तवांग: अजूनही 1962 च्या युद्धाची गडद छाया असलेला भारताचा सीमाभाग

तवांग
    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

"तवांगमध्ये त्या काळात धानाची कापणी सुरू होती. त्या लोकांनी रात्रं दिवस चारही बाजूंनी हल्ला करत तवांमध्ये प्रवेश केला, आणि लोक इथून पळून जाऊ लागले."

थुतान चेवांग यांचं वय त्यावेळी अवघं 11 वर्ष होतं. पण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या युद्धाच्या अनेक घटना त्यांना आजही अगदी लख्खपणे आठवतात.

तो 1962 सालचा ऑक्टोबर महिना होता. चीननं भारताच्या ईशान्य भागात नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी (सध्याचा अरुणाचल प्रदेश) च्या भागात अचानक हल्ला केला होता.

हा हल्ला एवढा वेगानं आणि जोरदार होता की, काही भागामध्ये कडवा प्रतिकार करूनही भारतीय सैन्याचा चीनच्या सैन्यासमोर निभाव लागत नव्हता.

सीमेपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेलं तवांग लवकरच चीनच्या ताब्यात गेलं आणि त्यानंतर एका महिन्यासाठी चीनच्याच ताब्यात होतं.

आता 60 वर्षांनंतर त्या युद्धाच्या आठवणी काहीशा धूसर बनल्या असल्या तरी, आजही त्याची काळी छाया या भागातील लोकांच्या मनावर कायमची घर करून बसलीय.

मोठे झाल्यानंतर थुतान चेवांग भारताच्या निमलष्करी दलात शिपाई बनले आणि 28 वर्षांच्या नोकरीनंतर निवृत्त झाले.

युद्धाच्या काळात लोकांनी ज्या अडचणींचा सामना केला, त्या लोक कधीही विसरू शकणार नाहीत, असं ते म्हणतात.

'वाईट स्वप्नासारखं युद्ध'

"या परिसरात त्याकाळी रस्ते नव्हते. लोक दिवस-रात्र जंगलांमधून प्रवास करून सुरक्षितपणे खालच्या भागात पोहोचले होते. त्यांनी खेचरांवर खाण्या-पिण्याचं सामान (राशन) लादून प्रवास केला होता. ते सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं," असं थुतान चेवांग म्हणतात.

आपला तरुणपणातला फोटो दाखवताना थुतान चेवांग
फोटो कॅप्शन, आपला तरुणपणातला फोटो दाखवताना थुतान चेवांग
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तवांगमध्ये राहणाऱ्या नवांग छोट्टा यांनी 1962 च्या युद्धाची परिस्थिती स्वतः अनुभवणाऱ्या अनेक ज्येष्ठांशी बोलून एक पुस्तकही लिहिलं आहे.

"सर्वांना जीवाची काळजी होती. लोकांना सुरक्षित ठिकाणी जायचं होतं. त्याकाळी इथं गाड्या तर नव्हत्याच, त्यामुळं लोक पायी जाऊन-जाऊन तरी किती लांब जाणार याचा अंदाज तुम्ही लावू शकता," असं ते म्हणतात.

लोबसांग त्सेरिंग 1962 मध्ये 11 वर्षांचे होते. चीननं हल्ला केल्यानंतर त्यांचे आई-वडील त्यांना आसामला घेऊन गेले होते, असं ते सांगतात. युद्ध संपल्यानंतरच ते तवांगला परत येऊ शकले होते.

सुमारे एका महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये चीनं युद्धविरामाची घोषणा केली आणि त्यांचं सैन्य मागं बोलावलं. पण अनेक लोकांना यावर विश्वासच बसत नव्हता.

तवांगमध्ये राहणारे ल्हाम नोरबू म्हणतात की, "चीनचं सैन्य मागं हटलं असं सांगण्यात आलं. पण काही लोक म्हणत होते की, हे सर्व खोटं असेल. कारण चीनचा युद्धात विजय झाला तर मग ते मागं का सरकतील?

काही लोकांना शंका होती की, कदाचित भारतीय अधिकारी त्यांच्याशी खोटं बोलत असतील आणि त्या लोकांना चीनच्या ताब्यात दिलं जाईल. पण असं काही नसल्याचं त्यांना पटवून देण्यात आलं, त्यानंतरच ते लोक परत आले."

युद्धाच्या भयावह आठवणी

तवांगहून जीव वाचवून पळालेले लोक काही महिन्यांनी परतत होते तेव्हा रस्त्यात त्यांना अनेक भयावह दृश्यं पाहायला मिळाली.

आजही त्या दृश्यांच्या आठवणींनी रिनचिन दोरजे यांच्या मनात भीतीचं सावट दाटून आल्याशिवाय राहत नाही. "आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांचे मृतदेह रस्त्यांवर ठेवल्याचं आम्ही पाहिलं," असं ते म्हणाले.

