चीनकडून होणाऱ्या आयातीत 7 वर्षांत 60% वाढ, भारत कोणत्या गोष्टी सर्वाधिक खरेदी करतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत आणि चीनच्या सीमेवर पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. यावेळी लडाखऐवजी अरुणाचल प्रदेशचा सीमाभाग तणावाच्या केंद्रस्थानी आहे.
9 डिसेंबरच्या सकाळी तवांग सेक्टरच्या यांगत्सेमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट यासाठी कारणीभूत ठरली आहे. या झटापटीत काही भारतीय जवानही जखमी झाले आहेत. यापूर्वी गलवानच्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता.
गलवानच्या आधी डोकलाममध्ये दोन्ही देश जवळपास अडीच महिने एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गेल्या 7 वर्षांत एकीकडे चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढला आहे, तर दुसरीकडे भारताचे चीनवरील अवलंबित्वही कमी झालेले नाही.
यादरम्यान, भारतानं चीनकडून वस्तूंच्या खरेदीत जवळपास 60 % वाढ केली आहे.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर 2014 मध्ये भारत चीनकडून वस्तू खरेदी करण्यासाठी 100 रुपये खर्च करत होता, आज ती रक्कम 160 रुपये झाली आहे. ज्या देशापासून धोका जाणवतो, त्या देशावरील अवलंबित्व कमी केलं पाहिजे, असं म्हटलं जातं. रशिया-युक्रेन युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसून येतील, अशीच आश्वासनं अलीकडच्या काळात दिली आहेत. सीमेवर तणाव असूनही भारत आपलं चीनवरील अवलंबित्व कमी करू शकत नाही याचं कारण काय आहे? भारत चीनकडून सर्वाधिक कोणत्या वस्तू खरेदी करतो? भारत या मार्गावर चालत राहिल्यास भविष्यात देशाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो?
चीनकडून किती आयात?
भारतानं 2021-22 या वर्षात जगभरातील 216 देशांमधून वस्तूंची खरेदी केली. यावर भारतानं 61 हजार 305 कोटी अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत.

भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या खर्चाचा सर्वाधिक फायदा चीनला झाला आहे. भारताच्या एकूण आयातीत चीनचा वाटा 15.42 % होता.
चीनशिवाय संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, इराक, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया आणि कोरिया या देशांची नावे पहिल्या 10 देशांमध्ये समाविष्ट आहेत.
चीनच्या या मालाची सर्वाधिक गरज
चीनवरील भारताच्या अवलंबित्वामागे औद्योगिक धोरणाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचं अर्थतज्ज्ञ संतोष मेहरोत्रा यांचं मत आहे.
बीबीसी हिंदीशी बोलताना ते सांगतात, "मागील सरकारनं 2011 मध्ये नवीन उत्पादन धोरण बनवलं होतं, पण सरकार ते लागू करू शकलं नाही. 1992 ते 2014 पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये उत्पादनाचं प्रमाण 17 % राहिलं, पण 2014 मध्ये दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली."
सोप्या शब्दात सांगायचं तर 100 रुपयांपैकी भारत चीनकडून 15 रुपयांच्या वस्तू खरेदी करतो. त्यामुळे मग त्या कोणत्या वस्तू आहेत ज्यासाठी भारताला चीनवर अवलंबून राहाव लागतं हा प्रश्न आहे.

