अमेरिकेच्याच नाकाखाली वाढतोय चीनी युआनचा वापर, ‘डॉलर’चं जागतिक संस्थान खालसा होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गेरार्डो लिसार्डी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून चीनने युआनचा वापर सुरू केलाय.
लॅटिन अमेरिकेतील दोन मोठे देश चीनसोबतच्या व्यापारात डॉलरऐवजी युआनला प्राधान्य देतं आहेत.
तज्ञांच्या मते, याच भागतील इतर देशही या ट्रेंडचा भाग बनू शकतात.
लॅटिन अमेरिकन अर्थव्यवस्थेत चीन कशापद्धतीने आपला प्रभाव वाढवतोय यावर तयार केलेला हा खास अहवाल.
चिनी युआन लॅटिन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आपलं स्थान हळूहळू भक्कम करू पाहतंय. लॅटिन अमेरिकेतील काही देशांमध्ये गाडी किंवा गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीत हे स्पष्टपणे दिसत नसलं तरी ही वस्तुस्थिती आहे.
अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून चीनने लॅटिन अमेरिकेत युआनचा वापर सुरू केलाय.
अलीकडेच लॅटिन अमेरिकेतील दक्षिण भागात याची काही चिन्हं दिसून आली आहेत.
अर्जेंटिनाच्या सरकारने मागच्या महिन्यात जाहीर केलंय की, देशाच्या तिजोरीतील परकीय चलन साठा सतत कमी होत असल्याने आम्ही चीनसोबत डॉलरऐवजी युआनमध्ये व्यापार करणार आहोत.
एवढंच नाही तर, ब्राझीलमध्ये डॉलरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा परकीय चलनसाठा म्हणून युआनने युरोची जागा घेतली.
यानंतर तिथल्या सरकारने चीनसोबत एक करार केला असून, या करारांतर्गत दोन्ही देश आता डॉलरऐवजी एकमेकांच्या चलनाची देवघेव करून व्यापार करतील.
लॅटिन अमेरिकेतील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेल्या या बदलानंतर आता बोलिव्हियाचे राष्ट्रपती लुईस एर्स म्हणाले की, हा एक प्रकारचा प्रादेशिक ट्रेंड बनत चाललाय. आणि यात आमचा देश देखील सामील होऊ शकतो.
यावर्षी 10 मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी युआनचा वापर करण्यावर भर दिला.
ते म्हणाले की, "लॅटिन अमेरिकेतील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांनी चीनशी युआनमध्ये व्यापार करण्याचा करार केलाय. हा एक प्रकारचा प्रादेशिक ट्रेंड बनत चाललाय. लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये अमेरिकेचा नेहमीच प्रभाव राहिलाय. पण आता अनेक देश चीनसोबत युआनमध्ये व्यापार करू लागलेत. आता गोष्टी बदलू लागल्या आहेत."
पण तज्ज्ञांच्या मते, चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढतोय. या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्या चलनाचा प्रचार करायचा आहे. लॅटिन अमेरिकन देश आता युआनमध्ये व्यापार करायला तयार झालेत, हे त्याचंच उदाहरण आहे.
चीनची रणनीती
वॉशिंग्टनमधील थिंक टँक विल्सन सेंटर फॉर इंटर-अमेरिकन डायलॉगच्या आशिया आणि लॅटिन अमेरिका कार्यक्रमाच्या संचालक मार्गारेट मायर्स यांच्या मते, "वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आपलं चलन वापरात यावं म्हणून चीन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. हा मुद्दा केवळ ब्राझील आणि अर्जेंटिनाचा नाहीये. ही एक प्रादेशिक घटना आहे."
त्यामुळे लॅटिन अमेरिकेत चीनचं हे चलन कितपत वापरलं जाणार यावर लक्ष ठेवावं लागेल असाही इशारा त्यांनी दिलाय.

फोटो स्रोत, Getty Images
मागच्या दहा वर्षांत चीनने लॅटिन अमेरिकेतील काही देशांशी आपले व्यापारी संबंध मजबूत केलेत. शिवाय काही देशांना आर्थिक मदतही देऊ केलीय. यातूनच चीनने आपल्या चलनाचा प्रचार आणि प्रसार सुरू केलाय.
