मंगळ ग्रहावर सापडलेले 'लेपर्ड प्रिंट' आणि 'पॉपी सीड्स' हे तेथील जीवसृष्टीचे सर्वांत मोठे पुरावे आहेत का?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, NASA/JPL

फोटो कॅप्शन, मंगळावर काही विचित्र खडक सापडले आहेत, ज्याला शास्त्रज्ञ संभाव्य जीवसृष्टीचे आतापर्यंतचे सर्वात मजबूत पुरावे मानत आहेत.
    • Author, रेबेका मोरेल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मंगळ ग्रहावर जीवसृष्टीच्या शोधासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. काही वेळा या प्रयत्नात थोडं फार यश मिळाले, तर काही वेळा अपयशही आले.

या शोधात पर्सिव्हरन्स रोव्हरही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावरील खडकांचे नमुने गोळा करून जीवसृष्टीच्या शक्यतापूर्ण पुराव्यांचा अभ्यास करण्यास मदत केली आहे.

आता शास्त्रज्ञ या अद्भुत शोधाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचे नमुने पृथ्वीवर आणण्याची तयारी करत आहेत.

लाल ग्रह म्हणजेच मंगळावर काही विचित्र खडक सापडले आहेत. त्याला शास्त्रज्ञ संभाव्य जीवसृष्टीचे आतापर्यंतचे सर्वात मजबूत पुरावे मानत आहेत.

नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला धुळीने भरलेल्या नदीत काही खडक/दगड सापडले आहेत. त्याला 'लेपर्ड स्पॉट' आणि 'पॉपी सीड्स' असं नाव देण्यात आलं आहे.

शास्त्रज्ञांना असं वाटतं की, या डागांमध्ये रासायनिक अभिक्रिया करून तयार झालेली खनिजं आहेत. ते प्राचीन मंगळावरील सूक्ष्मजीवांशी संबंधित असू शकतात.

हे खनिज नैसर्गिक भूगर्भीय हालचालींमुळे तयार झाले असण्याची शक्यता असली, तरी नासाने एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, हे डाग किंवा खुणा या मंगळावर जीवसृष्टी असल्याचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट संकेत असू शकतात.

'शोध पुढे नेण्याचं मजबूत कारण'

हे निष्कर्ष नासाच्या 'पोटेन्शियल बायोसिग्नेचर' मानकांशी जुळतात, म्हणजे असे पदार्थ किंवा रचना ज्याचा संबंध जीवाश्माशी असू शकतो, पण जीवसृष्टी आहे की नाही हे ठरवण्यासाठी अजून अभ्यास आणि डेटाची गरज आहे.

याचा अर्थ असा की, ही रचना जीवाश्म किंवा जैविक आहे की नाही हे नासाला पुढील संशोधनातून ठरवता येईल.

'नेचर' मॅगझिनमध्ये प्रकाशित अभ्यासाचे सह-लेखक आणि इम्पिरियल कॉलेज लंडनमधील खगोलशास्त्रज्ञ प्रा. संजीव गुप्ता म्हणतात, "आम्ही यापूर्वी असं काही पाहिलं नव्हतं, म्हणून हा एक मोठा शोध आहे."

शास्त्रज्ञ म्हणतात, "खडकांमध्ये आढळलेली रचना सूक्ष्मजीवांशी संबंधित असू शकते. आम्ही असं म्हणत नाही की जीवसृष्टी सापडली आहे. पण आम्ही हे निश्चितपणे म्हणू शकतो की, हे शोध पुढे नेण्याचं एक मजबूत कारण आहे."

ग्राफिक

नासाच्या सहयोगी प्रशासक (सायन्स मिशन डायरेक्टोरेट) डॉ. निकोला फॉक्स म्हणतात, "हे काहीसं फॉसिलसारखं (जीवाश्म) आहे. कदाचित ते कधी अन्नाचा भाग असावं किंवा विष्ठा असावी आणि आता तेच आपल्याला दिसत आहे."

पण हे घटक काही जीवाणूंपासून तयार केले आहेत की नाही, हे फक्त त्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणून तपासल्यानंतरच निश्चित करता येईल.

नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने (इएसए) खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्याच्या मोहिमेचा प्रस्ताव दिला असला, तरी याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

सध्या अमेरिकेच्या स्पेस एजन्सीला निधीत मोठी कपात सहन करावी लागत आहे. ट्रम्प यांच्या 2026 च्या अर्थसंकल्पात याचा समावेश आहे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्याची मोहीम रद्द होण्याचा धोका आहे.

'म्हणून उत्सुकता कायम आहे'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आज मंगळ एक थंड आणि ओसाड वाळवंट आहे. परंतु, अब्जावधी वर्षांपूर्वी येथे दाट वातावरण आणि त्यावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

म्हणूनच मंगळावर जीवसृष्टीचे संकेत शोधण्याची उत्सुकता कायम आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हर जीवसृष्टीच्या शोधासाठी पाठवण्यात आला आणि तो 2021 मध्ये मंगळाच्या पृष्ठभागावर उतरला होता.