1962 च्या युद्धात वापरलं गेलेलं बंकर
फोटो कॅप्शन, 1962 च्या युद्धात वापरलं गेलेलं बंकर

ल्हाम नोरबू आजही ती दृश्यं विसरू शकलेले नाहीत. "चिनी सैनिकांनी त्यांच्या सैनिकांचे मृतदेह गाड्यांमधून परत नेले आणि भारतीय सैनिकांचे मृतदेह जंगलांमधून बाहेर आणून, रस्त्यावर ठेवले. खूप लोक मारले गेले होते," असं ते म्हणाले.

नवांग छोट्टा यांच्या मते, त्यावेळी चिनी लष्करानं स्थानिक लोकांचा विश्वास जिंकून त्यांच्याकडून मदत मिळवण्याचा खूप प्रयत्न केला होता.

"याबाबत जेव्ही मी आमच्या इथल्या ज्येष्ठांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की, चीनच्या लष्कराला कधीही इथल्या लोकांचा विश्वास जिंकण्यात यश आलं नाही आणि त्यांना एवढी कमी मदत मिळाली की, त्याचा उल्लेखही करता येणार नाही," असं ते म्हणतात.

कायम चर्चेत राहिलेलं तवांग

तवांग भारताच्या ईशान्येतील अरुणाचल प्रदेश राज्याचा कायमच चर्चेत राहिलेला भाग आहे.

बौद्ध धर्माचं एक मोठं केंद्र असण्याबरोबरच याठिकाणचं 14वे दलाई लामा तेन्जिन ग्यात्सो यांच्याशी एक खास नातंही आहे.

1959 मध्ये तिबेटहून आल्यानंतर 14वे दलाई लामा तेन्जिन ग्यात्सो काही काळासाठी तवांगच्या मॉनेस्ट्रीमध्येच राहिले होते.

तवांग हा प्रदेश 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या काळात सुमारे महिनाभर चीनच्या ताब्यात होता.

हा आजही दोन्ही देशांमधील वादाचं कारण ठरलेला आहे.

याच वादाची झलक गेल्या वर्षी डिसेंबरच्या महिन्यात पाहायला मिळाली होती. त्यावेळी तवांगच्या के यांग्त्जे परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

चीननं लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे एलएसीवर अतिक्रमण करून पूर्वीची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्याचं भारतानं तेव्हा म्हटलं होतं.

नवांग छोट्टा आपलं पुस्तक वाचताना
फोटो कॅप्शन, नवांग छोट्टा आपलं पुस्तक वाचताना

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत यावर सरकारच्या वतीनं निवेदन केलं होतं. 'भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांना भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्यापासून रोखलं आणि चिनी सैनिकांना त्यांच्या पोस्टवर परत जाण्यास भाग पाडलं,' असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

पण या भागात झालेला हा पहिला संघर्ष नव्हता. ऑक्टोबर 2021 मध्येही दोन्ही देशांची लष्करं यांग्त्जेमध्ये समोरा-समोर भिडली होती.

'लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल' पर्यंतचा प्रवास

तवांग शहरापासून सध्याची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अवघी 35 किलोमीटर अंतरावर आहे.

या ठिकाणापर्यंच पोहोचण्यासाठी बुम-ला घाटाच्या वळणाच्या रस्त्यांवरून प्रवास करतच जावं लागतं.

बुम-ला घाटातून प्रवास करताना 15 हजार फूट उंचीवर हवेतील ऑक्सिजनची कमतरता नक्कीच जाणवते.

त्याचबरोबर अनेक नैसर्गिक तलावही आढळतात पण उन्हे तापमानामुळं त्याठिकणचं पाणीही गोठलेलं असतं.

याचठिकाणी 1962 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धादरम्यान अनेक लढाया झाल्या होत्या.

त्या युद्धाच्या काही खाणा-खुणा आजही या परिसरात पाहायला मिळतात.

ठिक-ठिकाणी रस्त्याच्या किनाऱ्यावर आजही काही बंकर आहेत. त्याठिकाणाहून भारतीय लष्करानं चीनच्या हल्ल्याचा प्रतिकार केला होता.

तवांग बाजार
फोटो कॅप्शन, तवांग बाजार

हे बंकर आज रिकामे असले तरी, एलएसीच्या जवळच्या परिसरात भारतीय लष्कराची प्रचंड प्रमाणावरील उपस्थिती पाहायला मिळते.

दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून तणावाचं वातावरण आहे, त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिक पाहून आश्चर्य मात्र वाटत नाही.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य असलं तरी अनेक पर्यटक परवानगी घेऊन दररोज तवांगहून एलएसीपर्यंतचा प्रवास करतात.

पर्यटकांना बुम-ला घाटातून एलएसीपर्यंत घेऊन जाणं हे तवांगमधील टॅक्सी चालकांच्या उत्पन्नासाठीचं एक मोठं साधन आहे.

तवांग युद्ध स्मारक

भारतीय लष्कराच्या मते, या युद्धादरम्यान कामेंग सेक्टरमध्ये 2,420 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तवांगमध्ये एक युद्ध स्मारक तयार करण्यात आलंय.