2021-22 मध्ये भारताने चीनकडून जवळपास 3 हजार कोटी अमेरिकन डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल मशिनरी, उपकरणे, सुटे भाग, ध्वनी रेकॉर्डर, टेलिव्हिजन आणि बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत.
पहिल्या दहा गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर त्यात इलेक्ट्रॉनिक सामानाव्यतिरिक्त न्यूक्लियर रिअक्टर्स, बॉयलर, सेंद्रिय रसायने, प्लास्टिक वस्तू, खतं, वाहनांशी संबंधित वस्तू, रासायनिक उत्पादनं, लोखंड आणि पोलाद, लोखंड आणि स्टीलच्या वस्तू आणि अॅल्युमिनियम यांचा समावेश होतो.
भारत चीनला काय देतं?
चीनमधून होणाऱ्या आयातीविषयी अधिक समजून सांगताना अर्थतज्ज्ञ संतोष मेहरोत्रा सांगतात की, भारत चीनला कच्चा माल विकण्याचं काम करतो, तर तयार झालेली उत्पादनं तिथून आयात करतो.
मेहरोत्रा सांगतात, "भारत इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मशिनरी व्यतिरिक्त चीनकडून अनेक प्रकारची रसायनं खरेदी करतो. भारताच्या फार्मा उद्योगासाठी ही रसायनं खूप महत्त्वाची आहेत. आपल्या देशात यापासून औषधे बनवली जातात, पण त्यांची मूळ सामग्री चीनमधूनच येते."
दुसरीकडे, भारत चीनला कापूस, लोखंड आणि पोलाद, कृत्रिम फुले, धातू, स्लॅग, राख आणि सेंद्रिय रसायने मोठ्या प्रमाणावर विकतो.
‘गलवान’नंतर चीनशी व्यापार
2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एप्रिल 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सुरू झालेल्या लष्करी संघर्षानंतर, भारतानं चीनला स्पष्टपणे सांगितलं होतं की, सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य राहू शकत नाहीत.
मोदी सरकारनं अनेक निर्बंध लादल्यामुळे चीनमधून येणारी गुंतवणूक कमी झाली होती. भारतानं 5G चाचणीतून चीनी कंपन्यांना वगळलं आणि 200 हून अधिक चीनी अॅप्सवर बंदी घातली.
दुसरीकडे, भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली गलवाननंतरही चीनमधून आयात वाढतच आहे, हे लक्षात येतं.
वर्ष 2019-20 मध्ये, भारतानं चीनसोबत एकूण 86 अब्ज अमेरिकन डॉलरचा व्यापार केला होता, ज्यामध्ये जवळपास 65 अब्ज डॉलरची आयात आणि 16 अब्ज डॉलरची निर्यात समाविष्ट होती.
2021-22 मध्ये, यात वाढ होऊन व्यापार 115 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचला. ज्यामध्ये आयात 94 अब्ज डॉलर आणि निर्यात 21 अब्ज डॉलर आहे.

या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबरचा विचार केल्यास भारतानं चीनसोबत जवळपास 69 अब्ज डॉलरचा व्यापार केला आहे, ज्यामध्ये केवळ 8 बिलियन डॉलरची निर्यात आहे.
जर आपण चीनसोबतच्या व्यापारातील तुटीबद्दल बोललो, तर 2014-15 मध्ये ती जवळपास 48 अब्ज डॉलर होती, जी 2021-22 मध्ये वाढून 73 अब्ज डॉलर झाली आहे.
स्वस्त वस्तूंचं चीनी धोरण
आत्मनिर्भर भारताच्या आवाहनानंतरही चीनसोबतची भारताची व्यापार तूट कमी झालेली नाही. चीन मोठ्या प्रमाणावर जगभरात माल निर्यात करतो. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ एसपी शर्मा सांगतात, चीनचं तत्वज्ञान डंप करणं हे आहे. त्यामुळे भारताची चीनसोबतची व्यापार तूट तर वाढत आहेच पण उद्योगधंद्यांचंही नुकसान होत आहे.
ते सांगतात, "'चीन स्वस्तात वस्तू बनवतो आणि भारतात डंप करतो. सरकारनं चिनी उत्पादनांची गुणवत्ता तपासायला हवी. भारतात चिनी खेळण्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत वेगवेगळ्या योजना आणत आहे. मेक इन इंडियापासून व्यवसाय सुलभतेचा ट्रेंड वाढला आहे. सिंगल विंडो सिस्टीममुळे उत्पादन क्षेत्रही मजबूत होईल."
दुसरीकडे, अर्थतज्ज्ञ संतोष मेहरोत्रा मेक इन इंडियावर प्रश्न उपस्थित करताना म्हणतात, "मेक इन इंडियाने बाजारपेठ खुली करण्याची चर्चा होत आहे, पण इथं उत्पादन क्षेत्राऐवजी एफडीआय हे सेवा सेक्टरमध्ये येत असल्याचं दिसून येत आहे."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात चीनविरुद्ध व्यापारयुद्ध छेडलं होतं. असं असलं तरी 2021 मध्ये दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार 755.6 अब्ज डॉलर इतका होता. 2021 मध्ये दोन्ही देशांच्या व्यापारात 28.7% वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत चिनी वस्तूंविरुद्ध लढणं हे सीमेवर चीनविरुद्ध लढण्यापेक्षा जास्त कठीण आहे, असं तज्ज्ञाचं मत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








