जयशंकर- जागतिक पातळीवर भारताचा सशक्त आवाज की आक्रमकतेमुळे देशात मिळणारी लोकप्रियता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताच्या मते युक्रेन-रशिया युद्धाने जगाला आणखी विभागलं आहे. पाश्चिमात्य देशांनी तयार केलेली व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदलण्याची आवश्यकता आहे.
अमेरिकेसारख्या ताकदवान देशाला ही गोष्ट सांगणार कोण?
चीन खुलेपणाने ही गोष्ट सांगत आहे. विकसनशील देशांचं नेतृत्व करणाऱ्या भारताने ही जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.
पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेबद्दल स्पष्टपणाने बोलणारे अशी डॉ. जयशंकर यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झाली आहे. विकसनशील देशांचे विचार विनासंकोचपणे ते मांडतात.
जयशंकर हे काम चपखलपणे करत आहेत असं भारताचं म्हणणं आहे. रशियाशी संबंध तोडावेत, रशिया-युक्रेन युद्धात युरोपियन देशांना साथ द्यावी असा भारतावर दबाव आहे, पण भारताने असं केलं नाही.
भारताने हे स्पष्ट केलं 'युद्धात कोणाचीच बाजू घेणार नाही'. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावाचा सामना करताना जो आत्मविश्वास दाखवला आहे त्याचा चेहरा आहेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर.
अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या ताकदवान यंत्रणांसमोर जयशंकर निडरपणे भारताची भूमिका मांडत आहेत. जयशंकर टोकदारपणे, बेधडक आणि काही लोकांच्या नजरेत चीड आणणाऱ्या भाषेत बोलत आहेत.
गेल्या काही वर्षांत लोकशाहीचं गुणांकन देणाऱ्या पाश्चिमात्य संस्था भारतात ढासळणारी लोकशाही आणि अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक याबाबत चिंता व्यक्त करत असतात. या चिंतेबाबत जयशंकर यांचा पवित्रा अत्यंत आक्रमक असा असतो.
ते म्हणाले, "हे ढोंग आहे. जगात काही लोकांनी असं प्रमाणपत्र देण्याच्या कामाचा ठेका घेतला आहे. भारत आता त्यांच्या हुकूमाचा ताबेदार नाही हे त्यांना पचत नाही त्यामुळे असं बोलत राहतात."
जयशंकर यांचे तिखट उद्गार मुत्सदी चर्चांमधील शब्दच्छली मुलामा न दिलेले होते.
सर्वसामान्य माणसं स्वत:वर झालेल्या टीकेला अशाच पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे जयशंकर यांना माहिती आहे. अशा वक्तव्यांमुळे जयशंकर हे सर्वसामान्य माणसाच्या नजरेतले नायक झाले.
यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी भाजपच्या नेतृत्वातील सरकारला हिंदू राष्ट्रवादी असं म्हटलं. त्यावर जयशंकर यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं.
त्यावेळी ते म्हणाले होते, "तुम्ही विदेशी वर्तमानपत्रं वाचलीत तर ते हिंदू राष्ट्रवादी सरकार अशा संज्ञा वापरतं. अमेरिका किंवा युरोपात ख्रिश्चन राष्ट्रवादी म्हणत नाहीत. अशा स्वरुपाची विशेषणं ते आपल्यासाठी राखून ठेवतात."
राजकीय आणि परराष्ट्र विषयांचे जाणकार डॉ. सुव्रोकमल दत्ता पाश्चिमात्य देशांप्रति जयशंकर यांच्या आक्रमक पवित्र्याचं समर्थन करतात.
ते सांगतात, "जगातील देश आणि विशेषत: पाश्चिमात्य देशांचा सामना करताना जयशंकर यांच्या दृष्टीने भारताचं हित सर्वतोपरी महत्त्वाचं आहे. युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाकडून खनिज तेल खरेदी करण्यावरुन जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यामुळे भारतात ते अतिशय लोकप्रिय झाले."
