भारतातल्या अफूसाठी जेव्हा ब्रिटन आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं...

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
- Author, एनी गिब्सन
- Role, बीबीसी हिस्ट्री
ही गोष्ट आहे 1840 मधली. ब्रिटनच्या युद्धनौकांनी चीनच्या पर्ल नदीकाठच्या भागात युद्ध पुकारलं. चीनमध्ये तेव्हा किनाऱ्यानजीकच्या भागांमध्ये सुरक्षा सक्षम नव्हती. ब्रिटनच्या या हल्ल्यासमोर चीन फार काळ टिकाव धरू शकला नाही आणि चीनने शरणागती पत्करली.
अफूसाठी लढलं गेलेलं हे पहिलं युद्ध होतं आणि यात हजारो माणसं मारली गेली आणि तेही मुक्त व्यापाराच्या नावावर. चीनमध्ये अफूचा व्यापार हा फायदा मिळवून देणारा व्यवसाय होता मात्र तो बेकायदेशीर होता.
स्कॉटलंडमधली दोन माणसं या व्यापाराशी संलग्न होती. सुरुवातीच्या काळात या दोघांनी अफूच्या व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली. विल्यम जार्डाइन डॉक्टर होते आणि उद्योजकही.
चहा ते अफू
चीनमध्ये एका वेश्यालयातल्या भेटीनंतर जेम्स मेथेसन विल्यम यांचे व्यासायिक साथीदार झाले. 1832 मध्ये दोघांनी मिळून जार्डाइन, मॅथेसन अँड कंपनी उभारली. त्याचं मुख्यालय दक्षिण चीनमधल्या कँटन शहरात होतं. कँटन शहर आता ग्वांगझु नावाने ओळखलं जातं.

फोटो स्रोत, NATIONAL PORTRAIT GALLERY
चीनच्या या भागातूनच विदेशी लोकांना व्यापारउदिमाची परवानगी होती. ते चहाच्या बदलात अफू देण्याचा व्यापार करत असत. ब्रिटनमध्ये चहाचं वेड प्रचंड होतं. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटन दरवर्षी कँटनमधून 60 लाख पाऊंड एवढ्या प्रचंड रकमेचा चहा आयात करत असे.
चांदीचा व्यापार
मात्र लवकरच ब्रिटनला या व्यापारात अडचणी जाणवू लागल्या कारण चीनची अशी अट होती की, चहाच्या किमतीत केवळ चांदी स्वीकारू. ब्रिटनने चहाच्या किमतीच्या बदल्यात भांडी, वैज्ञानिक उपकरणं, लोकरीचे कपडे देऊ असं सांगितलं. पण चीनने अशा व्यवहाराला मान्यता दिली नाही.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
चीनचे तत्कालीन सम्राट कियान लोंग यांनी किंग जॉर्ज तृतीय यांना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं की, आमच्याकडे या सगळ्या वस्तू आहेत आणि चांगल्या दर्जाच्या आहेत. सर्वसाधारण दर्जाच्या वस्तूंना आमच्यालेखी काही किंमत नाही. तुमच्या देशात तयार झालेल्या या वस्तू आमच्यासाठी खास उपयोगाच्या नाहीत.
अफूची तस्करी
पन्नास वर्षांच्या काळात ब्रिटनने चीनला 270 लाख पौंड रकमेची चांदी दिली. या बदल्यात त्यांना 90 लाख पौंड रकमेचं सामान विकता आलं. ब्रिटनसाठी चीनहून येणारा चहा हळूहळू महागू लागला. चीनमधून पैसा कमावण्याचा दुसरा मार्ग ब्रिटनला दिसत नव्हता.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
कायदेशीर पातळीवर तरी असा कुठला मार्ग नव्हता. मात्र त्यावेळी भारतातल्या ब्रिटनच्या उद्योगपतींनी याकडे एक संधी म्हणून पाहायचं ठरवलं. बंगाल भागात अफूची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असे. चीनमध्ये अफूवर प्रतिबंध होता. मात्र तसं असलं तरी चीनमधल्या उपचार पद्धतीत अफूचा उपयोग हजारो वर्षांपासून होतो आहे.
चीनमध्ये प्रतिबंध
पंधरावं शतक उजाडलं तसं चीनमधील माणसं अफू तंबाखूत मिसळून नशेसाठी याचा वापर करू लागले. अल्पावधीत चीनमधल्या एका मोठ्या वर्गाला अफूचं व्यसन लागलं. लोक अफूच्या विळख्यातच सापडले. याचे सामाजिक दुष्परिणामही दिसू लागले. अफूची शिकार झालेले लोक यासाठी आपलं सामान विकू लागले.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
1729 मध्ये चीनचा राजा योंगझेंगने अफूच्या खरेदीविक्रीवर बंदी घातली. नशेसाठी याचा वापर करण्यावर संपूर्ण प्रतिबंध लागू केला. शंभर वर्ष उलटल्यानंतरही चीनचं अफूप्रेम जराही कमी झालं नाही. इंग्रजांनी चीनच्या या अफूप्रेमाचा फायदा घेण्याचं ठरवलं.
भारताचा पूर्व भाग
1836 मध्ये भारतातून दरवर्षी तीस हजार पेट्या भरून अफू चीनमध्ये पोहोचवलं जात असे. जार्डाइन, मॅथेसन अँड कंपनीने आपल्या कारभाराचा एक चतुर्थांश भाग यानेच व्यापला होता. चीनमध्ये अफूच्या खरेदीविक्रीवर सरकारने घातलेली बंदी धुडकावत ब्रिटनने चीनमधून पैसा कमावण्याचा मार्ग शोधून काढला.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
हाँगकाँग विद्यापीठातील प्राध्यापक जेन कॅरोल यांच्या मते, भारताच्या पूर्व प्रदेशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणावर होते हे ब्रिटिशांना समजलं. चीनमध्ये अफूच्या तस्करीतून बक्कळ पैसे कमावता येईल हेही त्यांच्या लक्षात आलं. कँटनची शहराची भौगोलिक स्थिती अशा तस्करीसाठी अनुकूल होती.
चीनची कारवाई
प्राध्यापक जॅन कॅरोल यांनी सांगितलं की, छोट्या बोटींमध्ये अफू भरून सहजतेने कँटनच्या किनाऱ्यावर पोहोचवल्या जात. किनाऱ्यावर माल उतरवून घेण्यासाठी कोणीतही हजर असे. आर्थिकदृष्ट्या त्यांचा खूप फायदा होत होता.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
ब्रिटनने चीनचे नियम पायदळी तुडवणं फार काळ लपून राहिलं नाही. 1839 मध्ये चीनचे राजा डाओग्वांग यांनी नशेच्या पदार्थांविरोधात युद्ध पुकारलं. पाश्चिमात्य देशातील व्यापाऱ्यांच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकायला सुरुवात केली.
ब्रिटन सरकार
कँटनमधल्या 13 फॅक्टरी भागातल्या गोदामांमध्ये छापे टाकण्यात आले आणि चीनच्या सैनिकांनी याला सील ठोकलं. विदेशी व्यापाऱ्यांना शरणागती पत्करण्यास चीनने भाग पाडलं. चीनने केलेल्या कारवाईत 20 लाख पौंडाचं सामान जप्त करण्यात आलं. यामध्ये अफूच्या 20 हजार पेट्या तसंच 40 हजार ओपियम पाईप्सही होते.