याठिकाणी असलेल्या काही दुर्मिळ फोटोंमध्ये 1959 मधला 14 व्या दलाई लामांचा फोटोदेखील आहे. दलाई लामा त्यावेळी तिबेटमधून भारतात आले होते.

या स्मारकात युद्धाची छायचित्रं, शस्त्रं आणि सैनिकांच्या इतर साहित्याच्या माध्यमातून आजही 1962 च्या युद्धातील भयावह आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

नवांग छोट्टा यांच्या मते, "आम्ही ती घटना विसरत नाही याचं एक कारण म्हणजे, तो आमच्यासाठी एक मोठा धडा होता. शत्रूच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसतो, हा धडा त्यावेळी आम्ही सर्वांनी घेतला आहे."

'कॅफे 62'

1962 च्या युद्धाशी संबंधित आठवणी आज धूसर झाल्या असल्या तरी, लोकांच्या मनातून पूर्णपणे मिटलेल्या नाहीत.

तवांगहून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर जंग नावाच्या छोट्याशा गावात आम्हाला असंच एक उदाहरण पाहायला मिळालं.

लष्करात 21 वर्ष नोकरी केल्यानंतर रिनचिन ड्रेमा निवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी एक कॅफे सुरू केलं, 'कॅफे 62'.

तवांग युद्ध स्मारक
फोटो कॅप्शन, तवांग युद्ध स्मारक

"1962 मध्ये चीनबरोबर जे युद्ध झालं होतं, त्यावेळी आमच्या इथं असलेल्या वृद्धांना प्रचंड त्रास देण्यात आला होता. त्याच्या आठवणींवरूनच आम्ही कॅफेचं नाव ठेवलं आहे," असं रिनचिन ड्रेमा यांनी सांगितलं.

'कॅफे 62' च्या माध्यमातून रिनचिन ड्रेमा यांना 1962 युद्धाच्या आठवणी जतन करायच्या आहेत.

'सीमेवरील चकमकीत नवीन काही नाही'

तवांग शहरातील लोकांच्या मते, दोन्ही देशातील सैनिकांदरम्यान सीमेवर होणारी चकमक, ही आता त्यांच्यासाठी अगदी सामान्य बाब बनली आहे.

त्यांच्या मते, डिसेंबरमध्ये झालेल्या संघर्षानंतरही तवांमध्ये भीती किंवा तणावाचं वातावरण नव्हतं. पण व्यवसायावर त्याचा नक्कीच परिणाम झाला.

करमू या तवांगमध्ये कपड्यांचं एक दुकान चालवतात. त्यांच्या मते, "आमच्या सारख्या स्थानिक लोकांना काहीही भीती नाही. अनेकदा तर माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतरच आम्हाला असं काही तरी घडलं आहे हे समजतं. पण मीडियामध्ये असं काही तरी आल्यानंतर इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होते."

तवांगमधील बाजारपेठेत गिफ्ट शॉप चालवणारे तेन्जिन दारगे यांनीही, सीमेवर दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या संघर्षाचा तवांच्या लोकांवर फारसा काही परिणाम होत नाही, असं ठामपणे सांगितलं.

त्यांच्या मते, "इथं अगदी सुरळीत जीवन सुरू आहे. आम्हाला बातम्यांमधूनच संघर्ष झाल्याचं समजतं. आमचं जीवन सुरळीतपणे सुरू अशतं. त्यात काहीही चढ-उतार नसतात."

तवांगच्या बहुतांश लोकांच्या मते, 1962 च्या तुलनेत भारतीय लष्कर आता कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक सज्ज आहे. स्थानिक लोकांच्या मते, 1962 मधील भारतीय लष्कर आणि आजचं भारतीय लष्कर यात खूप फरक आहे.

तवांग

तसंच गेल्या काही वर्षांमध्ये या भागातील रस्त्यांचादेखील खूप विकास झाल्याचंही लोक सांगतात. त्यामुळं भारतीय लष्कराला सीमेपर्यंत सैनिक आणि रसद पुरवणं सहज शक्य झालंय.

नवांग छोट्टा यांच्या मते, "तवांगमधील कोणत्याही स्थानिक व्यक्तीशी बोललं तर ते म्हणतात की, भारतीय लष्कर तर आहेच पण गरज पडली तर आम्हीदेखील मागे उभे आहोतच."

पण काही लोकांच्या मते, चीनचा विषय असेल तर खबरदारी बाळगणं हे कधीही योग्य ठरतं.

थुतान चेवांग यांच्या मते, "ते लोक (चीन) दगाबाजी करतच राहतात. दिवसा बैठका घेतात आणि रात्रीच्या वेळी हल्ला करतात. त्यामुळं आम्हाला कायम कान आणि डोळे उघडे ठेवावे लागतील. त्यांच्यावर किंचितही विश्वास ठेवता येणार नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)