
पण त्यानंतर लगेचच 112 वर्षांचे नेटो हे 'जगातील हयात असणारी सर्वात वयोवृद्ध पुरुष' म्हणून ब्राझीलमधल्या आणि जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकले.
"मी जगातला सर्वात हँडसम माणूसही आहे..." त्यांना ही बातमी देणाऱ्या नर्सेसना त्यांनी हसतहसत सांगितलं.
ब्रिटनमधले 112 वर्षांचे जॉन टिनीसवुड हे यापूर्वी जगातले सर्वात वृद्ध पुरुष होते. पण 25 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा हा मान जोआओ नेटो यांच्याकडे आला.
सध्या जिवंत असणाऱ्या जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत जपानच्या टोमिको इटुका. सध्या त्यांचं वय आहे 116 वर्षं आहे. त्यांच्याकडेही जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होण्याचा मान ऑगस्ट 2024मध्येच आलाय.
जगातल्या आजवरच्या अधिकृतपणे सर्वाधिक जगलेल्या व्यक्ती होत्या फ्रान्सच्या जिअॅन कॅलमेंट. 1997 मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा त्या 122 वर्षांच्या होत्या. 120 पेक्षा अधिक वर्षं जगलेल्या अधिकृत नोंद असणाऱ्या त्या एकमेव आहेत.
जगभरातच अशा शंभरी गाठणाऱ्यांची - ओलांडणाऱ्यांची संख्या वाढतेय.. अधिकाधिक लोक आता तीन आकडी वय गाठतायत.
आता 2024 मध्ये किमान 100 वय असणारे सुमारे 5,88,000 लोक जगभरात असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाचा अंदाज आहे. 2030 पर्यंत जगभरात सुमारे 10 लाख लोक हे शंभरीचे असतील, असा अंदाज आहे. पण 1990 मध्ये शंभरीच्या व्यक्तींचं हेच प्रमाण 92,000 होतं.
औषधं - वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती, अन्नाची उपलब्धता, सुधारलेलं राहणीमान या सगळ्यामुळे जगभरामध्ये सरासरी वयोमान वाढलेलं आहे.
युनायटेड नेशन्सने 1960पासून जगभरातल्या आयुर्मानाबद्दलचा डेटा ठेवायला सुरुवात केली. 1960मध्ये जन्मलेल्या सामान्य व्यक्तीचं अपेक्षित आयुर्मान होतं 52 वर्षांचं.
सहा दशकांनंतर आता जगभरातलं सरासरी अपेक्षित आयुर्मान 73 वर्षं झालंय. आणि 2050 हे अपेक्षित सरासरी आयुर्मान 77 वर्षं होईल असा युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे.
म्हणजे 100 वर्षांचं होणं इतकंही सोपं नाही. 2023 मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एकूण 0.007% लोक हे शंभरीचे होते, असं युनायटेड नेशन्सची आकडेवारी सांगते. तर दोन आकडी वयापासून तीन आकडी वय गाठणं - शंभरीचं होण्याची शक्यता बहुतेकांसाठी कमीच असल्याचं फ्रान्समध्ये 2024मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात आढळलं होतं.
2023 मध्ये जन्मलेल्या मुलग्यांपैकी 2% तर मुलींपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी जण शंभरीचे होतील असा अंदाज फ्रान्सच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीजने व्यक्त केलाय. शिवाय इतकं वृद्धत्वं गाठणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन आजारही जडलेले असतील, असंही त्या पाहणीत आढळलंय.
बॉस्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासाअंती मांडलेल्या अंदाजानुसार 50 लाख अमेरिकनांपैकी फक्त एक जण किमान 110 वर्षांचं वय गाठेल.

फोटो स्रोत, Getty Images
2010 मध्ये शंभरी गाठणाऱ्या अमेरिकनांची संख्या होती 50,000. 2020 मध्ये हे प्रमाण वाढून 80,000 झाल्याचं अमेरिकेच्या जनगणनेची आकडेवारी सांगते.
Human Ageing म्हणजे माणसांच्या वृद्धत्वाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी अशा शंभरी ओलांडलेल्या व्यक्ती कुतुहलाचा - संशोधनाचा विषय असतात.
युकेमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहममधले सेल बायोलॉजीच्या प्रोफेसर जॅनेट लॉर्ड सांगतात, "दीर्घायुषी असणं म्हणजे चांगलं आयुष्यं जगणं नाही. पुरुष त्यांच्या आयुष्याची शेवटची सरासरी 16 वर्षं डायबिटीसपासून ते डिमेन्शियापर्यंतच्या आजारांसोबतच घालवतात, तर महिलांसाठी हेच प्रमाण 19 वर्षं आहे. पण बहुतेक वृद्धांसोबत जे होतं ते या शंभरी ओलांडणाऱ्यांसोबत होत नाही. आणि असं का, याचं नेमकं कारण सांगता येणार नाही."
दीर्घायुषी असणाऱ्या या वयोवृद्धांचं आरोग्य हे इतरांच्या तुलनेत चांगलं असतं. 112 वर्षांच्या नेटो यांची फक्त दृष्टी अधू झालीय. त्याशिवाय त्यांना इतर कोणतंही दुखणं नसल्याचं त्यांची काळजी घेणाऱ्या नर्स सांगतात. त्यांना कोणतंही औषध घ्यावं लागत नाही आणि गंभीर आजारपणही होऊन गेलेलं नाही.
शंभरी ओलांडलेल्या प्रत्येकाचीच जीवनशैली आदर्श होती, असंही नाही, आणि यामुळेच तज्ज्ञही गोंधळात पडले आहेत.
म्हणजे जोआओ नेटोंची जीवनशैली बऱ्यापैकी चांगली होती आणि त्यांनी मद्यपान केलं नसल्याचं त्यांच्या मोठ्या मुलाने अँतोनिओ यांनी सांगितलं. पण शंभरी ओलांडणाऱ्या अनेकांनी अगदी बिनधास्त आय़ुष्य जगल्याचंही आढळलंय.
म्हणजे सर्वाधिक जगल्याची अधिकृत नोंद असलेल्या फ्रान्सच्या जिअॅन कॅलमेंट यांचं वयाच्या 122 व्या वर्षी निधन झालं, पण त्या स्मोकर होत्या आणि भरपूर चॉकलेट्स खायच्या.