पण 'मोदीज इंडिया: हिंदू नॅशनलिझ्म अँड द राईज ऑफ एथनिक डेमोक्रसी' पुस्तकाचे लेखक आणि लंडनमध्ये किंग्ज कॉलेजातील प्राध्यापक क्रिस्टॉफ जॅफरलो यांच्या मते जयशंकर यांचं बोलणं-वावर लोकप्रिय राष्ट्रवाद्यासारखा आहे. देशातल्या जनतेला जिंकून घेण्यासाठी ते असं बोलतात.

फोटो स्रोत, Getty Images
"ज्या पद्धतीने जयशंकर पश्चिमकडच्या देशांबद्दल बोलतात त्यामागचा उद्देश देशांतर्गत पातळीवर छाप सोडण्याचा असतो. म्हणूनच ते असा आक्रमक पवित्रा स्वीकारतात. अशी भूमिका घेणं नवीन नाही."
क्रिस्टॉफ पुढे सांगतात, "जगातले बहुतांश राष्ट्रवादी नेते असंच बोलतात. तुर्कीचे अर्दोआन याच पद्धतीने बोलतात. हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान याच स्वरुपाचं बोलतात. आपापल्या देशातल्या जनतेला आकृष्ट करण्यासाठी असं बोलण्याची पद्धत आहे. सर्वसामान्य जनतेला बिनधास्त भाषा, दृष्टिकोन आणि व्यंगात्मक भाषा आवडते."
लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील सेंटर फॉर स्टडी ऑफ द डेमोक्रसीच्या संचालक प्राध्यापक निताशा कौल यांच्या मते, "भारत आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील मध्यस्थ म्हणून जयशंकर अतिशय सावध आणि चतुराईने रिव्हर्स इंजिनियरिंगचा वापर करतात."
ते अशी तर्कसुसंगत मांडणी करतात जो सिद्धांत सर्वसामान्यांनाही ठाऊक असतो. पण ते त्याच जुन्या तर्कांना, स्वदेशी भूमिकेला योग्य ठरवतात.
निताशा कौल सांगतात, "पश्चिमकडील देशांमध्ये अशी खूप माणसं आहेत जी जयशंकर यांच्या पाश्चिमात्य देशांबद्दलच्या टीकेचं समर्थन करतात. देशातल्या जनतेचं मन जिंकून घेण्यासाठी ते त्याच क्लृप्त्यांचा उपयोग करतात. पश्चिमेकडच्या देशांच्या टीकेसाठीही याच गृहितकांचा आधार घेतात."
मित्र आणि शत्रू याकडे कसं पाहतात?

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक हुआंग युनसॉन्ग हे चीनमधल्या चेंगडू शहरातील सिचुआन विद्यापीठात स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे असोसिएट डीन आहेत. जयशंकर प्रदीर्घ काळ भारताचे चीनमधले राजदूत म्हणून कार्यरत होते.
हुआंग सांगतात, "चीनच्या बौद्धिक आणि सामरिक क्षेत्रातील काहीजण जयशंकर यांना ओळखतात. ते जयशंकर यांना सर्वसमावेशक मुत्सदीकार म्हणून आदर देतात. जयशंकर कठोर, तीक्ष्ण आणि धाडसी आहेत."
"मुत्सदी पातळीवर शांत आणि वेगवान विचारांसाठी ओळखले जातात. भारताची सामरिक स्वायतत्ता कायम कशी राखली जाईल यावर त्यांचा भर असतो."
प्राध्यापक निताशा कौल यांच्या मते मानवाधिकारांच्या नावाखाली दुसऱ्या देशातील घटनांमध्ये मध्यस्थी करणं, लोकशाहीला चालना देण्याच्या नावावर पाश्चिमात्य देश ढोंगी दृष्टिकोन अवलंबतात हे नाकारुन चालणार नाही.
त्या पुढे म्हणतात, "“मी जे काम केलंय त्यावरून लक्षात येतं की हे धोरण म्हणजे वसाहतवादच्या जुन्या जखमांना नैतिकतेचं शस्त्र बनवून पाश्चिमात्य देशांच्या विरोधात वापरण्याचं आहे. तेच स्वदेशी आक्रमकता आणि अहंकारच्या रूपात समोर येतं.”
जयशंकर जे वागत बोलत आहेत आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट जयशंकर यांच्यासारख्या चेहऱ्याच्या माध्यमातून पाश्चिमात्य देशांना त्यांचा इतिहास आणि मानवतेच्या मुद्यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचंच उदाहरण आहे.
