चीनच्या सुसाट प्रगतीमागे आहेत ही 5 ऐतिहासिक कारणं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रा. राणा मिट्टर
- Role, प्रोफेसर, ऑक्सफर्ड विद्यापीठ
व्यापार असो परराष्ट्र धोरण वा इंटरनेट सेन्सॉरशीप या गोष्टींबाबत चीनची भूमिका सातत्यानं ठळक घडामोडींची जागा घेत असते, मात्र चीनची ही भूमिका का निर्माण झाली याची उत्तरं चीनच्या इतिहासात दडलेली आहेत.
जगाच्या पाठीवर आणखी कुठल्यातरी समाजजीवनाबद्दल माहिती असण्यापेक्षा कोणत्याही देशाला आपल्या स्वतःच्या इतिहासाची अधिक ओळख असते.
अर्थात ही ओळख काहीवेळा फसवी असते - माओंच्या सांस्कृतिक क्रांतीसारख्या घटना या अगदी चीनमध्ये आजही चर्चा करण्यासाठी अवघड मानल्या जातात. पण भूतकाळातल्या किती आणि कोणत्या घटनांचे पडसाद वर्तमानावर पडले आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
1) व्यापार
एकेकाळी चीनला आपल्या इच्छेविरुद्ध व्यापार करण्याची सक्ती करण्यात आली होती, ही भूतकाळातली घटना चीन अद्यापही विसरलेला नाही.
आज पाश्चिमात्य देशांकडून चीनी बाजारपेठेला महत्त्व आहे, त्याची चीनला कदर असली तरी एकेकाळच्या भळभळत्या जखमेची ती आठवण असल्यासारखी भावना चीनी लोकांची आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या वाद सुरू आहे तो अमेरिकी उत्पादनांची बाजारपेठ बंद करून चीनी कंपन्यांनी अमेरिकेत व्यापार करावा की करू नये यावरून. तरीही व्यापारातला समतोल राखण्याचं पारडं कायम चीनच्याच बाजूने होतं असं नाही.
सुमारे दीड शतकांपूर्वी व्यापारउदीम आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कटू आठवणी आजही बीजींगवासियंच्या मनात खोल रुतून बसल्या आहेत. या आठवणी आहेत त्या काळच्या जेव्हा चीनचा त्यांच्या स्वतःच्या व्यापारावर अगदी तीळमात्र वचक होता.
अफूच्या व्यापारावरील प्रतिबंधाच्या मुद्द्यामुळे ब्रिटननं चीनवर हल्ला केला आणि अफूची युद्धं लढली गेली. या युद्धांचा सामना चीनला करावा लागला.
पहिलं युद्ध 1839 साली छेडलं गेलं. त्यानंतरच्या दहा वर्षांत ब्रिटननं एका संस्थेची स्थापना केली- इंपिरियल मेरिटाइम कस्टम सर्व्हिस. ही संस्था चीनमध्ये आयात होणाऱ्या मालावर किती जकात द्यावा, हे ठरवण्याचं काम पाहायची.

फोटो स्रोत, Alamy
रचनेप्रमाणे ही संस्था चीनी सरकारचा एक भाग होती, पण ती त्यावर वचक होता ब्रिटिश साम्राज्याचा. बीजिंगमधल्या मँडरीन लोकांकडून (स्थानिकांकडून) तिचा कारभार चालण्याऐवजी पोर्ट डाऊन येथून सगळी सूत्रं हलत होती.
चीनच्या या कस्टम्स विभागाचे इन्सपॅक्टर जनरल म्हणून सर रॉबर्ट हर्ट नियुक्त झाले. हे ब्रिटिश अधिकारी पुढे शतकभर चीनमधले ब्रिटनचे मुत्सद्दी म्हणून ओळखले गेले. चीनी सरकारला पुरेशी उत्पन्न निर्मिती व्हावी, यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पण त्याकाळच्या आठवणी अजूनही चीनची झोप उडवतात.
मींग साम्राज्याच्या काळात परिस्थिती आणखी वेगळी होती. पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला, ॲडमिरल झेंग यांनी सात भल्यामोठ्या आरमारी जहाजांच्या जोरावर दक्षिण-पूर्व आशिया, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीचा काही भाग या ठिकाणी व्यापारी सीमा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं यशस्वी घौडदौड केली होती आणि चीनी सामर्थ्याची जगाला प्रचिती दिली होती.