2015 मध्ये चिनी अधिकाऱ्यांनी चिलीसोबत गुंतवणूक केली. त्याचबरोबर चलन विनिमयाचा करार देखील केला होता. या करारांतर्गत चीनने युआनमध्ये व्यापार करण्यासाठी या लॅटिन अमेरिकन देशात बँक सुरू केली आहे.
त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी अर्जेंटिनाबरोबर करार करून द्विपक्षीय व्यापारासाठी युआनची देवघेव व्हावी म्हणून अधिकृतपणे बँक उघडली.
या विशेष बँकांना क्लिअरिंग हाऊस असं म्हटलं जातं.
साधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापारात एखाद्या देशाच्या चलनाचं डॉलरमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये व्यापार केला जातो. आणि पुन्हा हे डॉलर आपापल्या चलनात बदलले जातात. पण चीनच्या या संस्था आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये डॉलरचा वापर न करता थेट स्थानिक चलन आणि युआनमध्ये व्यापार करतात.
युआनची देवाणघेवाण वाढावी या उद्देशाने चीनने इतरही भागात असेच करार केलेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चीनने लॅटिन अमेरिकेतील आपला सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असलेला देश, ब्राझीलसोबतही असाच करार केलाय. 2022 मध्ये या दोन्ही देशांमधील व्यापार 150 अब्ज डॉलर इतका होता.
ब्राझीलने यावर्षीच्या एप्रिलमध्ये चीनसोबत युआनमधील पहिला द्विपक्षीय व्यापार पूर्ण केला. चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँकेने यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी ब्राझिलियन व्यापाऱ्यांना आश्वासन देताना म्हटलंय की, युआनमध्ये होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचं देय ब्राझिलियन रिअलमध्ये केलं जाईल.
युआनचा वाढलेला वापर
ब्राझीलचे माजी परदेश व्यापार मंत्री वेल्बर बर्राल सांगतात की, जर व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असेल तर युआनचा वापर करणं सोयीचं ठरतं. आणि शिवाय याचं डॉलरमध्ये रूपांतर करण्याची गरज पडत नाही.
बर्राल पुढे म्हणाले की, "युआनमध्ये व्यापार केल्यामुळे दुसरे देश त्यांचं चलन सहज रुपांतरीत करू शकतील. यातून युआनचा वापर वाढेल ही चीनची रणनीती आहे."
पण चीनचा ब्राझीलसोबतचा 90 टक्के व्यापार अजूनही डॉलरमध्येच होत असल्याच ते सांगतात.
कदाचित येणाऱ्या काळात या दोघांमधील करारामुळे युआनच्या माध्यमातून होणारा व्यापार वाढेल आणि ब्राझीलच्या परकीय गंगाजळीत डॉलरनंतर युआन आपलं स्थान निश्चित करेल. पण सध्या तरी तशी परिस्थिती नाहीये.
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्राझीलच्या परकीय चलन साठ्यामध्ये 80 टक्के अमेरिकन डॉलर होता, तर युआन फक्त 6 टक्के होता.

फोटो स्रोत, REUTERS/FLORENCE LO
अर्जेंटिनाने चीनसोबत 5 अब्ज डॉलरच्या विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे. यावर अर्जेंटिनाचे ऊर्जा मंत्री सर्जिओ मास्सा यांनी एप्रिलमध्ये सांगितलं की, चीन मधून होणाऱ्या आयातीसाठी ते डॉलरऐवजी युआनमध्ये पैसे देतील.
मे महिन्यात चीनसोबत होणारा 1.04 अब्ज डॉलरचा व्यापार युआनच्या माध्यमातूनच होईल, असं अर्जेंटिनाने सांगितलंय.
यात इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींपासून वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. दुसरीकडे अर्जेंटिना आणि अमेरिकेचं व्यापार मूल्य महिन्याला सरासरी 79 कोटी डॉलर इतकं आहे.