प्राध्यापक निताशा कौल यांच्या मते, "पाश्चिमात्य देशांना जयशंकर यांच्या खणखणीत पावित्र्याचा अंदाज आहे. पण या देशांचं मुख्य आव्हान असणाऱ्या चीनच्या वक्तव्यांशी जेव्हा ते जयशंकर यांच्या उद्गारांची तुलना करतात तेव्हा ते कमी तीव्र भासतात."
त्या सांगतात, "जयशंकर यांची ही खेळी यशस्वी आहे. कारण यात चीन भारताचा मोठा व्यापारी सहकारी आहे. पाश्चिमात्य देशांचे जाणकार ज्यांना जयशंकर यांच्या उद्गारांमागचे संदर्भ माहिती आहेत त्यांना असं वाटतं की चीनच्या तुलनेत भारताला मोठा धोका नाही."

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक क्रिस्टॉफ जॅफरलो यांच्या मते, "पाश्चिमात्य देशांचा दबदबा असलेली विश्वव्यवस्था बदलते आहे यावर जयशंकर यांचा विश्वास असल्याचं त्यांच्या धाडसी वक्तव्यं आणि भाषणातून जाणवतं."
'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर ऐन अनसर्टन वर्ल्ड' (2020) या पुस्तकात जयशंकर यांनी वारंवार याचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, बदल अशा पद्धतीने होत आहेत की असे बदल आपण कोणी पाहिलेले नाहीत.
प्राध्यापक जॅफरलो सांगतात, "जगात सत्तेचा लंबक कुठल्या दिशेने जात आहे याचा इशारा आहे. विकसनशील गटातले आणि हळूहळू विकासाच्या मार्गावर असणारे देश आपल्या प्रवासाची गाथा सांगतात. पश्चिमकडचे देश ढोंग करतात. जर तुम्ही स्वत: अनैतिक गोष्टी करत असाल तर मग तुम्हाला अन्य कोणाला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार नाही".
जयशंकर यांची प्रगती
जयशंकर यांचे ग्रह चांगले आहेत असा सूर मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. ज्या पद्धतीने जयशंकर यांनी युक्रेन युद्ध आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचं प्रकरण हाताळलं आहे त्याने त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक पसंतीचे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ. सुवोक्रमल दत्ता सांगतात, "परराष्ट्र मंत्री म्हणून दिवंगत सुषमा स्वराज यांच्याप्रमाणे जयशंकर काम करत आहेत. परराष्ट्र मंत्री म्हणून डॉ. जयशंकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा उजवं काम केलं आहे."
ही खूपच मोठी गोष्ट आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा जयशंकर यांचा प्रवास एका व्यावसायिक मुत्सदीकाराची यशोगाथा आहे.
1955 मध्ये दिल्लीत जयशंकर यांचा जन्म झाला. सरकारी अधिकारी होण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील के.सुब्रमण्यम हे प्रसिद्ध प्रशासक होते. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय संबंध विषयात दिल्लीतल्या प्रसिद्ध अशा जेएनयू विद्यापीठातून डॉक्टरेटची डिग्री मिळवली.
त्यावेळी त्यांच्याबरोबर शिक्षण घेतलेल्या समकालीन मंडळींना वाटतं जयशंकर हे एक खुल्या विचारांचे उदारमतवादी आहेत. त्यांचा पश्चिमेकडच्या लोकशाहीवरही विश्वास आहे.
जयशंकर यांनी राजदूत म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1977 मध्ये केली. अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलं.
अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून (2013-2015) या कालावधीत काम करताना अमेरिकेत धोरणांशी संबंधित लोकांबरोबर त्यांनी जवळून काम केलं. भारत-अमेरिका आर्थिक संबंध दृढ करण्यात त्यांची भूमिका मोलाची होती.
दोन्ही देशांमधले सामरिक संबंध अधिक चांगले होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
विदेशी धोरणांच्या जाणकारांनुसार जयशंकर चीनमध्ये 2009 ते 2013 मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत असताना त्यांच्या विचारांमध्ये अमूलाग्र बदल झाला. 2011 मध्ये ते पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने चीनला गेले होते.