काही अंशी चीनचा प्रभाव पाडण्याच्या हेतूनं झेंग यांनी सागरी सफर हाती घेतली होती. विविध देशांच्या सागरी सीमा ओलांडून आपल्या बलाढ्य नौका पाठवल्याचा सार्थ अभिमान इतरही अनेक साम्राज्य मिरवत होती, मात्र या सागरी सफारींचा आणखी एक फायदा असा होता. या सफारींमुळे अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी बीजिंगपर्यंत पोहोचत होत्या. चीनमध्ये पहिल्यांदा जिराफ आला तो याच सफारींमुळे.
असे फायदे असले तरी व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा आणि प्राधान्याचाही होता. विशेषः आशियातल्या इतर भागांपर्यंत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची गरज होती.
त्यासाठी लागणारी धमक झेंग हे मध्ये होती, आणि त्यानं तसे केलंही, वेळ पडल्यावर श्रीलंकेच्या राजाशी दोन हात करत त्यानं एका राजाला धूळ चारली होती.
तरीही त्याची ही सफर म्हणजे राष्ट्रप्रणित सागरी मोहिमेचं विरळ उदाहरण मानावं लागेल. पुढील अनेक शतकांमध्ये चीननं सागरी सीमापार केलेला बहुतांशी व्यापार हा कागदोपत्री आला नाही.
2) शेजारील राष्ट्रांशी भांडणं
सर्व सीमांवर सरकारी अंमल, सीमाभागात शांतता प्रस्थापित करणे या गोष्टी नेहमीच चीनला महत्त्वाच्या वाटत आल्या आहेत. आणि याच कारणांमुळे, आज लहरी उत्तर कोरियाचा मुद्दा चीनकडून अत्यंत काळजीपूर्वक हाताळला जातो आहे.
मात्र पहिल्यांदाच चीनला त्यांच्या सीमाभागातील राष्ट्रांशी काही वाद आहेत, असे अजिबात नाही. उलट उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन याच्यापेक्षाही वाईट संबंध शेजारील राष्ट्रांशी चीनचे असल्याचे दाखले इतिहासात सापडतात.

फोटो स्रोत, Getty Images
बाराव्या शतकातली घटना असावी, 1127 सालच्या आसपास सोंग राजवटीच्या काळात, ली क्वींगझाओ नावाच्या स्त्रीनं घरातून पळ काढला आणि ती कैफेंग शहराच्या आश्रयाला आली.
आपल्याला तिची गोष्ट माहिती आहे, कारण चीनमधल्या प्रतिभाशाली कवियित्रींपैकी ती एक मानली जाते आणि आजही तिच्या कविता वाचल्या जातात. मात्र तिनं पळ काढला कारण तिचा देश संकटाच्या छायेत होता.
सोंग साम्राज्यासह होत असलेल्या दीर्घकालीन कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर, उत्तरेतील जीन गटानं चीनवर स्वारी केली होती.
लढाईचे स्वरुप अत्यंत गंभीर होत गेले. चीनमधली महत्त्वाची शहरं जळून बेचिराख झाल्यानं तत्कालीन चीनी वसाहतींमधल्या अनेक प्रस्थापितांना पळ काढून देशात इतरत्र आसरा घ्यावा लागला होता.
आपलं दुर्मिळ आर्ट कलेक्शन अनेक शहरांमध्ये इतस्ततः विखुरल्याचं पाहण्याचं दुर्भाग्य ली क्वींगझाओच्या नशिबी आलं.
शेजारच्यांशी सलोख्याचे संबंध असणं दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी किती गरजेचं आहे, याचा थेट धडाच ली क्वींगआओच्या साम्राज्याच्या भाळी आलेले कटू दिवस पाहून मिळतो.
उत्तर चीनवर आणखी काही दिवस जीन साम्राज्यानं राज्य केले आणि सोंग राजवटीनं दक्षिणेकडील भागात नव्यानं आपलं साम्राज्य वसवलं. मात्र अखेरीस मंगोलियन साम्राज्यानं दोन्ही राजवटींचा पाडाव केला.

फोटो स्रोत, Getty Images
नकाशातल्या बदललेल्या सीमारेषा पाहून चीनी साम्राज्याची व्याख्या काळाबरोबर बदलत गेल्याचं दिसतं. भाषा, इतिहास, आणि कन्फुशियससारखी मूल्यप्रणाली अशा अनेक गोष्टींचा चीनच्या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.