गेल्या 4 वर्षांपासून हा रोव्हर जेझेरो क्रेटर नावाच्या परिसराचा शोध घेत आहे. हा परिसर पूर्वी प्राचीन तलाव होता आणि त्यात एक नदी वाहत होती.

गेल्या वर्षी या रोव्हरने नदीने तयार केलेल्या एका खोऱ्याच्या तळाशी 'लेपर्ड प्रिंट'सारख्या खुणा किंवा चिन्ह असलेले खडक शोधले होते. ही जागा 'ब्राइट एंजल फॉर्मेशन' म्हणून ओळखली जाते.

हे खडक सुमारे 3.5 अब्ज वर्षे जुने आहेत आणि 'मडस्टोन' म्हणून ते ओळखले जातात. ते मातीपासून तयार झालेल्या बारीक दाण्यांसारख्या खडकासारखे असतात.

पर्सिव्हरन्स मिशनचे शास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक जोएल हुरोविट्झ हे न्यूयॉर्क येथील स्टॉनी ब्रुक युनिव्हर्सिटीमध्ये असतात.

ते म्हणतात, "हे पाहताच आमच्या लक्षात आलं की, या खडकांमध्ये काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली असावी आणि त्यामुळे आम्ही खूपच उत्साहित झालो."

ग्राफिक
फोटो कॅप्शन, मंगळावर खडकांच्या जवळून घेतलेला फोटो

खडकांमध्ये असलेल्या घटकांची तपासणी करण्यासाठी रोव्हरमध्ये अनेक उपकरणे लावण्यात आली आहेत. हा डेटा अभ्यासासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आला.

जोएल हुरोविट्झ म्हणतात, "आम्हाला वाटतं की, आम्हाला रासायनिक अभिक्रियांचे पुरावे सापडले आहेत. ते तलावाच्या तळाशी असलेल्या चिकट मातीमध्ये तयार झाले असावेत. असं दिसून येतं की, ही अभिक्रिया माती आणि कार्बनिक पदार्थांमध्ये झाली आणि त्यामुळे नवीन घटक तयार झाले."

पृथ्वीवर अशा परिस्थितीत, जीवाणूंच्या रासायनिक क्रियेमुळेच सामान्यपणे नवीन घटक तयार होतात.

ते म्हणतात, "ही एक शक्यतापूर्ण व्याख्या आहे की, हे डाग खडकांमध्ये कसे तयार झाले. हे आतापर्यंत मिळालेल्या सर्वात ठोस संभाव्य बायोसिग्नेचरसारखे असल्याचे दिसते."

शास्त्रज्ञांनी ही गोष्टही तपासली की, कार्बनिक पदार्थ किंवा जीवाणू न वापरता असे घटक कसे निर्माण होतात आणि त्यांनी निष्कर्ष काढला की, हे नैसर्गिक भूगर्भीय हालचालीमुळेही होऊ शकते.

मात्र, यासाठी उच्च तापमान लागतं आणि या खडकांना पाहून असं वाटत नाही की, ते कधी गरम झाले असतील.

हुरोविट्झ म्हणतात, "जैवाश्म न वापरणारे किंवा गैरजैविक उपाय वापरताना आम्हाला काही अडचणी आल्या, परंतु आम्ही त्यांना पूर्णपणे नाकारू शकत नाही."

'पण मोहिमेचं भविष्य अनिश्चित'

मंगळावर राहून पर्सिव्हरन्सने खडकांचे नमुने गोळा केले आहेत. त्यात ब्राइट एंगल फॉर्मेशनमधील खडकांचे नमुनेही आहेत.

हे नमुने कॅनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत आणि मंगळावरून परत आणण्यासाठीच्या मोहिमेची वाट पाहत आहेत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, NASA/JPL

फोटो कॅप्शन, पर्सिव्हरन्सने मंगळावरून खडकाचे नमुने गोळा केले आहेत. खडकाच्या आतील भागाचा फोटो.

पण नासाच्या या मोहिमेचं भविष्य अनिश्चित आहे. कारण बजेट कमी होण्याचा धोका आहे. दुसरीकडे, चीन देखील 2028 मध्ये सुरू होणाऱ्या 'रिटर्न मिशन'साठी म्हणजेच परतीच्या मोहिमेसाठी तयारी करत आहे.

या निर्णयावर अजून चर्चा सुरू असली, तरी शास्त्रज्ञ लवकरात लवकर नमुने परत आणण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रा. गुप्ता म्हणतात, 'आम्हाला हा नमुना पाहण्याची गरज आहे. मला वाटतं की, बहुतांश शास्त्रज्ञांना हे नमुने पृथ्वीवर तपासायला आवडेल. म्हणून आम्ही ते पृथ्वीवर आणण्यास प्राधान्य देत आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)