मध्यंतरीच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे अर्जेंटिनाची परकीय गंगाजळी घटली होती. पण चीनसोबत करार करून ते आंतरराष्ट्रीय चलन साठ्यात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
अर्जेंटिनाच्या मध्यवर्ती बँकेला देशाचे पेसो चलन स्थिर करण्यासाठी एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलर्सही विकावे लागले होते.
बोलिव्हियालाही सध्या अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतोय. त्याचा परकीय चलन साठा संपत चाललाय. त्यामुळे डॉलरमध्ये व्यापार करणं कठीण होऊन बसलंय.
यावर बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस एर्स म्हणतात की, अर्जेंटिना, ब्राझील आणि चीन यांच्यात युआनच्या माध्यमातून परस्पर व्यापार केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.
युआन की डॉलर - कोणाचं पारडं जड?
पण या सगळ्या खेळात भू-राजकीय गोष्टी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
तज्ज्ञांच्या मते, चीनला युआनचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करायचा आहे. आणि यातून केवळ द्विपक्षीय व्यापारालाच चालना मिळणार आहे असं नाही.
तर गेल्या कित्येक दशकांपासून डॉलरमध्ये सुरू असलेल्या व्यापाराला देखील तेवढंच तगडं आव्हान मिळणार आहे.
युक्रेनवर हल्ला केल्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अशात चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं चलन पुढे नेण्यासाठीही खूप मदत मिळत आहे.
2022 मध्ये चीन आणि रशियाच्या व्यापारात युआनने अमेरिकन डॉलरला मागे टाकलंय. 2022 मध्ये झालेल्या रशियन निर्यातीपैकी 23% व्यवहार हे युआनमध्ये करण्यात आले होते.
आणि राहता राहिला चीनचा विषय तर जागतिक व्यापारात युआनचा वाटा केवळ 5 टक्के असला तरी या वर्षी मार्चमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात चीनला डॉलरपेक्षा जास्त देयके युआनमध्ये मिळालीत.
काही तज्ज्ञांना वाटतं की, चीनला डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करायचं आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात त्याच्याशी संबंधित जोखमीपासून वाचता येईल.
अलीकडच्या काळात चीनने युआनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानपासून फ्रान्सपर्यंतच्या अनेक कंपन्यांशी करार केले आहेत.
त्यांनी आपलं डिजिटल चलन सुद्धा सुरू केलंय. हे चलन आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये ग्लोबल इंटरबँक मेसेजिंग नेटवर्क (SWIFT) साठी पर्याय ठरू शकेल.
शिवाय व्यापारात केवळ डॉलरला प्राधान्य देण्याबाबत लॅटिन अमेरिकन देशांनीही काही प्रश्न उपस्थित केलेत.

फोटो स्रोत, AFP
ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) परस्पर व्यापारासाठी डॉलर सोडून इतर चलनाचा विचार करायला हवा अशी सूचना ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासिओ लुला डी सिल्वा यांनी केली होती.
एप्रिलमध्ये चीनच्या दौऱ्यावर असताना लुला डी सिल्वा यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की, "आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोनं सोडून डॉलरचा वापर करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? आम्हाला असं चलन हवंय जे सुधारणा आणि स्थिरता आणेल. कारण आज निर्यात करण्यासाठी देशांना डॉलरच्या मागे पळावं लागतंय."
पण आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर हे सुरक्षित चलन मानलं जात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आणि युआन डॉलरशी स्पर्धा तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत चीन स्वत: त्याच्या भांडवलावरील निर्बंध शिथिल करत नाही.
मार्गारेट मायर्स म्हणतात की, ब्राझील आणि अर्जेंटिनाने चीनशी व्यापारी करार करून देखील येत्या काळात लॅटिन अमेरिकेत युआनच्या वापरात वेगाने वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.
त्या सांगतात, "युआनच्या वापरात नक्कीच वाढ होईल आणि चीन देखील यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असेल. पण जागतिक चलन म्हणून हे स्वीकारलं जाईल का? हे चीनच्या अंतर्गत सुधारणांवर आणि आर्थिक बाजारावर अवलंबून आहे. आणि सध्या तरी हे शक्य दिसत नाही.