मात्र याच बाबींचा, अन्य राजवटीतील लोकांनी, जसं की मांचू आणि मंगोलियन राज्यसत्तांनी वापर केला आणि चीनमधल्या सिंहासनावरून राज्य केलं. ज्या शिकवण वा मूल्यांचा वापर करून चीनी साम्राज्य समृद्ध झालं त्याचाच आधार घेत विरोधकांनी त्यांच्यावर राज्य केलं.
या शेजाऱ्यांनी फक्त या मूल्यांचं अनुकरण केले नाही तर त्याचा अंगीकार केला आणि काहीवेळा त्याची अशी प्रभावी अंमलबजावणी केली की स्थानिक राज्यकर्त्यांनीच जणू काही सर्व व्यवहार चालवावा.
3) माहितीचा ओघ
राजकीयदृष्ट्या संवेदनशील गोष्टींसाठी आज चीनमध्ये इंटरनेट सेन्सॉरशीप आहे. राजकीय पोलखोल करणाऱ्यांवर संकट ओढवण्याची दाट शक्यता असते, इतकेच नाही तर त्यांना अटकही होऊ शकते वा आणखी वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं.
सरकारविषयीचं सत्य बोलणं-मांडणं यावर असलेली बंदी हा चीनमधला जुनाच मुद्दा आहे. अगदी तिथल्या इतिहासकारांनीही याची कबुली दिली आहे. अनेकदा त्यांना काय महत्त्वाचं वाटतं हे लिहिण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना काय हवं आहे, तेच लिहावं लागतं असं इतिहासकार सांगतात.
मात्र चीनमधले थोर इतिहासकार म्हणून ज्याला ओळखले जातं त्या लेखक सीमा चिआन यांनी वेगळी वाट निवडली होती.

फोटो स्रोत, Alamy
चीनच्या इतिहासातल्या घडामोंडीविषयी अत्यंत महत्त्वाचं लेखन करणाऱ्या, इसवी सन पूर्व पहिल्या शतकात या लेखकानं तेव्हा हिंमत दाखवली होती आणि युद्धात पराजय झालेल्या एका अधिकाऱ्याची बाजू घेण्याचं धाडस केलं होतं.
अर्थातच त्यानं सत्ताधाऱ्यांचा कडवा रोष ओढवून घेतला होता. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली, त्याला लिंगच्छेदाची अमानुष शिक्षा ठोठावण्यात आली.
मात्र त्याच्या या धाडसानं एक मोठा वारसा मागे ठेवला, ज्यामुळे आजपर्यंतच्या चीनच्या इतिहासाची जडणघडण अशी झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
'रेकॉर्ड्स ऑफ द ग्रँड हिस्टोरीयन' अर्थात 'शीजी' म्हणजे चीनमधल्या प्राचीन अवशेषांवरून सीमा चीआन यांनी मांडलेला इतिहास.
हा शीजी तयार करण्यासाठी त्याकाळी या लेखकानं माहितीचे विविध स्रोत, ऐतिहासिक काळातील जाणकारांची मतं तसंच वर्षानुवर्षे लोकांना माहित असलेला मौखिक परंपरेचा दस्तावेज, यात थेट लोकांचा समावेश करून घेणं या प्रकारांची मदत घेतली होती.
इतिहासाची मांडणी वा लेखन करण्याची ही नवी पद्धती मानली जाते, मात्र ही पद्धत त्या काळात उपयोगात आणत या द्रष्ट्या इतिहासकारानं पुढील पिढ्यांसाठी प्रशस्त मार्गच आखून दिला- जर तुम्ही तुमची सुरक्षा धोक्यात घालू शकत असाल, तेव्हाच तुम्ही स्वतःवर सेन्सॉरशीप लादून घेण्याऐवजी, तुम्ही सर्व 'गुणदोषांसह' इतिहास लिहू शकाल- अप्रत्यक्षपणे हाच सल्ला पुढील पिढीला त्यानं देऊ केला जणू!
4) धर्माचं स्वातंत्र्य
आधुनिक चीन माओंच्या सांस्कृतिक क्रांतीच्या तुलनेत लोकांमधल्या धर्म उपासनेबाबत फारच उदार झाला असला तरीही चीनची ही भूमिका एका मर्यादेपर्यंतच आहे.