काही दिवसांपूर्वीच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी त्या भेटीला उजाळा दिला होता. "मी पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना 2011 मध्ये भेटलो. ते चीनमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. त्या भेटीत त्यांच्या कार्यपद्धतीचा, विचारांचा माझ्यावर प्रभाव पडला", असं ते म्हणाले होते.
"2011 पर्यंत मी असंख्य मुख्यमंत्र्यांना अशा स्वरुपाच्या दौऱ्यांवर पाहिलं होतं. पण मी याआधी कुठल्या मुख्यमंत्र्याला इतक्या तयारीनिशी आलेलं पाहिलं नाही", असं त्यांनी सांगितलं.
जयशंकर यांची वैचारिक वाटचाल

फोटो स्रोत, Getty Images
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तोपर्यंत जयशंकर यांची अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती. जयशंकर यांच्या विचारांमध्ये झालेल्या बदलाचं ते निदर्शक होतं हे सांगणं कठीण आहे. सप्टेंबर 2014 मध्ये मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून अमेरिकेला गेले तेव्हा जयशंकर यांच्याशी सुरेख ताळमेळ होता.
राजदूत म्हणून जयशंकर यांनी मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या तयारीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. न्यूयॉर्क इथे मॅडिसन स्क्वेअर इथे हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या आयोजनाची खूप चर्चा झाली.
गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमात जयशंकर यांनी त्यासंदर्भात सांगितलं होतं. ते म्हणाले, "मॅडिसन स्क्वेअर कार्यक्रमादरम्यान मी भारताचा राजदूत होतो. खूप लोकांना असं वाटतं की तो कार्यक्रम ऐतिहासिक होता. नरेंद्र मोदी यांनी जयशंकर यांना परराष्ट्र सचिव (2015-2018) म्हणून नियुक्त केलं. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची भूमिका मोलाची होती".
नियमांवर आधारित वैश्विक व्यवस्था असावी ही धारणा बिंबवण्यात त्यांचं योगदान सिंहाचं होतं.
जयशंकर यांनी सांगितलं की, परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अनेक दौरे केले. मात्र त्यांच्यावर हेही आरोप होतात की परराष्ट्र सचिव म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याऐवजी आपल्या राजकीय नेत्याची मर्जी जपली".
2019 निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जयशंकर यांची परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती केली. त्यावेळी जयशंकर परराष्ट्र सचिवपदावरून निवृत्त होऊन एका नव्या आयुष्याची तयारी करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
परराष्ट्र धोरणांच्या जाणकारांनुसार परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त होत असलेल्या प्रशासकाला थेट कॅबिनेट मंत्रीपदी नेमणं अभूतपूर्व गोष्ट होती. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मला याचा जराही कल्पना नव्हती असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी महिनाभर सखोल विचार केला. विचाराअंती त्यांनी होकार भरला. परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वाची शपथ घेतली.
जेव्हा जयशंकर पराष्ट्र मंत्री झाले तेव्हा एका वर्तमानपत्राने मथळा दिला - 'मोदी यांच्या संकटमोचकाने घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ'.
मोदी यांच्याप्रति असलेल्या निष्ठेला कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने पुरेपूर न्याय देण्यात आला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चार वर्षात मोदींच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात वलयांकित चेहऱ्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
एकेकाळी उदारमतवादी असलेल्या जयशंकर यांनी आपली वैचारिक बैठक बदलली आहे.
जयशंकर यांच्या परराष्ट्र धोरणांची तत्वं
जयशंकर यांच्या पुस्तकानुसार त्यांचं परराष्ट्र धोरण 3 तत्वांवर आधारित आहे.
आघाडीपेक्षा भागीदारीवर जयशंकर यांचा विश्वास आहे. बहुलतावाद तसंच बहुपक्षीय राजकारणाचे ते पुरस्कर्ते आहेत.
बहुध्रुवीय जागतिक रचनेवर त्यांचा विश्वास आहे. या व्यवस्थेअंतर्गत ज्या संघर्षांना सामोरं जावं लागतं त्याला त्यांची तयारी आहे.
या दोन्ही भूमिकांचे परिणाम विरोधाभासी आहेत, पण जयशंकर यांना हे विरोधाभास मान्य आहेत.