फोटो स्रोत, Getty Images
2011 मध्ये अमेरिकन जेरिअॅट्रिक सोसायटी जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. 95 किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या 400 अमेरिकन ज्यू वृद्धांच्या जीवनशैलीचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आणि अनेकांना वाईट सवयी असल्याचं आढळलं.
- जवळपास 60% जण हे हेवी स्मोकर्स - प्रचंड धूम्रपान करणारे होते.
- अर्ध्यापेक्षा अधिकजण आयुष्यातला बहुतांश काळ लठ्ठ (obese) होते.
- फक्त 3% जण शाकाहारी होते.
- अनेकांनी कधी थोडाही व्यायाम केला नव्हता.
दीर्घायुष्याचं रहस्य काय?
मग जर दीर्घायुष्य मिळावं यासाठी ज्या गोष्टी करण्याचा सल्ला दिला जातो, त्या न करताही या लोकांना इतकं दीर्घायुष्य कसं मिळालं?
संशोधकांच्या मते यामध्ये जनुकांची - genetics ची भूमिका महत्त्वाची आहे.
वाढत्या वयानुसार होणारे आरोग्यावर होणारे परिणाम आणि झीज यांपासून शंभरीपर्यंत वा त्यापेक्षा अधिक जगणाऱ्या व्यक्तींना स्वतःचं संरक्षण करता आलं. शिवाय ज्या सवयींमुळे इतरांचं आयुष्य कमी होतं, त्या गोष्टींचेही या व्यक्तींवर फारसे परिणाम होत नसल्याचं दिसून आलं.
मग आता मानवी आयुर्मान आणखी किती वाढण्याची शक्यता आहे?
तर याच शतकामध्ये दीर्घायुष्याची संकल्पना आणखीन वाढेल आणि लोक अगदी 125 ते 130 वयापर्यंत जगतील असा अमेरिकेतल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा दावा आहे.


"सध्याचा वयाचा रेकॉर्ड कुणीतरी 2100 पर्यंत नक्कीच मोडेल आणि लोक अगदी 126,128 आणि अगदी 130 वर्षांचे होईपर्यंत जगतील," या संशोधनाचे सह-लेखक आणि स्टॅटिस्टिशियन मायकल पिअर्स सांगतात.
पिअर्स आणि त्यांचे सहकारी एड्रियन राफ्टरी यांनी दीर्घायुष्याची आंतरराष्ट्रीय आकडेवारी वापरून त्यावर आधारित पुढच्या दशकभरासाठीच्या आयुर्मानाच्या आकडेवारीचा अंदाज मांडलाय.. 122 वर्षं जगण्याचा कॅलमेट यांचा रेकॉर्ड मोडला जाईल याची त्यांना 100% खात्री आहे आणि कुणीतरी 127 वा वाढदिवस साजरा करेल याची शक्यता 68% असल्याचं ते म्हणतात.
शिवाय दीर्घायुषी असणाऱ्यांमध्ये सध्या महिलांची संख्या जास्त आहे.
9 डिसेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसारी जगातल्या सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या 50 व्यक्ती या सगळ्या महिला आहेत. 112 वर्षांचे ब्राझीलचे जोआओ मरीनो नेटो हे 54व्या क्रमांकावर आहेत.
लंडनच्या किंग्स कॉलेजच्या एजिंग रिसर्चचे संचालक डॉ. रिचर्ड सिओ सांगतात, "वयोमान आणि वृद्धत्वाविषयी संशोधकांना असलेल्या अनेक प्रश्नांची अजून उत्तरं मिळालेली नाहीत. आणि जगभरातल्या म्हाताऱ्या होणाऱ्या लोकसंख्येचं वाढतं प्रमाण पाहता, चांगलं जीवन जगता यावं यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. जगामध्ये आताच 65 पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांची आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय. आपण किती दीर्घायुष्य जगू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नाही. वयानुसार शरीरावर होणारे परिणाम आपण आणखी पुढे कसे ढकलू शकतो आणि आतापेक्षा अधिक काळ निरोगी कसं राहू शकतो, याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. असं करता आलं आणि आपण खरंच इतके म्हातारे होईपर्यंत जगलो, तर आपल्याला आयुष्याच्या या काळात आजारपणांशी झुंजण्याऐवजी या वर्षांचा आनंद घेता येईल."