भूतकाळातील अनुभवांनी चीनला सावध केलं आहे. विश्वासावर आधारित चळवळींमुळे सत्तेला हादरे बसू शकतात. आणि इतकेच नाही तर सरकार उलथवण्याची ताकतही त्यातून निर्माण होऊ शकते, हे चीन जाणून आहे.
असं असलं तरी धर्म आचरणाविषयी अत्यंत उदार धोरण स्वीकारणं हा चीनच्या इतिहासाचा भाग आहे.

फोटो स्रोत, Alamy
सातव्या शतकात, टांग राजवटीच्या सोनेरी कालखंडाच्या काळात खुद्द साम्राज्ञी वू झेटियन हिनं बुद्ध धर्माला आपलंसं केलं होतं. चीनच्या कन्फुशिअस परंपरेमुळे तिचा कोंडमारा होत असावा त्यामुळेच या शिकवणुकीला झुगारून नवीन धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिनं घेतला होता.
मींग साम्राज्याच्या काळातही जेइसुट मॅटिओ रिक्की दरबारात आला, त्यावेळी आदरणीय संभाषणकार म्हणून त्याला मान देण्यात आला. पण पाश्चिमात्य धर्माविषयी (ख्रिश्चन) त्याचं ज्ञान जाणून घेण्यात लोकांना अधिक रस होता. श्रोत्यांचं धर्मांतर करण्याबाबतच्या त्याच्या अप्रत्यक्ष प्रयत्नांबाबत चीनी लोक फारसे गंभीर नव्हते.
मात्र श्रद्धा-विश्वास यांचा बाजार हा नेहमीच भयंकर रुद्रावतारी ठरला आहे.
19 व्या शतकाच्या अखेरीस, हाँग झ्यीक्वान यानं पुकारलेल्या बंडामुळे चीनच्या साम्राज्याला प्रचंड हादरे बसले होते. आपण ख्रिस्ताचा लहान भाऊ असल्याच दावा करत त्यानं नव्याच वादळाची ग्वाही दिली होती.
ताईपिंग येथील या बंडखोरानं स्वर्गाप्रमाणे, शांततेचं साम्राज्य भूतलावर प्रस्थापित करण्याचा वादा लोकांना केला होता. पण प्रत्यक्षात चीनच्या इतिहासातलं सर्वांत रक्तलांछीत नागरी युद्ध यामुळे छेडले गेलं. काही जाणकारांच्या दाव्यानुसार, सुमारे 20 दशलक्ष लोकांचा यात हकनाक बळी गेला.
सरकारी फौजांना सुरुवातीला या बंडखोरांना हाताळणं अवघड गेलं. त्यामुळे स्थानिक सैनिकांना स्वतःला सुधारण्याची संधी त्यांना द्यावीच लागली, मात्र अखेर 1864 मध्ये ताईपिंगचा पाडाव झालाच.

फोटो स्रोत, Getty Images
काही दशकांनंतर ख्रिश्चन धर्म आणखी एका युद्धाला कारणीभूत ठरला. 1900 मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला बॉक्सर म्हणवून घेत ख्रिश्चन मिशनरीज आणि धर्मांतर केलेल्यांविरोधात बंड पुकारलं. ख्रिश्चन मिशनरीज आणि धर्मांतर केलेले नागरिक देशद्रोही असल्याचा टाहो फोडत त्यांनी दक्षिण चीनमध्ये आंदोलन तीव्र केलं.
आधी साम्यवादी सरकारनंही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे हे आंदोलन शमण्यापूर्वी अनेक चीनी ख्रिश्चन नागरिकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं.
यानंतरच्या शतकापासून ते आजपर्यंत चीनची भूमिका-धर्माविषयी उदारमतवादी धोरण ते श्रद्धेचा हा मुद्दा सत्तेला संकटात तर टाकणार नाही ही भीती या दोहोंमध्ये लंबकासारखी दोलायमान राहिली आहे.
5) तंत्रज्ञान
चीनला आज नवीन तंत्रज्ञानाचं जागतिक हब बनलं आहे. शतकापूर्वी त्यांनी औंद्योगिक क्रांतीचीही लाट अनुभवली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही क्रांती घडताना महिला या केंद्रस्थानी होत्या.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), आवाज ओळखण्याचं तंत्रज्ञान, प्रचंड माहिती साठवण्याच्या क्षेत्रात चीन जगभरात उजवा आहे.