जयशंकर यांचं पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झालं आहे. त्यानंतर बरेच बदल झाले आहेत.
जयशंकर या तत्त्वांचं पालन करतात का?
प्राध्यापक जॅफरलो यांच्या मते, "विरोधाभासांचा फायदा उठवणं प्रत्येकवेळी शक्य नसतं. चीन हिमालयात घुसखोरी करतो आहे. तरीही ब्रिक्ससारख्या मंचावर भारताचं चीनशी वागणं चांगलंच असतं. हे किती दिवस चालणार?"
"चीनचं वागणं असंच आक्रमक राहिलं तर भारताला पाश्चिमात्य देशांना साद घालावी लागेल. आता रशियाचाही पर्याय राहिलेला नाही कारण रशिया आणि चीन सातत्याने जवळीक वाढते आहे."
दोन ध्रुवीय जगातला एक ध्रुव चीन होणं भारतासाठी चिंतेची बाब आहे. पण या गोष्टीने अमेरिकाही चिंतित आहे. म्हणूनच जयशंकर आणि पर्यायाने भारत आक्रमक पद्धतीने धाडसी पद्धतीने आपलं म्हणणं मांडत आहेत.
"आज भारत ज्या महत्त्वपूर्ण स्थितीत स्वत:ला पाहतो आहे, ती फार टिकणारी नाही असं प्राध्यापक जॅफरलो यांना वाटतं. ते सांगतात, आजच्या तारखेत प्रत्येक देश भारताला आपल्या बाजूने असावा यासाठी प्रयत्नशील आहे. तुम्ही अमेरिकेला हे विचारलंत तर त्यांचंही हेच उत्तर असेल."
"रशियाचाही हाच विचार असेल. जग दोन ध्रुवीय व्यवस्थेकडे चाललं आहे. अशी वेळ येऊ शकते जेव्हा निष्पक्ष राहणं शक्य नसेल."
सत्य हे आहे की चीनच्या बरोबरीने भारत एकसिवाव्या शतकात आशियाची ताकद होऊ पाहत आहे. त्यांनी आपल्या पुस्तकातही हाच विचार रेटला आहे.
ज्याने कुणीही जयशंकर यांचं पुस्तक वाचलं आहे तो सांगू शकतो की ते चीनच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीचे चाहते आहेत. भारताने चीनकडून शिकायला हवं असं त्यांना वाटतं.
अंतर्विरोध
चीनचे जाणकार प्राध्यापक हुआंग युनसाँग सांगतात, "जयशंकर यांचा चीन आणि भारत मिळून 21व्या शतकातील आशियातील सद्दी होण्याचा त्यांचा विचार त्यांचा आक्रमक दृष्टिकोन आणि चीनप्रतीचं धोरण यांच्याशी मेळ खाणारा नाही."
याचं कारणही हुआंग सांगतात. ते म्हणतात, "चीन आणि भारत दोन वेगवेगळी सत्ताकेंद्र आहेत. दोन्ही देशांची संस्कृती निरनिराळी आहे. भौगोलिकताही वेगवेगळी आहे. इतिहासात फार कमी वेळा ते पराभूत झाले आहेत."
1980च्या दशकात आशियाई महासत्ता म्हणून आपल्या नेत्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या दोन्ही देशांचा विकास आणि समृद्धी यांच्याशी संलग्न होत्या. पण आज वेगाने वाढणारी राष्ट्रवादाची भावना तसंच चुकीच्या सामरिक निर्णयांनी भारत आणि चीन यांच्यातील वादविवाद आणखी वाढले आहेत.
हुआंग सांगतात, "दोन्ही देशातील सामरिक भागीदारी कमी होऊन शेजारचे शत्रू म्हणून एकमेकांकडे बघण्याची वेळ आली आहे. दोस्ती दूर राहिली, त्याची जागा शत्रूत्वाने घेतली आहे."
प्राध्यापक जॅफरलो यांनाही भारत आणि चीन सहकार्याने आशियाई सद्दी होण्याच्या जयशंकर यांच्या विचार पटत नाहीत. हा खूप दूरचा विचार असल्याचं त्यांना वाटतं.