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
या जप्तीनंतर विल्यम जार्डाइन कँटनहून लंडनला रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री लॉर्ड पाल्मस्टोन यांची भेट घेतली. चीनवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी यासाठी मागणी केली. ब्रिटनला भारतातून मिळणाऱ्या अफूची भूमिका निर्णायक होती. यामुळे ब्रिटनच्या सरकारने चीनमध्ये नौदल पाठवण्याचा निर्णय घेण्यासाठी फार वेळ लागला नाही.
चीन पराभूत
जून 1840 मध्ये ब्रिटनच्या 16 युद्धनौका आणि 27 जहाजं चीनच्या पर्ल च्या दिशेने रवाना केलं. या जहाजांवर 4000 सैनिक होते. ब्रिटनच्या ताफ्यात नेमेसिस नावाची युद्धनौका होती यावर दोन मैलापर्यंत क्षमता असलेलं रॉकेट लॉन्चर होतं.
या हल्ल्यासाठी चीन तयार होतं मात्र ब्रिटनची ताकद किती याचा अंदाज त्यांना आला नाही. पुढच्या दोन वर्षात ब्रिटिशांनी आपला कारभार शांघायपर्यंत वाढवला.
असमान तह
चीनचे बहुतांश सैनिक अफूचे व्यसनी होते. त्यांना प्रत्येक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. या युद्धात चीनचे 20 ते 25 हजार सैनिक मारले गेले. दुसरीकडे ब्रिटनने 69 सैनिकांना गमावलं. या युद्धाने चीन हादरून गेला.

फोटो स्रोत, FELICE BEATO/GETTY IMAGES
ऑगस्ट 1842 मध्ये एचएमएस कॉर्नवालिस या युद्धनौकेवर नानकिंग भागाजवळ ब्रिटिशांनी चीनशी तह केला. या तहाला जग 'अनइक्वल ट्रिटी' या नावाने ओळखतं.
या तहाअंतर्गत चीनने पाच बंदरं ब्रिटिशांकरता खुली केली. अफूच्या कारभारात झालेलं नुकसान आणि युद्धाची भरपाई म्हणून चीनने ब्रिटनला 2 कोटी 10 लाख सिल्व्हर डॉलर चुकते केले.
या तहाच्या माध्यमातून ब्रिटनने हाँगकाँगवर कब्जा मिळवला. चीनमध्ये अफूचा कारभार वाढवण्यासाठी ब्रिटनला हाँगकाँग उपयोगी ठरलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