जगभरात मोठ्या संख्येनं चीनी बनावटीच्या चीप्स वापरून स्मार्टफोन्स बनवले जातात. अशा चीप्स बनवणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये तरुण महिलांची संख्या मोठी आहे, त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते.
मात्र त्यांना औद्योगिक बाजाराच्या अर्थकारणात पहिल्यांदाच जमेचं स्थान मिळाल्याचं नाकारता येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
100 वर्षांपूर्वी शांघाय आणि यांगत्झे डेट्टाला सुगीचे दिवस आणणाऱ्या कंपन्यांमध्ये कामासाठी रूजू झालेल्या महिलांचा वारसा खऱ्या अर्थानं या महिलांनी पुढे नेला आहे.
अर्थातच शंभर वर्षापूर्वी त्या महिला संगणकीय चीप्स बनवण्यासाठी नाही तर रेशीम आणि सुती धागे विणण्याच्या कंपनीत काम करत होत्या.
तेव्हाही ते काम अत्यंत कठीण होतं, फुफ्फुसाचे आजार होण्याचा धोका असे वा शारीरिक इजा होण्याचीही भीती असे. भरीस भर म्हणून कामगारांच्या वसतिगृहातल्या कडक शिस्तीचा बडगा त्यांना भोगावा लागे.
तरीही महिलांनी स्वतःच्या कामाचा मोबदला मिळण्याचा, स्व-कमाईचा आनंद मोठा असल्याचं सांगितलं. कमाई अल्प असली तरीही कधीकाळी मिळणाऱ्या एखाद्या सुट्टीच्या दिवशी चित्रपटगृहात जाण्याची वा जत्रेला जाण्याची ऐट त्यामुळेच करता आली यातच त्यांनी समाधान मानलं होतं.
काहींनी शांघायमध्ये नव्यानं सुरू झालेल्या मोठमोठाल्या चकचकीत दुकानांना भेट देण्यासाठी- अर्थात खरेदीसाठी नाही तर बहुदा फक्त पाहण्यासाठी प्रवास केला. तत्कालीन चीनमध्ये आधुनिकतेचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे शांघाय असं समीकरण होतं.
उद्याच्या इतिहासकारांच्या दृष्टीकोनातून?
चीन आणखी एका महत्त्वपूर्ण संक्रमणकाळातून जात आहे. 1978 साली अत्यंत गरीब आणि आत्मकेंद्री असलेल्या एका नगण्य देशानं पाव शतकही पूर्ण होण्याच्या आत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे, याची भविष्यातील इतिहासकार नोंद घेतीलच.

फोटो स्रोत, Getty Images
लोकशाहीकरणाची लाट टाळणे अशक्य आहे या धारणेविरोधात पाय घट्ट रोवून उभा असलेला महत्त्वाचा देश म्हणजे चीन. अशीही नोंद जगाला घ्यावी लागेल.
एक अपत्य धोरण (आता संपुष्टात आलं आहे), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर असे कदाचित आणखी काही मुद्दे ज्यांमुळे भविष्यातील लेखकांना चीनची भुरळ पडेल. किंवा पर्यावरण, अंतराळ शोधमोहीम किंवा आर्थिक विकास असे अजून आम्हालाही तर्क लावता आलेले नाहीत असे अनेक मुद्दे कदाचित त्यावेळी प्रमुख ठरलेले असतील.

फोटो स्रोत, Getty Images
एक गोष्ट मात्र अगदी नक्की आहे- आजपासून येणाऱ्या पुढील शतकभरासाठी का होईना चीन हा एक भुरळ पाडणारा देश असणार आहे, त्यांच्यासाठी जे चीनमध्ये राहतात आणि त्यांच्यासाठीही जे अप्रत्यक्षपणे चीनबरोबरच असतात. अर्थातच त्यांच्या समृद्ध इतिहासातूनच त्यांची वर्तमानाची वाटचाल सुकर होणार आहे आणि भविष्याची दिशाही त्यातूनच गवसणार आहे.
( या लेखातील मंत ही लेखकाची वैयक्तीक मतं आहेत. लेखक सध्या ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या चायना सेंटरमध्ये संचालक आहेत. )
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