जॅफरलो अनेक प्रश्न उपस्थित करतात. चीन कोणत्या पद्धतीने भारताची मदत करु शकतो? पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी कमी करण्यासाठी भारत कोणत्या प्रकारे चीनची मदत करू शकतो? भले पाश्चिमात्य देशांची पकड कमी होईल. पण त्यांच्या जागी कोणीतरी शक्तिशाली होईलच मग ते कोण असेल? जगात चीनची मक्तेदारी होण्यासाठी भारताने मदत करावी का?
जैफरलो यांच्या मते, "आगामी काळात भारताला दोन प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागेल. जगाची दोन गटात विभागणी होणार आहे म्हणून नव्हे तर विकसित देशांमध्येही भारत चीनच्या तुलनेत खूप मागे राहणार आहे म्हणून. कारण महासत्ता होण्यासाठी प्रचंड प्रमाणात संसाधनं आवश्यक असतात".
डॉक्टर सुव्रोकमल दत्ता यांना जयशंकर यांचा भारताने चीनच्या बरोबरीने मोठं होण्याचा सिद्धांत पटतो. पण त्याआधी चीनने आपलं वर्तन सुधारावं असं त्यांना वाटतं.
"चीन आणि भारत मिळून आशियाई महासत्ता होऊ शकतात, हे शक्यही आहे आणि तर्कसुसंगतही. पण त्यासाठी चीनने भारतविरोधी कुरापती बंद करायला हव्यात," ते म्हणतात.
जयशंकर किती यशस्वी?
परदेशात भारताचे मित्र आणि शत्रूंना हाताळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राजकीय नेत्याला असं वाटतं की भारताचा प्रभाव कमी झाला आहे.
ते सांगतात, "सौदी अरेबियापासून चीनपर्यंत तुम्ही नकाशावर लांब रेषा काढलीत तर पश्चिमेकडचा भाग चीन, रशिया, सौदी अरेबिया आणि इराणच्या ताब्यात आहे. आपण उंबरठ्यावर आहोत. दुसऱ्या फळीतले आहोत. मोदी यांनी आपल्या कार्यकाळात जे कमावलं त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे".
चीनच्या तुलनेत भारत जागतिक स्तरावर पिछाडीवर जात आहे.
अलीकडे सौदी अरेबिया आणि इराण यांनी शत्रूत्व संपवून मैत्रीचा हात दिला तेव्हा चीनने मध्यस्थाची भूमिका पर पाडली होती. सौदी अरेबिया आणि इराण दोन्ही देश भारताचे निकटवर्तीय मानले जातात.
चीनबद्दल सम्यक जाण असणारा जयशंकर यांच्यासारखा माणूस सापडणं कठीण आहे.
नऊ वेळा चीनचा दौरा करणारा मोदींसारखा दुसरा नेता सापडणार नाही. चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तर पाचवेळा भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी चीनला गेले आहेत.
भारत आणि चीन संबंधांमधील तणाव या दोघांनी कमी करावा अशी दोघांकडून अपेक्षा होती.
पण तूर्तास हा दबाव वाढत असल्याचं लक्षण आहे. शांतता नांदण्याची शक्यता कमीच दिसते आहे.
जयशंकर यांची वाटचाल
1977 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू
1985-1988 या काळात मॉस्कोत भारतीय दूतावासात कार्यरत
1990-1993 कालावधीत टोक्योत भारतीय दूतावासात डेप्युटी म्हणून जबाबदारी
1993-1995 या काळात विदेश मंत्रालयात संचालकपदी (पूर्व आशिया)
1995-1998 विदेश मंत्रालयात संयुक्त सचिव (अमेरिका)
2000-2004 कार्यकाळात सिंगापूरमध्ये भारताचे राजदूत
2007-2009 विदेश मंत्रालयात अतिरिक्त सचिव. अमेरिका-भारत अणू करारात भारताचं नेतृत्व
2009-2013 चीनमध्ये भारताचे राजदूत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका
2013-2015 अमेरिकेत भारताचे राजदूत. पंतप्रधान मोदी यांच्या न्यूयॉर्क येथील रॅलीच्या आयोजनात निर्णायक भूमिका.
2015-2018 भारताचे विदेश सचिव म्हणून पॅरिस इथे झालेल्या करारात भारताचं प्रतिनिधित्व
2019 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








